मायानिरूपण

या समासात ओवी १-४ पूर्वसमासातल्या (१।३७) ओवींशी संबंधित शिष्यविनंती, ५-९ सद्‌गुरूंचे उत्तर असा सुखसंवाद असून, १०-१२ मायेचे प्रमुख लक्षण सांगून, १३-२० त्याचा विस्तार केला आहे. ओवी २१-२५ माया ही स्वतंत्र की परतंत्र याबाबत शिष्याची शंका आणि त्याच्या ज्ञातेपणाच्या प्रज्ञावादाची निर्भत्सना आहे. त्यामुळे शिष्यास संभ्रम निर्माण होऊन तो ओवी २६ मध्ये स्पष्ट खुलासा करण्याची विनंती करतो. ओवी २७-२९ त्याच्या शंकेचे पूर्ण निरसन, ३०-३८ मायेच्या कल्याणकारक बाजूंचे वर्णन, ३९-४१ सावधतेचा इशारा असून ओवी ४२-४३ मध्ये पुढच्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

जय जय जी सच्चिदानंदा । जय जय जय जी आनंदकंदा ॥
जय जय जी निजबोधा । परमपुरुषा ॥१॥

(पहिल्या समासातील ३७ व्या ओवीप्रमाणे शिष्य विनवीत असून तो प्रार्थना करतो की,)

हे सच्चिदानंदा ! हे आनंदकंदा ! हे निजबोधा परमपुरुषा सद्‌गुरुनाथा ! आपला त्रिवार जयजयकार असो. ॥१॥

(श्रीगुरु तर जाण्यास निघाले आणि आपले समाधान तर झालेले नाही म्हणून त्यांनी थांबून आपल्याला सर्व पटवून द्यावे अन्यथा आपले कल्याण होणे अशक्य आहे ह्या जाणिवेने अत्यंत श्रद्धापूर्वक कळकळीने तो प्रार्थना करीत आहे. )

अनंत ब्रह्मांडाऎसी ढिसाळें । मायेनें रचिलीं विशाळें ॥
तें तुमचे कृपेचेनि बळें । विरतीं स्वानंदडोहीं ॥२॥

मायानिर्मित जी ही विशाल अनंत ब्रह्मांडे आहेत ती, हे सद्‌गुरुनाथ ! तुमच्या कृपाकटाक्षबळाने, स्वानंदाच्या डोहात जणू एखादे ठिसूळ मातीचे ढेकूळ पाण्यात विरावे त्याप्रमाणे विरून जातात, नामशेष होतात. मायेचे हे सर्व मोहकारक जाळे तुमच्या कृपेने क्षणार्धात नाहीसे होते. ॥२॥

आतां स्वामीनें जें कांहीं इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारलें ॥
शरणागत आपुलें । समर्थें उपेक्षूं नये ॥३॥

आपण माझ्याकडून ज्या काही त्यागाची अपेक्षा केली आहे तो कृपा करून पूर्ण करवून घेतली पाहिजे. महाराज ! मी आपणास शरण आलो आहे. आपण समर्थ आहात, माझी उपेक्षा करू नका हो !

नाशिवंत कायें म्यां टाकावें । तें मज स्वामीनें सांगावें ।
मज दातारें करावें । आपणाऎसें ॥४॥

जे नाशिवंत ते मी टाकावयाचे म्हणजे मी प्रत्यक्ष काय केले पाहिजे हे आपणच मला कृपापूर्वक समजावून द्यावे. आपल्या अलौकिक दातृत्वाने महाराज ! आपण मला आपल्या सारखेच सुखी करावे. ॥४॥

ऎकोन शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें ॥
अवधान देऊन घेणें । आनंदपद ॥५॥

अशी ही तळमळीची शिष्यविनंती ऎकून, सह्रदयतेने सद्‌गुरु म्हणतात, "बाळा ! सावध हो. माझ्यासारखे जर तुला व्हावयाचे असेल तर आता मी जे सांगतो त्याकडे अंतःकरणापासून लक्ष देऊन तू आपले स्वानंदपद ओळखून घे." ॥५॥

शिष्या बहू मन घाली । आतां बाष्कळता राहिली ॥
येथें वृत्ति चंचल केली । तरी बुडसी संदेहसागरीं ॥६॥

बाळा ! आता उच्छृंखलता सोडून, एकाग्र मनाने माझ्या बोलण्याकडेच पूर्ण लक्ष दे. या निरूपणाचे महत्त्व ओळख. या वेळी जर तू मन इतरत्र भटकू दिलेस तर मात्र तुझे निसंदेह समाधान होणार नाही आणि त्यामुळे शंकाकुशंकारूपी मोहसागरात बुडून तुझा नाश होईल. ॥६॥

अग्निसंगें लोहो पिटे । तेणें तयाचा मळ तुटे ॥
मग परिसेसीं झगटतां पालटे । लोखंडपण तयाचें ॥७॥

अग्नीमध्ये तापवून लाल झालेल्या कच्च्या लोखंडाच्या गोळ्याला घणाने ठोकले असता त्याचे मलिनत्व (गंज) नाहिसे होते; इतके की नंतर परिसाच्या नुसत्या स्पर्शानेही त्याचे लोखंडत्व समूळ जाऊन त्याचे सुवर्णात रूपांतर होते. ॥७॥

तयाचा मळ झडेना । आणि अभ्यांतर कळेना ॥
तरीं तें सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥८॥

वरीलप्रमाणे जर त्या गोळ्याचा मळ झडून गेला नाही तर त्याच्या आतले शुद्धत्वही स्पष्ट होणार नाही. अशा स्थितीत परिसाच्या स्पर्शानेही त्याचे लोखंडपण जाणार नाही. पूर्ववत्‌ तो गोळा मृत्तिकास्वरूप मलिनच राहणार. ॥८॥

म्हण‌उन नाशिवंत तितुका मळ । तुंवां तजावा अमंगळ ॥
तो गेलियां तूंच 'केवळ' । आहेस बापा ॥९॥

म्हणून सांगतो की बाळा । जितके काही नाशिवंत तितके सर्वच मलिन व मलिनत्व हे केव्हाहि अमंगलच, असे नीट उमजून तू त्याचा त्याग कर. हे सर्व मलिनत्व गेल्यावर जे उरेल तेच तुझे सत्य परब्रह्मस्वरूप होय बरे. ॥९॥

तरी नाशिवंत ते तूं जाण माया । माईक जाये विलया ॥
ते मायेचा विचार प्राणसखया । ऎक सांगतों ॥१०॥

वर जे नाशिवंत वा मलिन म्हणून सांगितले तीच माया होय. जे मायिक ते नष्ट होणारच. प्राणसख्या बाळा ! घाबरू नकोस. या मायेचा विचार तुला नीट समजेलसा सांगतो, ऎक. ॥१०॥

'अहं' ऎसे जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ॥
तये मायेपासून त्रिगुण । गुणापासून भूतें ॥११॥

'मी आहे' असे जे पहिले अस्पष्ट भान तेच मायेचे खरे रूप होय. हीच मूळमाया होय. हीच पुढे स्पष्ट होऊन सत्त्व, रज, तम अशी त्रिगुणात्मक महामाया झाली. तमोगुणापासून आकाशादि पंचमहाभूते क्रमाने निर्माण होऊन हीच माया अशाप्रकारे (३+५=८) अष्टधा प्रकृतिरूपाने विस्तार पावली आहे. ॥११॥

पृथ्वी आप तेज वायो आकाश । सृष्टी रचिली सावकास ॥
येथें दृश्य आणि अदृश्य । सकळ माया ॥१२॥

आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांपासून यथावकाश ही सारी सृष्टी उत्पन्न झाली; अर्थात ती पंचभौतिकच आहे. म्हणून यच्चावत्‌ सर्व दृश्य (पंचभौतिक) सृष्टि व अदृश्य (गुणमयी) सृष्टि ही त्या मूळमायेपासून असल्यामुळे मायामयच - नाशिवंत होय. ॥१२॥

येक माया दों ठायीं वाटली । प्रकृतीं आणि पुरुष जाली ॥
जैसी दों दिसांची बोली । येकचि परवा ॥१३॥

मुळात माया ही एकच; परंतु तीच अष्टधाप्रकृतिरूपाने व तिला अधिष्ठान अशा अहं संकल्पमय पुरुषरूपाने अर्थात शक्ती व शक्तिमान या दोन व्यावहारिक रूपात जणू विभागली गेली आहे. जसा 'परवा' या शब्दाने ऒळखिला जाणारा दिवस असतो एकच, परंतु भासतो मात्र दोन दिवसांची बेरीज म्हणून. ॥१३॥

माया ज्ञाता ज्ञेय ज्ञान । माया ध्याता ध्येय ध्यान ॥
माया हेंचि समाधान । योगियाचें ॥१४॥

(मायेची व्यावहारिक रूपे दोनच काय पण तीन अथवा अधिकही असू शकतात हे येथे स्पष्ट करतात.) ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान अथवा ध्याता, ध्येय, ध्यान इ. त्रिपुटीला प्रथम 'अहं' पणाची मूळ जाणीवच कारण असल्याने हा सर्व मायेचाच विस्तार होय. तद्वतच कर्मयोग्याचे कर्मतृप्तीचे समाधान हेहि अनेकविध अशा मायेचेच रूप होय. ॥१४॥

माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ॥
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥१५॥

तसेच ज्ञानयोग्याची 'सच्चिदानंद, आनंदाचा गाभा, निजबोध' इ. शब्दानीं ओळखिली जाणारी स्थिती ही ही जाणीवमयच असल्याने मायेचेच एक रूप होय. ॥१५॥

आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥
रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥

इतकेंच काय; परंतु नामरूपातीत अशी आत्मा अथवा ब्रह्म अथवा स्वरूप अशा शब्दांनी लक्षित केली जाणारी, एकमेवाद्वितीय अवस्था हीहि स्वसंवेद्य अशा त्या जाणिवेनें युक्त - अत्यंत सूक्ष्मतेने का होईना असल्याने मायासमच होय. अरूप असे म्हणने रूप सापेक्षच असल्याने रूप अथवा अरूप, द्वैत अथवा अद्वैत असे म्हणणे हा सर्व मायेचाच विस्तार होय. ॥१६॥

जीव शिव आणि ईश्वर । हाहि मायेचाचि विस्तार ॥
विश्वरूप विश्वंभर । अवघी माया ॥१७॥

आता उपाधीच्या दॄष्टीने भिन्न समजल्या जाणाऱ्या जीव, शिव अथवा ईश्वर ह्या स्थितीही जाणिवेच्याच न्यूनाधिकतेवर अवलंबून असल्याने, त्या सर्व त्या मायेचाच विस्तार होय. तात्पर्य या सर्व विश्वाचे भान करून देणारी दृश्य विश्वरूप आणि त्याचे भरणपोषण करणारी अदृश्य विश्वंभर शक्ती ही केवळ मायाच होय. ॥१७॥

माया मनास चाळक । माया बुधीस व्यापक ॥
माया येकीं अनेक । ऎसें बोलणें ॥१८॥

मनास संकल्प-विकल्परूपाने चंचल करणारी, बुद्धीस व्यापून निश्चय करणारी ही मायाच होय. केवळ एकमेवाद्वितीय अशा परब्रह्मस्वरूपात असे हे अनेकत्वांचे खेळ दाखविणारी ही मायाच होय. म्हणूनच हा सर्व खेळ मिथ्या होय असे संतांचे सांगणे आहे. ॥१८॥

माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ॥
माया दृश्यास दाखवी । नेत्रीं रिघोनियां ॥१९॥

ही ईशशक्ती माया, ही जाणीव तद्‌रूप अशा देहाची हालचाल करविते, वाणीने शब्द बोलविते, नेत्रांवाटे दृश्य दाखविते. तात्पर्य, सर्व इंद्रियांना तत्तद्विषयी प्रेरिते. (हा देह मायानिर्मित असल्याने त्याला तद्‌रूप म्हटले आहे.)

मायेनेंचि माया चाले । मायेनेंचि माया बोले ॥
मायेनेंचि माया हाले । वायोरूपें ॥२०॥

आता जास्त काय सांगावे बरे ! चालणे, बोलणे, हालणे इ. सर्व देहव्यापार होतात ते तिच्याच प्रेरणेने आणि ज्याकरवी होतात तो देहही मायानिर्मितच. तात्पर्य मायाच मायेकरवी हे सर्व काही करविते. वायूचे वाहणे हे जसे वायूमुळेच शक्य होते व त्याच्यामुळेच कळते; तद्वत माया(१) आपल्या मायेने(२) ही सर्व माया(३) करते. ॥२०॥ (१ - मूळ जाणीव, २ - शक्तीने, ३ - हे सर्व कार्य)

तों शिष्य म्हणे जी ताता । माया चाले स्वरूपसत्ता ॥
अरे ! सत्ता तेचि तत्त्वतां । माया जाण ॥२१॥

सावध असलेला शिष्य योग्य समयीं दक्षतेनें त्वरित आक्षेप घेतो की, "महाराज ! आपण म्हणता की, मायेला मायेचाच आधार; परंतु शास्त्रात तर मायेला स्वरूप सत्तेचा आधार सांगितला आहे, हे कसे?" त्यावर सद्‌गुरु स्पष्ट करतात की, "अरे बाबा ! सत्ता म्हणजे काय ते सांग पाहू. सत्ता म्हणजे "आहे" पण, हीहि एक शक्तीच की नाही? हे तरी कळले कशामुळे मायेमुळेच ना? म्हणून वर (ओवी ११) सांगितल्याप्रमाणे आहेपणाची जाणीव - ही स्वरूप सत्ता - ही मायाच होय." ॥२१॥

तरी मायेने स्व‌इछ्या (स्व‌इच्छा) असावें । आणि स्वरूपसत्तेनें नसावें ॥
मनास आलें तैसें करावें । हें केंवि घडे? ॥२२॥

वरील खुलासा नीट समजला नसल्याने शिष्य परत म्हणतो की, "महाराज ! तर मग याचा अर्थ माया स्वेच्छेने वागते असा होतो. स्वरूपसत्तेच्या आधाराने माया नसून ती स्वतंत्र ठरते आणि तिनें वाटेल तो धुडगुस घालावा असे आपल्या बोलण्याने ठरू पाहाते. हा अनवस्थप्रसंग कसा शक्य आहे बरे?" ॥२२॥

खऱ्यावरी लटिकें चौताळलें । लटिकें मर्यादेनें राहिलें ॥
ते तुंवां गर्भांधाने देखिलें । हें अघटित वार्ता ॥२३॥

शिष्याचें शब्द पांडित्य खोडून काढण्यासाठी सद्‌गुरु उपरोधाने म्हणतात की, "वाहवा ! बरा ज्ञातेपणा दाखविलास बाबा ! सत्यस्वरूपावर मूलतःच मिथ्या असणाऱ्या मायेने म्हणे आवरण घातले ! अथवा ती मर्यादेत वागू लागली ! आणि हा खेळ पाहिला कोणी? तर गर्भापासून स्वरूपज्ञान नसलेल्या तू गर्भान्धाने ! खरोखर ही बातमी विलक्षणच होय !! ॥२३॥ (लटिकें = मूलतः मिथ्या, खोटे; अघटित = न घडणारे, विलक्षण)

तैसी माया हें नाथिलि । आणि स्वरूपसत्तेनें चालिली ॥
ते तुंवां गर्भांधाने देखिली । हे वार्ता सांगसी ॥२४॥

तुला माया म्हणजे काय तेच अजून कळले नाही आणि मारे प्रज्ञावादाच्या गप्पा मारतोस की माया ही मुळीच मिथ्या असल्याने स्वतंत्र नव्हे. ती स्वरूप सत्तेच्या आधाराने चालते. आता या तुझ्या गर्भान्धाच्या देखणेपणाला म्हणावे तरी काय बाबा !! ॥२४॥

जें जालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ॥
ऎसे हे ज्ञातेपणे बोलतां । तुज लाज नाहीं ॥२५॥

जी माया (या मा सा माया) कधी वेगळेपणाने झालीच नाही, पृथकत्वाने ती कधी (शक्तिशक्तिमतेरभेदः) असणेच शक्य नाही; तिच्यावर म्हणे दुसऱ्याची सत्ता आहे आणि ती ही कोणाची तर म्हणे निर्विकार निर्गुण परब्रह्माची !! जी नाही ती आहे असे म्हणतोस आणि जे निर्विकार तेथे सत्तेचा विकार प्रतिपादन करतोस ! ह्या तुझ्या ज्ञातेपणाची तुला लाज कशी वाटत नाही रे? ॥२५॥

सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥
तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥

या भडिमाराने गोंधळलेला शिष्य अगतिक होऊन विचारतो की, "गुरुराजा ! सर्व काही मायाच होय असे आपणच मागे (ओवी १६-१७) सांगितलेत आणि आता तर म्हणता आहात की ती झालीच नाही ! महाराज, मला हे कोडे काही उमगत नाही. मी समजावे तरी काय ते कृपा करून स्पष्टपणे सांगा. ॥२६॥

अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥
तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥

अरे बाबा ! जे जे मनाला कळते, अनुभविता येते ते ते सर्वही मायिक - मिथ्या असे समजून तुझ्याच अनुभवाने मनाला समजणारे सर्व काही तू सोडले पाहिजेस. ॥२७॥

सकळहि माया परी नाथिलि । स्वरूपीं तों नाही राहिली ॥
येवं आहे नाही हे बोली । माया जाण ॥२८॥

मनाला भासणारे सर्व काही मायाच होय; परंतु स्वस्वरूपी जेथे मनच उरत नाही तेथे ही माया राहाणार कशी बरें? म्हणून ती मिथ्या होय. तात्पर्य माया आहे व माया नाही या दोन्ही कल्पना मायेमुळेच शक्य असल्याने त्या मायामयच होत. (अनिर्वचनीय माया) ॥२८॥

येवं सांगतो तें ऎकावें । माईक मायेतें जाणावें ॥
आतां मनन करावें । सावध होऊनी ॥२९॥

म्हणून मी सांगतो ते नीट ऎकून समजून घे. माया ही मायिक आहे म्हणजे पाहिले तर दिसणारी, न पाहिले तर नसणारी, एवंच अनिर्वचनीय आहे हे आता स्पष्ट झाले, तुझा आक्षेप (ओवी २१) संपला, आता आपण परत मुख्य निरूपणाकडे वळू या. नीट सावधतेनें मनन कर हं ! ॥२९॥

मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माया नासे ॥
मायेकरितां लाभ असे । परमार्थस्वरुपाचा ॥३०॥

(२०व्या ओवीतला ओघ परत सुरु झाला आहे) मायेमुळे म्हणजे मीपणाच्या जाणिवेमुळे माया अर्थात ही सर्व दृश्यादृश्य सृष्टी दिसते. ही जाणीव नसता म्हणजे मायेमुळेच ती नष्ट होते. परमसुखमय अशा स्वस्वरूपाची प्राप्ति जी आता व्हावयाची तीही या जाणिवेच्या अभावानेंच अर्थात मायेमुळेच एरवी ते तर नित्यप्राप्तच आहे. ॥३०॥

माया भवसिंधूचें तारूं । माया पाववी पैलतारू ॥
मायेवीण उद्धारुं । प्राणीयास नाहीं ॥३१॥

या भवसागरात तरून जाऊन त्याच्या पैलतीराला पोहोचण्यासाठी अर्थात मुक्त होण्यासाठी ही माया (आपल्या ब्रह्मत्वाची जाणीव) जणु एक नावच होय. या मायेवाचून प्राणीमात्रांचा उद्धार होणे शक्यच नाही. माया केवळ बंधनात्मकच आहे असे नव्हे तर या दृष्टिकोनातून ती उपकारकही ठरते. ॥३१॥ (तारूं = नाव, होडी)

मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ॥
मायेकरितां जीवनमुक्त । होती स्वानुभवें ॥३२॥

या मूळ जाणिवेमुळेच सर्व निर्मिती असल्याने देवभक्तांचा प्रेमसोहळा, ज्ञानी व त्यांची विरक्तता इ. सर्व विविधतः तिच्यामुळेच संभवते. मायेमुळेच अनुभव येणे शक्य होत असल्याने मीपणविरहित स्वरूपानुभवाने विलसणारे जीवन्मुक्तहि मायेमुळेच होत असते असे म्हणावे लागते. ॥३२॥

मायेकरितां वेदश्रुति । मायेकरितां नाना वित्पत्ति ॥
मायेकरिता होती । मूढ ते विवेकी ॥३३॥

द्रष्ट्या ऋषींना वेदश्रुतीचें ज्ञान मायेमुळेच - या जाणिवेमुळेच - उत्स्फूर्त झाले. तिच्यामुळेच नानातऱ्हेची शास्त्रव्युत्पत्ति पंडितांना होऊ शकते. जडबुद्धीच्याहि लोकांना या मायेच्या कृपेनेच आत्मानात्मविवेक शक्य होतो. ॥३३॥ (वित्पत्ति = व्युत्पत्ति, पारंगतता)

माया परमार्थाचे अंजन । मायेकरितां जोडे निधान ॥
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥३४॥

या मायारूपी अंजनाने परमार्थ दिसू लागतो, त्याचे आकलन होते. स्वस्वरूपाचा अमूल्य गुप्त ठेवा मायेमुळेच गवसणे शक्य होते. कारण तिला भिऊन परंतु तिच्याच आधाराने साधक स्वरूपसुखाच्या प्राप्तीविषयी साक्षेपी, दक्ष होतो. ॥३४॥ (निधान - गुप्त ठेवा, अंजन = एरवी जे न दिसणारे ते दाखविणारे औषध)

मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ॥
मायेकरितां विघडे । प्रपंचभान ॥३५॥

'मी जीव' ही विपरीत भावना मूळ जाणिवेने नष्ट होऊन, प्रपंचाविषयीच्या आस्तिक्यबुद्धीची अर्थात 'मी माझे' या आसक्तीची घडी विस्कटते, नष्ट होते. या प्रमाणे सर्व बंध निर्मूल होत असल्याने मायेमुळेच स्वहित साधते हे आता स्पष्ट झाले. ॥३५॥ (भ्रांति = एक असून दुसरेच आहेसे वाटणे)

मायेवीण ज्ञान कैचें । माया जीवन सकळ जीवांचे ॥
मायेवीण साधकांचें । कार्य न चलें ॥३६॥

जाणिवेच्या अभावी ज्ञान कोठले? प्राणिमात्रांचा सर्व व्यवहार जाणिवेवरच आधारलेला असल्याने तेच जगण्याचे खरे साधन होय. तद्वतच साधकाचे ध्येयसिद्धिचे कार्य सिद्ध करण्याचे कर्मही या जाणिवेशिवाय होणार नाही. ॥३६॥ (जीवन = जगण्याचे साधन)

मायेवीण परमार्थ जोडे । हें ऎसें कईच न घडे ॥
मायेवीण सहसा नातुडे । गुज योगियांचे ॥३७॥

माया - जाणीव नसती तर परमार्थ प्राप्ति होणे कधीहि शक्य झाले नसते. योगी - स्वानुभवी यांच्या अंतःकरणातील निज तृप्तीचा शब्दाने पूर्णतया प्रगट करता न येणारा, गुह्य भावहि माया नसती तर मुमुक्षूंना कधीहि लाभला नसता. ॥३७॥

माया योगियांची माउली । जेथील तेथें नेऊन घाली ॥
कृपाळूपणें नाथिलि । आपण होये ॥३८॥

हिचा उपकार किती म्हणून सांगावा बरे ! ऎक्यतेचा योग साधु इच्छिणाऱ्या आम्हा योगियांची ही केवळ माउलीच होय ! हिच्याच कृपेने स्वरूपप्राप्ति शक्य होते. ही नष्ट झाल्यावाचून स्वरूप प्राप्ति नाही आणि हिला नष्ट करण्याचा प्रत्येक प्रयत्न हिचेच - मीपणाचे - बळ वाढवित असतो. म्हणून (स्वरूपप्राप्तिसाठी) कृपाळूपणानें ही स्वतःच नाहीशी होऊन साधकाचा विवेकमार्ग मोकळा करून देते. ॥३८॥ (नाथिली = नाहीशी, मिथ्या)

सकळ मायेचें स्वरूप जालें । त्यांत तुझेंहि स्वरूप आलें ॥
हें इतुकेंहि आपुलें । नको मानूं सर्वथा ॥३९॥

याप्रमाणे हे मायेचे वर्णन झाले. त्यातच तुझेही रूप - तुझे मीपण - आले. तुझ्या ध्यानात आलेच असेल की, हे सर्व शाश्वत टिकणारे नाही. म्हणून आता तू याला आपले कधीच मानू नकोस. ॥३९॥

आतां सांगतों तुज खूण । तुंवां नाशिवंत केलें मदार्पण ॥
आतां करीसी आळकेपण । तरी मज शब्द नाहीं ॥४०॥

आता वर्म सांगतो ते नीट ऎक. वचन दिल्याप्रमाणे हे सर्व नाशिवंत मला अर्पण करण्याच्या मिषाने, तू पूर्वीच टाकिले आहेस. आता याचा जरासा सुद्धा अभिलाष धरशील तर मग मात्र तुला स्वरूपप्राप्ति करून देण्याविषयी मी जबाबदार राहणार नाही हे ध्यानात ठेव. ॥४०॥ (आळकेपण = अभिलाष)

संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ॥
म्हणोनि संगनिःसंगातीत । हो‌उनी राहे ॥४१॥

शारीरिक वा मानसिक कसलेहि साहचर्य नाशिवंतच होय. निःसंग हा शब्दही शाश्वत नाही. म्हणून तू आता संग आणि निःसंग या दोहोंपासून अलिप्त राहा, त्यांचा अभिलाष धरू नकोस. ॥४१॥ (संग = साहचर्य)

आतां पुढील निरूपण । आदरें करावें श्रवण ॥
संगातीत होइजेल ते खूण । सांगिजेल पुढें ॥४२॥

संगातीत व्हायचे कसे त्याचे वर्म आता पुढल्या समासात सांगू. ते श्रद्धापूर्वक लक्ष देऊन श्रवण कर. ॥४२॥

इति श्रीआत्माराम । रामदासीं विश्रामधाम ॥
योगी पावती विश्राम । जये ठाई ॥४३॥

याप्रमाणे रामदास्यांचे - मुमुक्षूंचे - केवळ माहेरघरच असलेल्या या आत्माराम ग्रंथाचा दुसरा समास सांगून झाला. येथे योग्यांना सुद्धा पूर्ण समाधान लाभेल. ॥४३॥ (विश्रामधाम = विश्रांतीचे माहेरघर, विश्राम = पूर्ण समाधान, तृप्ति)

समास दुसरा संपूर्ण

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel