सर्वांचा निरोप घेऊन शिशिर कलकत्यास आला. समुद्रापलीकडे जाऊन मारुतिरायानें जशी सीताशुध्दि आणली, त्याप्रमाणे ही परलोक विद्येची किल्ली सातासमुद्रांपलीकडून आणण्यासाठी ही निश्चयाचा बलभीम निघण्याची तयारी करुं लागला. २५ वर्षांचे वय. आपले लहानसे खेडें सोडून कधी अन्य ठिकाणी न गेलेला असा हा पुरुष १८६३ मध्यें अमेरिकेस जावयास तयार झाला याचें तुझयांस आश्चर्य नाहीं का वाटणार? ही कर्तबगारी, हा रणधीरपणा असतो. म्हणूनच ते थोर  मानावयाचे, आणि आम्ही त्यांची पदधूली वंदावयाची, परंतु परवाना व  तिकिट काढण्यापूर्वी त्यांनी बाबू पिअरी चंद्र मुजुमदार यांची गांठ घेण्याची इच्छा दर्शविली. ते मुजुमदार यांच्याकडे गेले. मुजुमदार म्हणाले' एकदम अमेरिकस जाण्याची घाई करु नका. आपल्या स्वत:च्या घरींच राहून  वा परलेकाविषयीची तुम्हांस अनुभव येतो का पहा.  जर तुम्हांस कांही दृश्य फळ दिसलें नाही तर हा प्रवास पत्कारा. देवानेंच जणूं दैवी संदेश दिला. शिशिरला हें सांगणे पटलें व अमेरिकेस जाण्याचा बेत रदद् करुन पुन: स्वारी आपलयां गांवी परत आली. हेमंत कुमार, मोतीलाल, त्यांची आई, एक बहीण व शिशिरबाबू असें या  पांचजणांचे एक आध्यात्मिक प्रयोगशाळा बंनविण्याचें मंडळ ठरलें. वसंतकुमारांस यामध्ये भाग घेतां येईना. कारण ते या वेळेस फार आजारी होते. दोन बैठकीनंतर हेंमतकुमार व मोतीलाल हे परगत आत्म्यांना मध्यम होऊं लागले. ही शक्ति त्याच्यांत उद्भूत झाली. मोतीलाल बाबूंची ही शक्ति लवकरच  लयास गेली. परंतु हेमंतकुमार म्हणजे एक उत्कृष्ठ लिहिणारें यंत्रच बनलें. हिरालालनें स्वत:चे आस्तित्व या माध्यांतून उत्कृष्ठ त-हेने दर्शविले. कोणालाही तो आला आहे याविषयी शंका राहिली नाही. 'मला माझया कृत्याचा आतां पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तुम्हांस मी दु:खगर्तेत लोटले. व तुमच्या सर्वांच्या साहय्याने होणा-या  माझया प्रगतीस मी आंचबलो खरा. परंतु तुमच्या प्रेमळ व मन:पूर्वक आशीर्वादाने मी लवकरच उन्नति करुन घेईन. माझया आधीं मृत झालेल्या सर्वांना मी येथें भेटलो आहें'अशा प्रकारचा मजकूर त्यानें लिहून दाखविला. पित्याच्या व भ्राताच्या वियोगाने विव्हल झालेल्या या कुटुंबाला फार आनंद झाला. मृत्यूनंतर  आपणांसर्वांची भेट होईल अशी त्यांस खात्री वाटूं लागली. परमेश्वर किती दयाळू आहे हें त्यांस पुरतेंपणी समजले. आनंदसागरांत सर्व मंडळी पोहत होती.

या मंडळीच्या या प्रयोगांची हकीगत इंडियन डेली न्यूजमध्यें जेव्हा प्रसिध्द झाली, त्या वेळेस सर्व लोकांत हाच विषय बोलण्याचालण्याचा होऊन राहीला. सुशिक्षित लोकांत खळबळ उडून गेली. देशाच्या निरनिराळया भागांत व खुद्य कलकत्ता येथें पारलौकिक विद्येच्या प्रसारार्थ संस्था स्थापन होऊं लागल्यां. पुष्कळशा या संस्थाशी खुद्य शिशिरबाबूंचा संबंध होता. हिंदुस्थानांत या आधुनिक काळास अनुरुप अशी परलोकविद्या शिशिरबाबूंनी आणिली. नुसती आणली एवढेंच नव्हे तर तिच्यामध्ये केवढा अर्थ भरुन राहिला आहे,  तिची व्याप्ति किती आहे, तिच्यामध्यें यश कितपत येईल. या सर्व गोष्टी त्यांनी प्रथम सिध्द करुन दिल्या. हिंदुस्थानांतील आधुनिक परलोकविद्येचे ते जनक व प्रणेते आहेत असें समजावयास फारशी हरकत नसावी असें वाटतें.

या परलोकविद्येत शिशिरबाबू रंगले असतां, आपल्या गतभावाची भेट होईल या आनंदात असतां, त्यांच्यावर दुसरा जबरदस्त दु:खाचा  डोंगर कोसळला. प्रेमाची मूर्ति, पावित्र्याची प्रतिमा, विद्येचें माहेरघर सदुणाचे निधन, सर्वांचा आवडता, भावाच्या गळयांतील ताईत, दिव्य स्फूर्ति देणारा, कर्तव्यजागृती करणारा, परमप्रेमाचा संदेश सर्वांस सांगणारा महात्मा वसंतकुमार हा मर्त्यलोक सोडून निघून गेला. शिशिरकुमार व वसंतकुमार यांच्यामधील भ्रातृप्रेम केवळ अवर्णनीय असें होते.  दोघांच्या दोन कुडी निराळया परंतु मनें एकत्र भिनली होती. एकमेकांचे समरस्य झालें होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel