कायेन मनसा बुद्धया केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वाऽऽमशुद्धये ॥११॥

जयाची चाहूल । लागे ना बुद्धीतें । अंकुरे ना जेथें । मनोधर्म ॥९१॥

ऐशा कर्मालागीं । अर्जुना साचार । ‘शारीर ’ व्यापार । हेंचि नांव ॥९२॥

करोनियां सोपे । सांगेन हे बोल । जैसी हालचाल । बालकाची ॥९३॥

योगीजन तैसीं । कर्मे तीं सकळ । करिती केवळ । ‘शारीर ’ जीं ॥९४॥

पंचभूतात्मक । झोंपतां शरीर । मनाचे व्यापार । स्वप्नीं जैसे ॥९५॥

वासनेचा कैसा । पसारा हा पाहें । नवल हें नोहे । काय पार्था ॥९६॥

देहालागीं होवों । न देतां जागृत । कैसी भोगवीत । सुखदुःखें ॥९७॥

इंद्रियांसी नाहीं । जयाची वार्ता हि । व्यापार तो पाहीं । ‘मानसिक ’ ॥९८॥

ऐसा जो केवळ । ‘मानस ’ व्यापार । करिती साचार । तो हि योगी ॥९९॥

परी कर्मे बद्ध । न होती ते पाहीं । अहंभाव नाहीं । म्हणोनियां ॥१००॥

होतां भूतबाधा । भ्रमोनियां चित्त । मग तो भ्रमिष्ट । वागे जैसा ॥१०१॥

इंद्रिय -व्यापारीं । नसे कांहीं ताळ । सर्व हि अमेळ । क्रिया होती ॥१०२॥

रुप तरी देखे । आळविलें ऐके । शब्द बोले मुखें । नेणिवेंत ॥१०३॥

ऐसें कार्जेवीण । करी जें सकळ । कर्म तें केवळ । ‘इंद्रियांचें ’ ॥१०४॥

सर्वत्र जाणीव । ठेवोनि जें होतें साच बुद्धीचें तें । कर्म जाण ॥१०५॥

बुद्धीचें नेतृत्व । स्वीकारोनि चांग । वावरती मग । दक्षतेनें ॥१०६॥

परी ते नैष्कर्म्य -। स्थितीतें हि पूर्ण । गेले ओलांडून । धनुर्धरा ॥१०७॥

बुद्धीपासोनियां । शरीरापर्यत । अहंतेची मात । नाहीं तेथें ॥१०८॥

म्हणोनि ते कर्मी । वर्ततां हि जाण । शुद्ध होती पूर्ण । स्वभावें चि ॥१०९॥

कर्तृत्वाहंकार । गाळोनियां जें जें । स्वभावें निपजे । कर्मजात ॥११०॥

तें चि तें नैष्कर्म्य । ऐसी ही पावन । गुरुगम्य खूण । जाणती ते ॥१११॥

आतां शांतरस । भरोनि सर्वत्र । सांडोनियां पात्र । वाहूं लागे ॥११२॥

कीं जें नये बोलें । दावितां बोलोन । तयाचें व्याख्यान । झाले येथ ॥११३॥

इंद्रियांचा पांग । चांग झाला दूर । श्रवणाधिकार । तयांसी च ॥११४॥

असो पुरे आतां । नको बोलूं फार । सोडोनि साचार । कथाभाग ॥११५॥

श्लोकसंगतींत । येईल व्यत्यय । म्हणोनि विषय । नको दुजा ॥११६॥

आकळाया जें का । येई ना मनासी । शोधितां बुद्धीसी । सांपडे ना ॥११७॥

बोलीं बोललासी । तें चि तूं सकळ । दैव अनुकूल । म्हणोनियां ॥११८॥

स्वभावें सर्वथा । जें का शब्दातीत । तें चि होय प्राप्त । बोलांमाजीं ॥११९॥

तरी आणिकांचें । काय प्रयोजन । गीतार्थ -व्याख्यान । करीं आतां ॥१२०॥

श्रोत्यांची ही ऐसी । जाणोनि उत्कंठा । म्हणे दास आतां । निवृत्तीचा ॥१२१॥

श्रीहरी -पार्थाचा । संवाद गहन । तो चि सावधान । ऐका पुढें ॥१२२॥

मग पार्थालागीं । बोले जनार्दन । अर्जुना होवोन । दत्तचित्त ॥१२३॥

ऐक आतां साच । योग्याचें लक्षण । तुज निवेदीन । संपूर्णत्वें ॥१२४॥

युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नौष्ठिकीम् ‍ ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥१२॥

तरी आत्मज्ञानें । होवोनि संपन्न । गेला जो विटोन । कर्म -फळा ॥१२५॥

जगामाजीं शांति । तयासी साचार । रिघोनियां घर । माळ घाली ॥१२६॥

परी प्रापंचिक । लोक जे आणिक । तयांसी बंधक । होती कर्मे ॥१२७॥

तेणें कर्म -बंधें । मग बळकट । बसोनियां गांठ । कामनेची ॥१२८॥

तेथें फळभोग -। खुंटयालागीं जाण । राहिले खिळोन । संसारी ते ॥१२९॥

सर्वकर्माणि मनसा संन्यस्याऽऽस्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ‍ ॥१३॥

सकाम तो चित्तीं । ठेवोनि आसक्ति । कर्मे जैशा रीती । करी येथें ॥१३०॥

तैसा योगी तो हि । करी कर्मे सर्व । परी नसे भाव । कर्तृत्वाचा ॥१३१॥

म्हणोनि तो पार्था । स्वभावें चि जाण । राहे उदासीन । कर्म -फलीं ॥१३२॥

मग जेथें पाहे । तेथें सुख कोंदे । म्हणे तेथें नांदे । महा -बोध ॥१३३॥

फलत्यागी योगी । दिसे देहवंत । नवद्वार -युक्त । देहीं वर्ते ॥१३४॥

परी असोनि हि । नसे चि तो देहीं । करोनि हि कांहीं । करी ना तो ॥१३५॥

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥१४॥

जैसा सर्वेश्वर । अकर्ता साचार । परी चराचर । तो चि रची ॥१३६॥

आणि कर्ता ऐसें । म्हणावें तयासी । तरी तो सर्वाशीं । अलिप्त चि॥१३७॥

कीं तो सर्व कर्मी । सर्वागें संपूर्ण । राहे उदासीन । यथार्थत्वें ॥१३८॥

विघडेना घडी । अकर्तपणाची । मोडे ना तयाची । योगनिद्रा ॥१३९॥

परी पंचमहा -। भूतात्मक सारा । उभारी पसारा । स्वभावें तो ॥१४०॥

जगाचिया जीवीं । असोनियां नाहीं । कोणाचा केव्हांहि । धनंजया ॥१४१॥

स्वभावतां जग । होत जात पाहीं । तयासी वार्ता हि । नसे त्याची ॥१४२॥

नाऽऽदत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।

अज्ञानेनाऽऽवृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥१५॥

पापपुण्यें सारीं । असोनि समीप । तयांचें स्वरुप । देखे ना तो ॥१४३॥

तयांचें साक्षित्व । तें हि तया नाहीं । आणिक तें काई । बोलूं आतां ॥१४४॥

आकाराच्या मेळें । होवोनि साकार । खेळे तो साचार । सर्वेश्वर ॥१४५॥

परी त्या प्रभूचें । निराकारपण । होई ना मलिन । कदा काळीं ॥१४६॥

तो चि सृजी पाळी । आणिक संहारी । ऐसें चराचरीं । बोलती जें ॥१४७॥

तें तों सर्वथैव । केवळ अज्ञान । तत्त्वतां तूं जाण । धनुर्धरा ॥१४८॥

ज्ञानेन तु तदज्ञानं येषं नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ‍ ॥१६॥

तुटे तें अज्ञान । समूळ ज्या वेळीं । भ्रांतीची काजळी । फिटे तेव्हां ॥१४९॥

नष्ट होतां भ्रांति । मग ईश्वरांचे । अकर्तृत्व साचें । प्रकटतें ॥१५०॥

ऐशापरी एक । ईश्वर अकर्ता । ऐसें जरी चित्ता । मानवलें ॥१५१॥

तरी तो च मी । हें स्वभावतां साच । सर्वथा आधींच । आहे सिद्ध ॥१५२॥

ऐसा हा विवेक । प्रकटतां चित्तीं । तया त्रिजगतीं । भेद कैचा ? ॥१५३॥

स्वानुभवें मग । तयालागीं पाहें । सारें विश्व चि हें । मुक्त दिसे ॥१५४॥

पूर्व दिशेचिया । मंदिरांत भली । होतां चि दिवाळी । सूर्यादयें ॥१५५॥

सर्व हि दिशांचा । अंधार तत्काळ । सहर्जे सकळ । दूर होय ॥१५६॥

तद्‍बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥१७॥

तैसें सत्य ज्ञान । व्यापक तें भलें । धुंडळित आलें । जयांलागीं ॥१५७॥

किती तयांची ती । वर्णू समदृष्टी । सांग पां किरीटी । विशेषत्वें ॥१५८॥

आपुलें स्वरुप । ब्रह्मरुप जैसें । देखती ते तैसें । विश्वाचें हि ॥१५९॥

दावावें बोलोन । ऐसें येथें काय । असे गा आश्चर्य । धनंजया ॥१६०॥

कौतुकें हि भाग्य । न देखे दैन्यातें । विवेक भ्रांतीतें । नेणें जैसा ॥१६१॥

किंवा जैसा सूर्य । न देखे स्वप्नींहि । वानगी ती पाहीं । अंधाराची ॥१६२॥

ना तरी अमृत । आपुलिया कानीं । मृत्यूची कहाणी । आइके ना ॥१६३॥

असो हें स्वभावें । शीत -रश्मि जैसा । संताप तो कैसा । ओळखे ना ॥१६४॥

तैसे आत्मज्ञानी । जाहले ते पार्था । नेणती सर्वथा । भूतीं भेद ॥१६५॥

विय्दाविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥१८॥

मग हा मशक । अथवा हा गज । किंवा हा अंत्यज । ब्राह्मण कीं ॥१६६॥

पैल तो परका । येथें हा आपुला । कोठून उरला । भेद ऐसा ॥१६७॥

ना तरी ही गाय । अथवा हें श्वान। एक हा लहान । एक थोर ॥१६८॥

असो हें कोठून । जागत्यासी स्वप्न । तैसा त्यासी भिन्न -। भाव नाहीं ॥१६९॥

जरी अहंभाव । तरी दिसे भेद । समूळ उच्छेद । झाला त्याचा ॥१७०॥

आतां ज्ञानियासी । चराचरीम सर्व । भिन्नत्वासी ठाव । उरे कैंचा ॥१७१॥

इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्‍ब्रह्मणि ते स्थिताः ॥१९॥

म्हणोनियां नित्य । सर्वत्र जें सम । अद्वय तें ब्रह्म । आपण चि ॥१७२॥

समदृष्टीचें हे । वर्म ऐसें भलें। तया कळों आलें। संपूर्णत्वें ॥१७३॥

विषयांचा संग । न सांडितां येथें । तेविं इंद्रियांतें । न दंडितां ॥१७४॥

सर्वथा निष्काम । होवोनियां जयें । संभोगिली स्वयें । निःसंगता ॥१७५॥

लौकिक व्यापार । लोकाधारें होतां । लौकिक मूढता । ओसंडिली ॥१७६॥
पिशाच्च तें जैसें । वावरोनि जनीं । दिसे ना नयनीं । लोकांचिया ॥१७७॥

तैसा तो शरीरी । तरी हि साचार । जाणे ना संसार । तयालागीं ॥१७८॥

ना तरी असो हें । पवनाच्या मेळें। जळीं च तें लोले । जळ जैसें ॥१७९॥

परी तया जन । वेगळें कल्पून । तरंग म्हणोन । संबोधिती ॥१८०॥

तैसें नामरुप । तयाचें तूं जाण । एर्‍हवीं संपूर्ण । ब्रह्म चि तो ॥१८१॥

जयाचिया चित्ता । ऐसी साम्यावस्था । सर्वत्र सर्वथा । प्राप्त झाली ॥१८२॥

स्वभावें जो ऐसा । झाला समदृष्टि । म्हणे रमापति । पार्थालागीं ॥१८३॥

तया ओळखाया । एक असे खूण । संक्षेपें सांगेन । ऐक आतां ॥१८४॥

न प्रहृष्ट्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ‍ ।

स्थिरबुद्धिर्ससंमूढो ब्रह्मविद्‌ब्रह्मणि स्थितः ॥२०॥

मृगजळ -पूर । लोटला अपार । तेणें गिरि -वर । डंडळे ना ॥१८५॥

तैसें शुभाशुभ । पावतां साचार । राहे निर्विकार । अंतरीं जो ॥१८६॥

तो चि समदृष्टी । जाणावा तत्त्वतां । तो चि ब्रह्म पार्था । हरि म्हणे ॥१८७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel