संध्याकाळचे ५:३० झाले होते.
महाराज अद्याप आले नव्हते.
सत्संगी बाबांची वाट बघत होते.
तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले.
श्रीराम जय राम जयजय राम!
सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला.
महाराज सांगू लागले-
"ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते. हालचाल बंद पदते. चैतन्य म्हणजेच ईश्वर. ईश्वराचे दुसरे रुप. म्हणजे सजीव प्राणी. त्यात वनचर, जलचर तसेच मनुष्य हा प्राणीही आलाच. मनुष्यप्राणी हा विचारवंत असल्याने चैतन्यरुपी ईश्वराला जाणतो, ओळखतो. मनुष्यप्राण्याने पैशांची हाव धरु नये. पैसा हा मनुष्याकरता असतो. मनुष्य पैशांकरता नाही. पैसा हा चांगल्या कामाकरता खर्च करावा. "
तोच एक ऑस्टीन गाडी येवून थांबली. त्या गाडीमधून एक रुबाबदार व्यक्ती उतरते. सत्संग चालू असतांना ती व्यक्ती महाराजांना साष्टांग दंडवत घालते. महाराजांच्या पायाशी ती व्यक्ती ५०००० रु दक्षिणा ठेवते. महाराज "सुखी भव!" असा आशीर्वाद देतात. ५०० च्या कोर्या करकरीत १०० नोटांचे बंडल. महाराज त्या बंडलांकडे तिरप्या नजरेने बघतात आणि सत्संग चालू राहातो. सत्संग संपतो. ती व्यक्ती निघून जाते.
१५ दिवसांनंतर-
एक ऑस्टीन गाडी येवून थांबते. तीच व्यक्ती पुन्हा महाराजांना भेटायला येते. महाराजांना साष्टांग दंडवत घालते. महाराजांना पुन्हा ५०००० रु दक्षिणा देते. महाराज त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात "धनवान हो! सुखी हो!"
त्या व्यक्तीला महाराज विचारतात, "आपण कोण? कोठे रहाता? धंदा काय"
ती व्यक्ती स्वतःचा परिचय करुन देते, " मी लंडनला स्थायिक असून सध्या मुंबईच्या सेंटॉर हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. माझा धंदा आहे, न्यूयॉर्क शेअर मार्केट. शेअर मार्केट मधून रोज २ -४ लाख रुपये कमावतो. इथल्या मार्केटचा अभ्यास करावयास आलो. आपली किर्ती ऐकून दर्शनास आलो. "
महाराज म्हणतात, "मला सुद्धा २ कोटी गुंतवायचे आहेत."
"महाराज, सध्या मार्केट तेज आहे. मार्केटमध्ये मंदी येईल तेव्हा तुम्ही पैसा गुंतवा. "
"तुम्ही मला सहकार्य कराल काय?"
"हो. नक्कीच"
१५ दिवसांनंतर-
त्या व्यक्तीचा महाराजांना फोन येतो.
"मार्केटला सध्या मंदी आहे. अमुक कंपनीचे शेअर्स घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या माणसाला पैसे घेवून पाठवा."
"तुम्हीच या अन पैसे घेवून जा. आणि माझ्या नावाने गुंतवा."
दुसर्या दिवशी-
पुन्हा ऑस्टीन गाडी येवून थांबते. ती व्यक्ती पुन्हा महाराजांना भेटायला येते. महाराजांना साष्टांग दंडवत घालते. ५०००० रु पुन्हा दक्षिणा देते.
"मुनीमजी, दोन कोटी रुपये यांना द्या"
मुनीमजी तिजोरीतून पैसे काढतात. पैसे १.५० कोटीच असतात.
"सध्या एवढेच घेवून जा. मुनीमजी, बाकीचे नंतर घेवून जा. ५० लाख रुपये."
ती व्यक्ती १.५ कोटी घेवून जाते.
१५ दिवसांनंतर-
महाराज सेंटॉर होटेलमध्ये फोन करतात.
सेंटॉरचा मॅनेजर सांगतो, "ते तर १५ दिवसांपूर्वीच लंडनला निघून गेलेत."
त्या व्यक्तीचा तपास लागत नाही. सत्संग सांगूनं जमवलेला पैसा महाठक घेवून गेला.
५०००० रु तीन वेळा दक्षिणा म्हणून १,५०००० रु दिले आणि १.५ कोटी घेवीन गेला.
दोन कोटींमधील ५० लाख मुनीमजींनी वाचविले.
म्हणून महाराजांनी मुनीमजींना ५ लाख बक्षीस दिले.
सत्संग गुंतवणूक पूरी झाली.