“असला मोठेपणा आम्हाला नको.” शंकर म्हणाले.
“मी पायीच जाते. ह्या नंदीचे व गरुडाचे तेथे भांडण व्हायचे एखादे. सोहळा बाजूलाच राह्यचा. मी भरभर जाईन.” पार्वती म्हणाली.
“वाटेत अडखळशील, पडशील.” शंकर म्हणाले.
“पडत नाही. रडत नाही. मी पर्वताची मुलगी. दगड धोंडे मला लागत नसतात. शिवाय, आज रस्ते साख असतील. जाते मी.” असे म्हणून पार्वती निघाली.
तिच्या अंगाखांद्यावर दागिने नव्हते. नेसू उंची वस्त्र नव्हते. पायी जात होती. आपणाला कोणी हसेल, असे तिच्या मनातही आले नाही. दागदागिन्यांची तिला आठवण झाली नाही. तिचा पती स्मशानात राहणारा, अंगाला भस्म फासणारा, कातडी पांघरणारा! पार्वतीजवळ कोठून येणार वस्त्रे नि अलंकार? वल्कलांचीच वस्त्रे नेसून ती जात होती. पिता हिमालय, त्याच्या घरांच्या झाडांच्या सालींपासून ती वस्त्रे तयार केलेली होती. ती वल्कलेही माहेरचीच होती.
शंकरांच्या विषाचा दाड शांत करणारे राम-नाम ओठांनी म्हणत पार्वती वेगाने जात होती. तिला वैकुंठ दिसले. तो नयनमनोहर प्रासाद दिसला. रम्य चंद्रकिरण दूरवर पसरले होते. रस्ता दिसत होता. स्वच्छ सुंदर रस्ता, सर्वत्र सुगंध दरवळला होता. सीमेवरची मंगल वाद्ये कानावर येत होती.
प्रासादाच्या अंगणात पार्वती आली. तेथे सारे स्तब्ध होते. आत सरस्वतीदेवी गात होती. भगवान शंकराचा महिमा गात होती. ते गीत ऐकून पार्वती तटस्थ झाली. तेथेच उभी राहिली. ते गाणे संपले. वीणेचा आवाज बंद झाला. शंकराचा महिमा इतर देवांगनांना सहन झाला नाही.