मेघनादाला इंद्रजीत देखील म्हटले जाते कारण त्याने स्वर्गावर आक्रमण करून तिथे आपला अधिकार प्रस्थापित केला होता. तो अत्यंत शक्तिशाली आणि मायावी होता. त्याने हनुमानाला बंदी बनवून रावणा समोर हजर केले होते. दिव्य शक्ती : रावणाच्या पुत्रांमध्ये मेघनाद सर्वांत पराक्रमी होता. असे मानले जाते की जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याने मेघाच्या समान गर्जना केली होती म्हणून त्याचे नाव मेघनाद पडले. मेघनादाने युवा अवस्थेतच दौत्यगुरू शुक्राचार्य यांच्या सहाय्याने 'सप्त यज्ञ' केले होते आणि शंकराच्या आशीर्वादाने दिव्य रथ, दिव्यास्त्र आणि तामसी माया प्राप्त केली होती. त्याने रामाच्या सेनेशी मायावी युद्ध केले होते. कधी तो गायब होत असे तर कधी प्रकट होत असे. बिभीषणाने कुबेराच्या आज्ञेने श्वेत पर्वतावरून गुह्यक जल आणून दिले होते ज्याने डोळे धुतल्याने अदृश्य देखील दिसत असे. रामाच्या सर्व प्रमुख योद्ध्यांनी या जलाचा प्रयोग केला होता जेणेकरून मेघनाद दिसू शकेल आणि त्याच्याशी युद्ध करता येईल.
मेघनादाचा वध : याने राम आणि लक्ष्मणावर दिव्य बाण चालवला जो नागपाशात बदलला. त्यामुळे राम आणि लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडले. राक्षस सैन्यात चैतन्य पसरले आणि रामाच्या सैन्याचे मनोबल ढासळू लागले. ही बदलती परिस्थिती बघून हनुमानजी पवन वेगाने गरुडाला घेऊन आले. गरुडाने नागपाश तोडून राम-लक्ष्मण यांना मुक्त केले. राम लक्ष्मण भानावर आले आणि वानर सेनेचे मनोबल वाढवू लागले. मेघनादाला जेव्हा राम लक्ष्मण जिवंत असल्याचे समजले तेव्हा तो पुन्हा युद्ध करायला आला. यावेळी लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यात प्रलयंकारी युद्ध झाले. दोघेही एकमेकांवर दिव्य अस्त्रांचा प्रयोग करू लागले. दोघांचे युद्ध बघून आकाशातील देव सुद्धा हैराण झाले होते. तेवढ्यात लक्ष्मणाने रामाचे नाव घेऊन एक दिव्य बाण मेघनादावर सोडला. बाण मेघनादाचे मस्तक छाटून आकाशात दूरवर घेऊन गेला. मेघनादाची ही अवस्था पाहून राक्षस सेनेचे मनोबल पूर्णतः खचले आणि ती सर्व सेना जीव वाचवून नगरच्या दिशेने पळून गेली. रावणाला जेव्हा मेघनादाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा अतिशोकाने तो सिंहासनावर कोसळला.