अमेय, जयंत आणी रामुकाका स्वामींसोबत बंगल्याच्या मागच्या बाजुला उभे होते.
अमेयः स्वामी, तुम्ही आम्हाला इथे मागच्या भागात का आणलय.
स्वामीः तिच एक गुप्त ठिकाण आहे. त्या ठिकाणावर जाण्याचा रस्ता तळघरातून आहे आणि तळघरात जाण्याचा रस्ता इथून आहे.
जयंतः पण तळघरात जाण्याचा रस्ता जनरली घरामधूनच असतो ना?
स्वामीः हो पण हे फक्त तळघर नाहीए. तिच्या अनेक कुकर्मांच ते ठिकाण आहे आणी ते कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून तिने या इथे ते बनवलय.
"पण तळघरात जाण्याचा रस्ता तर कुठेच दिसत नाहीए. इथे सगळीकडे फक्त गवतच आहे." अमेय चारी बाजुंना नजर फिरवत म्हणाला.
यावर स्वामी फक्त हसले. ते जिथे उभे होते तिथून सरळ काही पावले चालत गेले आणी एका जागी जाऊन थांबले. त्यांनी खाली एक नजर टाकली आणी त्याकडे बोट दाखवून हसत म्हणाले, "तळघराचा रस्ता इथे आहे."
स्वामी ज्या ठिकाणाकडे बोट दाखवत होते. तेथे गवताच नामोनिशाण नव्हत. तिथे एक साफ जमीन दिसत होती. मात्र त्या जमिनीवर एक चौकोनाचा आकार होता. स्वामी त्या आकाराकडेच बोट दाखवत होते.
अमेयः पण मग आता या तळघरात शिरायच कस.
स्वामीः ह्या तळघरात प्रवेश करण इतक सोप नाहीय. हा दरवाजा ताकदवान मंत्राने बंद केला गेलाय. तो उघडण्या साठी सुध्दा एक मंत्रच लागेल.
अस म्हणून स्वामींनी कमंडलूतील पाणी उजव्या हातात घेतल. काही मंत्र पुटपुटले. आणी हातातील पाणी त्या भागावर शिंपडल. पाण्याचे थेंब त्या भागावर पडताक्षणीच भलामोठा आवाज झाला आणी ज्या ठिकाणी चौकोनाचा फक्त एक आकार होता. तिथे आता चौकोनी छिद्र दिसायला लागल होत. त्या छिद्रात खाली उतरण्यासाठी पायर्या होत्या.
स्वामीः घ्या. उघडला दरवाजा. आता तुम्ही या पायर्यांनी तळघरात जाऊ शकतात.
स्वामी अमेय कडे वळले. आणी त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले, "लक्षात ठेव. तुझ्या हातातील हे शस्त्र अजिंक्य आहे. कोणतीही अडचण ह्या शस्त्राच्या मदतीने दूर होऊ शकते. आता जा आणी त्या वाईट शक्तीचा नाश करूनच परत ये."
अमेयने स्वामींना नमस्कार केला आणी ते तिघेही जण आता तळघराच्या पायर्या उतरत होते.
*************
ते तिघेही जण तळघरात येऊन पोहोचले होते. तिथे धूळ आणी मातीशिवाय दुसर काहीच दिसत नव्हत.
"स्वामींनी तर सांगितल होत की ती आपल्याला तळघरातच भेटेल म्हणून. पण इथे तर सर्वत्र धुळीच साम्राज्य आहे." जयंतने आपली शंका उपस्थित केली.
अमेयः स्वामींनी सांगितल होत कि तळघर हा फक्त तिच्या गुप्त ठिकाणावर जाण्याचा रस्ता आहे. तिच ठिकाण अस सहजासहजी दिसणार नाही आपल्याला. जसा या तळघरात येण्यासाठी गुप्त रस्ता होता, तसा त्या ठिकाणावर जाण्यासाठी एखादा गुप्त रस्ता असला पाहीजे. आपण या भिंती तपासून पाहू.
ते तिघेही भिंती चाचपून पाहु लागले. थोडा वेळ शोधाशोध केल्यानंतर अचानक रामुकाकांचा आवाज आला. अमेय आणी जयंत त्यांच्या जवळ जाऊन पोहोचले. रामुकाकांनी समोरच्या भिंतीकडे इशारा केला. त्या भिंतीवरही एक चौकोनी आकार होता.
रामुकाकाः साहेब, इथे पण तसाच चौकोनी आकार आहे. हाच तर तो गुप्त रस्ता नसेल.
जयंतः पण हा जरी गुप्त रस्ता असला तरी आपण याला उघडणार कस? आपल्याला तर ते मंत्र-तंत्र काही येत नाहीत.
अमेयः हा दरवाजा उघडण्यासाठी आपल्याला मंत्राची गरज नाही. तुम्ही दोघे मागे सरका.
जयंत आणी रामुकाका काही पावले मागे गेले. अमेयने आपल्या हातातील शस्त्राला नमस्कार केला आणि पूर्ण ताकदीनिशी ते शस्त्र त्या चौकोनी भागात खुपसल. एक भला मोठा आवाज झाला. तो चौकोनी भाग खालच्या बाजुला धसला आणी तो दरवाजा उघडला गेला. तिथे एक गुप्त खोली होती. तिघांनीही त्या गुप्त खोलीत प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर तिघांचेही डोळे भयाने विस्फारले गेले. ती खोली पूर्णपणे अघोरी साधनांनी भरलेली होती. जिकडे-तिकडे मानवी हाड-कवट्या पडलेल्या होत्या. सुकलेल्या रक्ताचे डाग होते. एक भयानक दुर्गंधी सर्वत्र पसरलेली होती. प्रवेशद्वाराच्या जवळच एक लोखंडी पुतळा भाला घेऊन उभा होता. अमेयने चारही बाजुंना नजर फिरवली. अचानक त्याला समोरच्या एका कोपर्यात किमया दिसली. ती बेशुध्दावस्थेत पडलेली होती. तिची अवस्था फार खराब होती. अमेय तिच्या दिशेने जायला निघाला. तेवढ्यात एक मोठा आवाज झाला. अमेयने वळून पाहील. तो लोखंडी पुतळा जिवंत झाला होता आणि त्याच्या दिशेने येत होता. त्या पुतळ्याने भाल्याने अमेय वर वार केला. अमेयने चपळाईने तो वार आपल्या शस्त्रावर झेलला. त्या पुतळ्याने पुन्हा वार केला. अमेयने परत तो वार झेलला. काही वेळ त्या दोघांची लढाई चालू होती. जयंत आणि रामुकाका आश्चर्याने ते पाहात होते. त्या पुतळ्याने तो भाला अमेयच्या पोटात खुपसायचा प्रयत्न केला. पण अमेय वेळेवर तिथून बाजूला झाला आणि तो भाला भिंतीत जाऊन रूतला. तो पुतळा भाला काढण्याचा प्रयत्न करत होता. पण भाला फार खोलवर रूतला होता. हीच संधी साधून अमेयने त्या दिव्य शस्त्राने पुतळ्यावर वार केला आणि त्या पुतळ्याच शिर धडावेगळ केल. तो पुतळा तिथेच शांत झाला. अमेय क्षणाचाही उशीर न करता किमया जवळ पोहोचला. त्याच्या मागोमाग जयंत आणि रामुकाकाही तिथे आले. तिचा मंद श्वास चालू होता. अमेयने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एक भलामोठा आवाज झाला. अमेयने मागे वळून पाहीले. त्याच्यापासुन काही अंतरावर एक बाई एक प्रगट झाली होती. अमेयने तिचा चेहरा निरखुन पाहीला आणि अचानक त्याला त्या बंद खोलीतील चित्राची आठवण झाली. ती साराह विंचेस्टर होती......