ब्रह्मनिरूपण

या समासात ओवी १-६ पूर्वसमासातल्या (२।४२) ओवींशी संबंधित संगनिःसंगातीत होण्याची खूण सांगून, ७-१५ आत्मस्वरूप कसे बृहत्, निर्मल, परिपूर्ण, दूर-जवळ, आत-बाहेर, अचल, अदाह्य, अक्लेद्य, अस्तेय, कल्पांतीहि अक्षुण्ण आहे याचे सूक्ष्म निरूपण आहे. ओवी १७-२१ पुन्हा मायावर्णन करून, २२-२६ अहंकाराचा पराक्रम सांगितला आहे. ओवी २७-३३ मायातीत कसे व्हावे याचे वर्म सांगून, ३४ मध्ये प्रत्यक्ष स्वरूपनिर्देष आहे. ओवी ३५ मध्ये त्याच्या प्राप्तिसाठी साधनाची आवश्यकता आहे असे प्रतिपादून ३६ मध्ये पुढल्या समासाचा उपोद्‌घात केला आहे.

संग तितुका नाशिवंत । सांडून राहावें निवांत ॥
येकपणाचाहि अंत । जालियां समाधान ॥१॥

(दुसऱ्या समासातील ४२ व्या ओवीत म्हटल्याप्रमाणे संगातीत होण्याचा मार्ग सांगतात.) जेव्हढा म्हणून संग आहे - ज्याची ज्याची मनाला ओढ लागते - तो सर्व मायिक अथवा नाशिवंत असल्याने त्याचा त्याग करून शांत राहावे. अशा प्रकारे एकांताचा अनुभव घेता घेता त्या एकटेपणाच्या जाणिवेचाहि लय झाला म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होते. ॥१॥ (बाह्यसंग हाहि मनामुळेच होत असल्याने त्याचे निराळे वर्णन येथे केलेले नाही आहे.)

येकपणाचा उमस । काढितां, त्रिपुटी सावकास ॥
होत आहे, म्हणोनी व्यास । येकपणाचा नसो ॥२॥

या एकत्वाचा केवळ 'अहं' या प्रत्ययाचा जो आवेग असतो त्याचे मुद्दाम निराकरण करू गेले असता, कर्ता, कार्य व क्रिया अशी त्रिपुटी नकळत उत्पन्न होते. तात्पर्य मी पणा काढू गेले असता उलट मी पणच वाढत जाते. म्हणून उत्तम मार्ग म्हणजे मीपणाच्या वृत्तीचा ध्यासच लागू नये. तिची जाणीवच होऊ नये. ॥२॥ (उमस = आवेग, स्फूर्ति; सावकास = स अवकाश = काही काळाने, सहजच, नकळत)

तो मी आत्मा ऎसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं ॥
उन्मनी अवस्थेचा प्रांतु । तें स्वरूप तुझें ॥३॥

शिष्य म्हणतो, "याला उपाय म्हणजे अहं ब्रह्मास्मि - तो आत्मा मीच होय - ही जाणीव". तर याला सद्‌गुरु सांगतात, "ही ही जाणीवच असल्याने नाशिवंतच होय. ती सुद्धा तू सोडली पाहिजेस. ब्रह्मत्वाच्या अनुभवाच्या वेळी, अत्यंत सूक्ष्म का होईना, जाणीव ही असतेच, तिच्यावाचून अनुभव येणेच शक्य नाही. तिचाहि निःशेष लय झाल्यावर जी निरालंब, मनातीत, अवर्णनीय अशी परमशांत स्थिती उरते, तेच तुझे सत्यस्वरूप होय. ॥३॥ (हेतू = जाणीव, उन्मनी = मनातीत, प्रांत = स्थिती)

ऎसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामध्यें आला ॥
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥४॥

एवढेच नव्हे तर या मनातीत निरतिशय शान्तीचाहि जो अनुभव येतो तो अर्थातच जाणिवेच्या सूक्ष्मतम अस्तित्वामुळेच, जाणिवेच्याहि जाणिवेनेच. हा कितीहि सुखमय वाटत असला तरी तोही नाशिवंतच होय. । हा अनुभवाचा रसास्वादहि ज्याला समजला तो अनुभवातीत असा आत्मा होय आणि तूच तो आहेस. ॥४॥

हेंहि न घडे बोलणें । आतां पाऱ्हेरा किती देणें ॥
वेद शास्त्रें पुराणें । तेंहि नासोनि जाती ॥५॥

बाळा ! या अनुभवातीत आत्मरामाची ओळख शब्दांनी ती किती करून देऊ बरें । वेद, शास्त्रे, पुराणें, जी याच्या वर्णनाकरिताचा अस्तित्वात आली, तीही शेवटी, याचे वर्णन करता करता थकून गप्प बसली. त्यांनाहि या स्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन शब्दांनी पूर्णतया करता आले नाही. ॥५॥ (पाऱ्हेरा = शाब्दिक ओळख)

ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ॥
ये मायेचा स्पर्श जाला । नाहींच तयासी ॥६॥

अध्यात्मिक ग्रंथ जितके काही या स्वरूपाबाबत सांगतात तें सर्व केवळ दोषमात्रच होय. शाखाचंद्रन्यायाप्रमाणे आत्मस्वरूप त्याहून वेगळे रहाते. असल्या वर्णनाने ते प्रत्यक्ष दाखविता येत नसून केवळ लक्षित मात्र होते. तात्पर्य ग्रंथांची ही शाब्दिक माया, ते मायातीत असल्याने त्याला स्पर्शू शकत नाही. ॥६॥ (स्पर्श करणे = हेच ते म्हणून बोट ठेवून प्रत्यक्ष दाखविणे)

स्वरूप निर्मळ आणि निघोंट । स्वरूप सेवटचा सेवट ॥
जिकडे पहावें तिकडे नीट । सन्मुखचि आहे ॥७॥

स्वरूप मलरहित - जाणिवेला न कळणारे - असले तरी ते परिपूर्ण घनदाट आहे. सर्व दृश्यादृश्य व्यवहाराचा शेवट जाणिवेत होतो व या जाणिवेचाहि शेवट - अंत झाल्याने अनुभवातीत असा अनुभव येतो. याप्रमाणे संहारणीने म्हणजे व्यतिरेकाने त्याचा एकदा साक्षात्कार झाल्यानंतर उभारणीने म्हणजे अन्वयाने पाहू जाता जिकडे तिकडे सर्वत्र सर्वदा तेच ते एकमेव भरलेले आहे हे प्रत्यक्ष स्पष्ट होते. ॥७॥ (अहं स्फूर्ति हाच मल, निर्घोट = घनदाट, ओतप्रोत, परिपूर्ण सन्मुख होणे = स्पष्ट होणे)

जें बहु दुरीचा दुरी । जे निकटचि जवळीं अंतरीं ॥
दुरी आणि अभ्यांतरीं । संदेहचि नाहीं ॥८॥

त्या स्वरूपाचे अस्तित्व इतके परिपूर्ण आहे की अत्यंत दूरवर वा अतिशय जवळहि तेच ते असल्याची जाणीव स्पष्ट होते; इतकेच काय तर या जाणिवेचेहि स्वरूप मूलतः तेच ते असल्याने जेथे जेथे आतबाहेर, कुठेहि पाहू तेथे तेथे एकमेव केवळ त्याचाच साक्षात्कार निस्संदेहाने होत असतो. मीपणाचा मळ गेल्यावर ही जाणीव इतकी मृदु, सूक्ष्मतम पारदर्शक होते की आतबाहेर प्रत्येक अणूरेणूतून त्याचाच साक्षात्कार होतो; इतका की आपणही पूर्णतः तेच ते असल्याचा निःशंक स्वानुभव येतो. ॥८॥

जें सकळांपरीस मोठें । जेथें हें सकळही आटे॥
अकस्मात येकसरें तुटे । मूळ मायेचें ॥९॥

सर्वत्र एकमेव त्याचेंच दर्शन होत असल्याने, मग 'मी तो सर्व' अशी नेहमीची सकळपणाची - अनेकत्वाची - भिन्न भावनाहि नाश पावते. दुसरे म्हणून दाखविता येणारे काहीच नाहे हे आता पटल्याने एकत्वाची जाणीवहि शेवटी विरून जाते. त्यामुळे मायेंचे मूळ अशी जी अहं प्रत्यग्वृत्ति तीही अकस्मात विरून जाते. ॥९॥ (आटे = विरते)

जे सकळाहून मृद कोंवळे । जें सकळांहून अत्यंत जवळे ॥
जें सकळांमध्यें, परी निराळें । अलिप्तपणें ॥१०॥

जर स्वरूपाचा अनुभवच इतका सूक्ष्मतर, प्रसन्नमय, कोंवळा, लुसलुशीत, हवाहवासा, सुखद वाटतो; तर ते स्वरूप त्याहून किती तरी सूक्ष्मतम, आल्हादायक असेल बरे ! या स्वानुभवाहुनहि ते अतिशय जवळ आहे, इतके की ते प्रत्यक्ष आपणच आहोत ! या सकळ सृष्टीमध्येहि तेच ते आहे; परंतु या सकळपणाचा, अनेकत्वाच्या भावनेचा मात्र त्याला स्पर्श होत नाही. अर्थात अनेकत्वापासून ते अलिप्त आहे. ॥१०॥ (मृद = प्रसन्नमय, सूक्ष्म, सुखद)

जें हाले ना चाले । जे बोले ना डोले ॥
आवघें आपणचि संचलें । येकलें येकटचि तें ॥११॥

'येथे आहे, तेथे नाही' अशी स्थिती नसलेले, परिपूर्ण असे ते स्वरूप असल्याने त्यात यत्किंचतहि हालचाल संभवत नाही. त्यात दुसरेपणाची भावनाच नसल्याने सांगणे - वागणेहि घडत नाही. सर्वत्र तेच ते एकमेव, एकत्वहि गिळून, त्याच्यातच तन्मयतेने समरसून विरजत आहे. ॥११॥ (संचले = परिपूर्ण समरसले)

जें आकाशासबाह्य भरलें । आणि आकाश जेथें मुरालें ॥
आकाश मुरोनिया उरलें । येकजिनसी आपण ॥१२॥

पंचमहाभूतात अती सूक्ष्म म्हणूनच सर्वात व्यापक असे जे आकाशतत्त्व, त्याच्याहि अंतर्बाह्य, त्याहूनहि अत्यंत सूक्ष्म असे ते स्वरूप भरलेले आहे. आकाशही जेथे आकाशत्वाने - वेगळेपणाने राहू शकत नाही असे हे स्वरूप असल्याने, सर्वत्र केवळ तेच ते एकटे एकच विराजमान आहे. ॥१२॥

जें जळे ना ढळे । अग्निमध्यें न जळे ॥
जे चळत्यामध्यें, परी न कळे । उदकीं बुडेना ॥१३॥

वायू चलनवलन करतो; पण त्यातले अस्तित्व मात्र जे स्वरूप, ते काही चळतवळत नाही. अग्नी इतरांस जाळून स्वतःहि विझतो; परंतु त्यातले स्वरूपभूत अस्तित्व मात्र जळत-विझत नाही. जलात असूनही ते अस्तित्व स्वरूप जलमय होत नाही. त्याचप्रमाणे पृथ्वीत्वाच्या विकारी पदार्थातही तेच असते परंतु त्याला - त्या अस्तित्वाला धक्का लागत नाही. तात्पर्य, सर्वहि पंचमहाभूतात हे अस्तित्वस्वरूप ओतप्रोत भरलेले असूनही त्यांच्या गुणांपासून पूर्णपणे अलिप्त आहे. ॥१३॥ (चळत्यामध्यें = विकारी पदार्थांत)

जयास कोणीच नेईना । चोरूं जाता चोरवेना ॥
कल्पांत जाला तरी वेंचेना । अनुमात्र ॥१४॥

केवळ अस्तित्वमय असे स्वरूप असल्याने, त्यास कोणीच नेऊ वा चोरू शकत नाही; कारण कर्त्यात वस्तूत व वस्तूच्या अभावातहि अस्तित्व हे असतेच. त्यामुळे कल्पांती महाप्रलयात सर्वांचाहि नाश झाला तरी या अस्तित्वात अणुमात्रहि कमी अधिक होणे शक्य नाही. ॥१४॥

जें ज्ञानचक्षीं लक्षिलें नव जाये । जेथे आकार भस्मोनी जाये ॥
सांगितले ते साकार होये । म्हणोनि सांगणे न घडे ॥१५॥

ज्ञानरूपी डोळा इतर सर्व पाहू शकेल पण त्याचे स्वतःचे अस्तित्व मात्र त्याला उमगत नाही. कारण येथे रूप आणि त्याचे ज्ञान, ही दोन्ही शिल्लक रहात नाहीत. ज्याचें वर्णन म्हणून करता येते ते सर्व साकार अर्थात नाशिवंत होय. तात्पर्य, या अविनाशी निराकारस्वरूपाचे प्रत्यक्ष वर्णन पूर्णपणे करता येत नाही. ॥१५॥

ऎसें जरी न बोलावें । तरी म्यां काये करावें ॥
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥१६॥

निर्विकार निर्गुण अशा आत्मस्वरूपाबाबत बोलताना मला अशी सुकृतदर्शनी परस्परविरोधी वाटणारी भाषा बोलावी लागते. पण काय करणार? जर बोललोच नाही तर तुला तरी त्याचे आकलन कसे बरे होणार? ॥१६॥

अरे बोलणें तितुके वेर्थ जातें । परी बोलतां बोलतां अनुभवा येते ॥
अनुभव सोडितां, तें । आपणचि होईजे ॥१७॥

अरे बाळा ! शाब्दिक बोलणें हे अपूर्ण व नाशिवंत आहे हे खरेच; परंतु अशी चर्चा करता करताच त्या शब्दामागचा माझा भाव अकस्मात तुझ्या अनुभवाला येऊ शकेल आणि मग त्या अनुभवाला सोडल्यावर जो अनुभव उरेल तेच आपले सत्यस्वरूप होय. ॥१७॥

मायारूप मूळ तयाचें । शोधीन म्हणता समाधान कैचें ॥
'मज लाभ झाला'या सुखाचें । मूळ तुटे ॥१८॥

कारण की त्या अनुभवाचे रूपहि मायामयच असणार. अनुभव, अनुभाव्य, अनुभविता अशी त्रिपुटी तेथे उत्पन्न होत असल्याने या अनुभवाच्या मागे लागण्यात - त्याच्या संशोधनात - शाश्वत समाधान कसे मिळणार बरे? म्हणून निरपेक्ष, शाश्वत समाधानाच्या प्राप्तीसाठी वरील त्रिपुटीमय अनुभाव्य सुखाचे मूळ तोडलेच पाहिजे, त्याचाहि त्याग केला पाहिजे. ॥१८॥ (मूळ तोडणे = नाश करणे)

'अहंब्रह्मास्मि' हा गाथा । आला देहबुधीचिया माथा ।
देहबुधीनें परमार्था । कानकोंडे होईजे ॥१९॥

'मी ब्रह्म आहे' हा अनुभव; जरी याचे कितीहि गोडवे गाइले तरी मीपणावरच आधारित असल्याने, तेथे हा अत्यंत सूक्ष्म असा जाणीवमय महाकारणदेहहि आहेच. कशीहि झाली तरी ही देहबुद्धीच - अहंकारच - या 'अहं' काराने खऱ्या स्वरूपप्राप्तीस मात्र मुकावे लागते. ॥१९॥ (कानकोंडे होणे = मुकावे लागणे)

देहबुधी हे टाकावी । हेहि मायेची उठाठेवी ॥
म्हणोनी काय अंगीकारावी ? । अंगीकारूं नये ॥२०॥

या अहंकारास टाकण्याची धडपड हाहि त्या अहंकाराचाच एक भाग. तात्पर्य, उपाय करू गेल्यास अपायच होणे शक्य. कारण हा सर्व मायेचाच खेळ होय. आता जर तू असे म्हणशील की अहंबुद्धी सोडूच नये तर असे मात्र नव्हे. हिच्या आहारी कधीहि न जाणेच योग्य होय. ॥२०॥

मायेच्या बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ॥
मायाचि गोंवी, आणि बंधन । तोडी, तेही माया ॥२१॥

पूर्वीच (समास २।३६) सांगितल्याप्रमाणे या मायेच्या कृपेनेच ब्रह्मज्ञ होणे शक्य आहे आणि ज्ञानान्त समाधानहि अर्थातच तिच्यामुळेच होणार. म्हणून बंधनात (मी-माझे) गुंतविणारी मायाच आणि बंधन तोडणारीहि (मी ब्रह्म) मायाच. ॥२१॥

माया आपणास आपण गोंवी । आपणास आपण वेढां लावी ॥
प्राणी दुखवती जीवीं । अभिमानें करूनि ॥२२॥

पूर्वी (समास २।२०) सांगितल्यानुसार मायाच मायेकरवी सर्व काही करीत असते. ही माया (ममत्व) स्वतःस गुंतवून घेते व ममत्वानेच हळूहळू ममत्वाचे वेढे वाढत जातात. असे असून 'मी बद्ध झालो' अशा तऱ्हेचे दुःख जे सर्व प्राण्यांना होते त्यास कारण या ममत्वाचा अभिमान ते घेतात हेच होय. ॥२२॥

जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मागोन आणिती ॥
खेळों बैसता वांटून घेती । आपुल्याला ॥२३॥

सारीपाटाचा खेळ खेळताना कोणाच्या तरी सोंगट्या मागून आणून प्रत्येक भिडू 'माझ्या ह्या' म्हणून वाटून घेऊन, नंतर खेळावयास बसतात. ॥२३॥

नसताचि अभिमान मायां । सारी मरता परम वेथा ॥
डाव येतां सुखस्वार्था । दोघेहि पडिले ॥२४॥

या 'माझ्याच' सोंगट्या असा खोटा अभिमान धरून (खेळाडू) खेळात सोंगटी मेल्याने फार दुःखी होतात, किंवा जिंकून हर्षाने फुलतात. इतकेच नव्हे तर आपापल्या डावाच्या वेळेस सोंगटी जिंकावी म्हणून इरेस पडतात. ॥२४॥

फांसयास दे दे म्हणती । येक ते चिरडी येती ॥
क्रोधां पेटल्या घेती । जीव येकमेकाचा ॥२५॥

(ते खेळाडू) इरेस पडून, जिंकण्यास पाहिजे असलेले दान निर्जीव फाश्यांकडे मागतात. ते न पडले तर चिडतात. इर्षेने संतप्त होऊन कधी कधी एकमेकांचा जीवही घेतात. तात्पर्य ज्या मुळातच आपल्या नाहीत, त्या सोंगट्या आपल्याच आहेत असा खोटाच अभिमान घेतल्याने त्यांना सुखदुःख , चिडाचीड, हाणामारी इ. सर्व भोगावे लागते. ॥२५॥

तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ॥
अभिमान वाहाती शिरीं । देहपांग प्रपंचाचा ॥२६॥

त्याचप्रमाणे या संसारखेळातील, मायेच्या सोंगट्याच जशा अशा स्त्री, पुत्र, कन्या इ. 'माझ्या माझ्या' म्हणून (खोटा अभिमान धरून), त्यांची जबाबदारी स्वीकारून या व्यवहारातले सुखदुःख बहुतेकजण भोगीत असतात. ॥२६॥ (देहपांग = सुखदुःखादि भोग)

येवं इतुकी वेढा लाविली । ते माया खेळे येकली ॥
ते मायेनेंच वारिली । पाहिजे माया ॥२७॥

याप्रमाणे सर्वजण या ममतेत - मायेत गुरफटले गेले आहेत. प्रपंचाचा हा सर्व खेळ ती मायाच एकटी खेळत आहे; असा विवेक करून, तिचे (अहंममतेचे) निराकारण मायेनेच (अहंब्रह्मास्मि जाणिवेनेच) केले पाहिजे. तिच्या एका अविष्काराचे निर्मूलन तिच्याच दुसऱ्या अविष्काराने, काट्यानेच काटा काढतात त्याप्रमाणे केले पाहिजे. ॥२७॥

ते माया तोडितां आधीक जडे । म्हणोनी धरिती ते वेडे ॥
धरिता सोडितां ते नातुडे । वर्म कळल्यावांचुनि ॥२८॥

हे ममत्व (माया) तोडू जाता, 'मी तोडली' असे मी पण (मायाच) वाढत जाते, उपायाचा अपायच होतो. तात्पर्य, मायेचा अंगीकार वा त्याग करणे हे तिचे वर्म (रूप) कळल्यावाचून शक्य नाही. असे जरी असले तरी जे हिच्यातच (मायेतच) जास्त जास्त गुरफटत जातील ते वेडेच होत. ॥२८॥

जैसें चक्रविहूचे उगवणें । बाहेर येउनी आंत जाणें ॥
कां भीतरीं जाउनी येणें । अकस्मात बाहेरी ॥२९॥

ज्याप्रमाणे चक्रव्यूहाला फोडावयाचे असल्यास बाहेरून आत जाणे व आतून बाहेर येणे अशा चक्राकारच फेऱ्या विलक्षण गतीने कराव्या लागतात. ॥२९॥

कां त्या कोबाडीयांच्या कडीया । गुंतगुंतोनी उगवाव्या ॥
तैसी जाण हे माया । गुंतोनि उगवावी ॥३०॥

ज्याप्रमाणे कड्यांच्या गुंतावळ्यातील कड्या परत परत एकमेकांत गुंतवून सोडवाव्या लागतात, त्याचप्रमाणे या मायेतून सुटण्यासाठी तिच्यात आधी गुंतणे जरूर आहे. तात्पर्य, मायेचे वर्म कळण्यासाठी तिचा अनुभव घेणे आवश्यक आहे. ॥३०॥

माया झाडितां कैसी झाडावी । तोडून कैसी टाकावी ॥
येथें विचारें पाहावी । नाथिलीच हे ॥३१॥

माया हा काही एखादा पदार्थ नव्हे की तिला झाडून दूर सारता येईल किंवा तोडून फोडून टाकून देता येईल. हे शक्य नाही कारण 'माया आपुली कल्पना' म्हणून विवेकाने तिच्याकडे पाहिले तर मात्र ही वितळून जाईल, न असलेली अशीच आढळेल. ॥३१॥ (नाथिली = न असणारी, मिथ्या)

बहू नाटकी हे माया । मीपणें न जाये विलया ॥
विवेकें पाहतां देहीं या । ठावोचि नाहीं ॥३२॥

ही माया अतिशय लाघवी आहे. अहंकाराने प्रयत्न करूनहि तिचा नाश होणार नाही. कारण अहंकार (मीपण) हीहि मायाच ! मात्र विवेकाने पाहिले असता आपल्या देहात मीपण नावाच्या एकाही वस्तूचा (मायेचा) ठावठिकाणा सापडत नाही. 'या मा सा माया !' जी नाही तिचा मागमूस तरी कसा लावावा बरे ! ॥३२॥

वर्म हेंचि माया माईक । याचा करावा विवेक ॥
विवेक केलियां, अनेक । येकीं मुरे ॥३३॥

माया ही मायिकमात्र आहे. कल्पना ही केव्हाहि काल्पनिकच होय. हेच तिचे वर्म होय. आत्मानात्माविवेकाने अनेकविध भासणारी ही माया एकत्वात अर्थात स्वरूपात विलीन होते. ॥३३॥

येकीं अनेक आटलें । येकपण अनेकासवें गेलें ॥
उपरी जें निःसंग उरलें । तेंचि स्वरूप तुझें ॥३४॥

एकत्व व अनेकत्व ह्या कल्पना परस्परसापेक्ष होत. जेथे कल्पनाच विराम पावली तेथे हे अनेकत्व व ते ज्यात मुरते ते एकत्वहि शिल्लक उरत नाही. 'कल्पनेने कल्पना सरे !' अहं या कल्पनेचा मूळ विवेकहि जेव्हा झालेला नसतो तेव्हा जे निःसंग निर्विकार असे उरते तेच तुझे स्वरूप होय. ॥३४॥

तुझे स्वरूप तुजचि न कळे । तें जया साधनें आकळे ॥
तें साधन ऎक, सोहळे । भोगिसी स्वानंदाचे ॥३५॥

असे नुसते म्हटल्याने काही तुला स्वरूपाचे आकलन झाले नाही, खरे ना हे? बाबा रे ! त्याला साधन पाहिजे. ज्या साधनाने स्वरूपप्राप्तीच्या स्वानंदाचे सोहळे तू भोगू शकशील ते साधन सांगतो, ऎक ! ॥३५॥

इति श्रीआत्माराम । सांगेल पुढील साधनवर्म ॥
जेणें भिन्नत्वाचा भ्रम । तुटोन जायें ॥३६॥

याप्रमाणे या आत्माराम ग्रंथाचा तिसरा समास सांगून झाला. ज्यायोगे भिनत्त्वाचा भ्रम नष्ट होईल ते साधन आता पुढल्या समासात सांगण्यात येईल. ॥३६॥

समास तिसरा संपूर्ण

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel