लेखिका - तेजस्वी सुरेंद्र सावंत

जीवनात ‘आई’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्व आहे. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर म्हणूनच आपला आत्मा हा ‘आई’ या शब्दातचं सामावलेला आहे. जगात सर्व वस्तूंची, गोष्टींची कमतरता, उणीव आपण पूर्ण करू शकतो परंतु कुटुंबात जर आईची साथ (आधार) नसेल तर संपूर्ण जग कोसळल्यासारखे वाटते. तसेच मनालीच्या जीवनात सुद्धा घडले, मनालीच्या वयाच्या अकराव्या वर्षीच तिच्या बाबांचे छत्र हरवले आणि तिची आणि तिच्या दोन लहान भावांची सर्वस्वी जबाबदारी आईवर येऊन पडली. त्या चौघांचे कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीमध्ये विस्तारलेलं होतं.

मनालीचे बाबा एका खासगी दुकानात दोन हजार रुपये पगारावर नोकरी करत होते आणि हा त्यांच्या कुटुंबाचा आणि शिक्षणाचा खर्च तिच्या बाबांना पेलवनासा झाला. आणि म्हणूनच कुटुंबाचा आधारवड म्हणून मनालीची आई बाबांना मदत करणेस आणि संसाराला हातभार लावण्यास पुढे झाली. तिच्या बाबांचे छत्र हरपल्यावर   तिच्या व भावांच्या शिक्षणाची व संसाराची सर्वस्वी जबाबदारी आईवर येऊन पडली. सकाळपासून दुपारपर्यंत पाच - सहा घरची धुणे - भांडी करायची आणि दुपारनंतर दहाबाय दहाच्या खोलीत असणा-या शिलाई मशीनवर मुलांचे शर्ट - चड्डी, पोलके शिवायची.

मनाली त्यावेळी सहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. आणि तिचा भाऊसुद्धा चौथी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाला. तिच्या आईने त्या दोघांच्या शिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. अभ्यासाच्या वेळी तर त्या दोघांना कोणत्याही प्रकारचे काम न लावता सर्व ते सहकार्य आईने केले.

पुढे तिने सहावीपासून नववी पर्यंत प्रथम क्रमांक सोडला नव्हता. दहावीमध्ये तर तिच्या आईने स्वतःच्या पोटाचा विचार न करता तिला वेळोवेळी चांगले खाणे - पिणे दिले. आई कधी त्यांच्यावर रागावली नाही. अगदी प्रेमाने दररोज अभ्यासाच्या वेळी प्रेमाचा हात पाठीवर फिरवत असे व योग्य ते मार्गदर्शन देत असे. आणि तिच्या या मार्गदर्शनामूळे त्या भावंडांच्यामध्ये आत्मविश्वास वाढला होता.

मनालीला प्रत्येकवेळी आईच्या आधाराची जाणीव होत होती. आणि या आधाराच्या बळावरच आणि माऊलीच्या आशीर्वादामुळे मनाली दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 98% मार्क्स मिळवून पहिली आली. तेव्हा या माऊलीच्या डोळ्यांच्या कडा पाण्याने भरल्याचे तिला जाणवले. वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्याकडून तिचेवर बक्षिसांचा वर्षाव झाला.  काहींनी व्यक्तींनी तर मदत म्हणून तिला रोख रक्कम सुद्धा देवू केली.

मनाली आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या  आईला अर्पण करते. जगामध्ये आईशिवाय दुसर कोणी मोठ्ठ नाही याची तिला जाणीव आहे. मनालीला आईने एवढा मोठ्ठा आधार दिला म्हणूनच ती हे यश प्राप्त करू शकली. पुढील भविष्यात वर्ग एकची सरकारी अधिकारी होण्याची आईची इच्छा मनाली पूर्ण करणार आहे. आणि याला आवश्यक आहे तो, ‘आईचा आधार’ तिच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. तिच्या अधिकारी पदाचा वापर गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी व अत्यंत गरजू व होतकरू मुला-मुलींना शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करून; कोणीही उपाशी झोपू नये यासाठी लागतील तेवढे कष्ट करायची तिची जिद्द आहे. तिच्या आईची इच्छा पूर्ण करण्याचा तिचा संकल्प आहे. अशा काही ‘मनाली’ या देशात जन्माला आल्या तर अनेक परिवारांना आधारवड प्राप्त होईल...!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel