२९.

पुढें ऋषीश्वरांची मांदी । बैसली होती सभासंधीं ।

तेही आशिर्वाद शब्दीं । मंत्रघोषीं गर्जिन्नले ॥१॥

मंघळतुर्‍यांचे घोषगजर । दुंदुभी वाजविती सुरवर ।

नंदरायाचें भाग्य थोर । देव वर्णिती निज मुखें ॥२॥

निगम येउनी मूर्तिमंत । श्रीकृष्णाचीं स्तवनें करीत ।

कामधेनुही क्षीरें स्त्रवत । तृप्ति सकळांसी द्यावया ॥३॥

देवगुरु जे बृहस्पति । तेहि आशिर्वादें कृष्णातें स्तविती ।

शुक्राचार्यही प्रज्ञामूर्ति । कृष्णाचे वर्णिती कीर्तिघोष ॥४॥

उमा रमा रेणुका सती । लोपामुद्रा अरुंधती ।

अक्षवाणें घेऊनियां हातीं । आत्मया ओवाळिती श्रीकृष्णा ॥५॥

अनसूया परम पवित्रता । अत्रिदेवाची जे कांता ।

जिचिये उदरीं श्रीअवधूता । दत्तात्रय जन्म महामुनि ॥६॥

निळा म्हणे तेहि येउनी । हरीतें वोसंगा घेउनी ।

आशिर्वादें अमृतवचनीं । गौरविती यशोदे ॥७॥

३०.

ऐसे देव आणि ऋषेश्वर । हर्षे होऊनियां निर्भर ।

नंदयशोदेचें वारंवार । वर्णिती भाग्य निजमुखें ॥१॥

न संपडे जो योगसाधनें । नाना तपें वेदाध्ययनें ।

तो हा सगुणरूपें नारायण । क्रीडा करी याच्या घरीं ॥२॥

यावरी गौळणीही अति सुंदर । कडिये घेउनी शारंगधरा ।

नेती उल्हासें निजमंदिरा । चुंबनें देऊनि खेळविती ॥३॥

म्हणती कृष्णा रामा मेघःशामा । योगी मुनिजन मनोरमा ।

सुलभ झालासी आजि तूं आम्हां । आवडी ऐसा वर्तसी ॥४॥

पूर्वीर्जितें उत्तमें होती । सकृतें त्यांचिया फळनिष्पत्ती ।

मोडोनी आलिया तुझी हे मूर्ती । डोळेभरी अवलोकूं ॥५॥

ऐशिया उत्साहे त्या प्रमदा । नेती खेळविती गोविंदा ।

मग पावोनियां परमानंदा । शयनीं पर्यकीं निजविती ॥६॥

निळा म्हणे सुख विश्रांति । पावल्या ऐशिया सत्संगती ।

पुढती कथा अपूर्व ख्याती । बाळपणींची हरिकीर्ती ॥७॥

३१.

कंसा मनीं भय संचारु । झाला तेणें चितातुरु ।

बैसोनियां करी विचारु । कृष्णवधार्थ प्रयोग ॥१॥

तें एकोनी उत्पात वार्ता । गोकुळींचिया लोकां समस्ता ।

धैर्य नुपजेति म्हणती आतां । जावें पळोनी दूरदेशा ॥२॥

तंव नंद म्हणे ऐका मात । जावोनी वसों दरकुटी आंत ।

सोडूनिया जातां आपुला प्रांत । घरें दारें नुरतील ॥३॥

विचार मानला सकळांसी । गेली पळोनी दरकुटीयेसी ।

गांवीं नाहीं मुंगी माशी । ऐसे ओस पडियेले ॥४॥

उष्णा बारियांचे आघात । साउली न मिळोचि त्या वनांत ।

तंव देखिल्या अकस्मात् । माईक गाडा शंकटासुर ॥५॥

यशोदा देखोनियां ते वेळीं । बाळकृष्ण निजवी गाडियातळीं ।

तंव हा लाघविया वनमाळी । पद घातेंचि उडविला ॥६॥

तेणें तो अक्रंदला । घोषें दणाणिला ।

जाउनी मथुरेमजि पडिला । कंस सन्मुख शतचूर्ण ॥७॥

झाला शोणिताचा सडा । मांस विखुरलें चहूं कडा ।

कंस म्हणेरे शकटहि गाढा । आजि लाविला मृत्युपंथें ॥८॥

निळा म्हणे गौळिये म्हणती । गाडा उडाला कैसिया रिती ।

तळीं होता हा श्रीपती । थोर भाग्यें वांचला ॥९॥

३२.

मग ओंवाळूनियां मृत्तिका । घेतलें उचलूनि यदुनायका ।

यशोदा म्हणे हें बाळका वरूनि अरिष्ट चुकलें ॥१॥

नव्हे शकट तो मायावी दैत्य । आला होता करावया घात ।

कृष्णें ताडिला तो यथार्थ । पूतनेऐसी परी केली ॥२॥

तेणें दिधली आरोळी । न्या हा उठे तो अंतराळीं ।

परी नाहीं भयाची काजळी । सावध वनमाळी सर्व गुणें ॥३॥

ऐसे क्रमिले कांहीं दिवस । तंव रायें पाठविलें लोकांस ।

मग येऊनि गोकुळास । पुनरपि वस्ती राहिले ॥४॥

कृष्ण खेळतां आंगणीं । गडी म्हणती सांरगपाणी ।

हाराळी नूतन हे कापुनी । चारूं वत्सासि आपुलीया ॥५॥

तंव तो तृणावृत दैत्य । हाराळी रूपें होता तेथ ।

इच्छूनियां कृष्ण घात । तंव तो हरीनें ओळखिला ॥६॥

म्हणे पळारे तुह्मी अवघे गडे । येथें दिसत असें हें कुंडें ।

रहा अवघे मागिलीकडे । आपण पुढे संचरला ॥७॥

तेणें देखतांचि श्रीहरी । वदनें काढिलीं तृणांकुरीं ।

शतें सहस्त्र लक्षवरी । रूपें धरूनी ठाकला ॥८॥

भयानकें अती विक्राळें । दाढा दंत दीर्घ शिसाळे ।

आवळुवे चाटीत आवेश बळें । कृष्णा अंगीं झगटला ॥९॥

निळा म्हणे कवळुनि मुष्टी । मुख्य तृणासुराची झोटी ।

उपटूनियां भूमी नेहटीं । शतचूर्ण करूनि सांडिला ॥१०॥

३३.

ऐसा वैरिया मुक्तिदानीं । कृपावंत हा सारंगपाणी ।

कैसें ऐकूनियां श्रवणीं । परम खेद मानिजे ॥१॥

कृष्णाजवळी होतीं मुलें । तिहीं तें आश्‍चर्य देखिलें ।

वडिलां सांगती नवल झालें । कृष्णें मर्दिले अपार दैत्यां ॥२॥

कोट्यावत पसरूनि मुखें । आले कृष्णासन्निध तंव ते ।

तेणें अति लाघवें कवतुकें । भूमिसी आपटूनि मारिलें ॥३॥

त्याचीं शरीरें पर्वताशी । पडिल्या आहेत गांवापाशीं ।

चला दाखवितो तुम्हांसी । म्हणवूनि सकळिकांसी हाकारिलें ॥४॥

तिहीं ते देखोनियां दिठी । भयें कांपती आपुल्या पोटीं ।

म्हणती अतुर्बळी हा जगजेठी । लेकरूं कैसा म्हणावा ॥५॥

नंदहि विस्मयापन्न चित्तीं । म्हणे हे कोठूनि असुर येती ।

याचिया हातें पावोनि शांति । जाताती मुक्तिपदातें ॥६॥

निळा म्हणे गांवींचे लोक । करिती अवघेंचि कौतुक ।

परी कंसा अधिकाधिक क्षतें उमटती दुःखाचीं ॥७॥

३४.

यावरी कोणे एके दिवशीं । कृष्णें घेउनी सौंगडियांशी ।

आला यमुनेचे प्रदेशीं । तंव गाई खिल्लारे देखिलीं ॥१॥

तयामाजी अति चोखडें । वत्स गाईचे ते पाडे ।

त्याचे ऐसें धरूनी रूपडें । वत्सासुर तेथ उभा ॥२॥

कृष्ण म्हणेरे हो गडिही ऐका । एक एक वत्स धरा नेटका ।

मीही धरितों म्हणवूनि तंव कां । धांवला वत्सासूरावरी ॥३॥

तंव तो मायावी असुर । शिंगें पसरूनि पातला समोर ।

मागें करित लत्ताप्रहार । आडवाचि उडे हाणावया ॥४॥

गौळी करिताती हाहाकार । मारिला नंदकुमार ।

अचपळ हा नव्हेचि स्थिर । कासया वत्स धरूं गेला ॥५॥

याचिये वदनीं निघती ज्वाळ । नासापूटींहुनी धूम्रकल्लोळ ।

बरें नव्हे हा पातला काळ । प्राण घ्यावया प्रगटला ॥६॥

निळा म्हणे धरिला कर्णी । मुरगाळूनि पाडिला धरणीं ।

मुष्टीघातेंचि चक्रपाणी । मोक्षपदातें पाठवी त्या ॥७॥

३५.

महा वैरी निर्दाळिला । पैल वत्सासूर निवटिला ।

म्हणती अचोज हा बळिया झाला । नंदरायाचा कुमरु ॥१॥

मात गेली कंसासुरा । ऐकोनि झाला तो घाबरा ।

विचारी आपुलिया कैवारा । न दिसे दुसरा ऐसा बळी ॥२॥

जो तो जाउनी घाताचि पावे । नये परतोनियां जीवें ।

यावरी आतां शरण जावें । कवणिया वीरा महीतळीं ॥३॥

तंव तो उठोनि अघासुर । करी रायसी जोहार ।

म्हणे न व्हावें चिंतातुर । विद्या अपार मजपाशीं ॥४॥

राया तुझिया हितावरी । करीन गोकुळाची बाहरी ।

अवघेचि घालूनियां उदरीं । येईन कृष्णासमवेत ॥५॥

ऐसें तोषवूनियां राया । म्हणे न धरीं आतां भया ।

तैशा रचूनियां माया । करितो संहार सकळांचा ॥६॥

निळा म्हणे गर्वारूढ । यावरी होऊनियां मूढ ।

काळासवें मांडूनियां होड । खेळों पाहे मश्यक ॥७॥

३६.

येरीकडे आनंद गोकुळीं । गोप उठोनि प्रातःकाळीं ।

मिळाले नंदाच्या राउळीं । करिती जागे श्रीकृष्णा ॥१॥

दसवंती म्हणे गोकुळांसी । निद्रित आहे हृषीकेशी ।

पुढें जा घेउनी गोधनासी । जाग झालिया येईल ॥२॥

काल बहुत श्रमला कृष्ण । वत्ससीं करितां संघटण ।

बळें वांचला सांगती जन । केलें मर्दन मग त्याचें ॥३॥

तेव्हां कळला तो असुर । हो‍उनी वत्स झाला क्रूर ।

कृष्णें ताडिती निशाचर एक योजन पडियेला ॥४॥

ऐकोनि म्हणती गोरक्षक । सत्वर पाठवीं यदुनायक ।

आम्ही जाती अवश्यक । पश्चिमे दिशेसी सांगावें ॥५॥

मग ते हांकूनियां खिल्लारें । सवेग चालिले एकाचि भारें ।

चौताळती गोधनें थोरें । आवेशेंसी धांवती ॥६॥

निळा म्हणे नेणती पुढें । अर्धे पसरिलें ते जाभाडें ।

तळीं महीवरी जेवढें । मेघमंडपापर्यंत ॥७॥

३७.

ऐसें वासुनी मुख अमूप । अघासुर पसरलासे सर्प ।

गाई गोवळे आपोआप । जाती वदनामाजी त्याच्या ॥१॥

पुढे चालतां मार्ग न दिसे । अंधःकारीं पडिलें ऐसें ।

मागें फिरावें तंव तो श्वासें । ओढूनि नेतसे पैलीकडे ॥२॥

मग म्हणती येर येरासी । प्रातःकाळींचि झाली निशी ।

गडदे पडिले न दिसे शशी । ग्रह तारांगणें ना भानु ॥३॥

पडिलों दरकुटिमाझारी । किंवा धुई दाटली भारी ।

अथवा मेहुडे आले वरी । कांहींचि दिसे न तर्क ॥४॥

जाभडीं मेळवितां आघासुर । परि मागें राहिला शारंगधर ।

म्हणोनियां तो झाला स्थिर । तयाही सगट गिळावया ॥५॥

तंव दिवस घटिका चारी । आला चढोनियां वरी ।

गाई गोवळे भिन्न अंधारीं । पडिली अघासुरा पोटीं ॥६॥

निळा म्हणे यावरी आतां । जागृत झालिया कृष्णनाथा ।

पुढें कैशी वर्तली कथा । ते परिसावी सात्विकीं ॥७॥

३८.

कृष्ण बळराम उठिले । मुखार्जनें सारिलें ।

तंव दसवंतिया बोले । जेउनी जावें गोधनापाठीं ॥१॥

गाई गोवळ खोळंबले होते । पुढें गेले ते निरुते ।

मग आणूनियां भोजनातें । पुढें ठेविलीं रत्‍नताटें ॥२॥

उभयतां जेऊनियां उठिले । गोपश्रृंगा आणविले ।

विचित्र चोळणे कसिले । काचे वेष्टिले सुरंग ॥३॥

शिरीं मोरपिसा टोप । कर्णी कुंडला तेज अमूप ।

केशर चंदनाचे विलेप । टिळे लल्लाटीं रेखियेले ॥४॥

गुंजाहार घातले कंठीं । खांदीं कांबळीं हातीं वेताटी ।

मोहरी पावा गांजिवा पाठीं । माजि दिव्यान्नें भरियेलीं ॥५॥

दंडीं रुमाल करी कंकणें । पायीं वाहाण शोभलें लेणें ।

ऐसे चालतां अतिसत्राणें । पुढें अघयतें ओळखिलें ॥६॥

एक जाभाडें गगनावरी । दुजें पृथ्वीची ऐसें निर्धारी ।

गाई गोपाळ गेले भीतरीं । निळा म्हणे हें जाणवलें ॥७॥

३९.

मग होणे गिळिले गोप । गाई खिल्लरांचे कळप ।

तरि हा चिरूनियां सांडीन सर्प । घेईन सूड य सकळांचा ॥१॥

कृष्ण शिरतां त्याच्या वदनीं । अघासुरा हर्ष न समाय मेदिनी ।

ह्यणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझें ॥२॥

ऐसा आनंदला अघ । तंव लाघविया श्रीरंग ।

वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥

नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेंहि न चलेचि तत्वतां ।

फाडूनि वदन केल्या चळथा । द्विभाग करूनि सांडियेले ॥४॥

तेणें उघड्या पडल्या गाई । गोवळ म्हणती थोर नवाई ।

निमिषामात्रेंचि गेली धुई । पहारे प्रकश पडियेला ॥५॥

कान्हो आतां येईल केव्हां । वृत्तांत तया हा नाहीं ठावा ।

ऐसें स्मरणचि खेवा । देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥

निळा म्हणे सांगती नव । आजीं अंधारिमाजी गाई गोवळ ।

पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंही सरों नेदी ॥७॥

४०.

मग हांसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे ।

सर्पें गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥

बरें झालें होतों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगें ।

पैल पहारे महा भुजंगें । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥

पहाती तंव भरोनिया दरा । पडिला वाहती शोणिती धारा ।

म्हणती नवल हें शारंगधरा । कैसा चिरूनियां टाकिला ॥३॥

येणेंचि आह्मां गिळिलें होतें । नेणें देखोनी अंधकारातें ।

थोर विस्मय करिती तेथें । म्हणती दाऊं वडिलातें नवल हें ॥४॥

ऐसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला ।

गोवळा नाचती विजये झाला । श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥

कंसातेंहि विदित झालें । जाउनी वार्तिकीं सांगितलें ।

तेणें चपपक त्याचें गेलें । ह्मणे ओढवलें दुर्मरण ॥६॥

निळा म्हणे इकडे गाई चरतां फांकल्या दिशा दाही ।

वळत्या करूनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥

४१.

तंव पातला माध्यान्हकाळ । गोवळा भुकेची झाली वेळ ।

मग पाहोनियाम उत्तम स्थळ । सुरतरू शीतळ छायातळीं ॥१॥

तेथें बैसविल्या पंगती । घोंगडी घालुनियां खालती ।

कृष्ण म्हणे गडियांप्रती । शिदोर्‍या एकत्र कालवूं ॥२॥

गोवळ म्हणती बहुत बरें । कृष्णा तुझिया निजकरें ।

होईल अमृतचि तें दुसरें । जेवूं आदरें शेष तुझें ॥३॥

नारदें तें ऐकिलें कानीं । सांगे सत्यलोका जाउनी ।

ब्रह्मयातें म्हणे चक्रपाणी । आजि ब्रह्मरस वांटितो ॥४॥

देवा जाऊनियां तेथें । शेष घ्यावेंजी कृष्णहातें ।

तरी हें पद राहेल निरुतें । नाहीं तरी अल्पायु ॥५॥

कृष्णशेषाचा हा महिमा । सांगतां अति निरुपमा ।

पावोनियां निष्काम कामा । पद अच्युत सुखप्राप्ती ॥६॥

निळा म्हणे नारदवचनीं । ब्रह्मदेव चालिले तेथुनी ।

पाहाती तंव वृंदावनी । गोवळ नाचती चौफेरीं ॥७॥

४२.

मध्यें परमात्मा श्रीहरी । दधिओदन घेऊनि करीं ।

कवळ त्याचिये मुखीं भरी । आणि स्वीकारी आपणही ॥१॥

हें देखोनियां चतुराननें । परम संकोच मानिला मनें ।

मग म्हणे हें संध्यास्नानें । कांहींची न करिती गोंवळ ॥२॥

आम्ही याचें शेष घेणें । तैं ब्रह्मत्वा मुकणें ।

यज्ञीं अग्रपूजेचें आंवतणें । कैंचें येईल मग आम्हां ॥३॥

यातें नाहीं यज्ञाचार । दीक्षा अथवा शिखासूत्र ।

आह्मीं सोवळें निरंतर । करूं उच्चारू वेदाचा ॥४॥

सोंवळें ओवळें नाहीं यांसी । केलें अपोषणे कर्मासी ।

सेवितां याचिया उच्छिष्टासी । होईल प्रत्यवायासी निजमूळ ॥५॥

मग प्रायश्चित्तेंही घेतां । न फिटे विटाळ तत्वतां ।

ऐसें विचारूनियां विधाता । पालटी तत्वतां ब्रह्मपण ॥६॥

निळा म्हणे ज्याचा तया । संदेह बाधी त्या नांव माया ।

मग तो रूप पालटूनियां । झाला गोंवळ वेषधारी ॥७॥

४३.

यज्ञोपवित सांडिलें दुरी । शिखासूत्राची बोहरि ।

करूनियां मोहरी करीं । कांठी कांबळा गांजिवा ॥१॥

उफराटी दडदणी खोवली टिरी । सूक्ष्म शेंडी बोडक्यावरी ।

दृष्टि चोरूनियां माझारी । माजी गोवळांच्या नाचतो ॥२॥

येऊनियां कृष्णाजवळा । मुख पसरीं इच्छूनि कवळा ।

तंव हा दावूनियां आणिका गोवळां । मुखीं भरी स्वानंदें ॥३॥

सर्वांग देखणा श्रीहरी । व्यापक सकळांचें अंतरीं ।

ब्रह्मा पाडियला फेरी । नेदी शितबोटी आतळों ॥४॥

म्हणे ठाकूनियां घेऊं आला । कैसेनि अधिकारी तो झाला ।

नव्हे सोंगादिन मी दादुला । भला कोणाचा सांगाती ॥५॥

मग म्हणे वांकुल्या दावा यासी । न पवे भाग कृत्रिमवेषीं ।

तुह्मी सेवारे सावकाशी । आजिचिया सुखासी पार नाहीं ॥६॥

ऐसे जेविले सतस्त । बह्मा राहिला टोकत ।

निळा म्हणे हा हृद्‌गत । जाणे सकळां अंतरींचें ॥७॥

४४.

ब्रह्मा विचार करी मनीं । ठकडा मोठा हा चक्रपाणी ।

आतां येईल आंचवणीं । तेथें उच्छिष्ट स्वीकारूं ॥१॥

एकचि सीत उदंड याचें । पोट भरणें नाहीं साचें ॥

वचन पूजणें नारदाचें । म्हणोनि विरोळा डोहीं ॥२॥

तंव गोवळासी म्हणे श्रीकृष्ण । आजिचिया जेवणा आंचरण ।

न घेई तो आम्हां सज्जन । जिवलग प्राण निजाचा ॥३॥

गोंवळ म्हणती भलाभला । मनींचाचि हेत जाणितला ।

आजीचिया धणी जो जो धाला । तो तो पावला समाधीसुखा ॥४॥

ऐसें बोलोनियां गोंवळ । बैसले आत्मस्थितीचि निश्चळ ।

तंव ब्रह्मा डोहीं करी तळमळ । कां पां न येतिची आझुनी ॥५॥

मग डोकाउनी बाहेरी पाहे । मागुती जळीं लीन होये ।

म्हणे मी ब्रह्मा आणि विचंवला ठाय । धिग् महत्त्व तें माझें ॥६॥

चोरूनियां वत्सें गोंवळ । नेऊं आडवूं हा गोपाळ ।

सत्ता बळें घेऊनि कवळ । मग ते देऊं याचें या ॥७॥

ऐसें विचारूनियां परमेष्ठी । राहिला निश्चळ कातरदृष्टी ।

म्हणे हेंही जगजेठी । कळलें हृद्गतयाचें ॥८॥

४५.

यावरी म्हणे संवगडियांसी । वत्सें फांकलीरे चौपासीं ।

वळूनी आणा धांवा त्यासी । मग सावकाशीं बैसा सुखें ॥१॥

तंव ते म्हणती हो वनमाळी । आजीचि वळती तुमची पाळी ।

जाऊनियां तूंचि सांभाळीं । आम्ही निष्काम आजिचेनि ॥२॥

तुझिया शेषाची हे नवलाई । देहभाव आम्हां नुरेचि देहीं ।

जाणें येणें कैंचें काईं । राहिलो ठायीं निश्चळपणें ॥३॥

देव म्हणे हे पावले खुणे । गडी माझे झाले शहाणे ।

समाधी सर्वहि गुणें । काय चतुराननें कीजे यांचें ॥४॥

यांचिये संगतीं वत्सें धालीं । ब्रह्मसुखातें पावलीं ।

वियोगवार्ता नेणती भुली । निजस्थिती राहिली स्वरूपींची ॥५॥

ऐसें जाणोनियां श्रीपती । म्हणे मी जातों आजिचे वळती ।

तुम्ही निश्चळ रहा वृत्ती । कोणी सांगाती फांकोंनका ॥६॥

निळा म्हणे सांगोनि ऐसें । मोहरी पावा घेतला हर्षे ।

वादत करितांचि पूर्व दिशे । वत्सेंहि सांडूनि चालिला ॥७॥

४६.

दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रह्मया जाणवलें अंतरीं ।

मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिलीं ॥१॥

तें तों होती समाधिस्थ । ब्रह्मा नेतो हे नेणतीचि मात ।

मग ते नेऊनियां समस्त । सत्यलोकीं बैसविलीं ॥२॥

यावरी येऊनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे संग ।

भलें झालें म्हणतुसे मग । अवघे आपणाचि हो सरला ॥३॥

ब्रह्मा आडवूं पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज ।

ऐसें म्हणोनियां श्रीराज । वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥

आपण वत्सें आपण गोवळ । मोहर्‍या पावे घोंगडी सकळ ।

काठ्या पावे पाईतपणें मेळ । झाला ते केवळ एकला एक ॥५॥

लुडे खुडे मुडके कान । गोरे सांवळे राजीव नयन ।

बोलिले तोतिरे म्लान वदन । देदीप्यमान तोही झाला ॥६॥

निळा म्हणे होतें तैसें । हो‍उनी ठेला तेवढेंचि जैसें ।

नव्हती पहिले कोणी ऐसें । ओळखेंचि नेणती अवलोकित ॥७॥

४७.

तैशीच वत्सें जिचीं जैसीं । होतीं हो‍उनी ठेला तैसीं ।

बांडीं खैरीं मोरीं जांबुळसीं । तांबडीं धवळीं कपिलवर्णे ॥१॥

बुजगीं मिसकिणें लातिरीं । एके खाविरीं डिंबरी ।

एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रूपें ॥२॥

देखतां गाईसी फुटे पान्हा । घरींचिया लोभ उपजे मना ।

ऐशीं स्वरूपें हो‍उनी नाना । खेळे वृंदावना चौपासीं ॥३॥

येउनी ब्रह्मा पाहे डोळां । तंव पहिलिय ऐसाचि सोहळा ।

ध्वजा कुंचे घागरमाळा । तोरणें पताका उभविलीया ॥४॥

शिंग काहाळा मोहर्‍या पावे । गोवळ नाचताती सुहावे ।

वरी धरूनियां चांदिवे । भोंवतीं खिल्लारें वत्सांचीं ॥५॥

ब्रह्मा म्हणे आणिलीं केव्हां । म्यां तों लपविली होतीं एकीसवा ।

जाऊनियां पाहे तंव तो मेळावा । जोथिल तेथें तैसाचि ॥६॥

निळा म्हणे लाविलें पिसें । ब्रह्मया येण्याजाण्याचाचि वळसे ।

मग लज्जित होऊनियां मानसें करीत स्तवनें श्रीहरीचीं ॥७॥

४८.

तंव कृष्णाभोंवते गोवळ । भासती चतुर्मुखचि सकळ ।

करीत वेदघोष कल्लोळ । पदें क्रमें निरुक्तें ॥१॥

ब्रह्मा म्हणे हें नवल झालें । ते तेथिल येथें हे कोठुनि आले ।

चतुर्मुखहि दिसती भले । न कळे महिमान श्रीहरीचें ॥२॥

मग जोडुनियां प्राणीतळ । चरणीं ठेवूं इच्छी निढळ ।

त्राहें त्राहें जी मी केवळ । दास डिंगर कृष्णा तुझा ॥३॥

ऐसा एक संवत्सर । करीत होता नमस्कार ।

म्हणे वत्सें आणि कुमर । आणवाल तरी आणितों ॥४॥

इकडे कृष्ण गोवळेमळीं । आपणसवें आपण धुमाळी ।

खेळत आला पर्वतातळीं । आणि वत्समुखें हुंबरला ॥५॥

चरतां पर्वत मस्तकीं गाई । ऐकोनी हुंकारिल्या ते ठायीं ।

मग उड्या घालूनियां पाही । पाजविती पान्हा वत्सांसी ॥६॥

निळा म्हणे जगत्रयजीवन । वत्सें झाला असे आपण ।

यालागीं स्नेहाचें महिमान । अधिकाधिक गाईपोटीं ॥७॥

४९.

गवळी होते राखणाईत । ते ते म्हणती झाला घात ।

गाई बुजाल्या आकस्मात् । पडणपात त्या झाला ॥१॥

मग ते आले पायवाट । पाहाती गाई तंव सुभटा ।

वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचे ॥२॥

नेणों क्षीरसिंधु सोहळा । पाहों आला कृष्णलीला ।

तेणें क्षीराचिया सुकाळा । केलें वत्सां आणि गौळियां ॥३॥

ऐसा झाला संध्याकाळ । तंव पातले गौळणींचे मेळ ।

सांजवणी दुडिया घेऊनि सकळ । करित गायनें सुस्वरें ॥४॥

गौळीं म्हणती पिंजल्या गाई । गोविंद म्हणे दोहाते त्याही ।

आजि दुधासी उणेंचि नाहीं । न पुरती पात्रे तैसिचि क्षीरें ॥५॥

गोवळ आपुलालिये घरीं । रात्रीं वसती सुखशेजारीं ।

दिवसा जाती वनांतरीं । वत्सापाठीं हरिसंगें ॥६॥

निळा म्हणे चतुरानन । आला गोवत्सें घेऊन ।

म्हणे नेणता महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel