१.

दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट । गहिवरें कंठ दाटताहे ॥१॥

ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टकोनियां वनामाजी ॥२॥

आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥३॥

काय हें सामर्थ्य नव्हते तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥४॥

तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥५॥

कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥६॥

२.

सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥

पावलों आपुलें केलें लाहें रस । निदैवा परिस काय होय ॥२॥

कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापवरी तरी उपदेशीं ॥३॥

उचित अनुचित सांभाळिलें नाहीं । कान्हा म्हणे कांई बोलों आतां ॥४॥

३.

असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येईल येथें ॥१॥

करुं कांहीं दिस राहे तो सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥२॥

करितां रुदना बापुडें म्हणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥३॥

तुकायबंधु म्हणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥४॥

४.

चरफडें चरफडें शोकें शोक होय । कार्यमुळ आहे धीरापाशी ॥१॥

कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥२॥

न चुके होणार सांडिल्या शुरत्वा । फुकटचि सत्त्वा होईल हीना ॥३॥

तुकयाबंधु म्हणे दिल्या बंद मना । वांचुनी निधाना न पावीजे ॥४॥

श्रीतुकोबांच्या वियोगामुळें कन्होबाचें श्री विठ्ठलाशीं कठोर भाषण

५.

नलगे चिंता आतां अनुमोदना हाता । आलें मुळ भ्राता गेला त्याचें ॥१॥

घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरिती कवळून पाय दोन्ही ॥२॥

त्याचें त्याचिया मुखें पडियेलें ठावें । नलगे सारावें मागें पुढें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥४॥

६.

मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥

ऐसें हें कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नहीं दुजा ॥२॥

वैष्णव हे हेर तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥३॥

तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास । तेणेंच आम्हांस नागविलें ॥४॥

७.

नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥

मागतों इतुकें जोडूनियां कर । ठेवूनियां शीर पायंवरी ॥२॥

तुम्हां आम्हांस एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय वरा ॥३॥

तुकयाबंधु म्हणे बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे ॥४॥

८.

बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥१॥

एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केलीं आम्हां ॥२॥

कान्हा म्हणे का रे निष्कम दिखिलें । म्हणोनी मना आले करितोसी ॥३॥

९.

निनांव हें तुला । नावं साजे रे विठ्ठला ।

बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥

कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ।

भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥२॥

मुद्राधारण माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे ।

हातीं फाशांचें गुंडाळें । कोण चाळे गुहस्था हे ॥३॥

तुकयाबंधु म्हणे मिस्कीन । करितोसी देखोन ।

पाहा दुरीवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥४॥

१०.

लालुचाईसाठीं बळकाविसी भावा । परि मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥

असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥२॥

मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंतराळ हृदय तुझें ॥३॥

करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीना । काढून घेईना निज वस्तु ॥४॥

११.

भक्ति मुक्ति तुझें जळो ब्रह्मज्ञान । दे माझ्या आणोन भावा वेगीं ॥१॥

रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥२॥

नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणून वेगीं ॥३॥

नको होऊं काहीं होसील प्रसन्न । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥४॥

तुकयाबंधु म्हणे पाहा तो नाहीं तरी । हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥५॥

१२.

धींदधींद तुझ्या करीन चिंधड्या । ऐसें काम वेड्या जाणितलें ॥१॥

केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरी नास आरंभिला ॥२॥

मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भांड कांहीं ॥४॥

१३.

तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥

मग कालावुली हाका देते वेळे । होतोसी परी डोळे नुघडिसी ॥२॥

जाणोनी अज्ञान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥३॥

तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीती । पाहतां वेळ किती तेच गुण ॥४॥

१४.

मुख्य आहे तुम्हां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥

नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारुनी ॥२॥

साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेईन मी ॥३॥

तुकयाबंधु म्हणे आइकें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥४॥

१५.

नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं ।

पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥

माझें नेलें पांघुरुण । ठावें असोन दुर्बळ दीन ।

माणसांमधुन । उठविलें खाणोर्‍या ॥२॥

आम्ही हे जगवूनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनी ।

जालसी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥३॥

तुकयाबंधु म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें ।

ऐसें काय गेलें । होते तुज न पुरतें ॥४॥

१६.

अवघीं तुज बाळें सारिखीं नाही तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥

म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळीं धरीलीं एके दुरी ॥२॥

एकां सुख द्यावें घेऊनी वोसंगा । एके दारीं गळा श्रमविती ॥३॥

एकां नवनीत पाजावें दाटुन । एकें अन्न अन्न करितील ॥४॥

एके वाटतील नवजावी दूर । एकांचा मत्सर जवळी येतां ॥५॥

तुकयाबंधु म्हणे नावडती त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥६॥

१७.

कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ ।

म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटु दिसतोसी ॥१॥

काय केलें होतें आम्हीं । सांग तुझें एक ये जन्मीं ।

जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥२॥

भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा ।

करूनी बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥३॥

तुकया बंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला ।

जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहीं तरी ॥४॥

१८.

आतां कळों आले गुण । अवघेचे यावरून ।

चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥

या नांवें कृपासिंधु । म्हणवितोसी दिनाबंधु ।

मज तरी मैंदू । दिसतोसी पाहतां ॥२॥

अमंळ दया नाहीं पोटीं कठिण तैसाचि कपटी ।

आंधळ्याची काठी । माझी गुदरसीच ना ॥३॥

तुकयाबंधु म्हणे पूरता । नाहीं म्हूण बरें अनंता ।

एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥४॥

१९.

कया सांगों हृषीकेशी । आहे अनुताप आला ऐसा ।

गिळायासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥

माझें बुडविलें घर । लेकरें बाळें दारोदार ।

लाविली काहार । तारातीर करोनी ॥२॥

जीव घ्यावा किंवा द्यावा । तुझा आपुला केशवा ।

इतकें उरलें आहे देवा । भावाचिया निमित्यें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे जग । बरें बाईट म्हणों मग या ।

कारणें परि लाग । न सांडावा सर्वथा ॥४॥

२०.

मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी ।

तोहि परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥

हे कां भक्तीचें उपकार । नांदतें विध्वंसिलें घर ।

प्रसन्नता व्यवहार । सेवटीं हे जालासी ॥२॥

एका जीवावरी । होती दोनी कुटुंबारी ।

चाळवूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥३॥

तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला ।

वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥४॥

२१.

पूर्वीं पूर्वजाची गती । हेची आइकिली होती ।

सेवे लावुनी श्रीपती । निश्चिंती केली तयांची ॥१॥

कां रे पाठी लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी ।

अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हूण ॥२॥

जन्माजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा ।

निमित्य चालवा । काईसयास्तव हें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा ।

देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥४॥

२२.

निसुर संसार करून । होतों पोट भरून ।

केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥

ऐसा काढिला नीस । काय म्हूण सहित वंश ।

आणिलें शेवटास । हाऊस तरी न पुरे ॥२॥

उरलों पालव्या शेवटीं । तेंही न देखवे दृष्टी ।

दोघांमध्यें तुटी । रोकडीचा पाडिला ॥३॥

तुकया बंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाढ ।

म्हणोनि कां बुड । मुळ्यासहित खावें ॥४॥

२३.

बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति ।

करुं येते राती । ऐसी डोळे झांकुनी ॥१॥

आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा ।

आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥२॥

सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व ।

येईल येई परि हा भाव । ज्याचा आहे तुज आधीं ॥३॥

असेंच करूनी किती । नागविली नाहीं नीती ।

तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥४॥

२४.

कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां ।

काय होईल अनंता । पहा बोलो कांसया ॥१॥

बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले ।

काबाड चुकले । केलें कष्टावेगळें ॥२॥

बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा ।

बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥३॥

तुकयाबंधु म्हणे दगा । बरा दिला होता बगा ।

झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥४॥

२५.

देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel