सत्यजीत भारत
(नवीन पनवेल)
७२०८७८९१०४

आपल्या समाज व्यवस्थेवरील सर्वात मोठा कलंक म्हणजे 'जात'. या जातीव्यवस्थेने माणसाला माणसापासून दुरावल. जात म्हणजे विषमतेच बीज. असं म्हणतात की जात नाही ती जात. या उक्तीवर सर्वांचा दांडगा विश्वास आहे. हे खरं सुद्धा आहे. पण माझ्या पाहण्यात आलेली एक घटना काही वेगळच सांगून जाते. काय बर सांगून जाते ? ‘जात’ जाते होsss...

वसिष्ठांच कुटुंब म्हणजे सोवळ्यातल. त्यांना आपल्या जातीचा अभिमान फार. निम्न वर्गाकडे खूपच हीन भावनेने पाहत. त्यांच्या मते निम्न वर्गीय लोकांकडे काडीचाही टॅलेंट नसतो. त्यांच्या नशिबी आलेलं हिणकस जीवन हे त्यांचं प्रारब्धच. त्याला कोणीही बदलू शकत नाही. त्यांच्याकडे जर कोणी महार, मांग वा चांभाराचा व्यक्ती आला तर त्याला ओसरीच्या बाहेर दूर उभं राहूनच आपलं म्हणण सांगावं लागे. एखाद्यान पाणी मागितलं तर त्याला एक वेगळ्या भांड्यातुन पाणी वरून ओतलं जात. ही परंपरा वसिष्ठ घराण्यातील सर्वच जण पाळतील याची दक्षता घरातील जेष्ठ म्हणून वसिष्ठ आण्णा घेत.

 पण वशिष्ट घरातील तिसऱ्या पिढीसाठी जातीव्यवस्था ही फोल आहे. हर्षद तर लहानपणापासूनच विद्रोही व्यक्तिमत्वाचा. तो तर त्याचा मित्र कांबळे याच्या घरी जाऊन जेवण करायचा. एकदा तर तो आपल्या काही मित्रांना देवघरात घेऊन गेला होता. तेव्हा तर बराच आगडोंब झाला. तेव्हा तर अण्णांनी घरातील पितळेच्या देवांना पंचगंगेचा अभिषेक करून शुद्ध केलं. एकाव्वण ब्राह्मणांना भोजन व दान केलं. तेव्हा जाऊन कुठे घरचे देव शांत झाले.

आज हर्षद मुंबईत राहतो. लहानपणापासून अभ्यासात कच्चा असल्यामुळे काही चांगली नोकरी नाही मिळाली. पण तो मेहनती खूप. आधी दुसऱ्याची रिक्षा चालवायचा आज स्वतःची रिक्षा आहे. साबळे नगरातील दहा बाय पंधराच्या एका झोपड्यात त्याच बिऱ्हाङ राहत. आण्णांच स्वप्न होतं हर्षदनं पायलट बनावं. उंच उंच आकाशी भिडाव..अण्णांचे स्वप्न काही पूर्ण झालं नाही.

मरणाच्या अगोदर आपल्या लाडक्या नातु हर्षदला भेटावसं असं मधून मधून अण्णांना वाटे. आज अण्णा व माई हर्षदला भेटण्यासाठी प्रथमच मुंबईत आले. फारच खूश होते ते. पण जेव्हा हर्षद त्यांना आपल्या ऑटो मध्ये बसवून साबळे नगरच्या झोपडपट्टीत घेऊन आला तेव्हा अण्णांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.अण्णांकडे बघून हसावं की रडावं कळत नव्हतं. पण माई पदराआङून  गालातल्या गालात हसत. मजा तर दुसऱ्या दिवशी सकाळीसकाळी आली. अण्णांना चिनपाट घेऊन सार्वजनिक शौचालयाच्या रांगेत उभ  रहावे लागलं. रांगेमध्ये कुणी मद्रासी तर कुणी भैय्या तर कुणी खाटीक... दुर्गंधीचा तर वारा वाहत होता. अण्णांनी तर एका हातात चिनपाट तर दुसर्‍या हाताने नाक दाबलं. पण सकाळच्या मंद वाऱ्यात त्यांची धोती सुद्धा उडत होती  पण तिला धरायला तिसरा हात नव्हता. गावी वाड्यात पाळलं जाणारं सोवळं मुंबईत पाळता येत नव्हतं. महिन्याभरासाठी आलेले अण्णा दोन दिवसात गावी जायला निघाले पण हर्षद काही जाऊ देईना.

आठवडाभरानं सांजेच्या वेळी एक मुलगा हर्षदच्या घरी आला. गोरागोमटा होता, चांगल्यातले कपडे घातलेला. बाहेर बूट काढून घरात आला. हर्षदने हात मिळवत त्याला मिठी मारली. दिबांग होता तो. हर्षदचा मित्र. परममित्र. त्याला कालच समजल की हर्षदचे अण्णा मुंबईत आलेत म्हणून. त्यांना चहा फराळासाठी बोलवायला आला होता. त्याचं राहणीमान पाहून तर अण्णा सुखावले. दिबांगची चारचाकी गाडी दारात उभी होती. आत येताच त्याने अण्णांना व माईंना वाकून नमस्कार केला व घरी चहा फराळाला येण्याचा आग्रह केला. तसं तर अण्णा कोणाच्या घरचं पाणीसुद्धा पीत नसत पण या गबरू जवान, सुशिक्षित, टापटीप युवकाचं आमंत्रण नाकारणं त्यांना नाही जमलं. माई तर  टूमकन  दिबांगच्या गाडीत बसल्या.

थोड्याच वेळात हर्षद, अण्णा आणि माई रेल्वे कॉलनीत पोहचल्या. पाच मजल्यांच्या बिल्डिंगसमोर गाडी उभी होती. बिल्डिंग मध्ये जाताना तर अण्णांच्या तोंडातून आपसूकच हे उद्गार बाहेर पडले  "अबब किती उंच माडी" . घरात बसल्यावर बाहेरील वातावरणापेक्षा आत मध्ये बराच गारवा आहे हे अण्णांना जाणवल.दिबांगच्या बायकोने  सुद्धा त्याचं हसतमुखाने स्वागत केलं. प्लेटमध्ये पोहे व नानकटाई दिली. अण्णांना नानकटाई खूपच आवडली. माईना इशारा करून काही नानकटाई सोबत घेण्यास सांगितले. हे दिबांगच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. त्याने एक मोठा डबा पॅक करून त्यांना गिफ्ट म्हणून दिला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर निरोप घेतला गेला.

घरी परत आल्यावर अण्णांनी हर्षदला विचारलं हा मोठा माणूस तुझा कसा र मित्र झाला? तू इथे झोपड्यात अन तो तिथं उंच माडीत तू इथं रिक्शा चालवतो अन तो चार चाकी गाडी.

हर्षद उत्तरला दिबांग माझ्या बालपणीचा मित्र. लंगोटीया यार. हे ऐकून तर अण्णा फारच गोंधळले. अण्णांचा प्रश्नार्थक चेहरा पाहून हर्षद स्मित करत म्हणाला " अण्णा, हा दबंग आपल्याच गावचा आहे. लहानपणी आपल्या वाड्यात सुद्धा आला आहे तो. एकदा तर तुम्ही त्याला वेताच्या छडीने बडवलं होतं. मलाबी हाणल होतं अन देव धुतले होते. तुमच्या देवांचा विटाळ ज्याच्यामुळे झाला तोच हा दिबांग. गणू कांबळेचा पोरगा. "  अण्णा अवाक होऊन ऐकत होते.  चेहऱ्यावर राग आश्चर्य यांचा मिलाफ उमटला. शेवटी शब्दातीत भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटला व त्यांनी प्रश्न केला "हा त्या गनू चांभाराचा

प्वार ?"  हर्षद म्हणाला "हो" आजीवन ज्यांच्या घरचं पाणी सुद्धा अण्णा पिले नाहीत आज त्यांच्या  घरीच फराळ करून आले. अण्णांना काय बोलावं काय नाही हे सुद्धा समजेना. केवळ स्तब्ध होते . त्यांच्या डोक्यातील जातिभिमानाची जळमट नष्ट होऊ पाहत होती.

उर्वरित कथा पुढील भागात...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel