भाग पहिला

॥ श्रीगणाधिपतये नमः । श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

श्रीगणतपीला नमस्कार असो. श्रीसरस्वतीला नमस्कार असो. श्रीगुरूंना नमस्कार असो.

मंगलाचरण

१.

ॐनमोजि विश्वतीता । विश्वव्यापका श्रीअनंता ।

परात्परा सद्‍गुरुनाथा । ईश्‍वरनियंता सकळादी ॥१॥

तुमचा अनुग्रहो झालिया । निरसे मोह ममता माया ।

करुनी उपदेशी ब्रह्मया । निजात्मपदीं स्थापिसी ॥२॥

सनकादिकांचें चिंतन । नाम तुमचें अनुसंधान ।

त्यातें स्वरूप स्थिति पाव‍उन । ठेविसी निमग्न निजानंदीं ॥३॥

शुक प्रल्हाद नारद । पावोनियां तुमचा बोध ।

कारिता सदा ब्रह्मानंद । तारिती कीर्तनें आणिकां ॥४॥

निळाह्यणे परमानंदा । परात्परा सच्चिदानंदा ।

सद्‌गुरुराया निजात्माबोधा । कृपेस्तव लाहीज तुमचिये ॥५॥

२.

परात्परा सच्चिदानंदा । परिपूर्णा जी आनंदाकंदा ।

जगदीशा विश्ववंद्या । विश्वव्यापका अनंता ॥१॥

भक्तवत्सला कृपासिंधु । तापत्रयहरणा दीनबंधु ।

तुझ्या नामीं अगाध बोधु । भक्त पावती भाविक ॥२॥

परमपुरुषा गुणातीता । अव्यया अक्षरा जी अव्यक्ता ।

विश्वंमंगळा रुक्मिणी कांता । पुंडलिक वरदा पंढरीशा ॥३॥

निरंजना निर्विकारा । निर्विकल्पा जगदोद्धारा ।

वेदवेदांतसागरा । विश्वंभरा कल्पादि ॥४॥

भावाभावविवर्जिता । सगुणनिर्गुणा गुणातीता ।

निळया स्वामी कृपावंता । चरणीं माथा तुमचिये ॥५॥

३.

अगा ये षड्‌गुण भाग्यवंत । समग्र लक्ष्मीचिया कांता ।

समग्र यशातें तूं धरिता । समग्र ऐश्वर्यता तुज अंगीं ॥१॥

समग्र औदार्य लक्षणीं । समग्र वैराग्याची खाणी ।

समग्र ज्ञानशिरोमणी । समग्र षड्‌गुणी संपन्ना ॥२॥

यशें थोरविला मारुति । बिभीषण केला लंकापती ।

औदार्य देऊनि कर्णा हातीं । कीर्ति दिगांतीं फिरविली ॥३॥

ज्ञानें उपदेशिला चतुरानन । ऐश्‍वर्य वाढविला अर्जुन ।

वैराग्यशुकातें बोधून । ब्रह्म सनातन पावविला ॥४॥

निळा म्हणे इहीं अगाध लक्षणीं । वंद्य सुरासुरां तुं त्रिभुवनीं ।

माझी अलंकारूनियां वाणी । प्रवर्तवावी स्तवनीं आपुलिया ॥५॥

बालक्रीडा

४.

वसुदेव देवकिचिये उदरीं । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं ।

कंसाचिये बंदिशाळे माझारीं । श्रावन कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥

अयोनिसंभव चतुर्भुज । शंख चक्र गदांबुज ।

चहुं करीं आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥

कासे पीतांबर कसिला । कंठीं कौस्तुभ तेजागळा ।

श्रीवत्सलांछन शोभला । माजीं मेखळा जडिताची ॥३॥

मस्तकीं मुगुट रत्‍नखेवणी । रत्‍नमय कुंडलें उभय कर्णी ।

देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसेनि आच्छादूं ॥४॥

देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ ।

सायुधें भूषणें घवघवित । तेजःपुंज निजात्मा ॥५॥

देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुलां नेऊनि लपवा यासी ।

विदित झालिया रायासी । नेदी वांचो य बाळका ॥६॥

निळा म्हणे ऐसी चिंता । आकुळनी ठेला तया उभयतां ।

हें देखोनिया कृष्णनाथा । कळों सरलें हृद्गत ॥७॥

५.

मग बोले मंजुळा उत्तरीं । मज न्या जी गोकुळभितरीं ।

ठेवुनी नंदयशोदेच्या घरीं । तुम्हीं यावें तेच क्षणीं ॥१॥

ऐकोनी तयाचें उत्तर । वसुदेव विस्मित आणि चिंतातुर ।

म्हणे कैसा करावा विचार । बंधनें गोविलें मजलागीं ॥२॥

ऐशिया मोहें त्या कवळित । तंव तुटलीं बंधनें झाला मुक्त ।

म्हणे आतां हा कृष्णनाथ । नेईन गोकुळांत ठेवीन ॥३॥

मग घेऊनियां निज बोधेशीं । आला वसुदेव गोकुळासीं ।

देऊनियां त्या नंदापाशीं । म्हणे हें स्वीकारा बाळक ॥४॥

जन्मलें देवकीचिये उदरीं । परि हें ठेवितां नये घरीं ।

आहे कंसाचें भय थोरी । यालागीं तुम्हां हें कृष्णार्पण ॥५॥

ऐशिया उत्तरीं बोलिला । बाळक त्यापाशीं दिधला ।

उघडोनि नंदें जो पाहिला । तंव तो देखिला चतुर्भुज ॥६॥

निळा म्हणे वोळलें भाग्य । घरां आले पुसत चांग ।

उद्धरावया सात्विक जग । केला वास तया घरीं ॥७॥

६.

कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप ।

भूषणें विराजलीं दिव्य स्वरूप । नंदें पाहिला निज नयनीं ॥१॥

मग यशोदपशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला ।

येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥

वसुदेव सदाचा भिकारी । बंदीं कंसाचिये चिरकाळ वरी ।

बालक सुलक्षण हा निर्धारी । असेल सभाग्या समर्थाचा ॥३॥

येरु म्हणे आहे पोटींचा । आत्मा जिवलगु हा आमुचा ।

नाहीं व आणीला लोकांचा । म्हणोनियां देतों तुम्हांप्रती ॥४॥

येरी म्हणे आमुचें कन्यारत्‍न । याच्या पालटा न्या करा यत्‍न ।

कंसा पुसतांचि तया दाउन । चुकवा अरिष्ट सकळांचें ॥५॥

यावरी कृष्णातें निरवून । वसुदेव निघाला माया घेऊन ।

पुढती बंधनें पावला बंदिखाना । विचित्र विंदान शक्तीचें ॥६॥

श्रीकृष्णदेवेसी अंतरावो । होतांचि प्राप्त झाला मोहो ।

अविद्यायोगें चिंताप्रवाहो । महार्णवीं पडियेला ॥७॥

निळा म्हणे हिताचित । नाठवेहि कांहीं झाला भ्रांत ।

मायदेवाची हा प्रघात । झाला आप्त वसुदेवा ॥८॥

७.

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरीं । वसुदेवातें दैन्य अवदसा वरी ।

मग देवकीजवळी देतां ते कुमरी । महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥

ऐकूनि कंस भयचकित । असुरसैन्यक भयें कांपत ।

सेवक धांवोनि रायातें म्हणत । जन्मला सूत देवकीये ॥२॥

म्हणे हा आमुच्या वंशा । निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥

घेऊनियां मग निशाचरभारा । आला बंदिशाळे सत्वरा ।

सावध करिताती येरयेरां । म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥

भयभीत देवकीतें हांकारी । म्हणें आठवा आणी वो बाहेरी ।

येरी करुणा भाकूनियां भारी । विनवी येवढें तरी वांचवा ॥५॥

ऐसे बोलोनियां सुंदरी । आणोनि दिधली कंसा करीं ।

येरु पाहे तंव ते कुमारी । म्हणे आठवा लपविला ॥६॥

तोहि आणोनिया देईं । येरी म्हणे दुसरें नाहीं ।

झाडा घेरूनियां पाहीं । आण तुझीचि वाहतसे ॥७॥

येरु म्हणे ईतें सोडूं । मग तयाचीहि सूड काढूं ।

निळा म्हणे गर्वारुढू । नेणे मंदाध हरि महिमा ॥८॥

८.

मग चरणीं कवळूनियां करतळें । आफळूं गेला प्रचंड शिळें ।

तंव ते गर्जोनियां अंतराळें । गेली निसटोनी हातींची ॥१॥

घोष गर्जनें बोले गगनीं । असुरा कंसा ऐकेंरे कानीं ।

तुझिया निर्मुळा लागुनी । चक्रपाणी गोकुळीं वाढे ॥२॥

नंदयशोदेच्या घरीं । बालकृष्ण बाळ ब्रह्मचारी ।

येउनी तो मथुरे भीतरीं । करील संहार असुरांचा ॥३॥

तुजसहित दैत्यबळी । मर्दुनी सांडील महितळीं ।

ऐशीं अक्षरें कर्णबिळीं । प्रविष्ट होतांचि कंसाच्या ॥४॥

रायें घातली घातली लोळणी । अकस्मात् पडियेला धरणीं ।

मुगुट माथांचा उडोनी । गेला वदनीं धुळी भरे ॥५॥

नेत्र झाले पांडुरवर्ण । कंठीं वाष्प दाटला पूर्ण ।

प्राण सांडीत सेवक जन । सावध करिती विलापें ॥६॥

एक घालिती विंजणवारा । वदनीं प्रोक्षिती आंबुतुषारा ।

निळा म्हणे नावेक शरीरा । कंपही सुटला हरिधाकें ॥७॥

९.

येरीकडे गोकुळाभीतरी । येतांचि परमात्मा श्रीहरी ।

विश्वकर्मा येऊनिया निमिषावरी । नगर श्रृंगारी कौतुकें ॥१॥

निजेलीचि असतां नारीकुमरें । श्रृंगारिलीं वस्त्रें अळंकारें ।

वृद्ध होताती ते निमासुरें । रूपें मंडित योजिलीं ॥२॥

धन कनक घरोघरीं । नाना धान्याचिया परी ।

सुख सोहळा वर्ते शरीरीं । पलंग सुपत्या न्याहालीया ॥३॥

नाना फळफळावळी । सुमनें वरुषती वृक्षातळीं ।

एकैक सुखाची नन्हाळी । वर्ते गोकुळीं निजानंदें ॥४॥

कामधेनु ऐशीं गुरें । नंदिनीचिया परीची वासुरें ।

प्रातःकाळीं देखती नारीनरें । परम विस्मयें दाटलीं ॥५॥

लक्ष्मी न समाय गोकुळांत । लेणीं लुगडीं अळंकारमंडित ।

धन संपत्ती नाहीं गणित । जेथें श्रीकांत वस्ती आला ॥६॥

निळा म्हणे सुखाची भरणी । गाई गोवळा आली गौळणी ।

सारस्वतें घोकिली तैशी वाणी । मधुर शब्दें अनुवादती ॥७॥

१०.

कंसें बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैजेसी ।

म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुला ॥१॥

त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज ।

जया साधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥

भागिनी पुतना प्रधानरासी । ऐकतांचि उठियेला अति आवेशी ।

म्हणे जाऊनियां गोकुळासी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥

आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित ।

म्हणे पाजूनियां कृष्णनाथ । करीन घात शस्त्रेंविण ॥४॥

घेऊनियां बाळलेणीं । मनगटीं बांधिलीं खेळणीं ।

जिवती वाघनखें माळा मणी । आंगडें टोपडें बाळंतविडा ॥५॥

मग सुखासनीं विराजीत । दासी परिचारिका विष्टित ।

येऊनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥

निळा म्हणे नवलकथा । वर्तेल ते येथें आतां ।

पूतना पावेल सायोज्यता । श्रीकृष्णनाथादर्शनें ॥७॥

११.

यशोदा म्हणे हे राजभगिनी । कां पां आलिसे धांवोनी ।

जाईल बाळका झडपोनी । कैसें करूं हे राक्षसी ॥१॥

बहुत उपचारेंसी पूजिली । पुतना सन्मानें बैसविली ।

मग ते म्हणे गे यशोदे भली । पुत्रवंती झालिसी ॥२॥

आणि नाहीं सांगोनियां धाडिलें । ऐसें निष्ठुरपण त्वां धरिलें ।

श्रवणी ऐकतांचि धांवोनी आलें । आनंदलें हदयांत ॥३॥

आणिली विचित्र बाळलेणीं । बाळंतविडाही तुजलागुनी ।

आणींगे तान्हुलें पाहों दे नयनीं । ऐकोनीं यशोदा मनीं गजबजिली ॥४॥

म्हणे कैसें तरी करूं ईसी । राजभगिनी हे राक्षसी ।

दिठाविल माझिया सुकुमारासी । दिठीची कठिण इयेची ॥५॥

मग म्हणे आतांचि न्हाणिलें । बाळक पालखीं निजविलें ।

हें ऐकतांचि नवल केलें । बाळक उठलें न राहेचि ॥६॥

निळा म्हणे पूतना येथें । रोषें बोले यशोदेतें ।

काय गे नष्टपण हें तूंतें । मिथ्याचि झकविशी मजलागीं ॥७॥

१२.

आतां तरी बाळका आणीं । आपल्या करें मी लेववीन लेणीं ।

यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥

मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मत्यु पाचारितो तूंतें वनमाळी ।

उगाचि असतासि जरि ये काळीं । तरि वांचतासी काय करूं ॥२॥

ऐसें बोलोनिया आणिला । पूतने वोसंगा बैसविला ।

देखतांचि पूतने वोसंडला । उभंड प्रेमाचा न सांवरे ॥३॥

सुंदरपणाची झाली सीमा । उपदेशी मदना अंगीं काळिया ।

अवलोकूनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवालीं ॥४॥

म्हणे गे यशोदे साजणी । परमसुखाची हे लाधलीसी धणी ।

जतन करी पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥

पूतना राक्षसी अति क्रूर । तेहि देखोनियां कृष्णचंद्र ।

नयनीं अश्रु आणुनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥

निळा म्हणे अगाध बुद्धी । हो‍उनी परतली प्रारब्ध सिद्धी ।

म्हणे कार्य साधूनियां त्रिशुद्धी । जावें सत्वर राजभुवना ॥७॥

१३.

पुतना म्हणे भुकेला कान्हा । मग झडकरी उघडुनी लाविला स्तना ।

यशोदा म्हणे वो राजीवनयना । न सोसे दूध आणिकीचें ॥१॥

स्तनीं लागतांचि त्याचें वदन । विष तें अमृतसमान ।

शोषूनियां रक्त मांस जीवन । पंचहि प्राण आकर्षिले ॥२॥

न सोसवे वेदना ते पूतने । म्हणे ओढीं ओढीं यशोदे तान्हें ।

ऐसें बाळ हें ही काय जाणें । वेंचलें प्राण धांव धांव ॥३॥

तंव तो न सुटेचि सर्वथा । शिणल्या दासी परिचारिकाही ओढितां ।

नानाशब्दें आक्रंदतां । बिहालीं तत्त्वतां पळती लोकें ॥४॥

रक्त मांस आस्थींचें उदक । करूनियां चर्मही शोषियलें निशेष ।

देऊनियां सायुज्यसुख । महामुक्तस्थानीं स्थापियली ॥५॥

हें देखोनि दासी परिचारिका । भेणेंचि पळती अधो मुखा ।

जाऊनिया मथुरा लोकां । सांगती वार्ता रायासी ॥६॥

निळा म्हणे ऐकतां कानीं । राजा चिंतावला बहुत मनीं ।

पुसे वर्तमान तया लागुनी । कैसें वर्तलें तें सांगा ॥७॥

१४.

तंव त्या करिती शंखस्फुरण । दीर्घस्वरें आक्रंदन ।

तें ऐकोनियां नागरीक जन । हाहाभूत वोरसले ॥१॥

तयांतें पुसतां त्या म्हणती दुःखार्णवीं पडिलों हो भूपती ।

सांगता पूतनेची गती । मूर्च्छित पडती धरणीये ॥२॥

म्हणती जातांचि गोकुळाभीतरी । प्रवेशतां नंद यशोदे घरीं ।

उभयतां येऊनियां सामोरीं । बहुत सन्मानें गौरविलें ॥३॥

विडे उपचार भोजन । पूजनाबाईतें तोषवून ।

मग आणिले राजीवनयन । बाळ तान्हुलें दाखविती ॥४॥

तंव तें घनःश्याम सांवळें । राजीवाक्ष रूप देखिलें ।

बाळलेणे विराजलें । नयनचि गोविलें देखतां ॥५॥

मग तें घेऊनियां जवळी । स्तनीं लावितांचि तात्काळीं ।

सुरासुरा शोषूनियां वेल्हाळी । न सोडी जिवें प्राण जातां ॥६॥

निळा म्हणे त्या सोडवितां । न सुटे पूतना आक्रंदतां ।

आम्हीही स्वशक्ती ओढितां । हरिले तत्त्वतां प्राण तिचे ॥७॥

१५.

स्नेह सरतां जैसा दीप । सूक्ष्म होतचि हारप ।

तयापरी बाईचें स्वरूप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥

नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केले निराकार ।

ऐसें देखोनियां सत्वर । आम्ही निघालों तेथुनी ॥२॥

राया त्याची भेटी गोष्टी । न व्हावी तुम्हांसी शेवटीं ।

अकस्मात् झालिया राहाटी । करील पूतनाबाई सारिखी ॥३॥

ऐसें ऐकतांचि श्रवणीं । राजा पडे मूर्छीत धरणीं ।

म्हणे गेली गेलीरे मायबहिणी । माझी पूतनेसारिखी ॥४॥

महाबळें अति उत्कंठ । मंत्रियांमाजी परमश्रेष्ठ ।

आतां कायसी पाहों वाट । गेली नये त्या निरपंथें ॥५॥

मग रायातें संबोधून । प्रधान आणि नागारीक जन ।

म्हणती नव्हे भलें हें महा विघ्न । उदेलें देखत देखत ॥६॥

निळा म्हणे याहीवरी । श्रीहरीचरित्राची थोरी ।

अधिकें अधिक ते कुसरी । परिसावी सज्जनीं सादर ॥७॥

१६.

घरोघरीं हेचि कथा । येरयेरां सांगती वार्ता ।

म्हणती रायासी पडिली थोर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥

नवलचि तें ऐकतां परी । कैसी शोषिली निमिषावरी ।

सांगती दासी त्या परिचारी । एका अपूर्व हे कथा ॥२॥

म्हणती स्तना लावितांची वदन । शोषियलें जीव प्राण ।

पूतना रडे आक्रंदोन । म्हणे धांव धांव ओढीं यशोदे ॥३॥

ओढितां न सुटेचि शोषिली । मुक्तिपंथेंचि ते लाविली ।

अवघीं देखोनियां तेथ भ्यालीं । सेवकें आलीं पळोनियां ॥४॥

येउनी रायातें जाणवलें । पूतनाबाइतें बोळविलें ।

बाळें शोषूनियां घेतलें । परम आश्चर्य हें वाटे ॥५॥

राया घरीं दुःख थोर । वाढलें झाला चिंतातुर ।

पुढें काय करील विचार । तें पाहावें नारीनर बोलती ॥६॥

निळा म्हणे यावरी आतां । अपूर्व आहे पुढील कथा ।

माभळभटासी गोकुळा जातां । होईल पूजा पिढीयांची ॥७॥

१७.

न कळेचि अदृष्टाची गती । न कळे कर्माकर्माची संभूती ।

न कळे मृत्यूचीही रीती । कैशी घडवील कोण वेळ ॥१॥

न कळे होणार तें बळिवंत । भोगणें भोगवील अकस्मात् ।

न कळे विधीचेंही लिखित । जें कां रेखियेलें निढळीं ॥२॥

कंसराव चिंताग्रस्त । उठुनी बैसला सभेआंत ।

प्रधान सेनाधिप समस्त । म्लान वदनें भासती ॥३॥

पुढील विचार सुचितां । न सुचे कांहींची त्या तत्वतां ।

कृष्ण धाकेंची त्याचिया चित्ता । धरचि कोठें न सांपडे ॥४॥

मग बोले कंसासुर । सेना सिद्ध करा भार ।

जाऊनिया अति सत्वर । वधा हो कुमर नंदाचा ॥५॥

तंव हे म्हणती रायाप्रती । बळाची तेथें न चले युक्ति ।

पहा ते पूतनेची शक्ति । इंद्रादिकासी अलोट ॥६॥

निमिषमात्रें तिची शांती । ठेला करूनियां श्रीपती ।

तंव त्या मांभळभट बोलती । नव्हे हें कार्य स्त्रियाचें ॥७॥

आम्हां ब्राह्मणाचें हें कृत्य । जाणें सकळाचेंही घटित ।

द्याल आज्ञा तरी मी तेथें । जाऊनिया साधीन कार्यार्थ ॥८॥

निळा म्हणे बोलतां ऐसें । अवघें उल्हासले मानसें ।

म्हणती यथार्थ हें ऐसें । ऋषी बोलिले मांभळ ॥९॥

१८.

मग वस्त्रें देउनी गौरविला । राये बहुत सन्मानिला ।

चालतां मार्गीं विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनीं ॥१॥

टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करीं ।

ध्योकटी घेऊनियां खांदियावरी । शुद्ध मुहूर्तें चालिला ॥२॥

आला गोकुळासन्निधीं । शुद्धाचमन केलें विधीं ।

मनीं कापट्याची बुद्धी । साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥

नंदगृही प्रवेशला । येतां यशोदेनें देखिला ।

पाट बसावयाला दिधला । नमूनि पूजिला उपचारीं ॥४॥

स्वस्थ स्वस्थानीं बैसले । पंचांग काढूनियां उकलिलें ।

वाचुनी चंद्रबळ दाविलें । आणि दिधलें आशिर्वादा ॥५॥

मग पुसे यशोदेप्रती प्रसूतिकाळ नेणती तिथी ।

तंव ते आणूनियां श्रीपती । द्विजातें दाखवी उल्हासें ॥६॥

देखतांचि तो मदनमूर्ती । ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती ।

निळा म्हणे समाधिस्थिती । पावली प्रतीति ब्राह्मणां ॥७॥

१९.

परी तें कर्म बळोत्तर । नेदी राहों वृत्ति स्थिर ।

स्वार्थ झोंबोंनियां विखार । आणिला ओढोनि लोभावरी ॥१॥

मग म्हणे वो सुंदर बाळ । यशोदे नागर हें वेल्हाळ ।

परि याचा जन्मकाळ । कैसा असेल पाहों तो ॥२॥

कृष्णपक्ष श्रावण मास रोहिणी नक्षत्र अष्टमी दिवस ।

मध्यरात्रीचा जन्म यास । दशा तों क्रूर दिसताहे ॥३॥

जन्मकाळीं या बारावा गुरु । शनी भोग हानिस्थानीं स्थिरू ।

राहो केतु आणि दिनकरु । देशत्यागातें सूचिती ॥४॥

याचेन सकर वंश हानि । करील कुळाची बुडवणी ।

नये अवलोकु यातें नयनीं । टाकावा नेऊनि अरण्यांत ॥५॥

यशोदे न लावीं यासि उशीर । बाळ नव्हे या मायावी खेचर ।

कालचि पाहेपां केला संहार । पूतनेचा क्षणही न लागतां ॥६॥

निळा म्हणे ऐकोनि ऐसें । मांडिलें विंदान परमपुरुषें ।

जयाचें कर्म देखिलें जैसें । दिल्हें तया तैसें दानफळ ॥७॥

२०.

बैसला होता पाटावरी । तोचि थराविला ते अवसरीं ।

निसटोनियां पृष्ठीवरी । बैसला अवचिता निघातें ॥१॥

पडिला पुढें दांतघशी । उठितां बळी अति आवेशी ।

तवं वेढिला येऊनियां चौपाशीं । घरोघरींच्या पिढियांनीं ॥२॥

मग म्हणे धांवा धांवा याचिये हातींचें मज सोडवा ।

नाडलों आपुल्या कापट्याभावा । नाहीं जन्मलों चांडाळ ॥३॥

अचेतन हे धांवती काष्ठें । लक्षानुलक्ष कोट्यानुकोटें ।

आतां कैचें जिणें येथें अदृष्टें । मारावया आणिलें ॥४॥

लोक हांसतातीं भोंवताले । म्हणती कैसें हें नवल झालें ।

आमुचेही पाट येथें आले । मारूंचि बैसले मांभळभटा ॥५॥

येथें न चले कोणाचेंचि कांहीं । ईश्वर‍इच्छेची हे नवाई ।

ब्राह्मण म्हणोनी सोडिला पाहीं । नागवा उघडा मांभळभट ॥६॥

निळा म्हणे लवडसवडी । पळतां भूई त्या झाली थोडी ।

येऊनियां कंसाचिये देवडीं । शंखस्फुरणें उभा ठेला ॥७॥

२१.

ऐकोनी गजबजिली दैत्यसभा । धाकेंचि कंसही ठाकला उभा ।

तंव बीभत्स माभळभटाची शोभा । देखते झाले सकळही ॥१॥

नागवा उघडा आणि बोडका । जीवत्वपांगें बुडाली शंका ।

भोंवते देखतांही विषयालोकां । म्हणे धांवा धांवा सोडवा ॥२॥

पाटेंचि पुरविली माझी पाठी । लक्षानुलक्ष आले कोटी ।

उठा उठा पळारे शेवटीं । मारिले जाल व्यर्थची ॥३॥

दैत्य पाहाती चहूंकडे । शस्त्रपाणी वेधल हुडे ।

दुर्गा सांभाळिती चहूंकडे । म्हणती न दिसे विघ्न डोळियां ॥४॥

राजा म्हणे झांका त्यासी । पुसा काय अते वार्तेसी ।

मग नेसऊनियां वस्त्रासी । आणिला सभेसी पुसती ॥५॥

तो म्हणे राया बळिया बाळ । उजपला तो आमुचा काळ ।

विचित्र पाहतां त्याचा खेळ । लाविलीं पिढींची मज पाठीं ॥६॥

निळा म्हणे रूपाकृती । सुंदरपणाची ओतली मूर्ती ।

कोटी मदनाची अंगीं दीप्ती । न ढळती पातीं अवलोकितां ॥७॥

२२.

ऐसें सांगता माभळभटा । राया दचक बैसला मोठा ।

मग पाचारूनियां सुभटा । दैत्याप्रती काय बोले ॥१॥

म्हणे वाढविलेंती बहुता मानें । अपार संपदा देऊनियां धनें ।

आजि माझिया उपेगा येणें । बाळ कृष्ण वधणें भलत्यापरी ॥२॥

नाना विद्या तुमच्या अंगीं । रूपें पालटुनी विचरतां जगीं ।

मायारूपी म्हणऊनियां स्वर्गी । देवही भिती तुह्मांसीं ॥३॥

ऐसें असोनि माझिये गांठी । कायसी बाळका जळूची गोठी ।

तुमचेनी बळें हे सकळही सृष्टी । आर्चित झाली मजलागीं ॥४॥

पूतना गेलीते तंव नारी । दुसरा भट तोहि भिकारी ।

काय जाणों कैशापरी । देखोनी कळली तयासी ॥५॥

तो तंव अत्यंत सुकुमार । सांगती अवघे लहान थोर ।

सुंदरपणा चीही बहार । रूपा आली कृष्णाकृती ॥६॥

तरी तुह्मी जाऊनियां तेथें । प्रेतरूपचि आणावा येथें ।

निळा म्हणे पाहोनियां त्यातें । कारऊं अक्षवाणे अपणा ॥७॥

२३.

ऐसा चिंतावोनियां मनीं । म्हणे निमाली पूतना भगिनी ।

माझिया राज्या आली हानि । म्हणोनि माभळपट पाठविला ॥१॥

तंव पिढेदान त्या प्राप्त झालें । नवलचि हें अपूर्व ऐकिलें ।

येऊनि आम्हांतें जाणविलें । नव्हे बाळ हें तान्हुलें श्रीहरी ॥२॥

मग म्हणे वो रिठासुरा । जाऊनि तुह्नी बाळकासि मारा ।

देईन अर्धराज्य भारा । कार्यसिद्धि झालिया ॥३॥

मग रिठासुर तो मायावी । गुंफिली रिठेमाळ अति बरवी ।

करीं घेऊनियां सादावी । नंद चौबारा जाऊनि ॥४॥

म्हणे हें बाळका लेववितां । सर्वकाळ कंठीं असतां ।

कोण्याही भयाची तया वार्ता । स्पर्शोचि नेणे सामर्थ्यगुणें ॥५॥

कदापिही नव्हे भूतबाधा । दिठीचें भय नाहीं त्या कदा ।

ऐसें ऐकोनियां यशोदा । आवडी घाली हरिकंठीं ॥६॥

निळा म्हणे पालखीं बाळ । निजऊनियां यशोदा वेल्हाळ ।

मेळऊनिया स्त्रिया सकळ । हास्यविनोदें बैसली ॥७॥

२४.

तंव त्या रिठीयासी निघाली वदनें । अति विक्राळ दाढा दशनें ।

श्रीकृष्ण कंठीचें रुधिरपान । करावया उदितें ॥१॥

कृत्रिमें जाणोनियां ते श्रीहरी । कवळूनि धरिलीं दोन्हीं करीं ।

आणि घालूनियां मुखाभीतरीं । चावुनी धरणिये टाकिलीं ॥२॥

त्याचें स्विष्टकृत केलियावरी । अक्रोशें पाळवियांत रुदन करी ।

तें ऐकोनि यशोदा सुंदरी । धांवली झडकरी काय झालें ॥३॥

तंव देखे शोणिताचे पूर । मांस मेदाचे संभार ।

मग म्हणे गे मरमर । बाळ महासर्पें खादलें ॥४॥

धांविल्या नरनारी बाळ । घात केला म्हणती सकळ ।

ऐशी कैशीगे तूं वेल्हाळ । यशोदे मारविलें बाळका ॥५॥

वाहाती शोणिताचे पुर । इतुकें कैंचे गे त्या रुधिर ।

काढूनियां पहा गे सत्वर । आहे प्राण कीं गेलासा ॥६॥

निळा म्हणे जाउनी जवळी । काढूनि आणिला जो वनमाळी ।

तंव हास्यवदन नित्य काळीं । नाहीं कोमाइला न दचकला ॥७॥

२५.

मग म्हणती अवघ्या जणी । धांवोनि पहागे आणा पाणी ।

डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥

पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियेलें अनंगें ।

नभापरी अलिप्त संगें । काय करिती अघात त्या ॥२॥

नानापरींची अक्षवाणें । करी यशोदा वांटी दानें ।

यथाविधी द्विजभोजनें । केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥

ह्यणती नवीची रिठीयाची माळा । घातली होती त्वां याचिया गळां ।

ते काय झाली गे याची वेळा । तेचि अरिष्ट यासी होतें ॥४॥

ऐसा झाला घोषगजर । ऐकोनियां तों कंसासुर ।

म्हणे बोळविला महावीर । केला चकाचुर रिठाही ॥५॥

करितां उपाय न चले यासी । कंस भयाभीत मानसीं ।

म्हणे काळ ह जन्मला आम्हांसी । करील संहार काळाचा ॥६॥

निळा म्हणे न चले युक्ती । यापुढें कापट्या समाप्ती ।

सर्वांतरवासी हा श्रीपती । कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥

२६.

यावरी कंस म्हणे दैत्यादिक । वधूनि येईल जो बाळका ।

त्यासी अर्ध राज्याची टीका । देईल छत्र सिंहासन ॥१॥

मग तृणावर्त धेनुकासुर । बग केशिया शकटासुर ।

अघासुर सर्प विखार । चालिले भार दैत्यांचे ॥२॥

कृष्णें ते ते संहारिलें । नवल अद्‌भुतचि वो केलें ।

निळा म्हणे आहे वर्णिलें । श्रीवेदव्यासें पुराणीं ॥३॥

२७.

आतां पुढें बाळचरित्र । कृष्णक्रीडा अति विचित्र ।

ऐकतां श्रवणीं होती पवित्र । गातां वक्र शुचिर्भूत ॥१॥

एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता ।

कैवल्यपदप्रप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥

श्रीकृष्णाची बाललीळा । अद्‌भुत सुखाचा सोहळा ।

वेधुनियां नरनारी बाळा । गाई आणि गोवळा ब्रह्मप्राप्ती ॥३॥

ब्रह्मादिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती ।

गगनीं विमानें दाटती । सुमनें वरुषति सुरवर ॥४॥

श्रीकृष्णाचें नामकरण । विधिविधानें द्विजभोजन ।

नंदयशोदे उल्हास पूर्ण । सुवासिनी ब्राह्मण सर्व जना ॥५॥

मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमलिया भेरीं ।

टाळ मृदंग झणत्कारी । नाचतीं वैष्णव पदें गाती ॥६॥

निळा म्हणे नगरवासी । प्रांतवासी देशवासी ।

आले द्विपांतरनिवासी । कृष्ण सोहळा पहावया ॥७॥

२८.

रत्‍नखचित पालख । सुर्या ऐसा निर्मियेला चोख ।

विरालंबी गोऊनि देख । मोहें उत्साह मांडियेला ॥१॥

महर्षि ऋषिही सकळिक । आले पहावया कवतुक ।

अवलोकूनियां यदुनायक । करिती प्राणें कुरवंडिया ॥२॥

आले गौळियांचे भार । नाना याति नारीनर ।

नानापरीचे श्रृंगार । लेणीं लुगडीं मिरविती ॥३॥

वाणें घेऊनियां नारी । रत्‍नजडितें तबकें करीं ।

देवांगना तैसियापरी । कृष्णवैभवें मंडिता ॥४॥

पालखीं घालितां चक्रपाणी । नाना आल्हादें गाती गाणीं ।

नाना स्वरें उमटल्या ध्वनी । उठती गगनीं पडिसाद ते ॥५॥

नामें ठेकूनियां पाचांरिती । गोविंदा गोपाळा यदुपति ।

सच्चिदानंद आनंदमूर्ती । जगपति श्रीपति अमरपिता ॥६॥

अच्युता अनंता अपारा । देवकीनंदना जगदोद्धारा ।

मुनिमनमोहना सर्वेश्वरा । आत्मया श्रीवरा सर्वगता ॥७॥

सुंदरा राजीवलोचना । जगदादीशा पंकजवदना ।

योगीमानसमनोरंजना । सुखनिधाना सुखमूर्ती ॥८॥

मधुमाधवा मधुसूदना । त्रिविक्रमा वामना संकर्षणा ।

मुकुंदा मंदार शेषशयना । राजीवाक्षा जनार्दन श्रीकृष्णा ॥९॥

निळा म्हणे ऐशिया नामें । गर्जती गौळणी सप्रेमा प्रेमें ।

ऐकोनियां ते पुरुषोत्तमें । केलिया संभ्रमें अति वाड ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel