पवित्र कराराच्या पविदोस्तांनीं मन्रोच्या घोषणेचा नीट विचार केला व आली दडपशाही युरोपांतील असंरक्षित राष्ट्रांपुरती ठेवली. पवित्र करारवाल्यांचा मुख्य हेतु अनियंत्रित सत्तेला जगांत धोका असूं नये हा होता. 'फोडा व झोडा' हें त्यांचे ब्रीदवाक्य होतें. 'युरोपाचे उध्दारकर्ते', 'युरोपला वांचविणारे', असे स्वत:लाच संबोधणारीं युरोपचीं डाकू राष्ट्रें सर्व युरोपला 'त्राहि भगवन् !' करीत होतीं. पण सर्वांहून अधिक त्रास कोणाला झाला असेल तर तो इटलीला. इटलीचे शतखंड करण्यांत आले होते. ऑस्ट्रियन राजघराण्यांतील अनेकांना हे तुकडे वांटून देण्यांत आले होते.

पण पांगलेलें पाणी ज्याप्रमाणें एका प्रवाहांत येऊं पाहतें, त्याप्रमाणें एकाच रक्ताचे इटॅलियन लोक जरी विखुरलेले होते, तरी ते अधिकच उत्साहानें व उत्कंठेनें एकत्र येऊं पाहत होते. त्यांच्यावर जितका जितका अधिक जुलूम होई, जितकी जितकी त्यांची पांगापांग करण्यांत येई, तितकी तितकी त्यांच्या ऐक्यभावनेची तीव्रता अधिकाधिक प्रखर होई. युरोपच्या व्यवहारी मुत्सद्दयांना इटलीचें एकीकरण हें एक अशक्य स्वप्न वाटत होतें, पण मॅझिनीला मात्र असें वाटत नव्हतें. त्याचें रक्त जणूं प्रेषितांचें होतें ! इटलीचें एकीकरण ही अत:पर एक कल्पना न राहता तीं मॅझिनीचा धर्म झाली. त्याच्या मनश्चक्षूंसमोर केवळ इटलीचेंच एकीकरण नव्हतें, तर सारें जगच एका कुटुंबाप्रमाणें वागत असावें असें ध्येय खेळत होतें. एकाच ईश्वराची पूजा करणारे, मोकळेपणानें एकत्र राहणारे व प्रेमस्वरूप परमेश्वराची उपासना करणारे एकत्र नांदत आहत असें तो आपल्या मन:सृष्टींत पाहत होता.

तो १८०५ सालीं जन्मला. वयाच्या बाराव्या वर्षीच तो राजकारणांत रस घेऊं लागला. आईबरोबर जिनेव्हाच्या नव्या राजमार्गानें तो जात होता. एका क्रांतिकारक उठावांत पराभूत झालेल्यांचा एक निराधार जथा त्याला भेटला. ते निराधार क्रान्तिकारक स्पेनमध्यें जाऊं इच्छीत होते. त्यांस मदत हवी होती. मॅझिनी लिहितो, ''त्या दिवशीं एक अस्पष्ट व संमिश्र विचार माझ्या मनांत आला. तो माझ्या देशाबाबत होता कीं स्वातंत्र्याबाबत होता हें मला सांगता येत नाहीं. पण त्या विचारांत येवढा भाग होता कीं, इटॅलियनांनीं स्वत:च्या स्वातंत्र्यासाठीं लढलें पाहिजे; व ते लढूंहि शकतील. माझे आईबाप लोकशाही तत्त्वांचे पुजारी होते. त्यांच्या शिकवणींत मी वाढलेला. नकळतच मी समानतेच्या भक्तगणांत सामील झालों होतों. मी समतेचा उपासक झालों होतों. माझे आईबाप उच्चनीचभेद मानीत नसत. ते रावांस व रंकांस समान लेखीत. व्यक्ति कोणत्या वर्गाची हें ते पाहत नसत. ते व्यक्तींतील मानव्य व प्रामाणिकपणा पाहत.''

विद्यापीठांत असतांना तो विद्यार्थ्यांच्या खेळांत फारसा सामील होत नसे. तो सदैव तन्मय व गंभीर असे व एकदम पोक्त झाल्याप्रमाणें दिसे. या वेळेस तो सदैव काळा पोषाख करी. आपल्या दु:खी देशासाठीं तो जणूं सुतकी होता ! त्यानें आपल्याभोंवती समविचाराचे स्नेही जमविले. जप्त झालेलीं पुस्तकें तो चोरून आणी. ज्या गोष्टींची चर्चा करण्यासहि परवानगी नसे त्या गोष्टींची तो चर्चा करी. परंतु अजून स्वातंत्र्याच्या बाबतींतील त्याची भक्ति तशीच त्याची उत्कटता शाब्दिक होती,  चर्चात्मक होती, अकॅडॅमिक होती. अजून तो गटेसारखा वाङ्मयीन बंडखोरच होता,  राजकीय बंडखोर झाला नव्हता. त्यानें एक जहाल व क्रांतिकारक पत्र सुरू केलें. डान्टेवर त्यानें एक नवविचारप्रवर्तक निबंध लिहिला. त्यानें इटलींत वैचारिक क्रांति सुरू केली व बौध्दिक खळबळ माजविली.

पण तो आपल्या मायभूमीची दैना पाहून केवळ मनांत हळहळणारा नव्हता. अन्याय व दु:खें यांनीं त्याच्या हृदयांत खोल घर केलें होतें. अन्यायविरुध्द केवळ शब्दांची तलवार परजीतच राहणें त्याला शक्य नव्हतें. कोळसे जाळणारांची कार्बोनरी नामक एक गुप्त संघटना होती. पदवीधर झाल्यावर तो तिचा सभासद झाला. त्या संस्थेचे सभासद ऑस्ट्रियाच्या जुलुमाविरुध्द इटलींत क्रान्ति करण्याची खटपट करीत होते. मॅझिनी फार दिवस या संस्थेचा सभासद राहिला नाहीं. संस्थेचे सभासद मूर्खपणाच्या गोष्टी बोलत. ते खर्‍या कामाविषयीं फारसा विचार करीत नसत. देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न मुख्य; पण तो जणूं मागें पडला होता. त्या संस्थेच्या नाना विधींत व समारंभांत त्याला गोडी वाटत नसे. त्यांनीं आपल्या निरनिराळया चळवळींत सामील होण्यास मॅझिनीला बोलावलें नाहीं. १८३० सालीं त्याला संशयावरून पकडण्यांत आलें. जिनेव्हाचा गव्हर्नर लिहितो, ''तो बुध्दिमान् तरुण होता. रात्रीं एकटेंच फिरण्याची त्याला फार आवड होती. तो कशाचें चिंतन करी ? तो आपल्या विचारांची दुसर्‍या कोणाला फारशी कल्पना देत नसे. सरकारला असे बुध्दिमान् लोक फारसे आवडत नाहींत. ज्या बुध्दिमंतांचे विचार सरकारला समजत नाहींत ते सरकारला नको असतात.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel