एकदा दारूक नावाच्या असुराने ब्रम्हदेवाला प्रसन्न करून शक्तिशाली होण्याचे वरदान प्राप्त केले आणि म्हटले माझा मृत्यू कोणाही कडून होऊ नये. ब्रम्हाने जेव्हा अमर होण्याचे वरदान देण्यास नकार दिला तेव्हा त्याने म्हटलं की ठीक आहे, माझा मृत्यू एखाद्या स्त्रीच्या हातून होऊदेत. ब्रम्हदेवाने म्हटले - 'तथास्तु'. दारूकाला घमेंड होती की मला तर कोणतीही स्त्री मारू शकणार नाही.
वरदानाने तो देवता आणि विप्रांना प्रलयाच्या अग्नीच्या समान दुःख आणि त्रास देऊ लागला. त्याने सर्व धार्मिक अनुष्ठाने बंद करवली आणि स्वर्गलोकात आपले राज्य प्रस्थापित केले. सर्व देवता ब्रम्हा आणि विष्णूकडे गेले. ब्रम्हदेवाने सांगितले की हा दुष्ट केवळ स्त्रीच्या हस्तेच मारला जाऊ शकतो. तेव्हा ब्रम्हा आणि विष्णूसहित सर्व देव स्त्रीरूप धारण करून दारूकाशी लढण्यासाठी गेले, परंतु दैत्य अत्यंत शक्तिशाली होता आणि त्याने त्या सर्वांना पराभूत करून पळवून लावले. ब्रम्हा, विष्णूसह सर्व देव भगवान शिवाच्या कैलास पर्वतावर गेले आणि त्यांना दैत्य दारूकाविषयी सांगितले. भगवान शंकराने त्यांचे बोलणे ऐकून माता पार्वतीकडे पाहिले. तेव्हा माता हसली आणि तिने आपला एक अंश भगवान शंकराच्या शरीरात प्रविष्ट केला. मातेचा तो अंश भगवान शिवाच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या कंठात स्थित विषाने आपला आकार धारण करू लागला. विषाच्या प्रभावाने तो काळ्या रंगात परावर्तीत झाला. भगवान शंकराला त्या अंशाची आपल्या अंतरात जाणीव झाली आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला. त्यांच्या नेत्रातून भयंकर अक्राळ विक्राळ रुपाची काळ्या वर्णाची कालीमाता उत्पन्न झाली. कालीमातेचे ते भयंकर आणि विशाल रूप पाहून सर्व देवता आणि सिद्ध लोक पळू लागले.
कालीमातेच्या केवळ एका हुंकाराने दारुक समवेत त्याची सर्व असुर सेना जळून भस्म झाली. मातेच्या क्रोधाच्या ज्वाळेत संपूर्ण लोक जळू लागले. तिच्या क्रोधाने सृष्टी जळताना पाहून भगवान शंकराने एका बालकाचे रूप धारण केले. शिव स्मशानात पोचले आणि तिथे झोपून रडू लागले. या रडण्यामुळेच त्यांचे नाव "रुरु भैरव" असे पडले. जेव्हा कालीमातेने त्या शिवरूपी बालकाला पहिले तेव्हा ती त्याच्या रूपाने मोहित झाली. वात्सल्य भावनेने तिने शिवाला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि आपल्या स्तनांनी त्याला दुध पाजू लागली. भगवान शंकराने दुधासमवेत तिचा क्रोध देखील पिऊन टाकला.
शंकराने तिचा क्रोध पिऊन टाकल्याने ती बेशुद्ध झाली. देवीला शुद्धीवर आणण्यासाठी भगवान शिवाने तांडव नृत्य केले. शुद्धीवर आल्यावर जेव्हा कालीमातेने भगवान शंकराला नाचताना पहिले तेव्हा ती देखील नृत्य करू लागली ज्यामुळे तिला "योगिनी" म्हटले गेले.
श्री लिंगपुराण अध्याय १०६ नुसार त्या क्रोधाने शिवाचे ५२ तुकडे झाले, तेच ५२ भैरव म्हणवले. तेव्हा ५२ भैरावांनी मिळून भगवतीच्या क्रोधाला शांत करण्यासाठी विविध मुद्रांमध्ये नृत्य केल तेव्हा कुठे भगवती मातेचा क्रोध शांत झाला. यानंतर भैरवाला काशीचे आधिपत्य दिले आणि भैरव आणि त्याच्या भक्तांना काळाच्या भयातून मुक्त केले, तेव्हापासूनच त्यांना "कालभैरव" म्हटले गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel