भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे राजपूत कुळाशी संबंध जोडण्यात आला. मराठी बखरींनी पुढे तोच क्रम चालू ठेविला. मुसलमानांचे उत्तर हिंदुस्थानात वर्चस्व वाढले, तेव्हा भोसले दक्षिणेत आले, असे बखरींचेच प्रतिपादन आहे. शिसोदेभोसले संबंध दाखविणारा स्वतंत्र ऐतिहासिक पुरावा नाही.

 या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष बाबाजी भोसले. त्याचे दोन पुत्र मालोजी आणि विठोजी हे वेरुळ-घृष्णेश्वर भागात निजामशाहीच्या  आश्रयाने प्रथम उदयास आले. पुणे जिल्ह्यातील पुणे व सुपे या जहागिरी मालोजींकडे होत्या. मालोजी यांना दोन पुत्र होते शहाजी (१६०२६४) आणि शरीफजी

 त्यांपैकी शहाजी हा प्रथम निजामशाहीत आणि नंतर आदिलशाहीत पराक्रम करून नावलौकिकास आले . आदिलशाहने त्याची नेमणूक कर्नाटकात केली. त्यानी बंगलोरला मोठी जहागीर संपादन केली. त्यांचे उर्वरित आयुष्य कर्नाटकात आदिलशाहीच्या सेवेत, पण मोठ्या वैभवात गेले. राधामाधवविलासचंपू या समकालीन काव्यग्रंथावरून शहाजी यांच्या योग्यतेची कल्पना येते.

 हाजीराजास जिजाबाई सिंदखेडकर लखुजी जाधव यांची कन्या, तुकाबाई आणि नरसाबाई अशा तीन पत्नी  होत्या. संभाजी (थोरले) आणि शिवाजी छत्रपती हे जिजाबाईचे दोन पुत्र आणि तुकाबाई यांचे व्यंकोजी ऊर्फ एकोजी तंजावर राज्याचे संस्थापक) या तिघांनी पुढे इतिहासात नाव कमावले.

 संभाजी कर्नाटकात शहाजी यांचे जवळ राहत असत . कनकगिरीच्या लढाईत (१६५४) पस्तीशीतच ते  वारले . एकोजी यांनी शहाजीनंतर तंजावर येथे नवी गादी स्थापन केली.

शहाजी यांनी शिवाजी यांना १६४१ मध्ये जिजाबाई समवेत पुणे-सुपे ही आपली जहागीर संभाळण्यासाठी महाराष्ट्रात कायमचे पाठवून दिले. त्यांच्या दिमतीला दादोजी कोंडदेवसारखे अनुभवी व हुशार कारभारी होते. त्यांच्यामुळे शिवाजी राजांच्या स्वतंत्र कर्तृत्वास वाव मिळाला.

भोसले घराणे

त्यांच्या साहाय्याने वयाच्या १२ वर्षांपासून शिवाजी जहागिरीचा कारभार पाहू लागले. त्या निमित्ताने पुण्याच्या आसपासचे मोक्याचे किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. मावळ्यांनी संघटना करून विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध बंडच पुकारले. यातून मराठ्यांचे स्वराज्य स्थापण्याची कल्पना त्यांना सुचली.

 पुढे प्रसंगानुसार आदिलशाह व मोगल यांच्याशी राजकारण व प्रसंगोपात्त युद्धे करून त्याने स्वराज्याची कल्पना स्वतःला राज्याभिषेक १६७४ करवून जाहीरपणे सिद्ध केली आणि छत्रपतिपद धारण केले. शिवराई व होन ही नवी नाणी सुरू केली. अष्टप्रधान पद्धती स्थापिली, नवे पंचांग केले आणि राज्यव्यवहारकोश बनवून शासनातील फार्सी शब्दांचे उच्चाटन केले.

 देवगिरीच्या यादवांच्या पतनानंतर ३५६ वर्षांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. हे एक अद्‌भुत घडले. स्वराज्याबरोबर धर्मस्वातंत्र्य प्राप्त होऊन मुसलमानी राजवटीत हिंदूंचे खचलेले नीतिधैर्य त्यांना पुन्हा मिळाले. बखरकार शिवाजी महाराजांना  अवतारी पुरुष मानतात. भोसले कुळाचे नाव शिवाजी महाराजांमुळेच इतिहासात अजरामर झाले.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel