सकाळी मला जाग आली तेव्हा सूर्याची किरणे पूर्ण खोलीभर पसरली होती पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. हवेत थोडासा गारवा होता. वातावरण प्रसन्न वाटत होते. अल्फा अजुनही खिडकीपाशीच बसला होता. पण आता त्याच्या हातात अभ्यासाचे पुस्तक होते. मी आवरून आलो आणि त्याने ते मिटून बाजूला ठेवले. तो चांगलाच खुष दिसत होता.


"वा! सकाळ सकाळी चक्क अभ्यास! तुझा तर नूरच पालटलेला दिसतोय! " मी म्हणालो, " किती वाजता उठला आहेस? "


" साडेपाच. " अल्फा उत्तरला, " सकाळी अभ्यास करायला मजा येते रे! मी एवढ्या लवकर उठून पहिल्यांदाच अभ्यास केलाय. असाच रोज एक एक तास अभ्यास केला, तर कदाचित टॉपच मारेन बघ मी! "


" हं. उदंडच! " मी म्हणालो, " रत्नजडित खंजिराच्या केसमध्ये कुठेतरी हरवलेला धागा सापडलाय, असं दिसतंय. तुझा चेहराच बोलतोय. "


" अगदी बरोब्बर ओळखलंस बघ.. " अल्फा उत्साहाने म्हणाला, " मला काहीतरी मिळालेय. एक कल्पना, जी या प्रकरणातील सर्व धाग्यांना जोडते.. खरोखर प्रभव, सत्य हे कधीकधी कल्पनेपेक्षाही विलक्षण असू शकते, याची प्रचिती मला काल विचार करता करताच आली. मला अंदाज नाही, की माझी कल्पना कितपत बरोबर आहे. पण एक गोष्ट मात्र मी खात्रीशीरपणे सांगू शकतो, की माझ्या कल्पनेहून अधिक सत्याच्या जवळ जाणारी दुसरी कोणतीच संभाव्यता असू शकत नाही. "


" अरे भल्या गृहस्था, आणखी किती कोड्यात बोलशील? माझी उत्सुकता ताणून ताणून आता फाटायला आली! सांगून टाक एकदा, तुझी कल्पना काय आहे ते. "


" तूर्तास तरी नाही. " अल्फा म्हणाला, " आज संध्याकाळी आपण समडोळीला जाणार आहोत. त्यावेळी वाटेत मी तुला सर्वकाही सविस्तर सांगेन. "


" समडोळीला? पुन्हा? " मी चक्रावलो.


" होय. रत्नजडित खंजिराच्या शोधातला अर्धा भाग आज पूर्ण होणार आहे. तोपर्यंत तू तुझं कॉलेज वगैरे आटपून घे. तुझं चारचं लेक्चर फार कुरकुर न करता बुडव. आपण संध्याकाळी पाचच्या सुमारास निघणार आहोत."


संदिग्ध मनानेच मी त्याला होकार दिला. आज अल्फाच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता. पठ्ठ्याला काहीतरी सापडलं होतं, हे नक्की. मला तर कधी एकदा संध्याकाळ होते आणि कधी एकदा आम्ही समडोळीला जायला निघतो, असं झालं.


अखेर संध्याकाळी साडेपाच वाजता अल्फा आणि मी बस स्थानकावर पोहोचलो. समडोळीची सिटी बस तेथे उभी होतीच. त्यामध्ये आम्ही जाऊन बसलो. बस पाचच मिनिटात सुटली. सांगली शहर संपेपर्यंत अल्फा काहीच बोलला नाही. बसने आयर्विन पूल ओलांडला आणि शहर मागे पडले. हळूहळू शेते, माळराने दिसू लागली. मावळतीच्या प्रकाशात उसाचे फड पिवळेधमक दिसत होते. वाऱ्याच्या तालावर डोलत होते. परतीच्या वाटेवरील पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. अल्फाने माझ्याकडे पाहिले. मी उत्सुकतेने त्याच्याच तोंडाकडे पहात होतो. अल्फाने एक हलकेच स्मित केले आणि बोलण्यास सुरूवात केली,


"हं... ठिक आहे तर. आपण या प्रकरणाची चार भागांत विभागणी विभागणी करुया. पहिला - आपल्याकडे काय होते, दुसरा - आपल्याला काय हवे होते, तिसरा - आपण कुठे अडत होतो आणि चौथा - या सर्व प्रश्नांना उत्तरे देणारी माझी कल्पना. किंबहुना तेच सत्य आहे, असे म्हटले, तरी चालेल. कारण तशी माझी खात्रीच आहे. आता आपण गुन्हा घडला त्या रात्रीपासून विचार करुया. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा घडला. तिथे केलेल्या तपासणीत आपल्याला काय मिळाले? रत्नजडित खंजिराची रिकामी पेटी, त्याला लागूनच राहिलेला चाव्यांचा जुडगा, चेअरमनच्या केबिनचे उघडे दार, तेथील टेबलाच्या मागचा दबलेला गालिचा आणि टेबलाला लागलेले अॉईलचे डाग. इतक्या माहितीवरून आपल्याला रत्नजडित खंजिर शोधायचा होता. अर्थातच गुन्हेगाराला चेअरमनच्या केबिनची सखोल माहिती असायला हवी होती आणि काही कारणाने त्याचे हात गाडीच्या अॉईलने माखलेले असायला हवे होते. मग मी पहिला मुद्दा मनात पकडला आणि चेअरमनसाहेबांचे निकटवर्तीय शोधले. पण त्यांमधले कोणीच गुन्ह्याच्या वेळी संग्रहालयात नव्हते. मग मी मुळापासून शोध घेण्याचे ठरविले. न जाणे, या गुन्ह्याशी रखवालदार महादबा पाटलाचे वैयक्तिक कारण जोडलेले असावे, असा विचार मी केला.


आणि माझा अंदाज खरा ठरला. अनिल पाटील हा गुन्हा करण्यासाठी अतिशय पूरक असा माणूस होता. तो धंद्याने मेस्त्री असणे, शिवाय गुन्ह्याच्या रात्री त्याचे सांगलीत असणे या गोष्टी नक्कीच गुन्हेगार म्हणून त्याच्याकडे बोट दाखविणाऱ्या होत्या. आपल्या जागी कोणी पोलीस अधिकारी असता, तर त्याने अनिल पाटलाला पकडले असते आणि मारून मुटकून त्याच्याकडून रत्नजडित खंजिराची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण दुसर्‍या बाजूने पाहता, अनिल पाटलाने खंजिर चोरल्याचा कोणता पुरावाही मिळत नव्हता. खंजीर त्याच्या घरीही नव्हता आणि त्याने कोणाला दिलेलाही नव्हता. त्याच्या बायकोनेही सांगितले, की तो रात्री रिकाम्या हातानेच परत आला होता. शिवाय, मी त्या रात्री महादबा पाटलाने मरण्याच्या वेळी जो शर्ट घातला होता, त्याची तपासणी केली होती. त्यावरही मला अॉईलचे काळपट डाग दिसले. पण वैशिष्टय़पूर्ण गोष्ट अशी, की चाव्यांच्या जुडग्यावर, चेअरमनच्या केबिनमधील कपाटावर आणि रत्नजडित खंजिराच्या पेटीवर मात्र हे डाग नव्हते. याचा अर्थ काय? एकाच वेळी अनिल पाटील गुन्हेगार आहे आणि नाही या दोन्ही गोष्टी सिद्ध होत होत्या. शिवाय त्या दबलेल्या गालिचाची गोष्ट वेगळीच. अशा सगळ्या प्रश्नांवर आपली गाडी अडत होती. या सर्वांचा परस्परसंबंध काय?


यावर मी काल बराच उशीर विचार करीत होतो. मी प्रथम या गुन्ह्याचा आढावा घेतला. मंगळवारी रात्री त्या संग्रहालयात दोन गोष्टी घडल्या होत्या - एक म्हणजे रखवालदार महादबा पाटलाचा खुन आणि दुसरी म्हणजे रत्नजडित खंजिराची राची चोरी. आपण आत्तापर्यंत या दोन्ही गोष्टी एकाच गुन्ह्याचा भाग समजत होतो. मग क्षणभरासाठी मी या दोन्ही घटना वेगळ्या करून पाहिल्या आणि माझ्या डोक्यात लख्खकरून प्रकाश पडला. महादबा पाटलाचा खुन आणि रत्नजडित खंजिराची चोरी या दोन वेगवेगळ्या घटना आहेत, हेच खरे या केसचे उत्तर आहे!! केवळ हिच शक्यता आपल्या सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे देऊ शकते..! "


" म्हणजे? " मला काहीच कळाले नाही.


" म्हणजेच," अल्फा म्हणाला, "महादबा पाटलाचा खुन आणि रत्नजडित खंजिराची चोरी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आणि एकाच व्यक्तीने केलेल्या असणे बंधनकारक नाहीये. हे दोन गुन्हे दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या वेळी केलेले असू शकतात.. आणि तेही स्वतंत्रपणे!!"


"काय?? " मी डोळे विस्फारून म्हणालो, " याचा अर्थ.. ज्याने रत्नजडित खंजिर चोरलेला आहे, त्याने.. त्याने रखवालदाराचा खुन केलेला नाहीये..?? "


" नाहीच मुळी!!! " अल्फा ठासून म्हणाला, " आणि ज्याने रखवालदाराचा खुन केलाय, त्याने रत्नजडित खंजिर चोरलेला नाहीये..!! "


यापेक्षा अधिक अकल्पित काही असूच शकत नव्हते.


" हे बघ, " अल्फा म्हणाला, " अनिल पाटलाचे शत्रुत्व त्याचा सावत्र भाऊ महादबाशी होते. त्यामुळे त्याने त्याचा खुन केलेला असणार, हे नक्की आहे. पण त्याने खंजिर चोरल्याचा पुरावा कुठाय? त्याच्या घरी नाहीये, त्याने कुठे विकलेला नाहीये, खंजिराच्या पेटीवर त्याच्या हातांचे काळे डाग नाहीयेत. या सर्वांचे एकच कारण आहे - अनिल पाटलाने चोरी केलेलीच नाहीये! प्रकरणाची गुंतागुंत लक्षात येतीय का तुझ्या? या प्रकरणात एक नाही, तर दोन गुन्हेगारांचा समावेश आहे! "


" मग ज्याने खंजीर चोरलाय त्याचे काय? " मी स्तंभित होऊन विचारले.


" ते अजुनही एक कोडेच आहे. खुन आणि चोरी या दोन्ही घटनांमध्ये पाच मिनिटांचे का होईना, पण अंतर आहे. या दोन गोष्टी एकाच वेळेस घडलेल्या नाहीत. मी काढलेल्या निष्कर्षानुसार, खंजीर चोरणारा नक्कीच महादबा पाटलाच्या खुनानंतर आला होता. आणि फार वेळाने नाही. फारतर पाच मिनिटे उशिरा.. "


" हे तू कशावरून म्हणू शकतोस? "


" आणि खंजिराची चोरी होताना महादबा पाटीलसुद्धा संग्रहालयात उपस्थित होता. "


" अल्फा!! आता मात्र तू कहर करतोयस!! माझं डोकं हळूहळू सुन्न पडायला लागलंय. तू हे कशाच्या आधारावर बोलतोयस? " मी अविश्वासाने विचारले.


" चेअरमनच्या केबिनमधला तो दबलेला गालिचा!! " अल्फा आपले गूढतेने भरलेले डोळे माझ्यावर रोखत म्हणाला, " आपण समजत होतो, की गुन्हेगार टेबलाखाली काहीतरी शोधण्यासाठी खाली वाकला असावा. पण तसे घडले नव्हते. तेथे अनिल पाटील बसला होता. नक्कीच वाकलाही होता. पण काही शोधण्यासाठी नव्हे, तर स्वतःला वाचविण्यासाठी! स्वतःला लपविण्यासाठी!! संग्रहालयात सर्वप्रथम अनिल पाटील आला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकून महादबा पाटील आत आला. अनिलने सराईतपणे त्याच्या छातीत चाकू घुसवून त्याला ठार केले. त्याचे काम आता फत्ते झाले होते. तो तेथून बाहेर पडणार, इतक्यात त्याला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली असावी. त्यामुळे नक्कीच तो गडबडला असणार. त्या दालनात लपण्यासारखी कोणतीच जागा नव्हती. मग त्याला चेअरमनची केबीन दिसली असावी, तीही लॉक न केलेली. मग येणाऱ्या व्यक्तीने पहायच्या आतच तो केबिनमध्ये घुसला. ही दुसरी व्यक्ती म्हणजे आपला दुसरा गुन्हेगार- रत्नजडित खंजिराचा चोर असणार, यात शंकाच नाही. ती व्यक्तीदेखील काही मिनिटातच चेअरमनच्या केबिनमध्ये शिरली असावी, त्या पेटीच्या चाव्या मिळविण्यासाठी. त्यावेळी हा अनिल पाटील त्याच केबिनमध्ये होता, चेअरमनच्या टेबलाच्या मागे अंग चोरून बसला होता. मागहून आलेली व्यक्ती संग्रहालयातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत तो घाबरून तेथेच बसून राहिला असावा. त्यामुळेच त्याच्या हाताचे काळपट डाग टेबलाच्या बाजूला लागले आणि गालिचा त्याच्या बराच वेळ बसण्याने खोल दबला गेला असावा. केवळ हा घटनाक्रम धरून आपण चाललो, तरच आपल्याला आपल्या न सुटलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. मला तर खात्री आहे. सत्य हे यापेक्षा वेगळं काही असूच शकत नाही. "


मी अल्फाकडे पहातच राहिलो होतो. मला काय प्रतिक्रिया द्यावी, तेच कळेना.


" मी पूर्णपणे निःशब्द झालोय अल्फा... " मी म्हणालो, " असे खरोखर घडू शकते?? "


" घडू शकते नाही, असेच घडलेले आहे प्रभव!!" अल्फा म्हणाला,  "या घटनेतील दोघांपैकी एका गुन्हेगाराला पकडायला आत्ता आपण निघालेलो आहोत. मला वाटतेय, की या अनिल पाटलाला खंजिराच्या चोराबद्दल काही माहिती असण्याची दाट शक्यता आहे. कोण जाणे, त्याने त्याच्या चेहराही पाहिला असावा - त्या टेबलाच्या मागे लपून!! त्यामुळे अनिल पाटील हे पात्र आपल्या नाट्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अर्धा तास थांब. अर्ध्या तासात हे प्रकरण अगदी काचेसारखे पारदर्शक होईल बघ. "


इतके बोलून अल्फा पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला. मला अखेर अल्फाच्या कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्तेचा साक्षात्कार पहायला मिळाला होता. हे सर्व अशा प्रकारे घडले होते, की त्यापुढे कविकल्पनाही फिकी पडावी!! अल्फाच्या तर्काची पडताळणी काही वेळात अनिल पाटलाच्या तोंडूनच होणार होती. त्यामुळे डोक्याला फार ताण न देता मी शांत बसून राहिलो. अखेर आमची बस गावात येऊन पोहोचली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel