प्रस्तुत आहेत, काही जुन्या आणि नव्या प्रसिद्ध जाहिराती. "व्यंगचित्रकाराच्या" मिस्कील तिरकस नजरेतून. वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही. अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग. मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही.तो तुमच्यासाठी होमवर्क समजा!!
(1) जांभूळ छाप दंतमंजन - कमनीय शरिरयष्टीचे रहस्य!
'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो :
"काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?"
ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ. "
(असे म्हणून ती तिचे शरीर मादक पद्धतीने हलविते)
वीर (अधीर होवून म्हणतो) : " सांग ना गं, रहस्य! "
ती : " जांभूळ छाप जांभळे दंतमंजन. याने रोज दात घासल्याने असे माझ्यासारखे मजबूत दात आणि मजबूत शरिरयष्टी बनते."
(मग ती पटापट सात आठ ऊस खाते)
अहो, तर मग वाट कसली बघता?
वापरा, जांभूळ दंतमंजन!
मजबूत दात, मजबूत शरिरयष्टी!
(2) उटण्याचा अक्स साबण...
एक सुंदर आणि मादक मुलगी शक्य तेवढे जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करत, सकाळी सकाळी घरातील सदस्यांसमोर आंघोळीची योजना जाहीर करते :
" मी आंघोळ करायला चालली आहे, पुतळ्याची! "
सगळे घरातील सदस्य तीला बँड बाज्यासह पुतळ्याजवळ घेवून जातात. ती पुतळ्याची आंघोळ घालते.
( 'अक्स' पुतळा साबण! या सोबत एक यंत्र मोफत. ते पुतळ्याजवळ ठेवून त्यात साबण टाकून ठेवा,
म्हणजे पुतळा थोड्या थोड्या वेळेने आपोआप धुतला जातो )
(3) सूपर "ठंडा" तेल...
एक बायको रागारागात तणतणते :
" मी चालले माहेरी कायमची "
नवरा पण फणफणतो :
"चल, स्टेशनवर सोडायला येतो तुला "
रागाने नवरा एके ठिकाणी बसतो.
तोपर्यंत बायको कपडे भरते.
एकजण नवऱ्याला एक 'सुपर' गरम तेल देतो.
नवरा ते डोक्याला लावतो.
तेल लावल्यामुळे तो भणभणत उठतो.
घटस्फोटाचं सर्टिफिकेट तीला देतो.
म्हणतो : " हे नाही का घेवून जाणार सोबत ?"
(बघितलंत आमच्या तेलाचा प्रभाव?
झटपट असरदार !)
(4) चोरांची खिच खिच
चोरी करण्यासाठी एक चोर एका घरात घुसतो.
त्याच्या गळ्यात 'खिचखिच' व्हायला लागते.
घरातील आजीला जाग येते.
ती म्हणते,
" बेटा, चोरी करायला आला आहेस ना.
घाबरू नकोस. हे घे आधी. हे 'गरारा' सायरप आहे.
ते पी, खिचखिच दूर कर, आणि मग शांततेने चोरी कर."
चोर गरारा सायरप गटागटा पितो.
आणि बेशुद्ध पडतो.
आजी पोलिसांना फोन करून चोराला पकडून देते.
(बघितलंत! आमच्या कंपनीचे गरारा सायरप! चोरांना पकडण्याचा नामी उपाय! आजच घ्या...)
(5) साडी में साडी ...
प्रतिनिधी : आपण कोणती साडी खरेदी केली?
महिला : 'सुपर' साडी !
प्रतिनिधी : का?
महिला : फुकटात मिळाली म्हणून!
एक अभिनेता : अरे! ही साडी तर माझी पत्नी पण नेसते.
प्रतिनिधी : समजूतदार आहे ना ती म्हणून !
अभिनेता : हे! चुप! खबरदार, पुन्हा असे म्हणालास तर!
(6) दाग- द फायर... टिकीया
प्रतिनिधी :
( आम्ही माफी मागतो की आम्ही सौ. सुनीता यांची मुलाखत त्यांना न विचारता शूट केली )
आपण कोणती टिकीया वापरता?
महिला : कोणत्याच टिकिया वर मला विश्वास नाही.
तुमच्या कंपनीच्या तर मुळीच नाही.
प्रतिनिधी : का बरे?
महिला : अहो, चांगल्या पांढऱ्या कपड्यावर डाग पडतात...
आहे तेच डाग जात नाहीत आणि धुतल्यावर अजून डाग पडतात!"
प्रतिनिधी : समजा , मी ही टिकीया तुम्हाला फुकटात देवू केली, तर?
महिला : नको! मुळीच घेणार नाही.
प्रतिनिधी : ( दर्शकांना ) बघितलंत ! फुकटात सुद्धा घ्यायला कुणी तयार नाही आमची टिकिया!
तुम्ही तरी घ्या हो आणि आमची लाज राखा!
(7) उध्वस्त ग्राईप वॉटर
"काय झालं?"
"बाळ रडत होतं."
" ऐकत नसेल तर थोबाडीत दे त्याला. तू लहान असतांना मीही तुला तेच देत होते."
(8) धुण्याची शुभ्र वडी
एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो.
त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? "
संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो.
बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! "
(पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना!
आजच, आताच घ्या आमची वडी...)
(9) नाटीका शांपू
एक बारा तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते :
" माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे!
मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते :
" माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ...
आं .... मी नाही सांगणार ! "
( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना!
ही कमाल आहे आमच्या शांपूची...
वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! )
(10) आला नवा "प्रकाश" -"उ"जाला
प्रतिनिधी : " पाहा पहा, ही लगबगीने जाणारी लोकं.. यांना विचारू या आपण यांनी काय खरेदी केलंय ते. "
एकीला तो विचारतो : " आपण काय खरेदी केलंत? "
ती : " लख्ख-उजेड " धुण्याची पावडर..
प्रतिनिधी दुसरीला : " तीने बघा " लख्ख उजेड " ला आपलंसं केलं...आणी तुम्ही ? "
दुसरी : मी? " अंधार " पावडर!
( आला लख्ख उजेड ... चार थेंबांचा हा हा..)
(11) पिवळे दंतमंजन
शिक्षक : " ही आहे आपल्या दातांची रचना ! , अरे काजू , तुझे दात तर खुप पिवळे झालेत? याचे रहस्य सांग! "
काजू : " का नाही होणारे ते पिवळे, मास्टरजी ! मी 'हार्बर' चे पिवळे दंतमंजन वापरतो ना! "
(12) खाली या
एक मंत्री खुर्चीवर सर्वानुमते जावून बसतात. पण, अनेक वर्षे झाली तरी खाली येण्याचे नाव घेत नाहीत.
इतर इच्छुक मनातून नाराज असतात.
जनतेला वाटते- "वा! काय सुखी मंत्रिमंडळ आहे ते!"
शेवटी इतर मंत्रीगणांचा रागाचा पारा अनावर होतो.
"खाली या हो आता"
मंत्री खुर्चीसह हवेत तरंगतात व म्हणतात- " खाली न येतो मी, खाली न येतो, खाली न येतो, खाली न येतो मी"
मंत्री मंडळातील एक जण- " जारे! खुपीरिया साबण घेवून ये. यांना आंघोळ घाल मग ताळ्यावर येतील ते"
खुपीरिया साबणाने आंघोळल्यावर मंत्री खाली येतात.
वापरा खुपीरिया साबणः मंत्र्यांचे उच्चपद डोळ्यात "खुपत" असेल तर, खुपीरिया साबण वापरल्यास मंत्री खाली येतात. जमीनीवर येतात. व तुम्हाला संधी मिळते.
(13) अक्स
एकदा "कभी" हा आपली पत्नी "कॅश" सोबत आंधळा लपंडाव खेळतो. कभी च्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते.
कॅश चालाख असते. ती "कया कच्चन" ला समोर करून लपून बसते.
कभी चुकून तीला पकडतो. "अरे मम्मी तू? माझी सोन्याहून सोनसळी प्रिया कुठे आहे?"
कया : अरे मुर्ख मुला! कधीचे सांगते आहे. "हक्स" साबण वापर. ऐकत नाहीस. वापरला असतास तर ही परिस्थिती आली नसती. "हक्स" च्या वासाने तुझी सोनसळी तू लगेच ओळखली असतीस.
"कमीताभ" तेथे येतो आणि म्हणतो- हक्स वापरा आणि आपले "अक्स" आरशात बघा. आणि व्हा बिंदास बंदा!
(14) चीरमा
एका गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. कित्येक महिने पाउस येत नाही. तेव्हा तेथे "चिरमा" नावाची मुलगी येते.
तीच्या अंगी अद्भुत शक्ती असते बरं का! पाणी अडवण्याची.
तिच्या जवळ एक मंत्र असतो.
" चिरमा, चिरमा चिरमा डिटर्जंट पावडर के झाग ने जादू कर दिया...पानी मे रहके भि ये कम जले...."
मंत्र म्हणतांना पाणी हवेतच थिजते.
मोठमोठे साधू अचंबित होवून होवून समाधिस्थ होतात.
शेवटी तेथे धरण बांधले जाते. केवळ चिरमा डीटर्जंट मुळे.
चिरमा डिटर्जंटः पाणि अडवा. पाणी जिरवा...इतर डिटरजंटची ही जिरवा.
(15) आले रे आले, रमेश सुरेश आले
आले आले. अद्भुत मेमरी लॉस गजनी चॉकलेट आले. कसे काय बघाच!
रमेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."
सुरेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."
दोघेही "वायू स्टार" चॉकलेट खातात. एकमेकांना विसरतात.
"रमेश?" "सुरेश?" तू इथे?
चॉकलेट खातात.
"रमेश?" "सुरेश?" तू इथे?
आणि दुकानदाराचे पैसे न देता निघून जातात.
कारण "वायू स्टार" गजनी चॉकलट. शंभर टक्के विसराळूपणाची गॅरंटी.
काय मग असे अद्भुत चॉकलेट घ्यायला जरुर विसरा...
(16) पाजोल पेवगन
"अरे ती.. पाजोल झाडावर लपून बसलीय. काय झाले कळत नाही."
"आमिष दाखवा तीला.."
"कल्केनलिबे घेतेस का? ये खाली?"
"खाली येते मी .."
"पण आधी नाचून दाखव बरं"
ती नाचून दाखवते.
तरीही चॉकलेट ते मर्कट लोक देत नाहीत.
ती धमकावते- "ए! जास्ती शानपणा करु नका हा! तो पेवगण आहे ना, त्याला सांगून देईल्..चांगला बोकलून काढील तुम्हाला तो.."
तेवढ्यात टॉम जेरीचा पाठलाग करता करता एक मगर तिथे येते. ते तीघे कल्केनलिबे खात असतात. ते मर्कटांना पळवून लावून पाजोल ला वाचवतात.
शेवटी सगळे एकमेकांचे मित्र होतात.
नेहेमी खा: कल्केनलिबे - करा प्राण्यांशी दोस्ती.
(17) बडे आराम से
सैफ नवाबाच्या घरी (मुकेश) ऋषी चोरी करायला येतो.
नवाब त्याचा फोन हिसकावतो व म्हणतो - "थांब तुझ्या आईला फोन लावतो!"
ऋषी हसायला लागतो.
नवाब विचारतो - "का रे? का हसतो?"
ऋषी म्हणतो - "बघच आता. कळेलच!"
तेवढ्यात ऋषीच्या फोनस्क्रिन डिस्प्ले वर सोनम नाचायला सुरुवात करते आणि म्हणते, "मां क्का फोन आया, तेरी मां क्का फोन आया.."
मग फोनमधूनच परेश रावल चा आवाज येतो, "उठाले रे बाबा, तेरी मां का फोन है!"
नंतर फवाद मोबाईल मधून एक फोन फेकतो, तो नवाब च्या कपाळावर जोरात आपटतो.
ऋषी म्हणतो - "अरे उचल ना! माझ्या आईचा फोन आहे. तुझ्याशी बोलायचं आहे तीला!"
नवाब विचारतो- "का रे? मी तिला फोन करण्या ऐवजी तीच मला फोन करतेय?"
फोन वरून "मां" बोलते, "ए येड्या नवाबा, म्याच आता माह्या पोराले बी अमोल चाचो घालाया लावतीया. तव्हा पासून त्यो लई भारी चोऱ्या करतुया. माला त्यो चोरी करताना लई चांगला वाटतोया. म्हीच त्याला चोरी करायला धाड्तीया.. करुदे त्यास्नी चोरी!"
ऋषी "बडे आराम से" चोरी करतो आणि नवाबला "बडे आराम से" एका कपाटात बंद करुन ठेवतो!
अमोल चाचो - बडे आराम से (चोरी करो!)
(18) क्रांतीकारी कुटुंब
भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे.
त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच.
त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे.
अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात.
तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत.
खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत.
तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो!
याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे?
म्हणजे एक प्रकारे देशाची गरिबी मिटण्यास हा एक हातभार आहे, नाही का?
हळू हळू हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश होईल यात शंकाच नाही!
आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?
तसेच त्या कार्यक्रमात नेहेमी येणार्या जाहिरातीत त्या कुटुंबातला त्यांचा मुलगा अनेक भारतीयांच्या समस्या एका "चुटकी सरशी" सोडवतो आहे.
तेही न बोलता.
आजवर अनेकांना प्रश्न भेडसावत होता की एका राज्यातल्या व्यक्तीला दुसर्या राज्यात नोकरी मिळाली तर काय करायचे?
तसेच, भारतातल्या एका राज्यातल्या व्यक्तीचे दुसर्या राज्यातल्या व्यक्तीवर प्रेम बसले तर करायचे तरी काय?
कारणः डिक्शनरी चा शोध तर अजून लागायचा आहे.
दुभाषे सुद्धा अलिकडे मिळेनासे झालेत.
आणि इंटरनेट वर पण तशी मदत नाही.
आणि भाषा शिकवणारे पुस्तके तर अस्तित्वातच नाहीतच नाहीत.
अरे देवा? काय करावे तरी काय भारतीय लोकांनी?
तुच सोडव रे बाबा आम्हाला या समस्येतून....
अशा परिस्थितीत, या मुलाने म्हणजे त्या कुटुंब प्रमुखाच्या मुलाने एक "कल्पना" सगळ्यांना दिली.
तुमच्या जवळ "कल्पना" चा नंबर असला की झाले बरं का मित्रांनो...
फक्त एकच (खर्चीक!) कॉल करा आणि भाषा शिका.
आणि त्यातून आणखी नवीन कल्पना अस्तित्वात आली आणि नसानसांत भिनली:
"बोलण्यासाठी भाषेची गरज नसते बर का मित्रांनो."
तुम्हाला हे माहित होते का?
नाहि बुवा. आजपर्यंत आम्ही बोलण्यासाठी भाषाच वापरत होतो.
ग्रेट ती कल्पना. ग्रेट तो मुलगा.
आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?
कुटुंबातली सून म्हणजे त्या मुलाची बायको अधून मधून लोकांना स्वच्छ राहाण्याची प्रेरणा देते.
आंघोळ केल्यावर लपंडाव कसा खेळावा, मजेत कसे जगावे हा संदेश त्यातून मिळतो आणि सारा देश स्वच्छतेत न्हावून निघतो.
तसेच सुंदर कसे बनावे याचेही ती अखिल भारतीय मुलींना प्रशिक्षण देते. कोणकोणते क्रीम वापरून तिच्यासारखी गुळगुळीत त्वचा मिळते हे रहस्य ती सर्वांसोबत शेअर करते.
तसेच लग्न केल्याचे दुष्परिणाम सुद्धा ती एका चित्रपटाच्या गाण्याद्वारे लोकांना समजावून सांगत असते.
लग्न ही एक आयुष्यभराची गुलामगिरी असून ज्याने जगात सर्वप्रथम लग्न केले त्याला "शरिराच्या अशा जागेवर" मारण्यास ती उद्युक्त करते की तो पुन्हा प्यायला पाणी मागणार नाही.
यात तीला एका लांब केस वाढवलेल्या "चिरंतन" कुमाराची मदत मिळते आहे.
आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?
आणि हे कुटुंब क्रांतीकारी कुटुंब म्हणून मान्यता पावेल यात शंकाच नाही.