हॉलीवूड चित्रपटांची नक्कल करतात असं म्हणून आपण नेहमीच हिंदी चित्रपटांची उपेक्षा करतो. परंतु लोकांनाही अशा गोष्टी आवडतात असं सांगत बॉलीवूडचे लेखक, दिग्दर्शक या गोष्टींचे समर्थन करतात.

प्रत्यक्षात मात्र अनेक हिंदी चित्रपट आहेत जे खरंच मनोरंजक आहेत. ते आपल्यापर्यंत पोहचू शकत नाहीत कारण त्यांचे योग्य प्रकारे सादरीकरण होत नाही. आता काही असे चित्रपट पाहू जे भारतीय आहेतच आणि विश्वसनीय देखील.

एक डॉक्टर की मौत

या चित्रपटामुळे पंकज कपूर फिल्मी दुनियेतील महान कलाकारांच्या यादीत जाऊन बसला. खूप संशोधनानंतर डॉ.दीपंकर रॉयला लेप्रोसीवर उपाय मिळतो. ही बातमी टीव्हीवर प्रसारित होते ज्यामुळे त्याच्या हाताखालच्या डॉक्टरना प्रसिद्धी मिळते. सहकाऱ्यांचा मत्सर आणि सात्तेचा दुरुपयोग करत आरोग्य विभागाचे मंत्री त्याला रहस्य सांगण्यासाठी धमकावतात. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका येतो पण तो हॉस्पिटलमध्ये जायला नकार देतो. अमेरिकन संस्थेकडून आलेलं एक पत्र दाबून टाकलं जातं आणि डॉ.रॉयला एका छोट्या गावात पाठवलं जातं. शेवटी दोन अमेरिकन डॉक्टरना या शोधाचं श्रेय दिलं जातं आणि त्यामुळे डॉ.रॉय पूर्णपणे खचून जातो.

जाने भी दो यारों

हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. दोन फोटोग्राफर एक स्टुडीओ उघडतात, पण सुरुवातीपासूनच सगळी गडबड होते. त्यांच्या फोटोग्रफितून त्यांना शहरातील बिल्डर्स, नगरपालिकेचे अधिकारी आणि अन्य लोकांच्या काळ्या धन्द्यान्विषयी माहिती मिळते.

विनोदाच्या माध्यमातून चित्रपट अनेक वाईट गोष्टी समोर आणून प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो.

अन ऑड टू लोस्ट लव्ह

या एनएफडीसी च्या चित्रपटाची वैशिष्ट्ये गांधी व्यतिरिक्त सर्व चित्रपटांपेक्षा चांगली होती.

आपल्या शुटींगच्या पहिल्या दिवशी प्रमोद फिल्मची अभिनेत्री सुश्मिता आणि तिची आई ज्योती भट यांची ओळख छायाचित्रकार एम शी करून देतो. सुश्मिता एम ला मोठा भाऊ मानू लागते. एम तिला आपल्या पुढच्या चित्रपटात आशाच्या रोलसाठी घेण्याचा निर्णय घेतो. प्रमोद, जो अविवाहित आहे, आणि ज्याने आतापर्यंत अनेक मुलींबरोबर संबंध ठेवलेले असतात, त्याला सुश्मिताबद्दल वेगळं आकर्षण जाणवू लागतं.

मै जिंदा हुं

एक अनाथ मुलगी बीना मुंबईला येते. पण तिचा नालायक नवरा तिला सोडून जातो. ती आपल्या सासरची करती सवरती स्त्री बनते. जेव्हा तिचं कोणावर तरी प्रेम जडतं, तेव्हा तिच्या सासरची मंडळी आपला प्रपंच चालणार नाही असं वाटून स्वार्थी बनतात. एक दिवस तिचा नवरा परत येतो तेव्हा सर्व कुटुंबीय तिला वेश्या म्हणून संबोधतात. हा चित्रपट समाजातील स्त्रियांच्या दर्जावर भाष्य करतो की कसं सगळ्यांच्या आकांक्षा जपताना ती स्वतःचं आयुष्य जगूच शकत नाही.

बांगरवाडी

हा चित्रपट अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकरने बनवला. चित्रपटाला राष्ट्रापती पुरस्कार मिळाला. ही एका शिक्षकाची गोष्ट आहे. तो एका धनगरांच्या गावात राहायला येतो. त्याला त्यांना प्रगतीपथावर घेऊन जायचं असतं. पण ते दोघांच्याही नशिबात नसतं. सुरुवातीला अडचणींचा सामना केल्यानंतर त्याला तिथलं वातावरण प्रेरणादायी वाटू लागतं. पण तेवढ्यात त्याची दुसऱ्या शाळेवर बदली होते. त्याच्याजवळ फक्त गावातील गोड आठवणी राहतात. दुष्काळाने हैराण असलेले गावकरी नाईलाजाने त्याला जाऊ देतात. तो निघून जातो... आठवणी सोबत घेऊन...

आगंतुक

भारतीय चित्रपट सत्यजित रें शिवाय अपूर्ण आहे. अन्य चित्रपटांप्रमाणेच हादेखील त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करतो.

अनिता आणि तिचा पती सुधीन्द्र बोस यांना समजतं की गेल्या ३५ वर्षांपासून जगभर हिंडत असलेले त्यांचे काका मनमोहन भारतात परत येतायत आणि त्यांची या दोघांना भेटण्याची इच्छा आहे. मनमोहन आपल्याबरोबर आपल्या प्रवासाचे किस्से घेऊनच येतात. त्यांच्या भोळेपणाबद्दल बोस कुटुंबाला संशय येतो, पण त्यांच्या ११ वर्षांच्या मुलाला हे काका फारच आवडू लागतात. एका वकील मित्राला बोलावून बोस परिवार काकांची विचारपूस करून त्यांना अपमानित करतात. दुसऱ्या सकाळी काका निघून गेलेले असतात. बोस पती-पत्नी जेव्हा त्यांना शोधायला जातात तेव्हा एक अशी गोष्ट समोर येते जी त्या दोघांसाठी आनंदाची आणि लाजिरवाणी देखील असते.

द वोयेज बियोंड

१९व्या शतकात सतीच्या प्रथेवर बंदी आली. एक वृद्ध ब्राम्हण प्रभू सितारामाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नदीवर जातो. तिथे एक ज्योतिषी त्याला सांगतो की पुन्हा विवाह केल्यास त्याला त्याची पूर्वीची ख्याती मिळू शकते. यामुळे प्रभावित होऊन तो एका गरीब, गरजवंत ब्राम्हणाची मुलगी याशोमतीशी विवाह करतो. स्मशानाचा नोकर बैजू च्या विरोधाला न जुमानता हे लग्न होते. बैजू प्रचंड चिडतो आणि त्याचा परिणाम जो होतो तो कोणालाही अनपेक्षित असा आहे.

रघु रोमिओ

रघु एका डान्सबार मध्ये वेटर असतो. त्याच्या आसपासचं जग झगमगाटाने भरलेलं. पण या जागी सगळे त्याच्याशी वाईट पद्धतीने वागतात. अशात त्याची एकाच आशा - नीतजीबरोबरचं त्याचं नातं. त्याच्यासाठी नीताजी म्हणजे धरतीमातेप्रमाणे प्रेमळ व दयाळू आहे. अडचण फक्त एकाच - नीताजी काल्पनिक आहे - टीव्हीवरील एक पात्र आहे... आणि मग रघुला समजतं की कोणीतरी नीताजीला मारणार आहे - तिला कोणत्याही परिस्थितीत वाचवलं पाहिजे...

बबल गम

वेदांत १४ वर्षांचा आहे. तो एकाकी मुलाचं आयुष्य जगतोय. आपले आई-बाबा मुकुंद आणि सुधावर तो आपला मोठा भाऊ निशांसाठी असणाऱ्या चिंतेमुळे नाराज आहे. निशांत बहिरा आहे आणि लखनौमध्ये एका विशेष शाळेत शिकतोय. मुलांच्या महागड्या शिक्षणासाठी आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे वेदांतसाठी कोणाकडेच वेळ नाहीये. त्यांना मिळणारा सर्व वेळ ते निशांतच्या काळजीत व्यतीत करतात. वेदांत सामान्य असल्यामुळे कोणालाच त्याची गरज नाहीये.

पण शेजारी जेनी नावाची मुलगी राहायला आल्यापासून आयुष्य सुंदर वाटायला लागतं. तो तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतो पण १५ वर्षांच्या रतनचा इरादापण त्याच्यासारखाच असतो. जेव्हा होळीला निशांत घरी येतो तेव्हा सर्वजण त्याची सेवा करण्यात गुंग होतात. वेदांतलाही मित्रांना सोडून भावाकडे लक्ष देण्यास सांगितले जाते. पण जेनीला गमावण्याच्या भीतीने वेदांत या गोष्टीला नकार देतो. या विरोधातूनच तो स्वतःला, आपल्या भावाला आणि आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने ओळखायला लागतो.

बबलगम वेदांतच्या विकासाची गोष्ट तर आहेच, पण त्याचबरोबर ती त्याच्या पालकांना विचार करायला लावते की त्यांच्या प्रयत्नांनी ते आपल्या अपंग मुलाला सामान्य तर बनवतायत, पण आपल्या दुसर्या चांगल्या मुलाला अपंग करून टाकत आहेत...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel