||श्री काळभैरवनाथ प्रसन्न||

||जय धनुष||

नमस्कार वाचकहो, मी प्रथमेश काशीनाथ हळंदे, पुणे येथे बी.एस्सी.(कम्प्युटर सायन्स) च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. माझ्या आगामी गाव‘गाडा’ या होऊ घातलेल्या कादंबरीची एक छोटीशी ‘झलक’ तुम्हा सर्वांसमोर सादर करत आहे. प्रस्तुत लेखक नवा असल्याकारणाने आपल्या शुभेच्छांची नितांत गरज आहे. बाकी कार्य सिद्धीस नेण्यास देव नाथबाबा समर्थ आहे. तुम्हा सर्वांचाही आशीर्वाद असू द्यावा.

मो. नं. : ७०६६३१८०४४

===========================================

कमळी उठून उभी राहिली. तिनं तिचे केस मोकळे सोडले. कपाळाची टिकली काढून मागच्या भिंतीला चिकटवली. तिच्या कपाळावर गोंदलेला काळा ठिपका आता स्पष्ट दिसत होता. गोदी उठून तिच्या जवळ आली. तिचे सगळे दागिने काढून बाजूला ठेवले. तिला तीन वेळा स्वतःभोवती फिरवून परत खाली पाटावर बसवलं. समोरच्या ताटातला गुलाल उचलून तिनं कमळीच्या केसात टाकला. संपूर्ण केसात गुलाल पसरवला. मागं ठेवलेल्या भांड्यातलं गारगार पाणी कमळीच्या डोक्यावरून सोडलं. कमळीची पिवळी साडी भडक गुलाबी रंग ल्याली. कमळी थरथरत होती. गोदीनं तिचे ओले केस सावरले. वेणीफणी केली. ताटातल्या हळद आणि बुक्क्याने तिच्या भांगेतल्या एकेकाळच्या कुंकवाची जागा भरून काढली. लालभडक कुंकवाने तिचा मळवट भरला. मधोमध ठसठशीत हळदीचा ठसा उमटवला. त्याही मधोमध बुक्का लावला. गुलालाने लालेलाल झालेला तिचा चेहरा आता अधिकच भेसूर भासू लागला. लागलीच झणझणीत काजळाने कमळीच्या डोळ्यात पाणी आणलं. तिचे रक्तवर्णी डोळे पुढील शृंगाराची वाट पाहू लागले.

आता गोदीनं खाटेखाली ठेवलेला पितळी डबा बाहेर काढला. मघापासून खोलीत सुटलेल्या उग्र वासाचं साम्राज्य आणखीनच बळावलं. एवढ्या जाड अलवनात घट्ट गुंडाळलेल्या डब्यातून येणारा भपका अत्यंत असह्य होता. कमळीच्या मळवटात उठलेली बारीकशी आठी हेच जाणवून देत होती. गोदीनं अलगद गाठ सोडवून अलवनातून डबा मोकळा केला. झाकण उघडताच कमळीचा हात तिच्या नाकावर गेला. गोदीनं तिची करंगळी त्या डब्यात बुडवली. कसलातरी लाल-काळा द्रव तिच्या करंगळीवर जमा झाला होता. नाही, नाही द्रव नाही रक्तच ! इतकं घट्ट रक्त पाहून कमळीच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. मघासच्या रक्तवर्णी डोळ्यातलं पाणी जाऊन तिथे हवस दिसू लागली. गपकन गोदीची करंगळी तिने तोंडात घातली. अगदी अधाश्यासारखे ती ते बोट चाटू लागली. खाड!! गोदीनं एक सणसणीत ठेवून दिली.

"अजून टाईम हाय ह्या समद्याला. तुझी भूक आवर नायतर देवीचा कोप हुईल." गोदी.

कमळीचा पारा चढला होता. ती घुश्श्यातच गोदीकडं बघत होती. तिची ती नजर पाहून गोदी मनातून चरकली. पण तिनं तसं चेहऱ्यावर मात्र दिसू दिली नाही. तिला अजून बरंच काम होतं. पुन्हा तिनं आपली करंगळी रक्तानं माखवली. कमळीच्या ओठावरून फिरवली. काळवंडलेले ओठ लालभडक झाले. उग्र वासाच्या रक्ताने वैताग पण त्याच्या घट्टपणामुळे समाधान असे संमिश्र भाव कमळीच्या चेहऱ्यावरील खुनशीपणाला अधिकच धारदार बनवू लागले. ते रक्त एका गाभण म्हशीचं होतं. होय, तिच म्हैस जिला कालच्या पंचमीला म्हसोबाला खुश करण्यासाठी आणली होती. म्हसोबाच्या पूजेवेळी पवित्र विधींसाठी दिलेल्या म्हशीच्या बळीमागचं खरं रहस्य आता स्वतःचं विद्रुप रूप कमळीच्या ओठांवर नाचवत होतं. बस्स आता कमी होती कमळीच्या हाताला सजवण्याची. एक लाल-दोन हिरवी-एक लाल अशा क्रमानं गोदीनं तिच्या दोन्ही हातांत सात-सात बांगड्या भरल्या. त्या नव्या रंगीत बांगड्यांचा किणकिण आवाज खरंतर कमळीच्या विधीसमाप्तीचा बिगुल होता. पिवळ्याधमक लिंबांची ताज्या हिरव्या कडूलिंबाच्या पानात गुंफलेली माळ गोदीनं कमळीच्या गळ्यात घालून या विशेष विधीचा शेवट केला.

आता बारी होती निवदाची. हळद-गुलाल मिश्रित रटरटून शिजलेला भात, त्यावर म्हशीच्या काळजाचे अर्धंकच्चे शिजवलेले तुकडे, लिंबाचे २-४ तुकडे असा भरगच्च निवद पुरेसा होता कमळीला भूकेची जाणीव करून देण्यासाठी. सकाळपास्नं कशीबशी आवरलेली भूक अनावर झाली आणि कमळीच्या लाल-हिरव्या बांगड्या किणकिणल्या. गपकन् गोदीनं तिचा हात धरला, कमरेची छोटी सुरी काढली अन् चर्रर्र!! कमळीच्या करंगळीतून रक्ताची धार लागली. अगदी आत्ता हा भात पिवळा होता असं कोणाच्या मनातही येणं अशक्य होतं इतका लालेलाल तो भात दिसत होता. पिवळ्याजर्द लिंबाच्या फोडीच काय त्या रक्ताला जुमानत नव्हत्या. मनासारखा निवद तयार झाला. आता गोदीनं साऱ्या सेवकांना इशारा केला. साऱ्यांनी ‘म्हसोबा’च्या नावानं हारकी दिली. गुलाल-बुक्क्याची उधळण झाली. सर्वत्र गोमतार शिंपडलं. धूप पेटवला गेला. सेवक जोरजोरात हातातली घंटी वाजवू लागले.

"आईराजा उदोउदो!! आई यल्लमेचा उदोउदो !!" आतल्या खोलीतून जनाक्का बाहेर आली. सर्व सेवकांनी गुढग्यावर बसून कमरेत झुकून आक्काला मुजरा केला. एका सेवकाने कोपऱ्यातली पान ठेवलेली चांदीची पेटी आक्कासमोर धरली. त्यातलं एक पान आपल्या मेंदीभरल्या हातांनी उचलत आक्कानं आपली सुरम्यानं सजलेली भेदक नजर सभोवार फिरवून आपल्या ओठाआड केलं आणि समोरच्या गादीसमोर जाऊन थांबली. गादीमागील भिंतीवर ताज्या फुलांचा हार घातलेली तिच्या आराध्य आई यल्लम्मेची एक मोठी तसबीर होती. तिच्या शेजारीच उजवीकडं कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची तर डाव्या बाजूला ग्रामदैवत म्हसोबाची हार घातलेली तसबीर होती. आक्कानं मनोभावे नमस्कार केला.

"बोल,म्हसोबाच्या नावानं चांगभलं!!आईराजा उदं उदं!!आई यल्लम्मेच्या नावानं चांगभलं!!" आक्कानं ताटातला गुलाल उधळला व ती गादीवर बसली. आज आक्का लाल साडी नेसली होती. ठेवणीतले दागिने, थोडासा शृंगार यामुळं तिचं रूपडं अगदी झकास खुललं होतं. ती आज इतकी सुंदर दिसत होती की डोईवरचं तुळतुळीत टक्कल सोडलं तर कोणीही म्हणालं नसतं की आक्का ही भगतीन बाई नव्हे तर एक ‘हिजडा’ आहे म्हणून. खरंतर नानागुरुचीच सख्खी बहीण ती. दोघंही किन्नरच पण अंतर्बाह्य वेगवेगळे. एकाच गुरूच्या हाताखाली शिकलेले पण दोघांनी बोध मात्र वेगळाच घेतला. नानाला साऱ्या विद्या, चांगल्या-वाईट, अवगत होत्या. पण आक्कानं मात्र अघोरतंत्र अवलंबलं. इतकं की तिला अनेक ठिकाणी अघोर विधींसाठीच आमंत्रित केलं जाऊ लागलं. भरपूर मानधन घेऊन आक्का हे कार्यक्रम करायची. या कार्यक्रमांमुळे तिचीही नानासारखीच वरपर्यंत पोच होती. मात्र तिचे खाजगीतले भद्रप्पा, भीमा, बटुक आणि राका हे चार कानडी सेवक,गोदी आणि इतर काही जणांशिवाय आक्का कशी दिसते हे कोणालाच माहित नव्हतं आणि माहित पडणार तरी कसं कारण आक्का कधीच जगासमोर आली नव्हती. स्वतःच्या सौंदर्याचा तिला विशेष हेवा होता. पण आपलं टक्कल कोणाला दिसू नये म्हणून ती सदैव पडद्याआडूनच सूत्र हलवायची. अनेक लोकांना गोदी म्हणजेच जनाक्का वाटायची. तिचा एकंदर अवतारच तसा होता. जितकी आक्का सुंदर होती त्याच्या दहापट गोदी गबाळी होती. अशी बाई अघोरतंत्र करताना दिसली तर कोणीही तिला जनाक्काच समजणार. तरीही आक्काचा गोदीवर विशेष जीव होता. कळकट मळकट पण कामाला बळकट अशी गोदी ढ असली तरी अगदी व्यवहारचतुर होती. अत्यंत प्रामाणिक व विश्वासू गोदी आक्काच्या सर्व व्यवहारात व्यवस्थित लक्ष घालायची. कसल्याही कामात दिरंगाई, कुचराई तिला चालायची नाही. त्यामुळंच आक्कानं तिला स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. आक्कानं आपली बैठक जमवताच गोदी तिच्या पायापाशी पिकदाणी घेऊन बसली.

"आक्का, घे, झाड सजवलंय बग तुला हवं तसं." गोदी.

"माझी गुणाची गं बाय ती." आक्का गोदीच्या केसात हात फिरवत बोलली. आक्कानं कमळीला उभं राहायला सांगितलं. तिला आपादमस्तक न्याहाळत आक्कानं भद्रप्पाला इशारा केला. ते चौघंही आपल्या बाह्या सरसावून पुढे झाले. आक्काने आतल्या खोलीकडे नजर वळवली तसा त्यांचा म्होरा आतल्या खोलीकडं वळाला. त्या चौघांनी आतून एक मोठी ट्रंक उचलून आणली.

"खोल." आक्कानं कमरेचा चाव्यांचा जुडगा बटुककडं फेकला.

पेटी खोलताच साऱ्या खोलीत एक मस्त सुवास पसरला. अगदी ताज्या फुलांसारखा. मघासचा अभद्र वास त्याहून वरचढ होता पण ‘वासरात लंगडी गाय’ या न्यायानं हा नवा सुवास आपल्या अस्तित्वाची जाण खोलीतल्या प्रत्येकाला करून देत होता. कमळीला देखील जरा बरं वाटलं पण तेवढीच तिची उत्सुकताही ताणली गेली, कारण तिला इथं अश्या प्रसन्न सुवासाची अजिबात कसलीही कल्पना सोडाच, साधी अपेक्षाही नव्हती. काय होतं तरी काय त्या पेटीत? काहीतरी होतं जे हार-फुलांच्या गर्दीखाली झाकलं नव्हे जाणीवपूर्वक लपवलं गेलं होतं. बटुक पुढं होऊन पेटीतून ती सारी फुलं काढू लागला. एका लाल कापडाखाली काहीतरी ठेवलं होतं. नक्की काय होतं याचा नीट अंदाजही येत नव्हता. बटुकनं ते कापड काढलं आणि ते जे काही होतं ते पाहून मटकन् खालीच बसला. त्याची दातखाळीच बसली. ततपप करत तो तसाच पेटीकडं बघत मागं मागं सरकू लागला. आक्का मोठमोठ्यानं हसू लागली. पानाची पिक टाकून बटुककडं तुच्छतेने बघत बोलली,

"का रं, कदी मुडदा बगीतला न्हाईस व्हय?" आक्का पुन्हा हसू लागली.

गोदी चमकली. मुडदा? आक्का मुडदा कवा घिऊन आली. ती उठून पेटीजवळ गेली. व्हय-नाय व्हय-नाय करीत तिनं तो मृतदेह पाहिला.

"ईऽऽऽऽऽऽ आक्का ह्ये गं काय??" गोदी गपकन् मागं सरत आक्काच्या बाजूला जाऊन बसली.

पेटीत एक सांगाडा होता. एका स्त्रीचा..साडी नेसवून सजवलेला...अगदी कमळीसारखा....!!!

"जनी..." आक्का नवीन पान जमवत शांतपणे म्हणाली.

क्रमशः

===========================================

टीप:

आक्काचे चारही खास सेवक हे कानडी होते. त्यामुळे त्यांची नावेही कानडी धाटणीची आहेत. ते कोण, कुठले याचा उल्लेख पुढे होईलच. आक्काच्या सेवकांची नावे आणि त्याचा अर्थ :

 भद्रप्पा: शिवशंकराचे एक प्रचलित नाव

 बटुक: उंचीने बुटका असलेला, अष्टभैरवांपैकी एक

 भीमा: शक्तिशाली,पाच पांडवांपैकी एक

 राका: पौर्णिमेचा चंद्र

||जय धनुष||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel