अर्जुन उवाच ---

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।

यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ‍ ॥१॥

मग तो किरीटी । श्रीहरीतें म्हणे । कैसें हो बोलणें । आपुलें हें ॥१॥

एक चि तें मज । सांगाल साचार । करुं ये विचार । तरी त्याचा ॥२॥

मागें सकल हि । कर्माचा संन्यास । तुम्ही बहुवस । सांगितला ॥३॥

तरी आतां केवीं । कर्मयोगीं भर । देत असां फार । पुन्हां येथें ॥४॥

आम्हां नेणत्यांसी । होई ना उकळ । ऐसे व्द्यर्थ बोल । बोलतसां ॥५॥

एकतत्त्वबोध । करावा म्हणाल । तरी व्हावा बोल । एकनिष्ठ ॥६॥

तुम्हां सर्वज्ञातें । प्रभो चक्रपाणी । काय आणिकांनीं । सांगावें हें ॥७॥

आपणासारिख्या । थोरांसी विनंति । देखा केली होती । ह्या चि लागीं ॥८॥

कीं हा परमार्थ । संदिग्ध भाषेंत । न बोलावा येथ । भगवंतें ॥९॥

परी तें मागील । असो आतां देवें । प्रस्तुत सांगावें । उकलोनि ॥१०॥

दोहोंमाजीं मार्ग । कोणता बरवा । तो मज बोलावा । स्पष्टपणें ॥११॥

शेवटापर्यत । सर्वथा निश्चित । करी जो सोबत । साधकासी ॥१२॥

तेवीं चि जो होय । पूर्णत्वें सफळ । स्वभावें सरळ । आचराया ॥१३॥

निद्रेचें तें सुख । न मोडतां जेथें । वाटचाल होते । बहुसाळ ॥१४॥

ऐसें सुखासन। असावें वाहन । तैसें तें साधन । व्हावें सोपें ॥१५॥

ऐसे अर्जुजाचे । ऐकोनियां बोल । प्रेमें आला डोल । देवालागीं ॥१६।

मग संतोषोनि । म्हणे ऐकें पार्था । पुरेल सर्वथा । मनोरथ ॥१७॥

जया भाग्यवंता । कामधेनु माय । चंद्र तो हि होय । खेळ त्याचा ॥१८॥

उपमन्यूलागीं । होवोनि प्रसन्न । देव दयाघन । सदाशिव ॥१९॥

देई क्षीरोदधि । त्यासी दूधमाता । होय पुरविता । भक्त -काम ॥२०॥

तैसें औदार्याचें । माहेर श्रीकृष्ण । अर्जुना -आधीन । जरी झाला ॥२१॥

तरी सर्व सुखां । आश्रयाची जागा । कां न व्हावा सांगा । कौन्तेय तो ॥२२॥

मानावें हो येथें । नवल तें काय । रमाकांत होय । स्वामी ज्याचा ॥२३॥

तेणें आतां इच्छे -। सारिखें मागावें । हें तों ओघा यावें । स्वभावें चि ॥२४॥

म्हणोनियां पार्थे । मागितलें तें तें । दिलें रमाकांतें । संतोषोनि ॥२५॥

तरी आतां तें चि । ऐका सावधान । सांगेन श्रीकृष्ण । काय बोले ॥२६॥

श्रीभगवानुवाच ---

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।

तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥२॥

म्हणे मोक्षप्रद । दोन्ही हि ते देख । संन्यास आणिक । कर्मयोग ॥२७॥

असे जरी ऐसें । अर्जुना साचार । तत्त्वतां विचार । करुं जातां ॥२८॥

तरी जैसी नाव । स्त्रियां -बाळकांतें । पैलतीरा नेते । जळांतून ॥२९॥

जाणत्यां -नेणत्यां । सकळांसी तैसा । सोपा सुबोधसा । कर्मयोग ॥३०॥

पार्था , सारासार । करितां विचार । सुलभ साचार । हा चि योग ॥३१॥

कर्मसंन्यासाचें । येणें योगें फळ । लाभतें सकळ । अनायासें ॥३२॥

आताम संन्यासी जो । तयाचें लक्षण । तुज निवेदीन । ह्या चि लागीं ॥३३॥

मग दोन्ही मार्ग । साच एकरुप । ऐसें आपोआप । जाणशील ॥३४॥

ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।

निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥३॥

होवोनि जें गेलें । न घे त्याचें नांव । नाहीं जया हांव । कोणती हि ॥३५॥

असे मेरु जैसा । सर्वथा अढळ । तैसा जो निश्चळ । अंतर्यामीं ॥३६॥

अहंता ममत्व । गळालीं संपूर्ण । संन्यासी तो जाण । निरंतर ॥३७॥

तयासी आसक्ति । सोडोनियां जाय । मनें ऐसा होय । संन्यासी जो ॥३८॥

म्हणोनि जें साचें । सुख अखंडित । तें चि तया प्राप्त । अनायासें ॥३९॥

आतां गृहादिक । लागे ना सोडावें । निःसंग स्वभावें । मन झालें ॥४०॥

अगा , जैसी जातां । विझोनियां आग । राखुंदीचा ढीग । उरे जो का ॥४१॥

मग वस्त्रामाजीं । गुंडाळितां त्यास । न होई वस्त्रास । अग्नि -बाधा ॥४२॥

शिवे चि ना तैसा । अल्प हि संकल्प । जयाच्या निर्लेप । बुद्धीलागीं ॥४३॥

उपाधिमाझारीं । असोनि तो पार्था । नाकळे सर्वथा । कर्मबंधी ॥४४॥

म्हणोनि समूळ । संकल्पाचा नाश । तेव्हां चि संन्यास । घडूं शके ॥४५॥

ह्याचिलागीं कर्म -। संन्यास आणिक । कर्म -योग देख । सारिखे च ॥४६॥

सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।

एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ‍ ॥४॥

नाहीं तरी सांख्य -। योग -व्यवस्था ती । केविं मंदमती । जाणती ते ॥४७॥

स्वभावें ते पार्था । होती मतिमंद । म्हणोनियां भेद । दिसे त्यांसी ॥४८॥

एर्‍हवीं प्रत्येक । दीपाप्रति पाहें । प्रकाश का आहे । भिन्न भिन्न ? ॥४९॥

ह्यापरी यथार्थ । घेवोनि प्रचीति । देखते जे होती । पूर्ण तत्त्व ॥५०॥

सांख्य आणि योग । दोहोंचे हि ठायीं । ठेविती ते पाहीं । ऐक्यभाव ॥५१॥

यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।

एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥५॥

ज्ञानयोगें पार्था । होय जें का प्राप्त । तें चि लाभे येथ । कर्मयोगें ॥५२॥

ऐशा परी ऐक्य । स्वभावतां आहे । दोहोंसी हि पाहें । सव्यसाची ॥५३॥

देखें अवकाशा । आणिक आकाशा । भेद नाहीं जैसा । अणुमात्र ॥५४॥

तैसें चि एकत्व । योग -संन्यासाचें । जया आलें साचें । प्रत्ययासी ॥५५॥

जेणें सांख्य योग । जाणिले अभिन्न । झालें आत्मज्ञान । तयासी च ॥५६॥

तेणें चि गा जाण। आपुलें आपण । घेतलें दर्शन । यथार्थत्वें ॥५७॥

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।

योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति ॥६॥

कर्मयोगपंथ । आक्रमोनि पार्था । चढे जो पर्वता । मोक्षरुप ॥५८॥

तो चि येथें ब्रह्म -। सुखाचें शिखर । गांठितो सत्वर । अनायासें ॥५९॥

परी अव्हेरुनि । निष्काम कर्मास । धरी जो हव्यास । संन्यासाचा ॥६०॥

तयालागीं वायां । बापुडे सायास । घडे ना संन्यास । कदा काळीं ॥६१॥

योगयुक्तो विशुद्द्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।

सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥७॥

आपुलें मानस । घेतलें हिरोनि । संमोहापासोनि । जेणें पार्था ॥६२॥

मग गुरु -वाक्यें । करोनि निर्मळ । रोविलें केवळ । आत्मरुपीं ॥६३॥

जोंवरी पडे ना । सागरीं लवण । तोंवरी तें भिन्न । एकदेशी ॥६४॥

परी सिंधूमाजीं । तें चि पडे जेव्हां । होतसे तें तेव्हां। सिंधुरुप ॥६५॥

संकल्पापासोनि । तैसें चि काढिलें । ज्याचें मन झालें । ब्रह्मरुप ॥६६॥

असो एकादशी । परी तेणें जाण । व्यापिलें संपूर्ण । लोकत्रय ॥६७॥

कर्ता -कर्म -कार्य। त्रिपुटी ही ऐसी । खुंटली तयासी । आपोआप ॥६८॥

आणि सर्व कर्मे । करी जरी आतां । तरी तो तत्त्वतां । अकर्ता चि ॥६९॥

नैव किंचित्करोमिति युक्तो मन्येत तत्त्ववित् ‍ ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिन्नश्रन्गच्छन्स्वपञ्श्वसन् ‍ ॥८॥

प्रलपन्विसृजन्गृह्रन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।

इंद्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ‍ ॥९॥

तयाचिया ठायीं । स्वभावतां पाहीं । देहबुद्धि नाहीं । अल्पमात्र ॥७०॥

तरी कैचें काय । कर्तृत्व तें मग । तेथें उरे सांग । धनुर्धरा ॥७१॥

ऐसे ब्रह्म -गुण । तनुत्यागाविण । दिसती संपूर्ण । तयाठायीं ॥७२॥

एर्‍हवी आणिकां -। सारिखा चि देख । असे तो हि एक । देहधारी ॥७३॥

आणि यथाप्राप्त । सर्व हि व्यापार । करी तो साचार । दिसे ऐसें ॥७४॥

आणिकांसारिखा । तो हि नेत्रीं पाहे । तेविं ऐकताहे । कर्णद्वारा ॥७५॥

परी त्या व्यापारीं । सर्वथा तो नोहे । नवल हें पाहें । धनुर्धरा ॥७६॥

घ्राणेंद्रियद्वारा । घेई परिमळ । स्पर्श हि सकळ । जाणूं शके ॥७७॥
प्रसंग पाहोन । उचित तें जाण। करी संभाषण । तो हि पार्था ॥७८॥

घेतसे आहार । त्यजावें तें गाळी । सुखें झोंपे वेळीं । निद्रेचिया ॥७९॥

दिसे हिंडतांना । इच्चावशें तो हि । करी सर्व कांहीं । ऐसीं कर्मे ॥८०॥

देखें आतां सांगूं । कायसें एकैक । श्वासोच्छ्‌वासादिक । आणिक हि ॥८१॥

उघडावे नेत्र । मिटोनियां घ्यावे । सर्व हि करावें । तेणें ऐसें ॥८२॥

तरी स्वानुभूति । लाभली म्हणोन । नुरे कर्तेपण । तयाठायीं ॥८३॥

भ्रांति -शेजेवरी । सुप्त होता जेव्हां । भुलला तो तेव्हां । स्वप्नसुखें ॥८४॥

ज्ञानोदयीं मग । येतां जागृतीस । मावळे आभास । स्वप्नांतील ॥८५॥

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥१०॥

आताम आत्मसंगें । सर्वेद्रिय -वृत्ति । वावरती अर्थी । आपुलाल्या ॥८६॥

दीपाधारें जैसे । गृहींचे व्यापार । चालती साचार । धनुर्धरा ॥८७॥

तैसीं सर्व कर्मे । तयाचिया देहीं । होवोनि जो राही । योगयुक्त ॥८८॥

जैसें पद्म -पत्र । असोनि जळांत । जळें नव्हे लिप्त । कदा काळीं ॥८९॥

तैसा सर्व कर्मे । करोनि तो पार्था । पावे ना सर्वथा । कर्मबंधा ॥९०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel