१) सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते. घरांत सौभाग्यवती स्त्री नसेल तर कोणतीही स्त्री किंवा कुमारीका हे व्रत करून शकते.
२) स्त्री ऐवजी पुरुषाने जर हे व्रत केले तर त्याचे उत्तम फळ अवश्य मिळते.
३) हे व्रत श्रद्धेने आणि पवित्र भावनेने करायचे असते. मनात नसेल तर किंवा कंटाळून हे व्रत करू नये.
४) व्रत करण्या करिता अकरा किंवा एकवीस शुक्रवार नक्की करावेत आणि या पुस्तकांत सांगितल्या प्रमाणे शास्तोक्त विधीपूर्वक व्रत करावे. ठरविलेले शुक्रवार पुरे झाले की विधी प्रमाणे आणि शास्त्रोक्त रीतीने समारंभपूर्वक त्याची उद्यापन करावे. हा विधी अगदीं सोपा आहे. पण विधीपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने जर व्रत केले नाही तर त्याचे किंचीतही फळ मिळत नाही.
५) एकदा व्रत पूर्ण झाले की पुन्हा त्याचा संकल्प सोडून पुन्हा ते व्रत करु शकतो.
६) लक्ष्मीमातेची अनेक स्वरुपे आहेत. तसेच लक्ष्मीमातेला 'श्रीयंत्र' अतिप्रिय आहे. त्यांतील धनलक्ष्मी स्वरुप ही वैभवलक्ष्मीच आहे. व्रत करतांना या पुस्तकांत दिलेल्या लक्ष्मी मातेच्या प्रत्येक स्वरूपाला वंदन करावे आणि 'श्री यंत्रा' लाही वंदन करावे. तरच त्याचे फळ मिळते. इतकीही आपण तसदी घेतली नाही तर लक्ष्मीदेवी पण आपल्याकरिता तसदी घेणार नाही व तिची कृपा आपल्यावर होणार नाही.
७) व्रताच्या दिवसांत सकाळपासूनच 'जयलक्ष्मी माता' 'जयलक्ष्मी माता' असा जप मनातल्यामनांत जितक्या वेळा करता येईल तितक्या वेळा करावा.
८) एकाद्या शुक्रवारी बाहेर किंवा प्रवासाला जावे लागले तर तो शुक्रवार सोडून पुढच्या शुक्रवारला व्रत करावे, पण व्रत स्वतःच्या घरीच करावे. एकूण जितक्या शुक्रवाराचा संकल्प केला तितके व्रताचे शुक्रवार पूर्ण करावेत.
९) घरात सोने नसेल तर चांदीची वस्तू पूजेला ठेवावी. ती पण नसेल तर रुपयाचे नाणे ठेवावे.
१०) व्रत पुरे झाल्यावर सात भगिनींना किंवा ११, २१, ५२, १०१ भगिनींना 'वैभवलक्ष्मी व्रताचे' शास्त्रोक्त विधी सांगणारे पुस्तक भेट म्हणून द्यावे. जितक्या अधिक पुस्तकांची भेट द्याल तितकी अधिक लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा होईल आणि त्याबरोबर लक्ष्मीमाता व्रताचा अधिक प्रचार होईल.
११) व्रताच्या शुक्रवारी मासिकपाळीची अडचण असेल किंवा सुतक असेल तर तो शुक्रवार सोडून द्यावा आणि नंतरचा शुक्रवार धरावा पण जितक्या शुक्रवारांचा संकल्प केला असेल तेवढे शुक्रवार पूरे करावेत.
१२) व्रताची सुरुवात करतांना लक्ष्मीस्तवनाचा पाठ एकदा म्हणावा.
१३) व्रताच्या दिवशी शक्य झाल्यास उपवास करावा आणि संध्याकाळी व्रताचा विधी झाल्यावर मातेचा प्रसाद घेऊन शुक्रवार करावा. उपवास कारायचा नसेल तर फलाहार घ्यावा किंवा एक वेळा जेवण करून शुक्रवार करावा. जर व्रतधारी अशक्त असेल तर दोन वेळ जेवण घ्यावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की व्रत धारकांनी लक्ष्मीमाता वर पूर्ण श्रद्धा आणि भावना ठेवावी आणि 'माझी मनोकामना माताजी पूर्ण करील' असा दृढ संकल्प करावा.
माता वैभवलक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होवो.