रात्री चौघे भावंडे निघाली. रात्रभर चालत होती. बरोबर फराळाचे होते. सकाळी प्रातर्विधी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला,
“दादा, मला निरोप दे! मी जातो!”
“मला कंटाळलास?”
“दादा, मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमविण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा!”
असे म्हमून तो भाऊ काप बनला व थोड्या अंतरावर फण् फण्करीत निघून गेला. थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला, “दादा, मलाही निरोप दे!”
“का रे जातोस?”
“दादा, मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचविले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही य:कश्चित बेडूक परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो!” असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुणटुण उड्या मारीत निघून गेला.
पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली,
“दादा, मलाही निरोप दे!”
“तूही चाललीस?”
“होय दादा. पाडसे वाट पाहत असतील. मी ती हरिणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास; परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाले. आता जाते. सुखी हो. असाच दयाळू-मायाळू हो!”