२६.

मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला ।

तेणेंचि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥

इतका न लागला उशीर । न धरितों भीडभार ।

सिद्धासी व्यवहार । कासयसी लागला ॥२॥

असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा ।

धरणेंहि दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥३॥

अझुन तरी इतक्यावरी । चुकवी जनाचार हरी ।

तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥४॥

२७.

आतां न राहे क्षण एक । तुझा कळला र लौकिक ।

नेदी हालों एक एक । कांहीं केल्यावांचुनी ॥१॥

संबंध पडिला कोणाशीं । काय डोळे झांकितोसी ।

नेईन पांचांपाशी । दे नाहीं तरी वोढूनी ॥२॥

सुखें नेदीस जाणवलें । नास कल्याविण उगलें ।

तरी तेंही विचारिलें । आम्ही नांवा वांचूनि दुजा नाइकों ॥३॥

सर्वगुणें सपन्न । कळों आलासी संपूर्ण ।

तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥

२८.

तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें ।

परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥

नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनी ।

पाहा विचारोनी । आढी धरोनी काम नाहीं ॥२॥

अवघे राहिले प्रकार । झालों जिवासी उदार ।

असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥३॥

आतां निदसूर नसावे । गांठ पडली कुणब्यासवें ।

तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्त्व आपुलें ॥४॥

२९.

बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा ।

एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥

देणें आहे कीं भंडाई । करणें आहे सांग भाई ।

आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥२॥

मागें गेलें जें हो‍ऊनी । असो ते धरित नाहीं मनीं ।

आतां पुढें येथूनी । कैसा काय विचार ॥३॥

सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ ।

तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥४॥

३०.

आतां हें न सुटे न चुके । बोल कं दवडिसी फिके ।

जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाठीं ॥१॥

नये सरतां नव्हें भलें । तुझें लक्षण कळलें ।

बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥२॥

दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैदांचे चाळे ।

दिसतासी ये वेळे । काय करूं विसंबोनी ॥३॥

तुकयाबंधू म्हणे देखतां । अंध बधिर ऐकतां ।

कैसें व्हावें आतां । इतुकियाउपरी ॥४॥

३१.

तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक ।

अवघा बुडविला लौकिक । सुखेंचि भीके लाविली ॥१॥

थोटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।

म्हणोनि शहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतीना ॥२॥

निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ।

नागवणा या नांवा । वांचुनि दुजा नाइको ॥३॥

सर्वगुणें संपन्न । कळों आलसी संपूर्ण ।

तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥

३२.

तोचि प्रसंग आला सहज । गुज धरिता नव्हे काज ।

न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥

तूं तर न होसी शहाणा । नये सांगतों तेंही मना ।

आपण आपणा । आतां प्रयत्‍न देखावा ॥२॥

न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट ।

कांस घालुनियां नीट । चौघाचार करावा ॥३॥

आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन ।

न पडे तयावीण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥४॥

३३.

हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड ।

जाणवेल निवाड । करिसी परि पुढें ॥१॥

मी तो सांगून उतराई । झालों आतां तुज काई ।

कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥२॥

मागें युगें अठ्ठावीस । जालीं दिवसांचा दिवस ।

मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकी तुझीं तीं सुखें ।

जगजाहिर ठाउकें । झालें नाहीं खंडलेंसें ॥४॥

३४.

पत्र उचटिलें प्रयत्‍नें । ग्वाही कराया कारणें ।

नाहीं तरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥

नांव तुझेंचि करोनी । आहों सुखें पोट भरोनी ।

केली केली जाणवणी । म्हण‍उनि नाहीं म्हणसील ॥२॥

आतां इतुकियाउपरी । दे नको भलतें करीं ।

म्हणती ऋणकरी । आमुचा इतकें उदंड ॥३॥

तुकयाबंधु जागा । आळवावया पांडुरंगा ।

केला कांहीं मागा । याची नव्हती गरज ॥४॥

३५.

माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी ।

आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥

आतां नलगे यावे जावें । कोठें कांहींच करावें ।

जन्मोंजन्मीं सुखें खावें । बैसोनसें जालें ॥२॥

असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर ।

न माये अपार । त्रिभुवनीं सांठवितां ॥३॥

अवघें भरलें सदोदित । जालें सुखाचें पर्वत ।

तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्‌भुत सांपडलें ॥४॥

३६.

आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र ।

घरासी अगर । आला सकळ सिद्धींचा ॥१॥

जालों निधाई निधानें । लागलें अनंतगुणरत्‍न ।

जन्माचें विच्छिन्न । दुःख झालें दारिद्र ॥२॥

तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवले आले येथें ।

ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा ।

आतां पुरुषोत्तमा । ऐसा सौदागर सांपडला ॥४॥

३७.

सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें ।

केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वीचिया ॥१॥

सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां ।

निवारिली चिंता । देणें घेणें चुकलें ॥२॥

जालें भांडवल घरीचें । अमूप नाम विठ्ठलाचें ।

सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥३॥

तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला ॥

चाड दूसरी विठ्ठला । वांचूनियां आणिक ॥४॥

३८.

विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद । विठ्ठलारे दग्ध झालीं पापें ॥१॥

विठ्ठलारे तुझें पाहतां श्रीमुख । विठ्ठलारे सुख झालें नयना ॥२॥

विठ्ठलारे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥३॥

विठ्ठलारे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥४॥

विठ्ठलारे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥५॥

३९.

चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥

नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥

हरपला द्वैतभाव । तेणें देहचि झाला वाव ॥३॥

तुकयाबंधु म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥४॥

४०.

अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥

ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥२॥

उत्तमाचें सार वेदांचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीर्थें होतीं ॥३॥

म्हणे तुकयाबंधु आणिक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥४॥

४१.

उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेले ।

नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥

काय बडिवार सांगसी वायां । ठाया पंढरिराया आहेसि आम्हां ।

एकलाचि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥२॥

कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला बाणीं ।

पडिला भूमी परी नयेचि करुणा । दांत पाडियेले दोन्हीका ॥३॥

श्रियाळ बापुडें सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ।

ऐसा कठीण कोण होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥४॥

शिबी चक्रवती करितां यज्ञयाग । त्याचें चिरलें अंग ठायीं ठायीं ।

जाच‍उनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥५॥

बळीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देउनि माथां ।

कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्र कथा ॥६॥

हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं ।

पाडिला बिघड नळदमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥७॥

आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपत्ति गाउसीच्या ।

वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥८॥

४२.

तुम्हां आम्हांसी दरूषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥

म्हणवुनी करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥२॥

भविष्याचे माथां देह । कोण जाणे होईल काय ॥३॥

म्हणे तुकयाचा बांधव । आमचा तो झाला भाव ॥४॥

४३.

मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ ॥१॥

दे रे भेटी पंढरीराया । उभारोनि चारी बाह्मा ॥२॥

सर्वाग तळमळी । हात पाय रोमावळी ॥३॥

तुकयाबंधु म्हणे कान्हा । भुक लागली नयना ॥४॥

४४.

आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥

मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ।

श्रुति वाखणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥

म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥

४५.

म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता ॥१॥

होऊनियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥२॥

मृगजळाचियापरी । तैसें न करावें हरी ॥३॥

तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्मात्कारी ॥४॥

४६.

आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥

केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥

हातां चढलें धन । वर्णिता लक्षण रे देवा ॥३॥

मन जालें उन्मन । अनुपम ग्रहण ।

तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥४॥

कलिमहिमा

४७.

पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ।

पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥

ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।

केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥२॥

थोर य युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ।

सांडूनिया द्विजवर । दावला पीर स्मरताती ॥३॥

ऐसें यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।

नाहीं ऐसी झाली नीत । हाहा भूत पातलें ॥४॥

शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।

ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगलें ॥५॥

राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।

म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती ॥६॥

येर भोरप्याचेविशीं । धांवती भूतें आमिषा तैसीं ॥

कथा पुराण म्हणतां सिसी । तिडिके उठे नकरियाची ॥७॥

विषयलोभासाठीं । सर्वार्थेसी प्राण साटी ।

परमार्थी पीठ मुठीं । मागतां उठती सुनीसी ॥८॥

धनाढ्य देखोनि अनामिके । तयांतें मानिती आवश्यक ।

अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्विक संपन्न ॥९॥

पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।

सुनाचिया दासी । सासा झाल्या आंदण्य ॥१०॥

खोटें झाले आली विवसी । केली मर्यादा नाहींसी ।

भार्या ते भ्रतारासी । रंक तैसी मानिती ॥११॥

नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।

पोटासाठीं खौसा । वंदिती म्लेंच्छाच्या ॥१२॥

बहुत पाप झालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।

अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरिती कोणाचा ॥१३॥

कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।

विडे घेऊनि ब्राह्मण । अविंधवाणी वदताती ॥१४॥

कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासींचीं चुंबिती ।

सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१५॥

मद्मपानाची शिराणी । नवनीता न पुसे कोणी ।

केळवल्या व्यभिचारिणी दैन्यावाणी पतिव्रता ॥१६॥

केवढी दोषाची सबळता झाली पाहा हो भगंवता ।

पुण्य धुडावोनी संतां । तीर्थां हरी आणिली ॥१७॥

भेणें मंद झाली मेघवृष्टि । अकांतली कांपे सृष्टी ।

देव रिघाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१८॥

अपीकें धान्य दिवसेंदिवसें । गाई म्हैसी चेवल्या रसें ।

नगरें दिसती उदासें । पिकलीं बहुवसें पाखाडें ॥१९॥

होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें ।

जपतपादि साधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥२०॥

अठरा यातींचा व्यापार । करिती तस्कराई विप्र ।

सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२१॥

गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।

अश्वाचियेपरी विकिती । कुमारी वेदवक्ते ॥२२॥

वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची ।

आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२३॥

मुख्य सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलों दीनें ।

कुडीं कपटी महा मोहनें । शठ दुर्जनें मिरविताती ॥२४॥

कलाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।

विधिनिषेधाच्या वाही । एकही ऐसीं नाडिलीं ॥२५॥

जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होती वैरागी दिगांबरी ।

निस्पृही कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरीं न सुटती ॥२६॥

कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक ।

पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तताती ॥२७॥

केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन ।

याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दमकरूनि विटाळविले ॥२८॥

पूर्वीं होतें भविष्य केलें । संतीं तें यथार्थ झालें ।

ऐकत होतों तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२९॥

आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्यें वावरावें ।

देवाशी भाकोनी करुणारवें । वेगें स्मरावें अंतरीं ॥३०॥

अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसी या कौतुका ।

धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३१॥

४८.

ओले मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर ।

गुंफा करिताती पोखर । त्याचा नका करूं आंगीकार गा ॥१॥

वासुदेव करितो फेरा । तूं अद्यापी कां निदसूरा ।

सावध होईरे गव्हारा । भज भज का सांरगधरा ॥२॥

बा तुझें तूं सोईरे । तूंची वडिल पैं बाघारे ।

तूं तुझेनी आधारें । वरकड मिनले ते अवघे चोर गा ॥३॥

वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो ।

हा दुर्लभ मानव देह वो । तुकयाबंधु स्वहित लवलाहो गा ॥४॥

४९.

जेणें माझी लपविली पिवळी गोटी । उलट भवर्‍याची चोरी घाली पाठी ।

पाहे पाहे कंचुकी सोडूनी गाठी । हृदयीं शंकोनि एकांत घाली मिठी वो ॥१॥

पहा पहा सांवळा कैसा धीट । बोली बोलूं नये बोलतो उद्धट ।

याच्या बोलण्याचा कोणा नये वीट । याजवरोनि देह ओंवाळा संपुष्ट ॥२॥

अवचित माझ्या डोळ्यांत गेलें कणू । फुंकोनि काढितां वाटलें समाधानु ।

शहाणा तुझा गे कानडा नारायणु । चुंबन घेतां नाठवे देहभानु ॥३॥

नवनीत देखोनि लावितो लाडीगोडी । गुनी खुणाविता राजस डोळे मोडी ।

आगमानिगमा न कळे याच्या खोडी । तुकयाबंधु चरणीं हात जोडी ॥४॥

५०.

न गमे न गमे न गमे हरिविण । न गमे न गमे न गमे मेळवा शाम कोणी गे ॥१॥

तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा वोसा वो ॥२॥

नाठवे भूक तान विकळ जाले मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वा ॥३॥

जरी तुम्ही नोळखा सांगतों ऐका । तुकयाबंधुचा सखा जगजीवन वो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel