पिशवीतील पुस्तक म्हणाले, “अरे तुला मी ज्ञान देतो. पशूचा मनुष्य करतो. परंतु माझी दशा बघ काय केली आहेस ती! पानन् पान सुटले आहे. शाईचे डाग पडले आहेत. तुला नाही का रे दयामाया?”
मोरूला खोलीतील प्रत्येक वस्तू काहीतरी गा-हाणे करीत आहे असे दिसले. सा-यांचा त्याच्यावर आरोप. ‘तू कृतघ्न आहेस. तुझ्यासाठी आम्ही झिजतो, श्रमतो, काळे होतो. तू आमच्यासाठी काय करतोस?’ असे सारी म्हणत होती.
एकाएकी सारे आवाज बंद झाले. मोरू अंथरूणावर गंभीरपणे बसला. शेवटी खोलीतील सर्व वस्तूंना त्याने रडत रडत गहिवरून साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून तो म्हणाला, “माझ्या उपकारकर्त्यांनो, आजपासून तुमची काळजी घेईन, तुम्हाला स्वच्छ राखीन. तुम्ही क्षमावान आहात. या मुलाला चुकल्यामाकल्याची, झाल्यागेल्याची क्षमा करा. आजपासून मी कृतज्ञता दाखवीन. सर्वांचे उपकार स्मरेन. रडू नका, रूसू नका, या मुलावर प्रसन्न व्हा.”
दुस-या दिवसापासून मोरू अगदी निराळा मुलगा झाला. सर्वांना त्याच्यातील फरक पाहून आश्र्चर्य वाटले. ते म्हणत, “मोरू, अलीकडे सूर्य पश्चिमेस उगवू लागला?” मोरू म्हणे, “तुम्हांला काय माहीत आहे? मी केवढा थोर अनुभव घेलता तो?” ते विचारीत, “कोणता?” मग मोरू ही सारी हकीगत सांगे व ती ऐकुन त्याचे मित्रही गंभीर होऊन घरी जात व नीट वागत.
मोरू व त्याचे मित्र वागू लागले, तसे आपणही सारे वागू या.