इतक्यांत या खेडेगांवांत तापाची भयंकर साथ उसळली. मोठा कहर गुदरला. अधी अधिक लोकसंख्या मुत्युमुखी पडली.  शिशिरबाबू, त्यांचे  भाऊ इतर कुटुंबातील मंडळी हीं सर्व तापानें खंगुन गेली. अर्थात् याप्रिय जन्मभूमीस त्यांना सोडणें भाग  होतें.

आपल्या गांवास सोडून जाणें शिशिरबाबूंच्या खरोखर जिवावर आलें. जेथें आपण सर्वांनी लोकांस सुधारण्यासाठी नाना प्रयत्न केले, जेथे नाचलो, खेळलो, उनाडलो, बागडलो, तें सर्व सोडून आज जावयाचे  होते. ज्या झाडांवर वानरांपेक्षा सफाईने उडया मारुन चढलो, ज्या नदीमध्ये तासन्तास डुंबत राहिलो, अशी तीं वनें व अशी ती नदी यांस आज मुकावयाचें होते ज्या लोकांबरोबर कीर्तनें केली. ज्यांच्या जवळ मैत्री जोडल्या त्या सर्वास सोडून आज जावयाचे होतें.

डोळयांस टचकन् पाणी आलें तरी गांव सोडून जाणें भाग होतेंच.  आणि याप्रमाणें ही सर्व मंडळी दु:खानें दुखावलेली, तापानें त्रस्त झालेली. सुकलेली व जर्जर झालेली कलकत्यास येऊन दाखल झाली.

दूर प्रदेशात, अफाट शहारांत येऊन मंडळी पडली. कोणी ओळखीचा नाही. सगासोयरा कोणी नाही.  शिशिरबाबूंच्या खिशांत फक्त  १०० रुपये होते. हे सुध्दा त्याने भारी व्याजाने उसनवार काढले होते. मोतीलाल या वेळेस खुलना येथील पिल्जंग शाळेचे हेडमास्तर होते. त्यांनी मोठया मिनतवारीनें साठविलेले २०० रुपये भावास पाठवून दिले. खरोखर पाठचे भाऊ असावेत तर असे असावेत. नाही तर 'भाऊ सख्खे आणि दायाद पक्के'ही म्हण प्रसिध्दच आहे.

सन १८७२ च्या अगदी आरंभी हें देवाचें लाडकें कुटुंब कलकत्यास  आलें. पोटाचीच प्रथम पंचाईत असल्यामुळें दोन माहिने पत्रिकाप्रकाशन बंद ठेवावें लागली. बाबू हेमंतकुमार व मोतीलाल हेही संपादकीय कामांत मदत करण्यासाठी आले.

हें पत्र साप्ताहिक होतें. त्याची दोन रुपें होती. काही भाग इंग्रजी मध्यें असे व कांही बंगालीमध्ये असे. इंग्लिश भाग सर्व शिशिर बाबूंच्या ताब्यांत होता. दोन आठवडयांतच पत्रिकेनें कलकत्यास  चैतन्य आणिलें मृत देहात चेतना चेतली. आपल्या गांवांतील होडया, नद्या बागा यांस शिशिरबाबू मुकले परंतु परमेश्वर करतो तें चांगल्यासाठीच करतो.  आपण माणसें सर्व संकुचित दृष्टीची आहोंत कांहीएक मर्यादेपर्यंत आपण पाहू शकतो आणि त्यावरुन सर्व अनुमानें, बरें वाईट ठरवितो.  शिशिरबाबूस लहानशा रंगणांतून परमेश्वरानें मोठया पटांगणात अणिले.  व्यापक दृष्टी त्याला यावी म्हणून त्याला कलकत्यास अणिलें. त्याच्या
ईश्वरी देण्याचा असंख्य जनतेस उपयोग व्हावा असा परमेश्वरी संकेत होता. या आठ वर्षांत शिशिरबाबू राजकारणाच्या दंगलींत रंगले होते. परमार्थविषयक विचार जरा बाजूस राहिले. परंतु ही पण परमेश्वराचीच योजना असेल. भविष्यत्काळांतील जास्त चिरस्थायी काम सफल व्हांवे म्हणून रक्षक देवदुतांनी आठ वर्षे राजकारणच्या धुमश्चक्रीत  शिशिरला लोटले. या राजकारणांत शिशिरनें पाहिला दर्जा मिळविला म्हणून त्याचे अध्यात्मपर ग्रंथ, त्याचे वैष्णवधर्मावरचे लोकोत्तर ग्रंथ लोकांस मान्य झाले. नाहींतर पदवी न मिळविलेल्या, एका खेडेगांवांतून आलेल्या या माणसांचे ग्रंथ कोण वाचता व त्यांना कोण विचारता?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel