परंतु इजिप्तमध्यें ज्या गुलामांना सोडून तो आला होता, त्यांच्याविषयींचा विचार त्याला सचिंत करी.  आपल्या बेडौन मित्रांजवळ त्यांच्याविषयीं तो बोले.  त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाविषयीं व आजच्या अध:पतित स्थितीविषयीं तो सांगे.  आपल्या या हतपतित बंधूंची करुण-कहाणी ऐकून बेडौन सहानुभूति प्रकट करीत.  इजिप्तमधील हे लोक त्यांचेच होते.  बेडौनांचाहि अब्राहाम हाच मूळ पुरुष.  ज्या अब्राहामनें आपल्या जातीला नवें घर, नवें स्थान मिळावें म्हणून सर्व वाळवंटांतून धैर्याचें नव तेज पेटवलें, तोच अब्राहाम अरब बेडौनांचा व इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंचा पूर्वज.

हळूहळू मूसाच्या मनांत एक विचार आला.  इजिप्तमधील दास्यमग्न ज्यूंनीं इकडे पळून यावें व वाळवंटांत स्वतंत्र व्हावें असें त्याला वाटलें आणि नंतर पूर्वजांचे तें पहिलें स्थान-कनान-येथेंहि या सर्वांना आपण घेऊन जाऊं असें त्याला वाटलें.  ज्यूंना त्यांचें पहिलें स्थान परत देणें, त्यांची जुनी मातृभूमि त्यांना परत देणें, त्यांना नवधर्म देणें ! किती किती महनीय उदात्त असें हें ध्येय !  हें भव्य दिव्य स्वप्न मनांत खेळवीत मूसा सिनाई पर्वतावर शेळ्या-मेंढ्या चारीत असे.

याच सुमारास इजिप्तमधील राजा मरण पावला.  नवीन राजा गादीवर बसला.  इजिप्तमधून पूर्वेकडे येणार्‍या कारवानांच्या तोंडून तिकडील या घडामोडी मूसाला कळल्या.  कृति करायला योग्य संधि आली होती.  आणि मूसा पुन्हा इजिप्तमध्यें गेला.  तो त्या गुलामांत सर्वत्र हिंडूंफिरूं लागला.  बंड करा असें तो त्यांना सांगूं लागला. ''कामाचीं हत्यारें खालीं ठेवा.  संप करा.  काम बंद पाडा.  दगड वाहूं नका ; चढवूं नका ; विटा भाजूं नका.'' असें तो सांगूं लागला.  जुलमी धन्याचें काम काय म्हणून करावयाचें ?

इजिप्शियन राजपुत्र असणारा मूसा, अरबस्तानांत धनगर होऊन राहणारा मूसा आतां इजिप्शियन श्रमजीवींचा बंडखोर पुढारी झाला.  इतिहासांतील विटा भाजणार्‍या कामगारांचें पहिलें संघटन त्यानें निर्मिलें.  ते पहिलें कामगार-युनियन.

- ६ -

मूसानें इजिप्शियन राजाकडे ''ज्यूंना मुक्त करा'' असा अर्ज केला.  परंतु राजानें प्रथम लक्ष दिलें नाहीं.  परंतु पुढें राजानें आपलें मन बदललें.  हे ज्यू दास रोगग्रस्त होते.  मरतुकडे होते.  अत्यंत गलिच्छ वस्तींत ते रहात.  इजिप्त राष्ट्राला अशा लोकापासून भय आहे असें राजाला वाटलें.  इजिप्तमधील कितीतरी रोगांच्या सांथी ज्यूंच्या या भिकार वस्तींत प्रथम सुरूं होत.  मूसानेंहि ज्यूंना स्वच्छ सांगितलें कीं इजिप्तमधील दहा प्लेगांची जबाबदारी तुमच्यावर आहे.  तुमच्या डोक्यावर तें पाप आहे.  शेवटीं जेव्हां मूसाच्या नेतृत्वाखालीं ज्यू इजिप्तमधून निघालें तेव्हां त्यांना परवानगी देतांना इजिप्शियन राजाला वाईट न वाटतां उलट आनंदच झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel