भुतांचे स्वानुभव (Horror Experiences)

अतींद्रिय अनुभव : ती कशी मेली?

Author:संकलित

अमेरिकेतून एका वाचकाने आपल्या शब्दांत हि कथा पाठवली आहे. जशाच्या तशी इथे पेस्ट केली आहे.

माझे बालपण गोव्यांत गेले. तेरेखोल नदीच्या किनारी आमचे छोटे गांव होते. आम्ही डॉक्टरांची मुले. त्यामुळे गावांत सगळी मंडळी आम्हाला ओळखत असे. मी १२ वर्षांचा होतो आणि माझी छोटी बहीण श्री ६ वर्षांची. अक्षरशः एखादी परी सारखी गोरी पान. माझ्या बहिणीवर माझे प्रचंड प्रेम होते. तसेच तिचा माझ्यावर प्रचंड विश्वास. इतका कि ती गेली तेंव्हा मला अनेक वर्षे मानसोपचार तज्ञाकडून उपचार घ्यावे लागले. आई आम्हाला सोडून देवाघरी गेली होती. त्यामुळे श्रीला आई ची माया काय होती ते कधीच समजले नव्हते. वडील बहुतेक वेळा दवाखान्यात बीसी असायचे.

एका संध्याकाळी मी आणि श्री नदीच्या किनाऱ्याने चालत होतो. नदीत रेती काढण्याचे काम चालत होते. त्याकाळी होड्याने लोक जात असत आणि जागोजागी होडी लावण्यासाठी लाकडाचे धक्के बनवले होते. आम्ही तिथे जाऊन पाण्यात दगड मारत असू. मला फार चांगले पोहायला यायचे आणि श्री नेहमी मला भाऊ उडी मार ना म्हणून हट्ट धरायची. मी तिला अनेकदा पाण्यात उडी मारायला सांगितले पण तिला फार भीती वाटायची पाण्याची. तिला पोहता येत नव्हते.

मे महिन्याचा शनिवार होता आणि आम्ही आणि किनाऱ्यावर कायतूची होडी जिथे लावत होते तिथे आम्ही गेलो. तिथे पाणी जनरली चांगले असायचे. लाकडाच्या त्या धक्क्यावर आम्ही उभे राहून पाण्यात दगड मारत होतो. मी पाण्यात थोडा पोहून येऊ का ? मी श्रीला विचारले आणि तिने आनंदाने मान हलवली. मी उडी मारली. पाणी त्या दिवशी थोडे गढूळ होते. पाणी विशेष खोल नव्हते पण मी श्री ला नेहमी ते खोल आहे असे सांगत असे आणि खाली जाऊन माती उचलून आणायचो. तीला ते पाहून फार आनंद वाटत असे. त्या दिवशी माझी बुद्धी खरेच भ्रमित झाली होती. आज एकही क्षण असा जात नाही कि मला त्याच्या पश्चाताप होत नाही. जर त्या दिवशी मी तसे केले नसते तर आज काय झाले असते अश्या प्रकारची स्वप्ने मी नेहमीच रंगवतो. मी पाण्यात खाली गेलो आणि ठरवले कि ह्यावेळी काही वेळ खालीच राहीन आणि श्री घाबरते का असे पाहीन. मी श्वास कंट्रोल करत खाली गेलो आणि पाण्याखालून काही दूर गेलो. पाणी गढूळ असल्याने तिला मी कदाचित दिसत नव्हते. सुमारे १५ सेकंड्स तरी मी खाली राहिलो असें आणि इतक्यात पाणी अतिशय हलले, काही तरी पाण्यात पडले होते. मी तात्काळ वर येण्याची हालचाल केली, ३ सेकंड्स लागले असतील.

वर धक्क्यावर श्री नव्हती. पाण्यात काही तरी पडल्या प्रमाणे वर्तुळे येत होती. ती पाण्यात पडली कि काय ? मी तात्काळ पोहत धक्क्याखाली गेलो पाण्यात डुबकी मारली आणि डोळे फाडून मी श्री ला शोधू लागलो. मी वर आलो नाही म्हणून तिने "भाऊ, भाऊ म्हणून मला आवाज दिला असेल काय ? " मला काही झाले असे समजून तिने मला वाचवण्यासाठी पोहता न येत सुद्धा उडी मारली असेल काय ? कि तिचा पाय वगैरे घसरला असेल ? ती रडली असेल काय ? " मनात विचारांचे काहूर माजले होते. हे शब्द लिहता अंगावर काटा, मनात दुःखाची सुनामी आणि हृदयांत कळ येत आहे. मी पोहलो, प्रत्येक स्नायू थकून गेला तरी सुद्धा पोचलो, त्या बाजूचा इंच अन इंच मी पोहून काढला. किंचाळून दूरवरच्या होडीवाल्याना आवाज दिला. काही वेळांतच तिथे २०-२५ पट्टीचे पोहणारे लोक नदी ड्रेन करत होते. कुणाला श्री दिसली तर नाहीच. काही लोकांना वाटले कि कदाचित माझी मानसिक परिस्तिथी ठीक नसावी. मी अक्षरशः ओरडत होतो आणि मी आणखीन काय केले ते सुद्धा मला आठवत नाही. इतरांच्या मते त्यांनी मला जबरदस्तीने घरी नेले. वडिलांनी सर्व ऐकून आधी थरथरत्या हातानी मला झोपेचे इंजेक्शन दिले. आणि गावांतील इतर लोकांना घेऊन त्यांनी श्री चा शोध सगळीकडे घेतला. नदीत शेकडो होड्या होत्या. समुद्र जवळ होता आणि तिथे कॊस्ट गार्ड चे हेलिकॉप्टर सुद्धा फिरून गेले. पण श्री चा थांगपत्ता कधीही कुणालाही लागला नाही. तिची शेवटची आठवण म्हणजे त्या धक्क्यावर पांढऱ्या फ्रॉक मध्ये तिचा तो हसरा निरागस चेहेरा.

मला शुद्ध आली तेंव्हा वडिलांनी सर्वप्रथम रडवेल्या डोळ्यांनी मला आधार दिला. जे काही घडले त्यात माझी काहीही चूक नसून जे काही घडले ते फक्त एक अपघात म्हणून त्यांनी त्याकडे पाहायला मला सांगितले. त्यानंतर त्यांनी नक्की काय झाले हे ऐकून घेतले. सत्य काहीही, अगदी काहीही असले तरी ते मला माफ करतील आणि मी खरे तेच सांगावे असे त्यांनी सांगितले. मी पाण्याबाबत कदाचित खोटे बोलत असावो आणि श्रीला आणखीन काही तरी झाले असावे असे त्यांना वाटत होते. पण मी खोटे बोलत नाही हे शेवटी त्यांनी मान्य केले. बहुतेक वेळा मनाला प्रचंड धक्का बसतो जसे ट्राफिक अपघात, बलात्कार, इत्यादी गोष्टींत नक्की काय घडले हे बाली पडलेल्या माणसाला नक्की आठवत नाही. मेंदू अश्या आठवणी बहुतेक वेळा काढून टाकतो किंवा त्यांना सौम्य करतो. त्यांना फ्रॅगमेंटेड मेमोरी असे म्हणतात. माझे सुद्धा तसेच काही तरी झाले असे वडिलांना वाटले.

पण आम्हा दोघांना कधी ह्या विषयावर क्लोजर मिळालेच नाही. श्री चे काय झाले ? कुठे गेली ती ? पाणी नाकातोंडात जाऊन तीचा जीव जात असताना तिने मला आवाज देण्याचा प्रयत्न केला असेल काय ? मी हात पकडेन म्हणून हात पुढे केला असेल काय ? ह्याच विचारांनी मनात घर केले होते. मी शाळा सोडली आणि वडिलांनी प्रॅक्टिस आम्ही तो गांव सोडून मुंबईत गेलो. वडिलांचे भाऊ आमचा खानदानी धंदा पाहत असत त्यामुळे पैश्यांची काहीही कमतरता नव्हती. मी पुढील ३ वर्षे मानसोपचार तज्ज्ञाकडे जात राहिलो आणि शेवटी माझ्या आयुष्याचा ताबा माझ्या हातांत आला. वडील खंबीर होते पण पुन्हा त्यांनी स्टेथोस्कोप ला हात लावला नाही.

मी विदेशांत गेलो, मानसोपचारतज्ञ् झालो. श्रीचे काय झाले हा विषय मला प्रत्येक क्षणी येत असे. मी अमेरिकेत सायकिक, चेटकिणी (witches), paranromal activist, नेटिव्ह इंडियन आदिवासी, दक्षिण अमेरिकेतील मूळ निवासी, ज्योतिषी अश्या अनेक प्रकारच्या विविध व्यक्तिनाचा अभ्यास केला. ह्यातील बहुतेक व्यक्ती किती ढोंगी असतात हेच मला आढळून आले. कुठल्याही अतींद्रिय शक्तीने मी श्री चा शोध घेऊ शकत नाही हे मला कळून चुकले. अजाणतेपणी का होईना पण एक १२ वर्षांच्या मुलाकडून झालेल्या चुकीच्या परिणामांना आयुष्यभर हृदयांत ठेवूनच मला देह ठेवायचा आहे. काही प्रश्न आयुष्यभर अनुत्तरीतच राहतात असे समजून मी हार मानली होती.

२००६ मध्ये मी मेक्सिको मध्ये गेलो. माझी प्रेयसी मेक्सिकन होती. आम्ही मेक्सिकोच्या जंगलांत तेथील काही आदिवासी लोकांच्या प्रथांचा अभ्यास करायला गेलो. तेथील त्यांचे "शमन" (शमन म्हणजे आदिवासी लोकांचे प्रमुख पुजारी/तांत्रिक) लोक कसल्या प्रकारचे अध्यात्मिक प्रयोग करतात ह्यावर आम्ही अभ्यास करायला गेलो होतो. अर्थानं "आदिवासी" ह्याचा अर्थ हे लोक मागासलेले आहेत असा घेऊ नये. हे लोक सर्वप्रकारच्या आधुनिक सोयी सुविधांचा लाभ घेतात पण त्याच वेळी आपल्या जुन्या परंपरांचे पालन सुद्धा करतात.

मी ह्या लोकांचा इतका जवळून अभ्यास केला होता कि त्यांची विचारपद्धती मला पूर्वी पासून ठाऊक होती. हे लोक बोलायला लागले कि खूप काही बरळत. "तू पूर्वीच्या जन्मांत घोडा होता" इत्यादी इत्यादी. मी ते इतके अचूक ओळखत असे कि ते पाहून सिंथिया (माझी प्रेयसी) अतिशय थक्क होत असे. मेक्सिको मधील हुईचोल लोकांच्या त्या गावांत आम्ही पोचलो तेंव्हा संध्याकाळ झाली होती. त्यांच्या शमन जवळ मी आणि सिंथिया बसलो. आमच्याबरोबर त्याने वार्तालाप केला. हा आमच्या दोघां पैकी एकावर वाईट आत्म्याचा प्रभाव आहे असे सांगेल असे मी तिला आधीच सांगून ठेवले होते आणि त्याने अगदी त्याच प्रमाणात असे भविष्य संगतीवाले. सिंथिया हसून तिथून उठून गेली. मी मात्र तसाच बसून राहिलो. आपल्या चिलीम मध्ये असलेला गांजा ओढत शमन ने नंतर माझ्याकडे पहिले ... डोळे बारीक करून आणि कपाळावर आठ्या घालून. "तुझे जे काही हरवले आहे त्यांत तुझा दोष नाही... तू लहान होतास" असे त्याने म्हटले. १००% नास्तिक आणि वैज्ञानिक असलेला मी सुद्धा हादरलो. त्याचे डोळे माझ्या आत्म्यात पाहत आहेत असे मला वाटले होते. पण मी तसे दाखवून दिले नाही.

काही दिवस गेले. शमन आणि माझी दोस्ती झाली. माझा त्याच्या काही शक्तीवर वगैरे अजिबात विश्वास नव्हता पण मी मुक्तमनाने त्यांच्या सर्व कर्मकांडांत भाग घेतला. (काही कर्मकांडे अतिशय थकवणारी असतात) त्यांच्या सांस्कृतिचा चांगला अभ्यास असल्याने त्यांच्या माझ्यावर चांगला विश्वास बसला होता. त्यांच्या काही कर्मकांडांत मादक द्रव्यांचा समावेश असतो. मादक द्रव्ये आणि त्यांचे मानसिक प्रभाव ह्यावर सुद्धा मी अभ्यास केला होता.

मादक द्रव्ये अनेक प्रकारची असतात. गांजा आपण ओढला तर त्याचा "परिणाम" आपण हळू हळू जाणवू लागतो आणि नशा उतरताना सुद्धा हळू हळू उतरते. गांजा कोणीही ओढू शकतो. त्याच्यासाठी पात्रता हवी असे नाही.

ह्याच्या उलट साल्विया सारखी झाडे असतात. ह्यांची नशा एक्दम ३ सेकण्ड मध्ये येते १० मिनिटे राहते आणि नंतर ३ सेकण्ड मध्ये तुम्ही पूर्वरत होता. साल्विया ला त्यांच्या भाषेंत जो शब्द आहे त्याचे मराठी भाषांतर "महर्षी (ऋषी चे ऋषी) " असे होईल. अश्या झाडांना "प्लांट टीचर" असे म्हणतात म्हणजे "वृक्ष गुरु" असे त्याचे भाषांतर आम्ही करू शकतो. प्रत्येक जमातीचे आपले नियम असतील पण बहुतेक शमन लोकांची धारणा आहे कि हे जीवन आणि मृत्यू पलीकडील जीवन ह्यांतील जो धागा आहे तो धागा आपण वृक्ष गुरु कडून पकडू शकतो आणि आपल्या मनाचे दरवाजे फार सताड उघडे करून एक नवीन प्रकारचे ज्ञान आंत घेऊ शकतो. पण साल्विया सारखे द्रव्य घेण्यासाठी एका ज्ञानी गुरूकडून आधी ज्ञान घेवे लागते. नक्की किती प्रमाणात चिलीम ओढायची, कसल्या प्रकारचे संगीत ऐकायचे आणि त्यातून काय अपॆक्षा ठेवायची हे शमन आधी समजावून सांगतो. जीन जॉन्सन ह्याने १९३० मध्ये ह्या विषयावर प्रचंड संशोधन केले होते.

मी साल्विया चिलीम मध्ये ठेवून श्वास घेतला. शमन ने मला गरुडाचे एक पांढरे पीस दिले. "एक गरुड होता त्याच्या घरट्यांत त्याची पिले होती, एक दिवस अन्नाच्या शोधांत त्याने भरारी घेतली. असे कधीही होत नाही पण त्याला त्याच्या घरट्याच्या स्थानाचा विसर पडला. त्यादिवशी ग्रहण होते. गरुड उडत राहिला," असे काही तरी तो बरळत होता पण काही वेळाने नशा डोक्यांत गेली. मी पाण्यात होतो. पाणी अगदी स्पष्ट होते. मी खाली खाली जात होतो. मी खाली पाहायचा प्रयत्न केला खाली मला कापसा प्रमाणे एक अतिशय पांढरा आणि प्रचंड असा गोळा दिसला. मी त्याची व्याप्ती मोजायचा प्रयत्न केला आणि लक्षांत आले के त्या पांढऱ्या ढगा सदृश्य गोष्टीची व्याप्ती फार म्हणजे फारच मोठी आहे, त्याच्या त्या व्याप्तीपुढे मी घाबरलो. मी हात पाय हलवून वर यायचा प्रयत्न केला, इतका वेळ श्वास ओढून धरला होता तो काही क्षणातच सुटून नाकातोंडात पाणी जाईल असे वाटू लागले. पण माझे शरीर एकदम मृत पडले होते. मी खाली खाली जात होतो, इतक्यात मला माझ्या पुढे आणखीन काही आहे असा भास झाला खरेतर खालून ती वस्तू वर येत होती. त्या पांढऱ्या ढगाचा तुकडा ? नाही ते पांढरे पीस होते. ते वर जात होत ते माझ्या जवळून जाताना मी तोंडाने ते पकडायचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालो. त्या पिसाने मला वर आणले. वर पाणी स्पष्ट दिसत होते आणि त्याच्या वर असलेले आभाळ निळेशार दिसत होते. मी पाण्यात असल्याने माझ्या शरीराच्या हालचालीमुळे लाटा वर्तुळाकार स्वरूपांत निर्माण झाल्या होता आणि मी त्यांच्या मध्यभागी होतो. दर सेकण्ड गणिक मी पृष्ठभागाच्या वर येत होतो. आणि इतक्यानं दूरवर आणखीन काही तरी पाण्यात पडले. मी बघायचा प्रयत्न केला. "श्री ???" सर्व घटना त्या दिवसाच्या सारखी होती. पाण्यात पडलेली दुसरी वस्तू म्हणजे श्रीच होती .??? पण नाही पाण्यात श्री नव्हती पडली. एक दगड होता. मोठा पण लाल रंगाचा मी त्याच्याकडे पाहत राहिलो. प्रचंड वेगाने एका उल्के प्रमाणे तो खाली गेला. मी मन वाळवून पहिले तर तो त्या पांढऱ्या ढगांत गायब झाला होता. मी पाण्याच्या वर आलो तेंव्हा श्री .. श्री पाठमोरी पाण्यावरून चालत जात होती. मी तिला हाक मारायचा प्रयत्न केला पण ती पळत गेली. मी तिच्या मागे पळालो. माझे पाय पाण्यात आंत जात होते पण तरी सुद्धा मी पळू शकत होतो. नारळ पोफळीच्या बागांतून पळत असताना माज्या मागे पाण्यावरून तो पांढरा ढग वर येत होता. हळू हळू ढगाने सर्व कुळागर (बाग) व्यापली. श्री ची आकृती धूसर होत होती. मी कशाला तरी आपटून पडलो. पडलो आणि ढगाने मला सुद्धा व्याप्त केले. श्री दिसेनाशी झाली होती. मी कशाला आपटून पडलो म्हणून मी चाचपडून पहिले. काही तरी वर्तुळाकार अशी गोष्ट होती. कडे ? कंकण ?हो फार मोठे कंकण होती. मी चाचपडतात मला आठवण आली. मी फार लहान असताना आईच्या बरोबर असताना तिच्या हातांत ते कंकण होती. त्याच्यावर बारीक कलाकुसर होती आणि त्यावर माझी बोटे फिरायची तेंव्ह्या मला जशी स्पर्शाची फिलिंग यायची तीच फिलिंग आली. तेच कंकण होते. "

साल्विया ची नाश उतरली आणि मी जागा झालो. इतर लोक अजून नशेत होते तर शमन सिंथियाशी काही बोलत होता.

"तुला जे हवे होते ते मिळाले ? " त्याने विचारले. मी नकरारार्थी डोके हलवले. इथे ते मिळूही शकणार नाही. तुला त्याच जागेवर जावे लागेल असे म्हणून शमन पुन्हा काही बाही बरळू लागला.

दुसऱ्या दिवस माझी जीप आली आणि आम्ही नंतर अटलांटाला आलो. आईच्या त्या कंकणाचा आणि श्री चा काही संबंध होता का ? मी खूप विचार केला पण काहीही समजले नाही. मी काकांना फोन लावला. आईचे कंकण तिला सासूने दिले होते. काकांना त्या कंकण विषयी माहिती होती. माझी आजी म्हणजे वडिलांची आई तेरेखोल मधील होती. आम्ही राहायचो ते तिचेच जुने घर. ते कंकण तिच्या माहेरचे वडिलोपार्जित कंकण होते. ह्यावर त्यांना काहीही माहिती नव्हती. तेरेखोल मधील ते घर आता जवळ जवळ बंद होते. कुणी तरी पाडेली नारळ घेऊन जायचा.

मी तात्काळ भारताची तिकिट्स बुक केली. नक्की जाऊन काय करणार हे ठाऊक नव्हते तरीही. आईचे सोने आता काकी कडे होते. मी जाऊन तिच्याकडे हळूच मागणी करतात "हो बाबा तुझेच आहे हो ते, इतके जुने सोने ठेवायला मला सुद्धा बरे वाटत नव्हते" तिने ते कंकण आणि इतर काही सोन्याचे दागिने माझ्या हवाली केले. तुझ्या आईचा फार जीव होता ह्याच्यावर बाळा जरूर, जरूर तिनेच स्वर्गांतून तुझ्या मनात हा विषय घातला असेल अशी टिप्पणी सुद्धा केली. मी ते कंकण हातांत घेऊन निरखून पहिले. काकीनेच विषय काढला, "तुला ठाऊक आहे का ? तुझ्या आईच्या घरांत प्रचंड मोठे सोने होते. त्यातून फक्त हेच थोडे दागिने वाचले. म्हणून तिला त्यांच्यावर फार लोभ होता" . "मग इतर दागिन्यांचे काय झाले ? " मी विचारले. "अरे ते राण्यांनी नेले. हे काही दागिने तुझ्या आईच्या आईने पेवांत टाकले म्हणून ते वाचले. " मला काहीच कसे ठाऊक नाही अश्या आश्चर्याने तिने विचारले.

तर राणे म्हणून दरोडेखोर येऊन पूर्वी श्रीमंतांची घरे लुटायचे. म्हणून जवळ जवळ प्रत्येक सुखवस्तू घरांत सोने लपवायची एक गुप्त जागा ठरलेली असायची. कधी घराच्या मागे जुनाट विहिरींत तर कधी गुरांच्या गोठ्यांत अश्या ठिकाणी सोने लपवून ठेवले जायचे. माझ्या आईच्या घरी एक अगदी छोटी अरुंद अशी विहीर होती. हि विहीर नारळाच्या बागेंत होती आणि आजोबानी गोवा स्वातंत्र्यानंतर ती पुरून टाकली होती. त्यामुळे सर्वांच्या विस्मृतीत गेली होती.

पुढे काय करायचे मला ठाऊक होते. मी सरळ विमान धरून गोव्यांत गेलो. टॅक्सी करून बदललेल्या गोव्यात परिचयाच्या गोष्टी शोधू लागलो. गुपचूप तेरेखोल मधील घरी गेलो आणि दरवाजा उघडला. पाडेली ने येऊन घर साफ करून दिले. मी संध्याकाळी लोक नाहीत असे पासून कुळागरांत गेलो. आठवण अंधुक होती पण वडिलांनी "इथे ती विहीर होती" असे सांगितल्याचे आठवत होते. एका फणसाच्या झाडाजवळ मला ती विहीर सापडली. प्रचंड गवत माजल्याने शोधणे अवघड होते. पण मला ती विहीर सापडलीच. फावड्याने मी ती खणायला सुरुवात केली. सुमारे ४ फूट खणताच मला खाली एक फळी लागली. थोड्याश्या धक्क्याने फळी तुटली आणि माती दगड आंत पडले. तर विहीर पूर्ण पाने बुजवलेली गेली नव्हतीच. त्यावर काही फळी टाकून वरून माती टाकली गेली होती.

मी दुसऱ्या दिवशी काही कामगारांना आणून खणायला सुरवात केली. ४ तासांतच एका कामगाराने ओरडून मला बोलावले. मी त्या अरुंद विहिरीत खाली उतरलो. एक लहानगा हाडाचा सापळा होता जवळ जवळ नष्ट झाला होता. हातांत एक प्लास्टिकचे खोटे घड्याळ होते. माझ्या डोळ्यांतून अश्रूंची धार वाहू लागली. मी तो हात हातांत घ्यायचा प्रयत्न केला पण तो माती झाला मी घड्याळ खिशांत टाकले. पोलिसांना बोलावून माझी बहीण कुठल्यावर्षी गायब झाली होती वगैरे सर्व सांगितले. काही म्हाताऱ्या माणसांनी त्याला दुजोरा सुद्धा दिला. पोलिसांच्या सहमतीने मी भटजींना बोलावून तिचे शास्त्रोक्त पद्धतीने अंतिम दहन केले. मनात प्रचंड शांती, शांती म्हणण्यापेक्षा एक फार चांगली शीतलता वाटत होती. तिची कवटी फ्रॅक्चर झाली होती.

मी दोन दिवस त्याच घरांत राहिलो. दार संध्याकाळी मला श्री बागेंत बागडताना दिसायची. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसायचे. तो कदाचित १००% भास होता पण माझ्या मनात मला हवे असलेले क्लोजर मिळाले होते. ती आता एका चांगल्या जागी आहे असेच मनात वाटत होते.

नंतर विचार करता करता मला आठवण आली कि एकदा मी तिला पोहायला यायला आग्रह केला होता तेंव्हा तिने माझे लक्ष नाही असे पाहून एक दगड विहिरींत टाकला होता. मला तिनेच उडी मारली असे वाटून मी धावत आलो होतो. कदाचित त्या दिवशी मी पाण्यात असताना मला घाबरवण्यासाठी तिने पाण्यात दगड टाकला असावा आणि ती लपण्यासाठी घरी पळाली असेल. पाळताना त्या अर्धवट बुजवलेल्या त्या विहिरींत खाली पडली असेल. डोक्याला मार लागून ओरडण्याची सुद्धा शक्ती नसेल.

जे काही घडले ते वाईट घडले. पण तो अपघात होता. मी ते बदलू शकत नाही, पण माझे राहिलेले आयुष्य जे आहे ते मी समाधानाने आणि चांगल्या पद्धतीने व्यतीत केले तर मी तिला वर जाऊन नक्कीच तोंड दाखवू शकेन.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to भुतांचे स्वानुभव (Horror Experiences)


Bhay ithale sampat nahi. Marathi horror story.
Detective alfa and dekhava.
Detective Alfa and a step into darkness.
Zapatlela vada. Haunted home marathi horror story.
Halloween Marathi Horror Story
Detective Alpha and the moonlight murder
Khuni Kon ? World famous murders in Marathi
डीटेक्टिव अल्फा आणि रत्नजडीत खंजीराचे रहस्य
Detective Alfa and the old house. Story by Saurabh Wagale.
Jinn a Marathi Horror story