गोष्टी घराकडिल मी वदतां गडया रे
झालें पहा कितिक हें विपरीत सारे !--
आहे घरासचि असें गमतें मनांस,
ह्या येथल्या सकळ वस्तु उगीच भास !

ही देख म्हैस पडवैमधिं बांधलेली
रोमथभाग हळु चावित बैसलेली.
मित्रा ! गजांमधुनि या पडवीचिया रे
मौजा पहा क्षणभरी रजनीचिया रे !

डोळयांत बोट जरि घालूनि पाह्‍शील
अंधार तो अधिकची तुजला दिसेल ! --
अंधार-- जो फलक होत असे अम्हांस
चेतोनिबद्धजनचित्र लिहावयास !

आवाज ’ किरं ’ रजनी वदतेच आहे,
’घों घों ’ असा पवन नादहि बोलताहे;
ऐके पलीकडुनि बेडुक शेतभातीं
पर्जन्यसूक्त सगळे मनमोख्त गाती ?

हीं चारपांच चढूनी हळु पायठाणें
या ओसरीवर अतां जपुनीच येणें !
हें ऐक रे ’ टकटका ’ करितें घडयाळ
या शान्ततेंत गमतें कुटितेंच टाळ !

डावीस हा बघ निरेखूनि एक माचा
निद्रिस्थ त्यावरि पिता अतिपूज्य माझ्या.
त्याचा खरोखर न मी क्षण पुत्र शोनें !
तो सर्वदा जरि म्हणे मज पुत्र लोभें !

तातास या बघुनि या ह्रदयांत खातें,
होऊन हें ह्रदय विव्हळ सर्व जातें !
त्याच्या तरी पदयुगावरि या पडूनी
नाणूं तयास मग कां वद आंसवांनीं ?

ताताचिया बघ गडया उजवे कडेला
बापू असे तिथ बेरें अमुचा निजेला,
अज्ञान तो चपलधी परि बाल आहे
त्याचेविशीं मम मनीं अतिलोभ राहे !

बापू ! गडया ! ध्वज उभा करशील काय ?
तूं देशकारण करूं झटशील काय ?
बापू ! जनांत दिवटी धरशील काय ?
स्वातंत्र्यदेव मनसा भजशील काय ?

मित्र ! घरीं सुदुढ हस्त मदीय फार,
दारास आडसर घट्ट असेल थोर,
दाराचिया तर फटींतुन आंत जाऊं,
सानंद सुस्थित घरांतील सर्व गाऊं !

मित्रा ! इथें कितितरी मज हर्ष होई,
येथें हवा मधुर, निश्वबनांत येई,
नाहीं कधींहि बुधवारवनांत जैशी
वाटेवरी चतुरशिंगिचिया न तैशी !

मित्रा ! असा हळूच ये उजवे
खोली पहा पघळ ही किती ऐसपैस,
निद्रावश स्वजन येथ, बघूनि यास
हर्षाचिया न उकळया फुटती कुणास

ती एक खाट अवलोक समोर आतां
आहे सुषुप्तिवश तेथ मदीय माता,
तीचे कुशींत निजली दिसते मदीय
भीमा स्वसा, बधुनि ती मज हर्ष होय,

मत्कारणें स्तवुनि देव, निजावयातें
आलीस तूं खचित गे असशील माते !--
मोठे त्वदीय उपकार, जरा तरी ते
जातील का फिटूनियां तव पुत्रहस्तें ?

खालीं मदीय भगिनी दिसती निजेल्या,
गोष्टी जयांस कथितां न पुर्‍याच झाल्या !
ती कोण दूर दिसते ?-- निजली असूनी
जी श्वास टाकित असे मधूनीमधूनी !

कान्ताच ही मम ! -- अहा ! सखये ! मदीय
स्वप्नें अंता तुज गडे ! दिसतात काय ?--
आतां असो ! पण पुढें तुजला दिसेत
स्वप्ने तुझीं मग समग्र तुला पुसेन !

मागील दारीं सखया ! तुळशीस आतां
वन्दूं, जिला मम जनीं नमिला स्वमाथा !
सोडूनि गांव वळणें अमुच्या घराचें !
येऊं घरा परत खासगिवालियाचे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel