“माझं शेत माझं शेत लई लई छान
माझं शेत माझं शेत आहे माझा प्राण।।
येथे राबेन येथे खपेन
येथे काम येथे राम
संसाराला ना माझ्या मुळी कधी वाण।।
स्वर्गात गेलेले खाली येतील
येऊनी शानी ते काय खातील?
माझे शेत वाचवील त्यांना देउनिया धान्य।। माझं।।”
असे गाणे गात तो नाचत होता. जणू त्याची समाधी लागली होती. आणि त्याचे शेत नाचू लागले. झाडे-माडे नाचू लागली. बैल नाचू लागले. टेकड्या नाचू लागल्या. हळूहळू त्याच्या नाचात सारे त्रैलोक्य ओढले गेले. त्याच्या त्या सेवाकर्मात, त्या स्वधर्माच्या आचरणात सर्वांना खेचून घेण्याची शक्ती होती. नारद बुद्धीमान. त्याच्या चटकन सारे लक्षात आले. यज्ञयागांचे धर्म निस्सार आहेत. समाजाच्या सेवेचा कोणता तरी उद्योग मन लावून करीत राहणे म्हणजे खरा धर्म, म्हणजे एकमेकांची झीज भरून काढणारा खरा सहकारी यज्ञधर्म. यज्ञ शब्दाचा हा अर्थ. मी पिकवीन, तुला देईन; तू विणून मला दे. एकमेकांना सारे सांभाळू आणि जीवनाचा सर्व बाजूंनी विकास करून घेऊ. नारदाला त्या शेतक-याच्या नाचात, त्या मंगल कर्मोत्साही नृत्यात सारा धर्म दिसला. त्याने त्या शेतक-याच्या चरणांना वंदन केले. तंबोरा हातात घेऊन तोही नाचू लागला. त्या वीणेच्या तारांचा झंकार ऐकताच शेतकरी हळूहळू भानावर आला. परंतु नारद नाचतच होता-
“काम करा काम करा
कामामध्ये राम
हातामध्ये काम
अन् मुखामध्ये नाम।। काम।।”
शेतक-याने नारदाचे पाय धरले नि विचारले,
“देवा, कोण आपण?”
“मी तुझा शिष्य.”
“असे कसे देवा होईल?”
“तसेच आहे. आपापले काम नीट करीत राहणे म्हणजेच धर्म, हे महान तत्त्व तू त्रिभूवनाला नकळत शिकविलेस. तू साधा शेतकरी परंतु विश्वाला आपल्याबरोबर तू नाचायला लावलेस, धन्य तू!”