हि गोष्ट आहे कर्णाचा पुत्र वृषकेतू याची. तो कर्ण आणि वृषाली यांचा एकमेव जिवंत राहिलेला मुलगा होता. त्यामुळे जेव्हा अर्जुनाला हे समजलं की कर्ण त्याचा मोठा भाऊ होता आणि आपण आपला भाऊ आणि पुतण्यांना ठार केलं आहे, तेव्हा अर्जुनाला अतिशय दुःख आणि पश्चात्ताप झाला. त्याने एकच उरलेला कर्णाचा पुत्र वृषकेतू याला आपल्या मुलाप्रमाणे जवळ केलं आणि त्याला योग्य ज्ञान आणि मार्गदर्शन दिलं. वृषकेतूला वाटायचं की आपण कर्णाचे पुत्र असल्याने अर्जुन आपला तिरस्कार करत असेल, परंतु जेव्हा त्याने हे पाहिलं की अर्जुन खरोखरीच एवढा दुःखी झाला आहे, तेव्हा त्यानेही आपल्या काकाला माफ करून टाकलं. कृष्णही वृषकेतूवर अतिशय प्रेम करत असे कारण तो कर्णाचा फार आदर करीत असे.
वृषकेतू पृथ्वीवरील शेवटचा मानव होता ज्याला ब्रम्हास्त्र, वरुणास्त्र, अग्नी आणि वायुस्त्र यांचा वापर करण्याचे विधी माहीत होते. त्याच्या मृत्युनंतर हे ज्ञान संपुष्टात आलं कारण कृष्णाने कोणालाही हे ज्ञान देण्यापासून त्याला मनाई केली होती.
वृषकेतू आणि घटोत्कचाचा मुलगा यांची खूप जवळीक होती आणि त्यांच्यात पक्की मैत्री देखील होती. युधिष्ठिराच्या अश्वमेध यज्ञासाठी भद्रावती इथून या दोघांनीच श्यामकर्ण अश्व आणला होता. तो आपल्या जातीचा एकमेव घोडा होता आणि तिथला राजा तो घोडा पांडवांना देण्यास तयार नव्हता. तेव्हा भद्रावतीच्या सेनेचा पराभव करून ते दोघे घोडा घेऊन आले.
वृषकेतू आणि अर्जुनाला मणिपुरात बबृवाहन ने मृत्युमुखी पाडले होते. परंतु जेव्हा त्याला हे समजलं की अर्जुनच त्याचा पिता आहे, तेव्हा त्याने उलूपी कडून नाग मणी घेतला आणि अर्जुन आणि वृषकेतू दोघांनाही पुन्हा जिवंत केलं, ज्यामुळे दोघा भावांचं मीलन होऊ शकलं.