संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागलीये. आणि एकेकाळी मी नुसताच ‘मराठी’ आहे म्हणून जे भागत असे ती सोय राहिली नाही. मराठी म्हणजे पुणेकर कि मुंबईकर कि नागपूरकर असा प्रश्न यायला लागला. त्यामुळे मराठी माणसाच्यापुढे स्वपरिचयाचा एक नवाच ‘क्रायसिस’ निर्माण झाला..’क्रायसिस’!


महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हे न ओळखण्यासारखच आहे,स्वतः स्वतःलाही. महाराष्ट्रात खास व्यक्तिमत्व म्हणजे अशी तीन.एक म्हणजे मुंबईकर,पुणेकर किंवा नागपूरकर. तशी महाराष्ट्रात शेकडो गावं आहेत पण ज्यांच्यापुढे ‘कर’ जोडावेत अशी ही तीनच खास स्थळ पुणे,नागपूर व मुंबई.

 

...आता तुम्हाला मुंबईकर व्हायचंय का? मुंबईकर व्हायचं असेल तर प्रथम तुम्हाला मुंबईत 'जन्माला' येणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या राहण्याच्या जागेचा प्रश्न हा तुमच्या जन्मदात्यानीच सोडवायला हवा. एरवी मामला बिकट आहे. रात्री आडवं व्हायला फुटपाथची 'पागडी' देखील आता हजाराच्या आकड्यात गेलीये असं म्हणतात. त्यापेक्षा तुम्ही जिथे असाल त्या गावी सुखी राहा. आयुष्यात सगळ्याच महत्त्वाकांक्षा काही पुर्‍या होत नाहीत. आता मुंबईच्या चाळीत अगर ब्लॉकमध्ये जागा असलेली एखादी मावशी किंवा एखादी आत्या जर तुम्हाला दत्तक घेत असेल तर पहा. दुसर्‍यांदा जन्माला यायचा हाच एक सोपा उपाय आहे, किंवा मग 'घरजावई' व्हा. 'घरजावई'  याचा मुंबईतला अर्थ ज्याला मुलीबरोबर घरही द्यावे लागते असा आहे. राहती जागा असेल तर मात्र मुंबईकर होण्यासारखं सुख नाही, तुम्हाला सांगतो.

   'मुंबईत भयंकर गर्दीये' ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा,गर्दी,डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.

  पाव्हण्याना चुकवायला हे धोरण अतिशय उपयोगी पडत, कारण इथे काय आहे, 'बाहेरगावच्या पाव्हण्याना चुकवणे' हे धोरण गनिमी काव्यानी चालू ठेवावं लागत. सुदैवानी मुंबई शहरामध्ये बार-मार रोगांच्या साथी चालू असतात.तसाच मोर्चे,घोषणा,बंद ह्यांच्या राजकीय साथीसुद्धा असतात. प्रत्येक पक्षाला दरवर्षी आपआपला बंद यशस्वी करून दाखवावाच लागतो, त्याला ते तरी काय करणार?

 तेव्हा पाहुणे येणार असले तर त्यांना 'येऊ नका' असं कळवू नका.
'अवश्य यावे फक्त येताना कॉलरा,देवी व इन्फ़्लुएन्झाची इंजेक्शनं घेऊन यावे. गेल्या आठवड्यात २१४ मृत्यू झाले पण त्याचे विशेष नाही. काविळीची साथ पुन्हा सुरु झाली आहे तरी अवश्य यावे.चि.बाळकुशास आशीर्वाद' हे ही त्याच्या मध्ये घालून ठेवा.

 इतकं असून सुद्धा काही चिवट नातलग येतातच. नक्की करतात यायचं. त्यांना 'स्टेशनवरून उतरवून घेण्यास येत आहोत' असे सांगून आणायला जाऊ नये. टेक्सी ड्रायव्हर संघटनेला फोन करून त्यांचा पुढला संप किती तारखेला आहे हे विचारावं आणि त्या दिवशी बोलवावं.
पाहुणे जर प्रथमच येणार असले तर आपण जरी गिरगावात राहत असलो तरी त्याला 'ठाण्यात उतरणे सोयीचे पडेल' असं सांगून मोकळं व्हावं. मुंबईत एकमेव धोका म्हणजे मुक्कामाला येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांचा, एरवी मुंबई सारखं शहर नाही हो.

  मुंबईकर व्हायचं असेल तर मुंबईचं मराठी आलं पाहिजे. एका मराठी वाक्यात तीनचार तरी इंग्रजी शब्द हवेतच. फक्त मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो. मुंबईत एकदा तुम्ही जन्माला आलात कि मुंबईकर होतच जाता. किंबहुना तुम्हाला दुसरं काही होताच येत नाही. पण बाहेरून येऊन मुंबईकर व्हायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मुंबईच्या मराठीमध्ये भूतकाळाला काहीही किंमत नाही हे ध्यानात ठेवा. मुंबईत जसे उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू तसे काळही दोनच,वर्तमान आणि भविष्य. मुंबईला बिचारीला भूतकाळ वगैरे काही नाहीच. तिला फक्त आज आणि उद्या. मुंबईकराला 'शिवाजी महाराजांच्या घोडीचा स्पीड काय होता?' यापेक्षा सकाळच्या फास्ट लोकल कुठल्या? याची माहिती अधिक महत्वाची. घड्याळाच्या तासाप्रमाणे मिनिटही मोलाची असतात हे मुंबईत राहिल्याशिवाय कळत नाही.कारण मुंबईकराचे घड्याळ हे केवळ हाताला बांधलेले नसून त्याच्या नशिबाला बांधलेलं असतं. पण मुंबईमध्ये मुंबईकर होणं हे काहीही सक्तीचं नाही. हा ऐच्छिक विषय आहे.
पुण्यात मात्र पुणेकर होणं हे सक्तीचं आहे.

घड्याळ आणि गर्दी यांच्याशी जुळवलं आणि चाळीत जर राहत असाल तर 'चाळीस बिर्हाडात मिळून एक' अशा संडासापुढे शांत चित्ताने वाट पाहण्याची अशी जर तुम्ही योगसाधना केलीत कि माणूस मुंबईकर झालाच.

मुंबईला पुण्यासारखा इतिहास नसेल पण खर्‍या मुंबईकराचं भूतकाळाविषयीचं प्रेम फक्त एकाच बाबतीत उफाळून येतं ते म्हणजे क्रिकेट.कारण मुंबईमध्ये क्रिकेट हा एकच 'खेळ' मानला जातो. इतर शहरात हा खेळ मैदानी वगैरे आहे,पण मुंबईतल्या चाळीच्या ग्यालरीत टेस्ट म्याचेस वगैरे चालतात. शिवाय क्रिकेट समजायला हातात ब्याट-बॉल घेतलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.हि समजूत अगदी चुकीची आहे. क्रिकेट हा मुख्यतः खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. इथे मात्र क्रिकेटच्या इतिहासात तयार असणं अतिशय आवश्यक आहे. अस्सल मुंबईकर ''अवो,ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली वो?'' असा प्रश्न विचारून एखाद्या पुणेकराला फेफड आणील.पण त्याला क्रिकेटचा इतिहास विचारा. एखाद्या पुणेकराने बाजीराव,सवाई माधवराव,त्रिंबकी डेंगळे वगैरे नावं फेकावीत ना तसे पी.विठ्ठल,पी.के.नायडू, विजय मर्चंट इथपासून नावं फेकीत फेकीत वाडेकर,सोलकर,हा आपला गावस्कर इथपर्यंत हा हा म्हणता सगळे येऊन पोहोचतात.तेव्हा मुंबईकर व्हायचं असेल तर,'हर हर ती पेशवाई गेली आणि ब्रह्मविद्या गेली' या थाटामध्ये 'हर हर त्या क्वाडल्यामिरर्स गेल्या आणि क्रिकेट खल्लास झाला.' हे वाक्य म्हणावं लागेल.

  अस्सल मुंबईकर आणि इंग्रजांचा खरा ऋणानुबंध होता. कारण,मुंबईवर मुसलमान किंवा मराठे यांपैकी कोणाचंच राज्य नव्हतं.एक तर मुंबईच नव्हती,ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर.त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच.टिळक,गांधी या मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी उगीचच मुंबईकर आणि साहेब यांचे संबंध बिघडवले.अस्सल मुंबईकराला फोर्ट मधल्या जुन्या इमारती पाहून असं भडभडून येत...'काय साहेब होता.'
   मुंबई हि मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो 'चाय पिली' असं म्हणायच्या ऐवजी 'चहा घेतला' म्हणाय लागले.काय हे..

  तात्पर्य, पेशवे आणि टांगे गेले तरी पुण्याचं 'पुणेरीपण' सुटलं नाही पण मुंबईची ट्राम गेली आणि अस्सल मुंबईकर अगदी हळहळला.'साली निदान ती सहा नंबरची ट्राम तरी ठेवायला पाहिजे होती.' या उद्गारामागचा तो काही कळवळा आहे ना तो नव्या मुंबईकराला कळणार नाही.

- पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)

(source:http://cooldeepak.blogspot.in/2013/04/blog-post.html#)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel