(एपिक चॅनल: धर्मक्षेत्र)

कर्ण एपिसोड - भाग 4

निमिष सोनार-    

चित्रगुप्त कर्णावर पुढचा आरोप लावण्याकरता धृतराष्ट्रला बोलायला सांगणार तेवढ्यात दुर्योधन धृतराष्ट्रवर दबाव आणतो. चित्रगुप्त त्याला थांबवतो.

चित्रगुप्त: कर्णाने युद्धात दुर्योधनचा विश्वासघात केला आणि हा आरोप आहे खुद्द धृतराष्ट्राचा! कर्णावर!

दुर्योधन: हा आरोप असत्य आहे. माझ्या वडिलांना काय माहिती युद्धात काय झालं आणि काय नाही?

चित्रगुप्त: दुर्योधन, तू विसरलास का संजयला? ज्याने तुझ्या वडिलांना युद्धाचा सगळा वृत्तांत दिला?

धृतराष्ट्र: युद्धात कर्णाने काहीच कामगिरी केली नाही दुर्योधना! छोट्या मोठ्या सैनिकांना मारायला म्हणून आपण कर्णाला युद्धात थोडेच घेतले होते?  जर नुसते सैनिकांना मारायचे असते तर त्यासाठी गुरु द्रोणाचार्य सुद्धा पुरेसे होते.

धृतराष्ट्र आणि संजय यांचा युद्धाच्या वेळेस होत असलेल्या संवादाचा फ्लॅशबॅक सुरु होतो:

संजय: युद्धात आता कर्ण आणि सहदेव समोरासमोर आलेत.

धृतराष्ट्र: अरे वा!

संजय: कर्णाने सहदेवचे सगळे शस्त्र तोडले.

धृतराष्ट्र: अरे वा! आता काय चालले आहे? सहदेवने हार पत्करली का? कर्णाने त्याला मारले का?

संजय: नाही! अचानक कर्ण सहदेवला काहीही न करता निघून गेला..

धृतराष्ट्र: निघून गेला?

संजय: हो! निघून गेला! आणि जाण्यापूर्वी तो सहदेवला काहीतरी म्हणाला.

धृतराष्ट्र: काय? कदाचित कर्णाने त्याला एक अबोध बालक म्हणून सोडून दिले असेल. एखाद्या अबोध बालकाचा कशासाठी म्हणून वध करायचा बरे?

संजय: कदाचित तसे असेल!

धृतराष्ट्र: आता सांग भीमाचे काय चालले आहे?

संजय: आता कर्ण आणि भीम धनुर्युद्ध खेळत आहेत.

धृतराष्ट्र: काय? भीमाला धनुष्यबाण चालवता येतो?

संजय: माहित नाही. पण भीम जवळपास हरण्याच्या बेतात आहे. भीमाचे धनुष्य कर्णाने एका बाणाने तोडून दूर फेकले.

धृतराष्ट्र: वा! मग तर भीम गेलाच म्हणून समजा!

संजय: महाराज! समोर एक अनपेक्षित घडतंय. भिमाशी अचानक युद्ध करायचे थांबवून कर्ण पुढे निघाला. जाण्यापूर्वी तो भीमाला काहीतरी म्हणाला.

धृतराष्ट्र: अरे? या कर्णाला आज झालंय तरी काय संजया?

संजय: माहित नाही. पण आता कर्ण युधिष्ठिरच्या समोर आला आहे.

धृतराष्ट्र: कळलं आता. त्या दोघांना कर्णाने यासाठी सोडलं असावं की त्याला सरळ सरळ युधिष्ठिरलाच मारायचे असावे.

संजय: कर्ण तेथूनही निघून गेला आणि जातांना युधिष्ठिरला म्हणाला, "माझ्यापुढे तुम्ही कुणी टिकू शकत नाहीत पण तरीही तुम्हाला मी सोडतो आहे आणि त्यासाठी तुझ्या आईला धन्यवाद जरूर दे!"

धृतराष्ट्र आणि संजय यांचा संवादाचा फ्लॅशबॅक समाप्त होतो.

धर्मक्षेत्राच्या दरबारात:

धृतराष्ट्र: मला हे नंतर माहित पडलं होतं की कर्ण कुंतीपुत्र होता. पण कर्णाने जे केलं तो दुर्योधनाचा एक प्रकारे विश्वासघात नाही का?

कुंती: तो विश्वासघात नसून बलिदान होतं!

धृतराष्ट्र: ते कसं काय?

अर्जुन: हे काय माते? कर्ण माझ्या जीवावर उठला होता आणि तुम्ही त्याला चांगले म्हणता? बलिदान म्हणता त्याच्या या कृत्यांना?

कुंती: त्याने त्याच्या मंत्राने भारलेल्या विशिष्ट पाच बाणांवर पाचही पांडवांची नावं लिहूनही टाकली होती. ते बाण असे होते की नावं लिहिली की त्या व्यक्तीचा ते वेध घेणारच. पण नेमकं त्याच वेळेस मी त्याला त्याच्या जीवनाचं रहस्य सांगितलं. मग मी त्याला पांडवांना न मारण्याचं वचन मागितलं.

गांधारी: हे कुंतीचे षडयंत्र होते. पण मला हे सांगा, कर्णाजवळ इंद्रास्त्र होते आणि इंद्र अर्जुनाचे वडील पण अर्जुन कर्णाचा शत्रू! मला सांगा इंद्राचे अस्त्र सूर्यपुत्राजवळ कसे काय आले? सांग कर्ण? हे अस्त्र तुझ्याजवळ कसे आले? आणि अजून एक प्रश्न! तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या कानात कुंडल होते, शरीरावर एक कवच होते! सत्य आहे ना कुंती? काय विशिष्ट शक्ती होती त्या कवचामध्ये? सांग जरा!

कर्ण : कवच अभेद्य होते.

गांधारी: कवच अभेद्य होते आणि तरीही तू युद्ध हरलासच कसा? कुठे गेले ते कवच? बोल ना? ते जर तुझ्याकडे असते तर तुला कुणीही पराजित करू शकले नसते.

कर्ण निरुत्तर होतो, भावनाविवश होतो.

गांधारी: मी सांगते ना! तू ते अर्जुनाच्या वडलांना दिले. आणि त्यांचेकडून इंद्रास्त्र घेतले. बरोबर?

कर्णाचा फ्लॅशबॅक:

इंद्र वेश बदलून सकाळी सकाळी कर्णाला म्हणतो, "मला तुझ्याकडून काहीतरी हवे आहे. देतोस?"

कर्ण, "दिले!"

याचकाच्या वेशातील इंद्र, "बघ बरं! नीट विचार करून हो म्हण! कारण मी अजून वस्तूचे नांव सांगितले नाही, त्याच्या आधीच तू हो म्हणालास!"

कर्ण, "मी माझ्या दारातून कुणाही याचकाला परत पाठवत नाही. त्याला हवे ते देतो."

याचकाच्या वेशातील इंद्र, "मग मला तुझ्या या सफेद कपड्यांमागे लपलेले ते अभेद्य कवच कुंडले दे!"

(कर्ण एपिसोड क्रमशः)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel