पौर्णिमेच्या पूर्णचंद्राला साक्षी ठेवून आज आपण महाराष्ट्र देशाच्या मायलेकरांचा खराखुरा दसरा साजरा करत आहोत (टाळया). दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतात. आणि सीमोल्लंघन केल्यानंतर तिथून सोनं लूटून आणायचं असतं. आज आपल्याभोवती इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या भानगडींच्या, अडचणींच्या निराशेच्या सीमा पडलेल्या आहेत की, आपल्या पुर्वीच्या प्रथेप्रमाणे नुसती गावाची एक सीमा उल्लंघून आपल्याला जमणार नाही. तेवढयासाठी सबंध महाराष्ट्राचा एकजात मराठा, छत्रपतींची शपथ घेऊन, मी महाराष्ट्राचा अभिमानी लेक आहे... यापुढे कोणाच्याही प्रतीटोल्याची तमा न ठेवता समोर येईल ती सीमा तुडवीत निघण्याइतकी ताकद येईल,अशी हिंमत बांधली पाहीाजे. अहो, सामोपचाराच्या गोष्टी गांडूनी सांगाव्या. (हशा) मर्दाचं ते कामनाही. समर्थ रामदास म्हणतात, मारिता मारिता मरावे। मरोनि अवघ्यास मारावे। (टाळया) महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाहीये. ही वाघाची अवलाद आहे; आणि या वाघाला कोणी डिवचलं तर त्याचा परिणाम काय हाईल, याचे इतिहासामध्ये दाखले आहेत. भविष्यकाळात पहायचे असतील तर पहायला मिळतील! (प्रचंड टाळया) अजून आमचं रक्त भ्रष्ट झालेलं नाही. शिवाजीचं नाव आम्हाला सांगायचं आहे. भवानी आमच्या पाठीशी उभी आहे. काळ बदलला, विचार बदलले, आचार बदलले, ड्रेस बदलले, सगळे बदलले, तरी मराठा म्हणून जो मंत्र आहे, जो छत्रपतींनी आम्हाला दिलेला, ती शिवरायांची मुर्ती आमच्या देहातून काढून टाकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही. (टाळया)
शिवरायांची मुर्ती आणि किर्ती आमच्या हृदयात आत्माराम म्हणून आहे. आमच्यावरती आज ज्यांची आक्रमणं झाली आहेत त्यांची तर गोष्टच सोडून द्या. परंतू सगळया हिंदूस्थानवर राज्य जे करतायत त्यांनाही कळून चुकलं पाहीजे, कि महाराष्ट्र हा काही मेलेल्या आईचं दुध प्यायलेला नाही. (टाळया) असा हा पराक्रम दाखवण्यासाठी, पहिली गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्राचा मराठा आहोत, एका आईची लेकरे आहोत, सख्खी भावंडं आहोत, असं तीम्ही मानलं पाहीजे. आजपासून तशी शपथ घ्या. दुसरी गोष्ट स्त्री वर्ग, महिला! या महिलांच्या बद्दल जितका जितका आदर तुम्ही आपल्या अंत:करणामध्ये साठवित जाल, वाढवित जाल, तितका तितका तो शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होईल! अरे, नारी नर की खान, जिस खानीसे पैदा हुए राम, कृष्ण, हनुमान (टाळया) मी वर्तमानपत्रात वाचतो... आमच्या पोरीची टिंगल केली गेली. जातिवंत मराठा तिथे एकटा जरी असला, तरी त्याने जीव त्या पोरीच्या रक्षणासाठी दिला पाहीजे. धावून मेला पाहीजे. आज इथे काय चाललंय. मी तर काही घराबाहेर पडत नाही, मी झालोय आता कोकिळेचा मास! (हशा) पण तुम्ही माझ्या पाठीमागे सारे उभे राहीलात आणि हा शिवरायाचा भगवा झेंडा घेऊन ‘महाराष्ट्र की जय’ म्हणून जर तुम्ही गर्जना केलीत, ठिकठिकाणी उभे राहीलात, तर काय कुणाची टाप आहे तुमच्या विरुध्द जायची? आमच्या मागण्या आहेत. आम्हाला काय पाहीजे, ते तुम्हाला ‘मार्मिक’नं इतक्या दिवसात सांगितलंय. ती प्रत्येक गोष्ट आपण मिळवलीच पाहीजे. त्याच्याकरता वाटेल ते करावं लागलं तरी चालेल.
आता स्वस्थ बसायचं नाही. अरे, मराठा म्हणजे काय? मराठयाच्या नावाचा दरारा केवढा होता! मराठे रस्त्याने जर चालू लागले, तर विरोधक टरकून बाजूला झाले पाहीजेत. एवढं सामर्थ्य तुम्ही तयार केलं पाहिजे. (टाळया) लेख लिहीताना, भाषण करताना, कोणतीही कामगिरी करताना पेटलं पाहिजे. असं तुमचं एकदा अंत:करण पेटायला लागलं, की सत्याची चाड आणि असत्याची चीड येणारच. अन्यायाची चीड आली पाहीजे. माथं भडकून गेलं पाहीजे. मी एक मराठा इथे उभा आहे नि माझ्यासमोर अन्याय? तो तरी मरेल किंवा मी तरी मरेन. इतकी जिद्द असल्याशिवाय मराठयाला मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही! म्हणून तुम्ही आज जमला आहात. आपल्याला सीमोल्लंघन करायचंय. ते करताना प्रत्येक ठिकाणी छत्रपतींचं नाव घेऊन, संकटात उडी घालून अन्यायाचा फडशा पाडायचा, असा निश्चय केला पाहिजे. बसमध्ये जाताना एखाद्या महिलेला कुणी धक्का मारला, तर एक फाऽडकन वाजली पाहीजे. इतकी जेव्हा जरब तुम्ही निर्माण कराल, त्याचवेळेला रस्त्यातून, चाळीतून-बिल्डिंगमधून होणारे गैरप्रकार थांबतील. ‘अहिंसा परमो धर्म:’ हे तिथे चालणार नाही.
अहो, अशा अहिंसेने कुठे कामं होतात काय? मी सांगतो तुम्हाला पुराण. एखादा पुराणिक काय माझ्यापुढे पुराण सांगेल! ब्रम्ह आहे नी माया आहे! ठीक आहे! पण आमचं-आमचं कर्म आहे, ते आम्हाला सुधारायचंय. (टाळया) तेव्हा आज ही शिवसेनेची सगळी गर्दी पाहून तुमचं दर्शन घेऊन मला तर असं वाटायला लागलं की, जो अर्जुन धनुष्यबाण टाकून एखाद्या नपुंसकासारखा उभा राहीला; तेव्हा त्याला भगवान कृष्णानी, गीतेचा उपदेश केला. त्यावेळी भगवंतानं त्याला जसं विश्वरूप दाखवलं, तसं हे विश्वरुप आज हतबल झालेल्या मराठयाला, आपल्याला शिवरायानं दाखवलं आहे. ही विश्वरुपाची पुण्याई फुकट जाता कामा नये. तुम्ही जर शिवरायाचे खरे भक्त असाल, जातिवंत मराठे असाल, मराठयाचं नाव सांगत असाल, महाराष्ट्राबद्दल खरंखुरं प्रेम असेल, तर आजपासून निश्चय करा :- अन्यायाला कधीही मी क्षमा करणार नाही आणि जे न्याय्य आहे त्याच्याकरता झगडतना प्राण गेला तरी बेहत्तर! पण महाराष्ट्राचं नाव मी बद्दू करणार नाही! अशी बुध्दी तुम्हाला छत्रपती शिवराय देवो, इतकं सांगून मी माझं भाषण संपवतो.