एक फार मोठे शहर होते. त्या शहरात लाखों लोक रहात होते. पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या संगतींत राहात आणि बसत उठत असत. पण नव्या जमान्यांत माणसाचा स्वभावच वेगळा बनलेला आहे. या शहरातली सगळी माणसे आपापल्या कामातच मग्न होती. काहीना तर कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, किर्तन, भक्ति, परोपकार, दया, माया, वगैरे सांस्कृतिक गोष्टीही कमी झाल्या होत्या दुराचारांना पार नव्हता. दारू, जुगार, रेस, सट्टा, व्यभिचार, चोरी वगैरे अनेक गुन्हे शहरात सर्रास होत होती.
अशी एक म्हण आहे की, 'हजारो निराशेच्या गोष्टीत एक अमर आशा लपलेली असते.' त्याप्रमाणे शहरांत इतका मोठा दुराचार असूनही त्यांत काही चांगली माणसेही राहात होती.
अशा चांगल्या माणसांत शीला आणि तिचा पती यांचा संसार गणला जात होता. शीला वृत्तीने धार्मिक आणि संतुष्ट होती. तिचा पती ही विचारी आणि सुशील होता.
ती पतीपत्नी इमानदारीने जगत होती. ती कधी कोणाची निंदा नालस्ती करीत नसत आणि ईश्वर भक्तित सुखाने कालक्रमणा करीत. आदर्श असा त्यांच्या संसार होता आणि शहरातले लोक त्यांच्या संसारी जीवनाची वाखाणणी करताना थकत नसत.
शीलाचा संसार याप्रमाणे सुखात चालला होता. पण म्हणतात ना 'कर्मगती कांही निराळीच असते.' विधात्याचा लेख कोणी वाचू शकत नाही. माणसाचे भाग्य एका घडीत राजाचा रंक बनविते आणि रंकाचा राजाही बनविते. न जाणो, शीलाच्या पतीला मागील जन्माचे कर्मफळ भोगण्याचे कदाचित बाकी असेल. त्यामुळे त्याला वाईट संगत लागली. संगतीचा परिणाम म्हणून एका रात्रीत कोट्याधीश होण्याची स्वप्ने तो पाहूं लागला. भलत्याच धंद्यांत तो पडला आणि करोडपती होण्याऐवजी 'रोडपती' झाला. रस्त्यातील भिकार्या प्रमाणे त्याची हालत झाली.
शहरांत दारू, जुगार, सट्टा, रेस, चरस, गांजा वगैरे वाईट सवयी फैलावल्या होत्या. शीलाचा पती, त्याला दारुचे व्यसन जडले. रातोरात श्रीमंत होण्याच्या लोभात दोस्तांच्या चिथावणीने त्याला रेस-जुगार खेळण्याचा नाद लागला. थोडे-फार शिल्लक राखलेले पैसे आणि बायकोचे दागीने वगैरे सर्व काही तो गमाऊन बसला.
एक काळ असा होता की आपल्या सुशील पत्नीच्या सहवासात तो आनंदात आणि मजेत राहात होता आणि ईश्वरभजनात सुखाने आपला काळ घालवीत होता. त्याऐवजी आता घरांत दारिद्र्य आणि उपासमार आली. पूर्वी सुखाने खायला प्यायला मिळत होते. त्या ठिकाणी आता दोन वेळ पोटभर जेवण मिळायचे ही वांदे पडले आणि नवर्याच्या शिव्या खायची शीलावर पाळी आली.
शीला सुशील आणि संस्कारी स्त्री होती. पतीचा वर्तनाचे तिला खूप दुःख होत होते. पण परमेश्वरावर भरवसा राखून आणि मन मोठे करून ती सर्व सहन करी. अशी म्हण आहे की 'सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे अवश्य येतेच.' त्यामुळे दुःखा नंतर एक दिवस सुख येईलच अशी श्रद्धा ठेऊन प्रभू भक्तित ती लीन झाली.
अशारीतीने दारुन दुःख सहन करतां करतां आणि प्रभुभक्तित दिवस घालवतां घालवतां एक दिवस दुपारी तिच्या दरवाजांत कोणीतरी येऊन उभे राहिले.
शीला विचार करू लागली की माझे घर दुःखाने आणि दारिद्राने भरले आहे. अशा वेळी माझ्याकडे कोण आले असावे बरे?
तरीपण आपल्यादारीं आलेल्यांचे स्वागत करण्याचा आर्यधर्माचा संस्कारा़ची जाण असल्यामुळे ती उठली आणि तिने दरवाजा उघडला.
पाहिले तो तिथे एक माताजी उभी होती. वयाने ती खूप मोठी दिसत होती. पण तिच्या चेहेर्यावर अलौकिक तेज झळकत होते. तिच्या डोळ्यातून जणूं अमृताचे थेंब पडत होते. तिचा उमदा चेहरा करुणा आणि प्रेमाने चमकत होता. तिला पाहातांच शीलाच्या मनाला अपार शांति वाटली. त्या माताजीला ती ओळखत नव्हती, तरीपण तिला पाहातांच तिचे मन आनंदाने भरून आले. माताजीचे स्वागत करून तिला तिने घरांत नेले. आणि एकुलत्या एक फाटक्या तुटक्या चटईवर मोठ्या संकोचाने तिने तिला बसविले.
माताजी तिला म्हाणाली,"काय शीला! मला तूं ओळखले नाहीस?" काहीशा संकोचाने शीला म्हणाली, " माताजी, तुम्हाला पाहून मला खूपच आनंद झाला आहे. मनाला शांत वाटत आहे. असे वाटते कि कित्येक दिवस ज्यांना मी शोधीत आहे त्या तुम्हीच आहांत पण ओळख लक्षांत येत नाही."
माताजी हसून म्हणली, " काय! विसरलीस? लक्ष्मीजीच्या मंदिरांत दर शुक्रवारी भजन होत असते, त्या ठिकाणी मी पण जात असते. तिथें दर शुक्रवारी आपली भेट होते."
पती भलत्याच मार्गला लागल्यापासून अत्यंत दुःखी झाली होती त्या दुःखाने ते लक्ष्मीमातेच्या मंदिरातपण अलिकडे जात नव्हती. बाहेर लोकांना भेटण्याची तिला शरम वाटत होती. ती आठवण करू लागली, पण या माताजीला कधी पाहिल्याचे तिला आठवत नव्हते.
तेवढ्यांत माताजी म्हणाली, "लक्ष्मीजीच्या मंदिरात किती चांगले भजन तू गात होतीस! अलीकडे तूं तिथे दिसत नव्हतीस तेव्हा मी विचारांत पडले की तूं हल्लीं कां येत नाहीस? तूं आजारी बिजारी तर नाहीस ना? असा विचार मनांत येऊन खबर काढण्याकरिता मी आले."
माताजीच्या या अत्यंत प्रेमळ शब्दांनी शीलाचे हृदय भरून आले. तिच्या डोळ्यांत अश्रूं उभे राहिले. माताजीच्या समोर ती हुंदके देऊन रडूं लागली. हे पाहिल्यावर माताजी तिच्या जवळ गेली. आणि तिच्या पाठीवर हात फिरवून तिचे सांत्वन करूं लागली.
माताजी म्हणाली, "मुली, सुख दुःख हे ऊन आणि सांवली प्रमाणे असते. सुखानंतर दुःख येते त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येतेच. तूं मनांत धीर धर आणि तुझे दुःख मला सांग, तुझे दुःख हलके होईल आणि दुःखावर काहीतरी इलाजही सांपडेल."