श्रीभगवानुवाच ----

मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥१॥

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः ।
यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ॥२॥

ऐका मग बोले । पार्थासी अनंत । आतां योगयुक्त । झालासी तूं ॥१॥

तरी जेणें ज्ञानें । समग्रातें मज । अर्जुना सहज । जाणशील ॥२॥

विज्ञानासहित । ज्ञान तें सांगेन । तळहातीं जाण । रत्न जैसें ॥३॥

करावें तें काय । जाणोनि विज्ञान । ऐसें तुझें मन । सांगे जरी ॥४॥

तरी आधीं तें चि । जाणणें निःशंक । असे आवश्यक । सर्व थैव ॥५॥

मग पार्था , पाहें । ज्ञानाचिये वेळे । झांकती गा डोळे । जाणिवेचे ॥६॥

टेकतां तीरास । नाव जैसी पार्था । ढळे ना सर्वथा । स्वभावें चि ॥७॥

प्रवेशे ना जेथें । तैसी ती जाणीव । मागें वळे धांव । विचाराची ॥८॥

पांगुळतें जेथें । तर्काचें चातुर्य । तें चि ज्ञान होय । धनंजया ॥९॥

त्याहूनि इतर । जें का प्रापंचिक । विज्ञान तें देख । निःसंदेह ॥१०॥

धनुर्धरा सत्य । मानणें विज्ञान । तें चि तें अज्ञान । हें हि जाण ॥११॥

आघवें अज्ञान । जेणें हारपेल । समूळ जळेल । विज्ञान हि ॥१२॥
आणिक तें ज्ञान । सर्वथा आपण । स्वरुपें होवोन । राहूं जेणें ॥१३॥

जेणें वक्त्याचें तों । खुंटतें व्याख्यान । होतें समाधान । श्रोतयांचें ॥१४॥
जेणें सान -थोर । ऐसा नुरे भेद । गूढ जें अभेद -। ज्ञान -वर्म ॥१५॥

तें चि आतां बोलीं । होईल प्रकट । ऐसे बोल स्पष्ट । बोलेन मी ॥१६॥

घडतां चि ज्याचें । अल्प हि दर्शन । मनोरथ पूर्ण । होती बहु ॥१७॥

मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥३॥

लाभावें हें ज्ञान । तीव्र इच्छा ऐसी । धरोनि मानसीं । झटे जो का ॥१८॥

पार्था सहस्त्रांत । ऐसा एखादा च । आढळे गा साच । यत्नशील ॥१९॥

ऐशा यत्नशीला -। माझारीं हि कोणी । होय पूर्ण ज्ञानी । विरळा च ! ॥२०॥

भरलें त्रैलोक्य । तयांतील शूर । एक एक वीर । निवडोनि ॥२१॥

लक्षावधि सेना । उभारिती साच । परी एखादा च । तयांमाजीं ॥२२॥

साहोनि खड्‌गाचे । घाव रणांगणीं । बैसे सिंहासनीं । जयश्रीच्या ॥२३॥

तैसे कोटयवधि । रिघती साधक । महापूरीं देख । आस्थेचिया ॥२४॥

परी एखादा च । गाठितो साचार । पार्था ,पैल तीर । प्राप्तिरुप ॥२५॥

म्हणोनि हें ज्ञान । नव्हे साधारण । ह्याचें थोरपण । वर्णनीय ॥२६॥

परी करुं पुढें । तयाचें वर्णन । प्रस्तुत विज्ञान । ऐकें आतां ॥२७॥

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥४॥

महततत्त्वादिक । पार्था , माझी माया । जैसी पडछाया । निजांगाची ॥२८॥

मूळमायेतें ह्या । प्रकृति हें नांव । अष्टविध भाव । असे जिचा ॥२९॥

धनंजया ह्या चि । प्रकृतिपासोन । होतसे निर्माण । त्रैलोक्य हें ॥३०॥

तुझ्या मनीं ऐसा । जरी अभिप्राय । कैसी भिन्न होय । अष्टधा ही ॥३१॥

तरी तें चि आतां । ऐक विवेचन । सांगतसें भिन्न । आठी भाग ॥३२॥

व्योम वायु तेज । उदक धरणी । मन बुद्धि आणि । अहंकार ॥३३॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ‍ ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ‍ ॥५॥

पार्था , आठांची ह्या । जी का साम्यावस्था । प्रकृति ती श्रेष्ठा । दुजी माझी ॥३४॥

परा प्रकृतीतें । जीव ऐसें नांव । जडातें सजीव । करी जी का ॥३५॥

चेतनेसी जागें । करोनि मनातें । लावी मानायातें । शोक मोह ॥३६॥

हिचें सन्निधान । म्हणोनियां ज्ञान । होतसे उत्पन्न । बुद्धिअंगीं ॥३७॥

अहंकाराचिया । कौशल्यें संपूर्ण । जगासी धारण । करी हीच ॥३८॥

एअद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥६॥

स्थूळ प्रकृतीशीं । कौतुकें संयुक्त । पार्था , जेव्हां होत । प्रकृति ही ॥३९॥

प्राणिवर्गरुप । नाण्यांची केवळ । तेव्हां टांकसाळ । सुरु होय ॥४०॥

मग चतुर्विध । आकृतींचे ठसे । उमटती कैसे । आपोआप ॥४१॥

तयांचें तों मोल । सारखें च जाण । परी भिन्न भिन्न। आकार ते ॥४२॥

लक्ष चौर्‍यायशीं । योनींचे आकार । सहजें तयार । होती तेथें ॥४३॥

ऐसे आणिक हि । आकार ते किती । नेणों तया मिति । पंडुसुता ॥४४॥

ऐशा असंख्यात । आकृतींनी सारा । मायेचा गाभारा । भरे कैसा ॥४५॥

योग्यतेनें एक । ऐसीं हीं अनेक । पंचभूतात्मक । नाणीं जीं का ॥४६॥

तयांचिया मग । समृद्धीचें साच । घेई प्रकृति च । मोजमाप ॥४७॥

आखोनियां नाणीं । विस्तारिते पाहीं । मग आटणी हि । ती च करी ॥४८॥

कर्माकर्माचिया । व्यापारीं मध्यें च । प्रवर्तवी साच । प्राणियासी ॥४९॥

असो हें रुपक । सांगेन सरळ । तुज आकळेल । ऐसें आतां ॥५०॥

करी पार्था , नाम -। रुपाचा विस्तार । सर्वथा साचार । प्रकृति च ॥५१॥

आणि प्रकृति तों । भासे माझ्या ठायीं । अन्यथा हें नाहीं । धनंजया ॥५२॥

म्हणोनि जगासी । आदि मध्य अंत । एक मी निभ्रांत । ऐसें जाण ॥५३॥

मत्तः परतरं न्यान्यत्किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ॥७॥

मृगजळाचें तें । पाहूं जातां मूळ । सूर्य चि केवळ । नव्हे रश्मि ॥५४॥

तैसें आदिमाये -। प्रकृतिपासोन । जाहली निर्माण । जी का सृष्टि ॥५५॥

तियेचा निरास । करोनि पाहतां । मूळ तें तत्त्वतां । मी च आहें ॥५६॥

म्हणोनि उत्पत्ति । स्थिति आणि लय । मजमाजीं होय । ऐशा रीती ॥५७॥।

पार्था , करीं मी ह्या । विश्वासी धारण । जैसा मणिगण । सूत्रामाजीं ॥५८॥

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभाऽस्मि शशिसूर्ययोः ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं खे पौरुषं नृषु ॥८॥

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥९॥

म्हणोनियाः जळा -। माजीं जो का रस । किंवा असे स्पर्श । वायूमाजीं ॥५९॥

चंद्रसूर्यामाजीं । किंवा जो प्रकाश । मी चि तो निःशेष । जाण ऐसें ॥६०॥

पृथ्वीचिया ठायीं । स्वभावतां शुद्ध । असे जो सुगंध । तो हि मीच ॥६१॥

आकाशाच्या ठायीं । शब्द मी साचार । असें मी ॐकार । वेदांमाजीं ॥६२॥

नराचिया ठायीं । नरत्व जें थोर । अहंतेचें सार । असे जें का ॥६३॥

पौरुष तें देखें । धनुर्धरा मी च । तत्त्व तुज साच । सांगतसें ॥६४॥

आणि अग्नि ऐशा । नावें भासमान । तेज -प्रावरण । असे जें का ॥६५॥

सारितां तें दूर । स्वयंसिद्ध तेज । उरे तें सहज । मीच आहें ॥६६॥
नानाविध योनी -। माजीं धनंजया । प्राणी जन्मोनियां । त्रैलोक्यांत ॥६७॥
आपुलें जीवन । कंठिती साचार । घेवोनि आहार । आपुलाले ॥६८॥

राहती ते कोणी । सेवोनि पवन । कोणी एक तृण । भक्षोनियां ॥६९॥

अन्नाधारें कोणी । राहती केवळ । प्राशोनियां जळ । कोणी एक ॥७०॥

स्वभावानुसार । ऐसें भिन्न भिन्न । दिसे जें जीवन । प्राणियांचें ॥७१॥

तया भिन्न भिन्न जीवनीं संपूर्ण । असें गा अभिन्न । मी चि एक ॥७२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel