शिशिर बाबूंनी रयतेची दाद लावून दिली. पत्रें लिहिलीं ही एकच गोष्ट या वेळेस महत्वाची आहे असें नाही. दुसरी अत्यंत  महत्वाची गोष्ट म्हणजे कायदयाचें कोणत्याही रीतीनें तुम्ही उल्लघंन करतां कामा नये असें त्यानें रयतेस बजविले. अन्नास मोत्ताद झालेले लोक शांतपणें संप किती दिवस चालविणार? त्यांच्या वृत्ति प्रक्षुब्ध होतात. मुलांबाळाचे बायकांमाणसाचे डोळयादेखत अन्नासाठीं तडफडणारे पंचप्राण पहिले म्हणजे मनुष्य बेताल झाला, भावनांनी बेहोष झाला, हा घोर प्रसंग ज्याने आपणांवर आणला,  त्याच्यावर तो धाऊन गेला, तर तें मनुष्य स्वभावास धरुनच होईल. अशा वेळीं शांत राहणें फार कठीण असते.  शिशिरबाबूने या लोकांस आंवरुन धरिलें. शांततेच्या सत्याच्या मार्गानें विजय मिळवा असा त्याचा उपदेश असे. प्राण गेले तरी जावोत, तुरुगांत गेलें तरी बेहेत्तर, परंतु निळीची लागवड म्हणून या हातांनी होणार नाही. या शपथेला देवाला साक्षी ठेवून चिकटून रहा. प्रतिज्ञेपासून ढळूं नका. दुस-यांच्या प्राणांस धक्का लागूं देऊं नका. म्हणजे तुम्ही विजयी व्हाल यांत शंका नाहीं, अशी शिशिरची खात्री असे. त्याच्या सांगण्याप्रमाणे बहुतेक लोकांनी वागण्यांचे लोकोत्तर धैर्य दाखविले. सरकारनें निळीची लागवड केलीच पाहिजे याविषयी जेव्हां जोर जुलुम करावयास आरंभ केला तेव्हां 'हे हात निळीस स्पर्श करणार नाहींत' अशी एकच गर्जना या वीरांनीं केली. त्यांचे हयोरपे तुरुंगांत टाकण्यांत आले, त्यांना शृंखलांचा सन्मान मिळाला परंतु प्रतिज्ञाभंग या लोकांच्या हातून झाला नाही. जमीनदारांनी त्यांना बिडया ठोकाविल्या, त्यांचे नाना हाल केले. घरांदारांची राखरांगोळी करुन तीं जमीनदोस्त करण्यांत आलीं. बायकांमुलांस अनाथापरी, दीनदुबळया भणंगभिका-यांप्रमाणें अन्नवस्त्रहीन देशोधडीस लोवलें-परंतु काय? मोठया अभिमानाची गोष्ट 'आहे. कीं', 'या लोकांनी'प्रतिज्ञेची पूजा केली. सत्याला जुलुम जाळूं शकत नाही. जेथें पूर्णपणे धर्म असतो तेथें यश व जय ठरलेलाच असतो. जेथें कुचराई असेल तेथे पराजय प्राप्त व्हावयाचा. ५० लाख लोकांनी एका कार्यासाठीं तनमनधन वाहिलें असतां कोणती गोष्ट साध्य होणार नाही? कोणता स्वर्ग गांठतां येणार नाही? सत्याचा हा थोर विजय होता. जगाच्या इतिहासांतील हा संस्मरणीय प्रसंग होता. या प्रसंगांत कांही तर दैवी होतें. कांही तर हृदयास हलविणारें होतें. याचा सुणरिणाम झाल्याविना कसा राहील? टपो-या दाण्याला तसेंच फळही टपोरें येतें. या अद्वितीय स्वार्थत्यागाला, सहनशीलतेला फळही मिळालें. इंग्लंड मध्यें प्रधानांनी या गोष्टीची जेव्हां साग्र हकीगत ऐकिली, जमीनदार लोकांचे जूं झुगारुन देण्याचा या सत्वशील परंतु वज्रप्राय वीरांचा दृढ निश्चय जेव्हां त्यांनी स्पष्टपणें पाहिला. तेव्हा या जमीनदारांस आपलें चंबुगवाळें आटोपून बंगालला रामराम ठोकावा लागला. ज्या देशांतील लोकांस या लोकानीं पिळवटून काढून भुके कंगाल केलें, त्यांना हा बंगाल देश प्रधानांनी सोडण्यास भाग पाडलें. 'प्रयत्नांस फळ आलें. 'सहनशीलता सफळ झाली. कृतज्ञ रयतेला आनंदाचे भरतें आलें. प्रेमाचा गहिंवर आला. शिशिरबाबूस त्यांनी 'सिन्नीबाबू' असे नांव दिलें. या प्रेमळ टोपण नांवाचा अर्थ दैववान् असा आहे. जेथें जेथें शिशिर जाईल तेथें तेथें सुदैव धांवत यावयाचेंच अशी त्यांची श्रध्दा जडली.

या दिव्यांतुन यश मिळवून शिशिर घरीं आला. त्याच्या भावाला आकाश आनंदास ठेंगणें झालें. खरोखरच त्यांचे निंबलोण  उतरावयास पाहिजे होतें. आफ्रिकेत २०व्या शतकाच्या आरंभी सत्याग्रहाने झगडणा-या महात्मा गांधीच्या पूर्वी पन्नास वर्षे या तरुण बालांने हा सत्याग्रह यशस्वी करुन दाखविला होता आणि या यशस्वितेचें बीज 'अनत्याचारित्वांत'आहे हे त्यानें ओळखून ५० लाख लोकांस पटविलें होतें. आपण अद्याप अनत्याचारित्वास पारखे आहोंत. मनानें, वाचनें व कृतीने आपण सर्वं अत्याचारी आहोंत. मग आपणांस यश कसें यावें?

या भावंडांच्या गांवाचें नांव पोलुआ मगुरा होय. जेसूर जिल्हयातील हें एक अत्यंत छोटे असें खेडें असल्यामुळे तें लोकांस माहीतही  नव्हतें या तरुण भावांच्या मनांत विचार उत्पन्न झाला कीं, आपलें गांव नमुने दार बनविलें पाहिजे. आपल्या गांवाची सर्वतोपरी भरभराट झाली.  पाहिजे. एका बाजूला पडलेल्या या वनफुलाचा वास सर्व दशदिशांत दरवळाला पाहिजे. ही मुग्ध कलिका फुलून तिचें सौंदर्य सर्व विश्वास दिसावें, हा गांव धन्य असे आनंदोद्वार येथें येणा-याच्या तोंडावाटे निघावे अशी यांची महत्वाकांक्षा होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel