एके दिवशी दुर्वास ऋषि, ज्यांना आपल्या क्रोधासाठी सर्वत्र ओळखलं जातं, द्वारकेत आले, आणि त्यांनी आपल्या काबिल्यासाठी कृष्णाला जेवण बनविण्यास सांगितले. कृष्णाने "छप्पन्न भोग" बनवले. या सर्व स्वादिष्ट पक्वान्नामध्ये कामधेनु गायीच्या दुधापासून तयार केलेली "केशर खीर" सुद्धा होती. कृष्णाने दुर्वास ऋषिना खीर चाखण्यास सांगितले. खीर नुकतीच चुलीवरून उतरलेली होती, ऋषिना ती किती गरम आहे हे माहिती नव्हतं, आणि त्यामुळे त्यांची जीभ भाजली. अत्यंत क्रोधीत झालेल्या दुर्वास ऋषिनी कृष्णाला शाप देण्यासाठी कमंडलू उचलला. कृष्ण त्वरित आपल्या जागेवरून उठला, त्याने सगळी खीर उचलली आणि नाचत नाचत त्याने ती खीर आपल्या संपूर्ण अंगावर फासायला सुरुवात केली. ऋषि कृष्णाचा हा प्रयत्न पाहून थक्क झाले.
काही वेळाने शेवटी त्यांचा राग शांत झाला. त्यांनी कृष्णाला थांबण्यास सांगितले. कृष्णाने त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि सांगितले की तो कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार आहे.
दुर्वासांनी सांगितलं की " तू अतिशय महान असा यजमान आहेस. तू आतापर्यंत मला भेटलेल्या भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेस. मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या शरीराच्या जेवढ्या भागाला या खिरीचा स्पर्श झाला आहे तो वाज्रासमान कठीण आणि बळकट होईल. तुला कोणतंही हत्यार कधीही नुकसान पोचवू शकणार नाही. अशा प्रकारे कृष्णाला सर्व अस्त्रांपासून बचाव होण्याचा आशीर्वाद मिळाला. त्याचा मृत्यू टाच, जिथे खीर लागली नव्हती, तिथे बाण लागल्यामुळे झाला.