ग्रँड ट्रंक रोड हा उत्तर हिंदुस्तानातील वाहतुकीचा सर्वात जुना मार्ग. प्राचीन काळी सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या काळात या मार्गाच्या काही भागाचं बांधकाम झालं होतं. तेव्हा हा मार्ग उत्तरपथ म्हणून ओळखला जात असे. मौर्यांची राजधानी असलेल्या पाटलीपुत्र (पटना) पासून ते वायव्य सरहद्द प्रांतातील तक्षशीला शहरापर्यंत हा मार्ग होता. १६ व्या शतकात शेर शहा सुरीने या प्राचीन मार्गाचं पुन्हा बांधकाम केलं. मुघलांच्या काळात या मार्गाचा वायव्येला खैबर खिंडीतून काबूलपर्यंत आणि पूर्वेला चितगावपर्यंत विस्तार झाला. ब्रिटीश सरकारने या मार्गाचा विस्तार आणि पुनर्बांधणी केली. चितगाव, सोनग्राम, हावडा, वाराणसी, अलाहबाद, दिल्ली, अंबाला, जालंदर, अमृतसर, लाहोर, गुजरानवाला, रावळपिंडी, पेशावर, खैबर खिंड, जलालाबाद, काबूल यांना जोडणार्या या मार्गाचं ग्रँड ट्रंक रोड हे नामकरण ब्रिटीशांनीच केलं.
गुजरानवालाची लष्करी छावणी शहराच्या बाहेर उत्तरेला ग्रँड ट्रंक रोडला लागूनच होती. छावणीतील मोठ्या मैदानात हिंदू आणि शीख निर्वासितांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली होती. अनेक तंबू आणि राहुट्या तिथे उभारण्यात आल्या होत्या. मोठे तंबू मोठ्या एकत्रं कुटुंबाना देण्यात येत होते, तर लहान कुटुंबांची व्यवस्था राहुट्यांमधून करण्यात आली होती.
चौधरी महेंद्रनाथ यांच्या वाड्यातील सर्वांना घेऊन मिर्झांचा ट्रक
छावणीत पोहोचला तेव्हा संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. छावणीत आल्यावर
चौधरींनी छावणीच्या मुख्य अधिकार्याची भेट घेतली आणि आपल्यावर ओढवलेल्या
परिस्थितीची त्यांना कल्पना दिली. अर्थात त्या गोर्या अधिकार्याला हे
रोजचंच होतं. पाकीस्तानची घोषणा झाल्यापासून रोजच निर्वासितांचे गट
छावणीच्या आश्रयाला येण्यास सुरवात झाली होती. आलेल्या सर्व निर्वासितांची
नोंद करुन कॅनव्हासच्या तंबू आणि राहुट्यांमध्ये त्यांच्या राहण्याची
व्यवस्था करण्यात येत होती.
स्वतः महेंद्रनाथ, कमलादेवी आणि सरिता यांनी एका तंबू ताब्यात घेतला. सरदार
कर्तारसिंग, गुरकिरत, जसवीर कौर आणि सतनाम दुसर्या तंबूत होते.
रुक्सानाबानू, सुखदेव, चंदा आणि प्रिती यांनी तिसर्या तंबूत आश्रय घेतला.
डॉ.सेन आणि चारुलता हे एका राहुटीत होते. वाड्यातून आणलेलं आपलं सामान
लावण्यात सर्वजण गढून गेले. हिंदुस्तानात जाण्याची व्यवस्था होईपर्यंत आता
इथेच मुक्काम!
चौधरींचा निरोप घेऊन मिर्झा सिकंदरअली परत निघाले तेव्हा चौधरींनी त्यांना थांबवलं. छावणी सोडून पुन्हा शहरात येणं त्यांना शक्यंच नव्हतं. त्यामुळे एक महत्वाची कामगिरी त्यांना मिर्झांवर सोपवायची होती.
"हे पत्रं!" चौधरींनी आपल्या खिशातून एक लिफाफा काढून मिर्झांच्या हाती दिला. "कसंही करुन हे पत्रं प्रतापपर्यंत पोहोचव सिकंदर! आम्ही इकडे छावणीत आहोत हे त्याला कळवायला हवं!"
"फिकर ना करो महेंदर! उपरवालेपर भरोसा रखो! सब ठीक हो जाएगा!"
दुसर्या दिवसापासून सर्वांचा छावणीतला दिनक्रम सुरु झाला. छावणीत शक्यं
त्या सर्व सोई करण्यात आल्या होत्या. एका बाजूला पाण्यासाठी नळ बसवण्यात
आले होते. तिथेच काही अंतरावर स्नानाची आणि प्रातर्विधी उरकण्याची व्यवस्था
होती. छावणीत एक दवाखानाही उभारण्यात आलेला होता. सर्वांवर तिथेच उपचार
सुरु होते. छावणीत दाखल होताच डॉ. सेननी दवाखान्यातील इतर डॉक्टरांची गाठ
घेऊन आपली सेवा देऊ केली होती.
रोज सकाळी उठल्यावर सर्वप्रथम प्रातर्विधी उरकून पुरुषमंडळी प्रथम छावणीतील
धान्य वितरण करणार्या गोदामाकडे धाव घेत तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी
नळावर जात असंत. जे काही धान्य पदरात पडेल ते मुकाट्याने स्विकारण्यावाचून
पर्याय नव्हता. अनेकदा सडकं - कुजकं धान्यं निर्वासितांच्या वाट्याला येत
असे, पण तक्रार कोणाकडे करणार? जे काही धान्य मिळेल ते घेऊन आपापला तंबू
किंवा राहुटी गाठावी. धान्य घेऊन परतल्यावर स्त्रिया स्वयंपाकात गढून जात
तर पुरुषवर्ग आपले कपडे घेऊन आंघोळीसाठी जात असत. अनेकदा तास-तास
खोळंबल्यावर आंघोळीसाठी नंबर लागत असे!
दुपारच्या जेवणानंतर थोडीफार विश्रांती घ्यावी आणि इतर कामे उरकावी. संध्याकाळ झाली की स्त्रिया पुन्हा स्वयंपाकात गढून जात. तर पुरुषमंडळी गटागटाने गप्पा मारत बसत. प्रत्येकजण आपलं घरदार शहरात सोडून आला होता. भविष्याची चिंता प्रत्येकालाच जाणवत होती. हिंदुस्तानापर्यंतची वाटचाल खडतर असणार होती याची सर्वांनाच कल्पना होती. वाटेवर अनेक ठिकाणी बहुसंख्य मुस्लीम लोकवस्ती असलेली गावं होती. काफीर हिंदूंची कत्तल करण्यास, त्यांच्या बायका-मुलींवर अत्याचार करण्याची संधी मिळण्यासाठी तिथले मुसलमान वाटच पाहत असणार होते. या सार्या संकटातून वाचून हिंदुस्तानात पोहोचल्यावर पुढे काय? प्रत्येकाला पुनश्च हरि ॐ म्हणून सुरवात करावी लागणार होती.
संध्याकाळ झाली की स्त्रिया पुन्हा स्वयंपाकात गढून जात. रात्रीची जेवणं झाली की प्रत्येकजण आपापल्या तंबूत अथवा राहुटीत शिरुन निद्राधीन होत असे. लष्करी छावणीत असल्याने तसा धोका कमी होता, परंतु शहरातील एखाद्या झुंडीने छावणीकडे मोर्चा वळवण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. छावणीवर पहार्यासाठी शिपायांची नेमणूक केली होती खरी, परंतु त्यातील बहुसंख्य मुस्लीम असल्याने निर्वासितांना त्यांचा भरवसा वाटत नव्हता. जरा कुठे खुट्टं झालं की सर्वजण लगेच भितीने जागे होत असत.
दोन दिवसांनी स़काळी सातच्या सुमाराला सरिता पाणी आणण्यासाठी नळावर गेली होती. आल्या दिवसापासून छावणीत दाखल झाल्या दिवसापासून तिच्या मनात आदित्यशिवाय दुसरा विचार येत नव्हता. वाडा सोडण्यापूर्वी रजनीच्या नावाने आसिफकडे दिलेली चिठ्ठी तिला मिळाली असेल का? आदित्य आता कुठे असेल? आपण तर आता काही दिवसांतच, फारतर महिन्या - दोन महिन्यांत कायमचे हिंदुस्तानात जाणार. त्यापूर्वी पुन्हा आदित्यची भेट होईल का? इथे छावणीतच असेल का तो कुठेतरी? का अद्याप शहरातच असेल? कुठेही असला तरी सुखरुप असला म्हणजे झालं.
नळावर आपली पाळी येण्याची वाट पाहत असलेली सरिता याच विचारात गढून गेलेली होती. आदित्यबरोबर आपल्या भावी आयुष्याची आणि सुखाची अनेक चित्रं तिने आपल्या मनात रंगवली होती. लग्नानंतर आम्ही दोघं मजेत संसार करु, त्याच्याशी मी कधीही कोणत्याही कारणासाठी वाद घालणार नाही, भांडणार नाही. मग आम्हाला एक छोटंस बाळ होईल! त्याचे बोबडे बोल ऐकून आम्हांला खूप आनंद होईल. आमचं बाळ कोण होईल? डॉ़क्टर? इंजिनीयर? वकील? की आणखीन कोणी? पण... पण त्यासाठी त्याची पुन्हा गाठ तर पडायला हवी. नाहीतर...
सरिता त्या विचारानेच उदास झाली. आदित्यशिवाय आयुष्याची आजवर तिने कल्पनाच केलेली नव्हती. त्याच्याविना दुसर्या कोणाचाही विचार तिच्या मनाला कधीच शिवला नव्हता. पुन्हा कधीच त्याची भेट झाली नाही तर? हिंदुस्तानात पोहोचल्यावर आपले आई-वडील आपल्या लग्नाची घाई करणार याची तिला कल्पना होती. आयुष्याचा जोडीदार म्हणून दुसर्या कोणाचा स्वीकार करणं मला शक्यं होईल? स्वत:च्या मनाविरुद्ध केलेली ती एक तडजोड तर ठरणार नाही? आदित्यला मी आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही. आयुष्यातलं पहिलं प्रेम! उद्या दुसर्या कोणाशीही आयुष्याची गाठ बांधली गेली, तरी मनाच्या एका कोपर्यात आदित्यंचं स्थान कायम राहील हे निसंशय!
सरिता आपल्या विचारात हरवलेली असतानाच अचानक मागून तिच्या खांद्यावर एक हात पडला. सरितेची तंद्री एकदम भंग पावली. गर्रकन ती मागे वळली आणि पाहतच राहिली!
रजनी!
"रजनी!" सरिता जवळजवळ ओरडलीच! क्षणभर आपण स्वप्नं तर पाहत नाही ना असं तिला वाटून गेलं. रजनी इथे होती, त्या अर्थी आदित्यही छावणीत होता! सरितेच्या मनावरचं मळभ एका क्षणात नाहीसं झालं. स्वप्नांना पुन्हा नवीन पालवी फुटली!
"रजनी!" तिचे दोन्ही खांदे गच्च धरुन हलवत सरिता म्हणाली, "कशी आहेस तू? कधी आलीस छावणीत?"
"ठीक आहे!" रजनी तिचे दोन्ही हात हातात घेत उत्तरली, "आज पहाटेच आलो! अगदी थोडक्यात वाचलो!"
सरितेने तिच्याकडे प्रश्नार्थक चेहर्याने पाहीलं. रजनीच्या डोळ्यासमोर आदल्या रात्रीचा प्रसंग उभा राहिला.
सादुल्लाबरोबर झालेल्या त्या दिवशीच्या बोलाचालीनंतर केशवरावांना कोणत्या दिशेने वारे वाहत आहेत याचा अंदाज आला होता. शहरात धार्मिक उन्मादाला उत आला होता. रोज कोणत्यातरी मोहल्ल्यातील घरांवर गुंडांची धाड पडल्याच्या बातम्या येत होत्या. एक दिवस आपल्यालाही गाशा गुंडाळून हिंदुस्तानची वाट धरावी लागणार याबद्दल केशवरावांची हळूहळू खात्री पटत चालली होती. शहरातील अनेक हिंदू आणि शीखांनी लष्करी छावणीत आश्रय घेतला होता. आपणही तोच मार्ग पत्करावा या विचाराप्रत केशवराव आले होते.
रात्री दहाचा सुमार!
पटवर्धन कुटुंबिय झोपेची आराधना करीत बिछान्यावर पडले होते. आणखीन एक - दोन दिवसांतच लष्करी छावणीत आश्रय घेण्याचा केशवरावांचा विचार होता. मालतीबाईंचीही त्याला संमती होती. रोज रात्रंभर जीव मुठीत धरुन राहण्याला त्या कंटाळल्या होत्या. छावणीत गेल्यावर किमान रात्रीची शांत झोपतरी मिळू शकेल अशी त्यांना आशा होती. आदित्यच्या मनात सरिताचे विचार येत होते. आपल्या परिवारासह ती लष्करी छावणीत गेल्याचं त्याला रजनीकडून कळलं होतंच. पुन्हा तिची भेट कधी होईल?
अचानक दारावर थाप पडली!
"केशवजी! केशवजी! आदित्य! दरवाजा उघडा! जल्दी!"
आदित्य उडी मारुनच बिछान्यातून उठला. आता रात्रीच्या वेळेस कोण आलं असावं? त्याने पुढे होऊन दार उघडलं. शेजारी राहणारे प्रा. अशोक सिन्हा आणि त्यांची पत्नी चित्रा दारात उभे होते! सिन्हा आदित्यच्याच कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते. त्यांना अशा अवचित वेळी आलेलं पाहून आदित्यला आश्चर्य वाटलं.
"सर, तुम्ही? काय झालं?"
"आदित्य, जल्दी करा! आपल्याला आताच्या आता इथून निसटून गेलें पाहीजे!"
"काय झालं सिन्हासाहेब?" एव्हाना केशवराव बाहेर आले होते.
प्रा. सिन्हा काही बोलण्यापूर्वीच दूरवरुन आरडा-ओरडा ऐकू येऊ लागला! पाठोपाठ आरोळ्या -
"नारा ए तकब्बीर!"
"अल्ला हो अकबर!"
केशवराव काय समजायचं ते समजले. अखेर त्यांना वाटणारी भिती खरी ठरली होती. गुंडांची वक्रदृष्टी आज त्यांच्या मोहल्ल्यावर पडली होती!
हाताला लागतील ते कपडे सर्वांनी एका मोठ्या पिशबीत भरले. जवळ होते नव्हते ते सारे पैसे आणि महत्वाची चीजवस्तू त्याही परिस्थितीत त्यांनी एका बोचक्यात गुंडाळली. आदित्यने त्या परिस्थितीतही डोकं शांत ठेवून सर्व महत्वाचे कागदपत्रं, स्वतःची आणि रजनीची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रं एका पिशवीत भरली. दहा मिनीटांत सर्वजण घरातून बाहेर पडण्यास तयार झाले!
गल्लीत हैदोस घालणार्या गुंडांचे आवाज क्षणाक्षणाला जवळ-जवळ येत चालले होते!
सिन्हा पती-पत्नी आणि पटवर्धन कुटुंबिय राहत्या वाड्याच्या मागच्या दारातून बाहेर पडले. वाड्यातील इतर सर्वजण कधीच पसार झाले होते! धावत-पळत सर्वजण वाड्यापाठच्या चिंचोळ्या गल्लीत शिरले. केशवराव आणि प्रा. सिन्हा सर्वात पुढे होते. त्यांच्यापाठोपाठ मालतीबाई, चित्रा आणि रजनी या तिघी होत्या. आदित्य सर्वात शेवटी मागून कोणी येत नाही ना यावर लक्षं ठेवून होता.
शाहदरा चौकात पूर्ण शांतता होती. चौक ओलांडून सर्वजण पुढे आले. आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत सावधपणे कमीत कमी आवाज करत सर्वांची आगेकूच सुरु होती. सिव्हील लाईन्सचा परिसर ओलांडल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. शहरातील बहुसंख्य वस्तीचा भाग मागे पडला होता. इथून छावणी गाठण्यास कोणतीही अडचण येणार नव्हती. पहाटे तीनच्या सुमाराला सर्वजण छावणीत येऊन दाखल झाले होते!
रजनीकडून आदल्या रात्रीची कहाणी ऐकल्यावर सरितेचा थरकाप उडाला. काय बोलावं तिला काही कळेना. काही वेळाने तिने स्वतःला सावरलं. दोघी परत फिरल्या.
"काळ आला होता सरिता, केवळ आमची वेळ आली नव्हती काल!" रजनी उद्गारली.
"खरं आहे! हिंदुस्तानात पोहोचेपर्यंत अजून अशी किती संकटं आपल्यावर येणार आहेत कोणास ठाऊक!"
"बघू! आपल्या नशिबात काय लिहीलं आहे!"
रजनीसह सरिता आपल्या तंबूत परतली. सरितेकडे नेहमी येत असल्याने कमलादेवी रजनीला ओळखत होत्या. त्यांच्याशी दोन शब्द बोलून रजनी आपल्या तंबूकडे वळली तशी सरिताही तिच्यापाठोपाठ बाहेर पडली.
"तू कुठे निघालीस आता परत?" रजनीने मुद्दाम विचारलं.
"काही नाही! सहजच! रजनी...." सरिता अडखळली.
"काय? बोल ना!"
"काल रात्री छावणीत येताना तुम्हाला फार जास्तं त्रास झाला नाही ना?"
"त्रास असा नाही, दादाला सिव्हिल लाईन्सच्या कब्रस्तानापासुन एक जवळचा मार्ग माहीत होता, त्यामुळे लवकर आलो!"
सिव्हील लाईन्सचं कब्रस्तान! तिथल्या सुखद स्मृतींनी सरिता मोहरुन गेली.
"सरिता!" तिच्यासमोर चुटकी वाजवत रजनीने विचारलं, "काय झालं? कुठे हरवलीस?"
"काही नाही!" सरितेने स्वतला सावरण्याचा प्रयत्न केला.
रजनी स्वत:शीच हसली. सरिता आणि आदित्यची प्रेमकहाणी तिला पूर्णपणे ठाऊक होती. मात्रं आपल्याला सगळं माहीत आहे याचा तिने दोघांनाही थांगपत्ता लागू दिला नव्हता!
"तुला काय विचारायचं आहे कळलं मला!" अखेर न राहवून रजनीच म्हणाली, "दादा ठीक आहे! इथेच आहे!"
"तुला कसं कळलं?"
"मला सगळं माहीत आहे! तुम्ही दोघांनी सांगितलं नाहीत तरीही! वेळ मिळाला की निवांत भेटा दोघंजणं!"
दोघी खळखळून हसल्या. सरितेच्या मनावरच दडपण पूर्णपणे नाहीसं झालं होतं.
पंजाबातील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू आणि शीखांच्या रक्षणाची जबाबदारी पंजाब बाऊंड्री फोर्सच्या अधिकार्यांवर सोपवण्यात आलेली होती. परंतु या ब्रिटीश अधिकार्यांना हे काम आवाक्याबाहेरचं होऊन बसलं होतं. पंजाबच्या पश्चिम भागात बहुसंख्य असलेले मुस्लीम हे हिंदू आणि शीखांवर अत्याचारच करत होते. जाळपोळ, लुटालूट यांना उत आला होता. हिंदू स्त्रियांचं अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याच्याही कित्येक घटना या अधिकार्यांच्या कानी आल्या होत्या. परंतु या सगळ्या प्रकाराला पायबंद घालणे हे आपल्याला अशक्यं आहे या धारणेने हे अधिकारी काहीही न करत हातावर हात धरुन बसून राहीले!
पंजाबच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या या भयानक अत्याचारांच्या कहाण्या बहुसंख्य हिंदू असलेल्या पूर्व पंजाबात पोहोचल्यावर त्याची तीव्र प्रतिक्रीया उमटली. पूर्व पंजाबातील अल्पसंख्यांक मुसलमानांना आपल्या पश्चिमेतील जातभाईंच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागणं अपरिहार्य होतं. खवळलेल्या हिंदूंनी पूर्व पंजाबातील आपल्या तावडीत सापडलेल्या अनेक मुसलमानांना कापून काढलं होतं!
प्रा. सिन्हा, आदित्य आणि केशवराव एका सकाळी सिन्हांच्या राहुटीत गप्पा मारत बसले होते.
"आपल्या राष्ट्रीय पुढार्यांनी फाळणीला मान्यता देण्यापूर्वी
यापैकी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नव्हता का सर? गेल्यासाली डायरेक्ट
अॅक्शन डे च्या दिवशी कलकत्त्यात जे काही झालं त्या अनुभवावरुन तरी
त्यांनी धडा घ्यायला नको होता का? नेहमी निरपराध लोकांचाच अमानुष बळी जातो
याचा त्यांना कसा विसर पडला?"
"तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे
आदित्यबाबू! गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर फाळणीला मान्यता देण्यापूर्वीच
दोन्ही बाजूच्या अल्पसंख्यांकांचा प्रश्न उभा राहणार हे पुढार्यांच्या
ध्यानी कसं आलं नाही कळत नाही!"
"पाकीस्तान देण्याची इतकी मोठी
घाई काय झाली होती त्यांना? दोन्ही बाजूच्या लोकांना आधी सुरक्षीत स्थळी
हलवल्यावर मग खुशाल घोषणा करायची पाकीस्तानची!"
क्षणभर कोणीच काही बोललं नाही.
"देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या पुढार्यांनी आपलं
सर्वस्व पणाला लावलं आदित्य! तुमचा - आमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून
त्यांनी ब्रिटीशांशी केलेल्या संघर्षाचं फळ म्हणून आज हिंदुस्तान स्वतंत्र
होतो आहे. अशावेळी आपल्या नेत्यांना बोल लावण्यात काही अर्थ नाही! फाळणी
मान्य करण्यावाचून त्यांना दुसरा काही पर्याय शिल्लकच राहीला नव्हता!"
"पूर्वीच्या
गोष्टी काही सांगू नका नाना! बाळ गंगाधर टिळक, लाला लाजपतराय यांची गोष्टच
वेगळी होती! पण आमच्या आताच्या पुढार्यांनी सगळा घोळ घालून ठेवला आहे.
आमचे आजचे एकजात सर्व पुढारी मुसलमान धार्जिणे आहेत. अगदी नेहरुंसकट!
गांधीजी तर सर्वात जास्तं!"
"आदित्या, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाहीत त्यात उगाच बोलू नये!"
"काय
चुकीचं बोलतो आहे मी नाना? तुम्हीच सांगा सर, गांधीजींचा ओढा
मुसलमानांकडेच आहे. त्यात त्यांच्या अहिंसेमुळे फायद्यापेक्षा जास्तं
नुकसानच झालं आहे! एरवी काही ना काही कारणावरुन उपोषणाला बसणार्या
गांधीजींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी रोखण्यासाठी काहीच का केलं
नाही? त्या वेळी गांधीजी उपोषणाला का बसले नाहीत?"
"भगसिंगांचा मार्ग गांधीजींना मान्य नव्हता आदित्यबाबू! देशाला स्वातंत्र्य मिळावं पण....."
"गांधीजींना मान्य नव्हतं म्हणून भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांच्या बलिदानाचं काहीच मोल नाही?" प्रा. सिन्हांचं बोलणं अर्ध्यावर तोडत आदित्य म्हणला, "लाला
लाजपतराय यांच्यासारख्या वृद्ध योद्ध्यावर शांततापूर्ण आंदोलन करत असताना
अमानुष लाठीमार करणार्या ब्रिटीश अधिकार्याला तसंच मोकळं सोडून द्यायचं?
अहो खटासी व्हावे खट, उद्धटासी उद्धट हे साधं तत्वज्ञान गांधीजींना माहीत
नाही? आणि सर्वात मोठा सवाल सर, देशाची फाळणी झाली तर ती माझ्या मृतदेहावर
होईल असं गांधीजींनी सांगितलं होतं त्याचं काय झालं? फाळणीला त्यांनी
मान्यता कशी दिली?"
"गांधीजींचा फाळणीला विरोधच होता आदित्य! पण इतर पुढार्यांनी, विशेषतः जिन्हांनी त्यांचं ऐकलं नाही त्याल ते काय करणार?" केशवराव हताशपणे उद्गारले.
"मग
गांधीजी उपोषणास का बसले नाहीत? गांधी़जींनी प्राणांतिक उपोषण केलं असतं
तर कदाचित फाळणी टळली असती देशाची! आणि आहेत कुठे आता ते?"
"बंगालात नौआखलीत दंग्याची आग भडकली आहे! गांधीजी तिकडेच गेलेत!"
"छान! आधी दंगा भडकेल अशी कृती करायची आणि मग आगी विझवण्यासाठी धाव घ्यायची!" आदित्य संतापाने उद्गारला.
प्रा. सिन्हा काही बोलणार तोच चारुलता तिथे आली. सेन आणि सिन्हा कुटुंबियांचा पूर्वपरिचय होता. सिन्हा पती-पत्नी छावणीत आल्याचं कळल्यावर ती चित्राला भेटण्यासाठी आली होती. चारुला पाहून चित्राला आनंद झाला. दोघींची मैत्रीच होती.
"डॉक्टरसाहेब कसे आहेत भाभीजी?" प्रा. सिन्हांनी चौकशी केली.
"ठीक
आहेत! आल्या दिवसापासून छावणीतल्या दवाखान्यातच असतात दिवसभर! रात्री
कधीतरी उशीरा येतात आणि बहुतेक वेळी मी सकाळी उठण्यापूर्वीच गेलेले असतात!
मला तर वाटतं, मी आजारी पडल्याशिवाय काही त्यांची भेट होणार नाही आता!" चारु मिस्कीलपणे म्हणाली.
मिर्झा सिकंदरअलीखानांनी चौधरींचं पत्रं प्रतापच्या नावाने रवाना केलं होतं खरं, पण सद्यपरिस्थितीचा फटका टपाल खात्यालाही बसलेला असल्याने ते पत्रं प्रतापर्यंत पोहोचेल किंवा नाही याबद्दल त्यांना चिंताच वाटत होती. पंजाबातील सर्वच शहरांतून अंदाधुंदी माजली होती. जवळपास प्रत्येक शहरात निर्वासितांच्या छावण्यांतून हिंदू आणि शीख निर्वासितांनी आश्रय घेतला होता. कायमचं हिंदुस्तानात जाण्याची ते वाट पाहत होते.
एक दिवस भल्या सकाळी प्रा. सिन्हांनी आदित्य, केशवराव आणि सेन पती-पत्नींना आपल्या राहुटीत बोलावून घेतलं. त्यांच्या राहुटीत त्यांचा एक मित्रं बसला होता. त्याच्या छातीवर बँडेज गुंडाळलेलं होतं. त्याने सांगितलेली हकीकत अंगावर काटा आणणारी होती.
पाकीस्तानची घोषणा होताच सियालकोटमध्येही अनागोंदी माजली होती. प्रतापचा व्यवसाय बंदच पडला होत. कोणत्याही क्षणी गुंडांचा हमला होईल आणि आपल्याला प्राणाला मुकावं लागेल ही भिती त्यांना सतावत होती. वास्तविक हिंदुस्तानची सीमा असलेलं डेरा बाबा नानक हे ठिकाण सियालकोट पासून अवघं पंचेचाळीस मैलांवर होतं. निर्वासितांचे जत्थे या मार्गानेच हिंदुस्तानात जाण्यासाठी निघणार होते. सियालकोटच्या तुलनेत गुजरानवाला हिंदुस्तानच्य सीमेपासून पंजाबच्या अंतर्भागात होतं. परंतु प्रताप आणि उमा दोघांचेही कुटुंबीय गुजरानवाला इथे होते. दोघांनाही त्यांची चिंता लागली होती. अखेर सियालकोट सोडून दोघांनी गुजरानवाला गाठण्याचा निर्णय घेतला. प्रतापचा शेजारी असलेला प्रफुल्ल दासगुप्ता हा देखील त्यांच्याबरोबर निघाला.
दुपारी चारच्या सुमाराला प्रताप, उमा आणि प्रफुल्ल सियालकोट स्टेशनवर गुजरानवलाकडे जाणार्या गाडीत बसले. ही गाडी वझिराबाद मार्गे गुजरानवाला आणि पुढे लाहोरकडे जात होती. खरंतर रस्त्याने सियालकोट ते गुजरानवाला हे अंतर अवघ्या दीड तासाचं होतं, पण रस्त्यातील कोणत्याही गावात गुंडांचा हल्ला होण्याची शक्यता होती. तुलनेने रेल्वेने जाणं सुरक्षीत ठरेल असं प्रतापचं मत होतं.
सियालकोटहून निघालेली गाडी तासाभरात वझिराबादला पोहोचली. वझिराबादच्या स्टेशनवर पंजाबच्या अंतर्भागातून आलेल्या हिंदू आणि शीखांची एकच दाटी झालेली होती. लाहोरकडे जाणारी गाडी स्टेशनावर येताच सर्वांची गाडीत घुसण्याची धांदल सुरु झाली. सुमारे पंधरा - वीस मिनीटांनी गाडीने वझिराबाद स्टेशन सोडलं आणि दक्षिणेचा मार्ग धरला.
वझिराबादहून निघालेली रेल्वेगाडी घाकर मंडी इथे पोहोचली. इथून गुजरानवाला अवघ्या अर्ध्या तासावर होतं. घाकर मंडी स्टेशन सोडून गाडी पुढे निघाली आणि काही अंतरावर अचानक थांबली.
"दीन दीन दीन!"
"अल्ला हो अकबर!"
रेल्वेरुळांच्या दोन्ही बाजूला गुंडांची फौज जमली होती! प्रत्येकाच्या हातात काही ना काहीतरी शस्त्रं होतं! त्यांच्यापैकीच कोणीतरी गाडी थांबवली होती. गाडी थांबताच गाडीवर सर्वांनी एकच हल्लाबोल केला.
"काटो! मारो! पकडो सबको!"
"एकभी काफीर जिंदा बचना नही चाहीए!"
निरपराध हिंदू आणि शीखांच्या करुण किंकाळ्यांनी आसमंत भरुन गेला. अनेक गुंडांच्या हातात तलवारी होत्या. गाडीत शिरुन त्यांनी अंदाधुंद्पणे तलवारी चालवण्यास सुरवात केली. कोणत्याही दिशेने वार केला तरी हमखास बळी मिळत होते. कित्येक हिंदू स्त्रियांना गाडीतून बाहेर खेचण्यात आलं. जमावातील गुंड त्यांच्यावर तुटून पडले. काफीर स्त्रिया जगण्यास नालायक होत्या, परंतु आपली कामवासना शमविण्यासाठी मुसलमान गुंडांना त्या चालत होत्या. या अत्याचारातून लहान मुलं-मुलीही सुटली नाहीत!
प्रफुल्ल दासगुप्ताला छातीवर ओझरती जखम झाली होती. प्रसंगावधान राखून त्याने स्वतःला एका बाकाखाली झोकून दिलं. मधूनच डोळे किलकिले करुन तो परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. प्रताप आणि उमा, दोघांनाही गुंडांनी बाहेर खेचून काढलेलं त्याच्या नजरेस पडलं. पुढील अत्याचाराच्या कल्पनेनेच तो नखशिखांत हादरुन गेला. परंतु त्या परिस्थितीत आपण काही करु शकत नाही हे त्याला माहीत होतं. छातीवरील जखमेच्या वेदना सहन करत मेल्यासारखा तो त्या बाकाखाली पडून राहीला!
सुमारे तासभर हैदोस घातल्यावर त्या गुंडांचं समाधान झालं. गाडीत आणि रुळांच्या बाजूला रक्तमांसाचा चिखल झाला होता. मृतदेहांचा खच पडला होता! अनेक मृतदेहांची कल्पनेपलीकडे भीषण अवस्था झाली होती. कुणाचा हात छाटलेला तर कुणाचे दोन्ही पाय तोडलेले. कोणाचं पोट फाडल्यामुळे आतडी बाहेर येऊन लोंबत होती. काही स्त्रियांची वक्षस्थळं छाटून टाकलेली होती. गुह्यांगांची हवी तेवढी आणि हवी तशी विटंबना करण्यात आलेली होती. मनाचं समाधान होईपर्यंत हैदोस घातल्यावर गुंडांची टोळी निघून गेली.
गुंडांचा धोका टळल्यावरही कित्येक तास प्रफुल्ल त्या बाकाखाली पडून होता. रात्री अंधार पडल्यावर तो गाडीतून खाली उतरला. रेल्वे रुळातून रात्रभर चालत आणि लपत-छपत तो पहाटेच्या सुमाराला छावणीत येऊन पोहोचला होता. प्रातर्विधी आटपून परत येत असलेल्या प्रा. सिन्हांशी त्याची योगायोगानेच गाठ पडली होती!
ही भयंकर बातमी ऐकून काय बोलावं कोणालाच सुचेना. चारुच्या नजरेसमोर चौधरी महेंद्रनाथ आणि कमलादेवी यांचे चेहरे तरळले. चाचाजी आणि कमलाचाचीना कर्त्यासवरत्या मुलाच्या आणि सुनेच्या मृत्यूची भयंकर बातमी कोणत्या तोंडाने सांगायची?
"चाचाजींना ही बातमी द्यायलाच हवी!" बर्याच वेळाने चारु म्ह्णाली.
"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे दिदी, पण त्यांना सांगणार कोण आणि कसं?" आदित्यने सर्वांच्याच मनातला प्रश्न बोलून दाखवला.
"भाभीजी, तुम्ही चौधरीजींना इथे बोलावून आणा! आपल्याला त्यांना हे सांगावं तर लागणारच!"
चारु बाहेर पडली. दरम्यान आदित्यने आपला तंबू गाठून रजनीला सगळ्या घटनेची कल्पना दिली. ही भयानक हकीकत ऐकताच रजनी हादरुन गेली. आदित्यबरोबर ती सिन्हासरांच्या राहुटीत आली. केशवराव, प्रा. सिन्हा, प्रफुल्ल आणि चित्रा गप्पा मारत होते. तेवढ्यात चारुलता चौधरीना घेऊन आली. त्यांच्यासोबत सरिताही होती. प्रा. सिन्हांनी आपल्याला अचानक का बोलावून घेतलं असावं हे चौधरीना कळेना.
सिन्हासरांच्या राहुटीत आदित्य आणि रजनीला पाहून सरिता चकीत झाली. छावणीत आल्यावर ती आदित्यला प्रथमच पाहत होती. तिने प्रश्नार्थक चेहर्याने रजनीकडे पाहीलं, रजनीच्या चेहर्यावरचे भाव पाहिल्यावर अशुभाची शंका तिच्या मनाला चाटून गेली.
"सिन्हासाहेब, आज माझी आठवण कशी काय झाली?" चौधरींनी विचारलं.
प्रा. सिन्हांनी चौधरींची केशवराव, आदित्य आणि प्रफुल्लशी ओळख करुन दिली. प्रफुल्ल सियालकोटहून आला आहे आणि प्रताप आणि उमा यांच्या परिचयाचा आहे हे कळल्यावर चौधरींनी अधिरतेने विचारलं,
"प्रताप आणि उमा नाही आले तुमच्यासोबत? कुठे आहेत ते दोघं?"
क्षणभर काय बोलावं कोणालाच कळेना.
"चौधरीजी, फार दुर्दैवी प्रकार घडला आहे!" अखेर केशवराव म्हणाले, "तुम्ही प्रफुल्लबाबूंची सगळी हकीकत ऐका!"
प्रफुल्लने सियालकोटहून निघाल्यापासूनची सर्व कहाणी तपशीलवार सांगितली. आपण प्रताप आणि उमा यांच्यासह सियालकोटहून गाडी पकडली, घाकर मंडी इथून गाडी पुढे आल्यावर गुंडांनी गाडीवर केलेला हल्ला आणि घातलेला नंगानाच त्याने मोजक्या शब्दात वर्णन केला.
"केवळ त्या बाकाखाली मेल्यासारखा पडून राहिलो म्हणून मी बचावलो!" प्रफुल्ल शेवटी म्हणाला, "परंतु प्रताप आणि उमाभाभी मात्र तेवढे सुदैवी नव्हते. माझ्या डोळ्यांदेखत गुंडांनी त्यांना बाहेर ओढून काढलं!"
"प्रतापभय्या!"
सरितेने किंकाळी फोडली! रजनी आणि चारु दोघी तिच्याकडे धावल्या. तिला शांत करण्याचा त्या प्रयत्न करु लागल्या.
चौधरी महेंद्रनाथ स्तब्धं बसले होते. त्यांची नजर शून्यात लागली होती. केशवराव त्यांच्या शेजारी बसले होते. चौधरींच्या खांद्यावर हात ठेवून ते त्यांचं सांत्वन करण्याच्या दृष्टीने म्हणाले,
"स्वतःला सावरा चौधरीजी! घडायचं ते दुर्दैवाने घडून गेलं आहे! तुमच्या दु:खाची आणि वेदनेची मी केवळ कल्पना करु शकतो, पण...."
"हे..हे खोटं आहे!" चौधरी ठामपणे उद्गारले, "सियालकोटमध्ये इतकी अंदाधुंदी असतना प्रताप उमाला घेऊन गाडी पकडण्यासाठी जाईलच कसा? काहीतरी मोठा गैरसमज होतो आहे तुमचा!"
"गैरसमज कसा होईल पिताजी?" हुंदके देत सरिता म्हणाली, "हे
दासगुप्ताजी सियालकोटला प्रतापभय्या आणि उमाभाभीच्या शेजारी राहतात. गेल्या
दोन वर्षांपासून ओळखतात ते दोघांना! एवढी मोठी चूक कशी होईल? भय्या-भाभी
गेले पिताजी, कायमचे गेले!"
"चौधरीजी, मन घट्ट करा! दुर्दैवाने सत्यं स्वीकारावंच लागेल आपल्याला! निदान तुमच्या मुलीसाठीतरी तुम्हाला सावरायला हवं!"
महेंद्रनाथ काहीच बोलले नाहीत! त्यांनी डोळे मिटून घेतले. केशवराव त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत त्यांचं सांत्वन करत राहीले. अखेर काही वेळाने चौधरींनी डोळे उघडले तेव्हा त्यात कोणतीही भावना नव्हती.
"चल बेटी, तुझ्या मांला ही बातमी सांगायला हवी! चारु बेटी तूपण चल!" अख्रेर महेंद्रनाथ उठले.
ही भयंकर बातमी ऐकून कमलादेवी निश्चलच झाल्या. तंबूत लावलेल्या श्रीकृष्णाच्या तसबीरीकडे त्या एकटक पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचा एक थेंबही आला नव्हता. अखेर त्यांच्या तोंडून हुंदका बाहेर पडला! रात्रभर त्यांचा विलाप सुरु होता.
आदित्य सुन्न झाला होता. त्याचं विचारचक्रं सुरु होतं. देशाची फाळणी झाली. हिंदुस्तान स्वतंत्र झाला, मुस्लिमांना पाकीस्तान मिळालं. पण दुर्दैवी लोकांच्या वाट्याला मात्रं हे भोग आले! लोकांचे भोग त्यांनीच भोगले पाहीजेत! महात्मा गांधी की जय! पंडित नेहरुकी जय! गांधीजी, तुमच्या प्राणांतिक उपोषणाचं काय झालं? पंडितजी, फाळणी टाळणं अशक्यं झालं तर निदान दोन्हीकडच्या लोकांची सुरक्षित पाठवणी होईपर्यंत फाळणीची घोषणा करण्याची एवढी कसली घाई झाली होती तुम्हाला? फाळणीची घोषणा करण्यापूर्वी परिणामांचा विचार का केला नाहीत? आम्हाला वार्यावर सोडून दिलंत तुम्ही! निरपराध लोकांच्या या नृशंस हत्याकांडाला त्या गुंडांइतकेच तुम्हीदेखील भागीदार आहात!
फाळणीच्या नरयज्ञात आहुत्या पडण्यास सुरवात झाली होती.