“मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!” केशवचंद्र म्हणाले.

“माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!” भीमा म्हणाला.

“भीमा, जमीन नाही ना देत?”

“कशी द्यायची?”

“द्यायची की नाही ते सांगा!”

“नाही, त्रिवार नाही!”

“याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळविल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!”

“देव काही मेला नाही, केशवबाबा!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel