घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, ‘कोण मेले’ म्हणून विचारू लागले. ‘न्याय मेला’ असे जो तो उत्तर देऊ लागला.
‘मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला।’ तरुण म्हणू लागले.
एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला.
तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना.
“कसला हा आवाज?” राजाने विचारले.
“कोणी तरी मेले असावे. गावाचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची.” केशवचंद्र नम्रपणे म्हणाला.
“आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा.” राजा म्हणाला.
दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती.
“काय आहे भानगड? कोण मेले!” घोडेस्वारांनी विचारले.
“न्याय मेला!” लोक गर्जले.
ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, “महाराज, न्याय मेला!”
“मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!”
राजा रथातून निघाला. त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले.