लिओ टॉल्स्टॉय एक प्रसिद्ध रशियन लेखक होता. त्याला एकदा आपल्या कामात मदत करण्यासाठी एका माणसाची आवश्यकता होती.त्या संदर्भात त्याने आपल्या काही मित्रांना सांगितले की, त्यांच्या पाहण्यात अशी एखादी व्यक्ती असेल तर तिला माझ्याकडे पाठवा.
काही दिवसांनी एका मित्राने लिओकडे एका उमेदवाराला पाठवले. तो सुशिक्षित होता आणि त्याच्याकडे विविध प्रमाणपत्रे आणि पदव्या होत्या. ती व्यक्ती टॉल्स्टॉयला प्रत्यक्ष भेटली, पण सर्व पदव्या असूनही टॉल्स्टॉयने त्याला कामावर घेतले नाही, उलट अशी कोणतीही पदवी नसलेल्या दुसऱ्या व्यक्तीची निवड केली.
त्यावर त्या मित्राने लिओला विचारणा केली “लिओ,मला तुझ्या अशा वागण्याचे कारण कळेल का?”
टॉल्स्टॉय म्हणाला, “मित्रा, मी निवडलेल्या व्यक्तीकडे अनेक अमूल्य प्रमाणपत्रे आहेत, त्याने माझ्या खोलीत येण्यापूर्वी दारावर टकटक करून माझी परवानगी घेतली. दारात ठेवलेल्या डोअरमॅटवर त्याचे शूज साफ करून नंतर खोलीत प्रवेश केला. त्याचे कपडे साधे, पण व्यवस्थित आणि नीटनेटके होते. मी त्याला विचारलेल्या सर्व प्रश्नांची त्याने बिनदिक्कतपणे उत्तरे दिली आणि मीटिंग संपल्यावर तो नम्रपणे माझी रजा घेऊन परत गेला. त्याने कोणाचीही खुशामत केली नाही, कोणाचा वशिला किंवा शिफारस आणली नाही, जास्त शिकलेला नसून देखील त्याचा त्याच्या कर्तृत्वावर विश्वास होता, फार कमी लोकांकडे हि प्रमाणपत्रे आहेत. आणि तू ज्याला पाठवलेस त्याच्याकडे यापैकी कोणतेही गुण म्हणजेच प्रमाणपत्र नव्हते, मग मला सांग, त्याच्या या कागदी पदव्यांची किंमत काय?”
टॉल्स्टॉयचा मुद्दा मित्राला समजला, त्याला संस्काराच्या प्रमाणपत्रांचे महत्त्व कळले.
वपू काळेनी आपल्या एका कथेत म्हटलेच आहे
“सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट बनतं.”
त्यामुळे नम्रता हे सर्वात मोठे सर्टिफिकेट! ते कोणत्याही विद्यापीठात प्राप्त करता येत नाही.