प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुध्दी असणे अत्यंत जरुर आहे . पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा , याचा विचार करायला पाहिजे . ज्या शेतात पाणी भरपूर पुरुन उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते , आणि ते हितावहही होते . इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही ; अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरुर आहे . हीच दृष्टी परोपकार करणार्‍या व्यक्तीने ठेवावी . ज्या महात्म्यांनी स्वत :चा उध्दार करुन घेऊन , जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला , त्यांनाच परोपकाराचा अधिकार . मग प्रश्न असा येतो की , इतरांनी परोपकाराची बुध्दी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करु नये की काय ? तर तसे नाही . परोपकाराची बुध्दी आणि प्रयत्न असणेच जरुर आहे . परंतु परोपकार म्हणजे काय , आणि त्याचा दुष्पपरिणाम न होऊ देता तो कसा करता येईल , हे पाहणे आवश्यक आहे . भगवंताची सेवा या भावनेने दुसर्‍याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल , आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही . परंतु हे वाटते तितके सोपे नाही ; कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की , थोडेसे काही आपल्या हातून झाले की , ‘ ते मी केले , मी असा चांगला आहे , ’ अशा तर्‍हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो . सबब , ज्या ज्या वेळी दुसर्‍याकरिता काही करण्याची संधी मिळेल , त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की , ‘ देवा , तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली . अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करुन घे . ’ ही विचारसरणी जागृत राहिली नाही , तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही . म्हणून अत्यंत जपून वागणे जरुर आहे . परोपकार याचा सरळ अर्थ पर -उपकार ; म्हणजे दुसर्‍यावर केलेला उपकार . यावरुन असे लक्षात येईल की , परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते . एक उपकार करणारा , आणि दुसरा उपकार करुन घेणारा . जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या , तर आपल्या स्वत :वरुन असे दिसते की , मी एक निराळा , आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळे . मनाच्या या ठेवणीमुळेच , जर आपल्या हातून दुसर्‍याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला , तर ‘ मी दुसर्‍याचे काम केले ’ ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो . म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे . नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to ब्रह्मचैतन्य महाराज - मे मास


ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास
दासबोध
ब्रह्मचैतन्य महाराज - जून मास
ब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास
ब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास
ब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास
ब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास
ब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास
ब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास
आत्माराम
हरिपाठ
ज्ञानेश्वरी Dnyaneshwari