यो यो यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥२१॥
जो जो दुजें जें जें । पूजावें दैवत । म्हणोनि इच्छीत । मनोभावें ॥२८०॥
तयाची ती चाड । पुरविता साच । असें एक मी च । धनंजया ॥२८१॥
परी देवी देव । सर्व मी च होय । ऐसा हि निश्चय । नसे त्यांचा ॥२८२॥
म्हणोनियां नाना । देवतांचे ठायीं । धरी जो हृदयीं । भिन्नभाव ॥२८३॥
स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते ।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥२२॥
आणि होवोनियां । मग श्रद्धायुक्त । पूजी तें दैवत । यथायोग्य ॥२८४॥
तोंवरी तो पार्था । करी आराधन । होय जों संपूर्ण । कार्यसिद्धि ॥२८५॥
ऐसें जयें जें जें । इच्छावें केवळ । तें तें लाभे फळ । तयालागीं ॥२८६॥
परी तें सकळ । मज चि पासोन । मिळे तया जाण । धनुर्धरा ॥२८७॥
अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसाम् ।
देवान्देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि ॥२३॥
जाणती ना मातें । सर्वथा ते भक्त । गेले कल्पनेंत । गुंतोनि जे ॥२८८॥
म्हणोनियां फळ । पावती कल्पित । जें का नाशिवंत । स्वभावें चि ॥२८९॥
काय सांगूं फार । ऐसें जें भजन । होय तें साधन । भवाचें चि ॥२९०॥
आणि फळभोग । तयांचा संपूर्ण । दिसे जैसें स्वप्न । क्षणमात्र ॥२९१॥
राहो उहापोह । असो कोणाचें हि । दैवत कैसें हि । पंडुसुता ॥२९२॥
परी देवतांचें । करी जो पूजन । देवत्व चि जाण । लाभे त्या ॥२९३॥
आणि जे मद्भक्त । तन मन प्राण । भावें समर्पून । माझ्या ठायीं ॥२९४॥
चालविती नित्य । माझें चि भजन । मी चि होती जाण । देहान्तीं ते ॥२९५॥
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥२४॥
परी प्राणीं तैसें । नाचरोनि तेथ । दूरावती व्यर्थ । स्वहितासी ॥२९६॥
तळहातींचिया । जळीं पोहूं जाणें । तैसें तें करणें तयांचें गा ॥२९७॥
तोंडा वज्रमिठी । पाडावी कां तरी । बुडतां सागरीं । अमृताच्या ॥२९८॥
मग थिल्लरींचें । आठवोनि पाणी । झुरावें कां मनीं । सांगें बापा ॥२९९॥
अमृतामाजीं हि । रिघोनि मरावें । ऐसें हें करावें । कासयासी ॥३००॥
तरी सुखें कां गा । व्हावें ना अमर । राहोनि अपार । अमृतीं त्या ॥३०१॥
तैसा फलाशेचा । पिंजरा फेंकोन । पंख ते लावोन । प्रतीतीचे ॥३०२॥
मनासी मानेल । ऐसा निरंतर । करुं ये संचार । सुखें जेथें ॥३०३॥
मारिली भरारी । किती जरी उंच । तरी लागे ना च । पार ज्याचा ॥३०४॥
तया चिदाकाशीं । कराया संचार । समर्थ साचार । कां न व्हावें ? ॥३०५॥
मापावें कां पार्था । मज अमापातें । व्यक्त अव्यक्तातें । मानावें कां ॥३०६॥
शिणावें कां नाना । साधनें करोन । असतां मी पूर्ण । स्वयंसिद्ध ॥३०७॥
परी धनंजया । बोल हे साद्यंत । घेतां विचारांत । ऐसें वाटे ॥३०८॥
कीं ह्या जडजीवां । विशेषेंकरोन । उमजे ना खूण । येथींची ही ॥३०९॥
नाहं प्रकाशः सर्वस्व योगमायासमावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥२५॥
पाहें पार्था योग -। मायेच्या पडळें । सर्वथा आंधळे । जाहले हे ॥३१०॥
म्हणोनि स्वरुप -। ज्ञान -प्रकाशांत । मातें असमर्थ । पहावया ॥३११॥
एर्हवीं मी नाहीं । ऐसी वस्तु कोण । जळ रसावीण । संभवे का ॥३१२॥
सांगें कवणातें । शिवे ना पवन । व्यापी ना गगन । कोणालागीं ? ॥३१३॥
असो हें सर्वत्र । विश्वीं एक मी च । भरोनियां साच । राहिलों गा ॥३१४॥
वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्च्न ॥२६॥
जगीं जे जे प्राणी । होवोनियां गेले । माझ्या चि पावले । स्वरुपीं ते ॥३१५॥
आणि जे जे कोणी । जगीं विद्यमान । मद्रूप चि जाण । ते हि सर्व ॥३१६॥
ते हि मजहून । वेगळे नाहींत । होणार जे येथ । पुढें पार्था ॥३१७॥
एर्हवीं केवळ । बोल चि हा देख । नाहीं कांहीं एक । होत जात ॥३१८॥
ऐसा अखंडित । असतां मी नित्य । संसार चि सत्य । वाटे जीवां ॥३१९॥
तयाचें कारण । वेगळें चि जाण । प्रसंगें सांगेन । ऐक आतां ॥३२०॥
इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।
सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥७॥
धनंजया , काया । आणि अहंकार । आलीं परस्पर । प्रेमरंगीं ॥३२१॥
तयां चि पासोन । जन्मली गा देख । इच्छा नामें एक । कुमारिका ॥३२२॥
मग कामाचिया । येतां तारुण्यांत । द्वेषाशीं लागत । लग्न तिचें ॥३२३॥
द्वन्द्वमोह नामें । एक पुत्ररत्न । प्रसवलें जाण । जोडपें तें ॥३२४॥
तया पुत्रालागीं । पोशिलें साचार । मग अहंकार -। आजोबानें ॥३२५॥
जो का द्वन्द्वमोह । सर्वदा केवळ । असे प्रतिकूळ । धैर्यालागीं ॥३२६॥
आशारसें जो का । होवोनियां पुष्ट । नावरे उन्मत्त । निग्रहासी ॥३२७॥
असंतोषरुपी । मद्यें माजोनियां । विषयांचे शय्या -। गृहामाजीं ॥३२८॥
विकृतीच्या संगें । जो का रममाण । होय रात्रंदिन । धनुर्धरा ॥३२९॥
ऐशा तयें अंतः -। शुद्धीचिये वाटे । पेरोनियां कांटे । विकल्पाचे ॥३३०॥
निषिद्ध कर्माचे । मग आडमार्ग । काढोनियां चांग । रुळविले ॥३३१॥
तेणें योगें प्राण । गेले भांबावून । पडले गहन । भवारण्यीं ॥३३२॥
तों चि तेथें महा -। दुःखांचे आघात । येती धुंडाळीत । तयांलागीं ॥३३३॥
येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।
ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥२८॥
ऐसे विकल्पाचे । तीक्ष्ण कांटे फोल । देखोनि सरळ । मार्गामाजीं ॥३३४॥
न होती सर्वथा । जे का मतिभ्रष्ट । न सोडिती वाट । सत्कर्माची ॥३३५॥
एकनिष्ठारुप । पाउलें टाकीत । टोंके रगडीत । विकल्पाचीं ॥३३६॥
महापातकांचे । सांडोनि अरण्य । धांव घेती पुण्य -। मार्गे जे का ॥३३७॥
वाटवधेयांतें । ऐसें चुकवोन । माझें सन्निधान । पावती ते ॥३३८॥
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥२९॥
जन्ममरणाची । उरुं नेदी वार्ता । ऐसें असे पार्था । साधन जें ॥३३९॥
दैवयोगें तया । साधनाचे ठायीं । उपजली पाहीं । आस्था ज्यांची ॥३४०॥
तयांतें संपूर्ण । परब्रह्मरुप -। फळें फलद्रूप । होय तें चि ॥३४१॥
पिकतां तें फळ । ऐसें एके वेळ । मग रस गळे । पूर्णतेचा ॥३४२॥
कृतकृत्यतेनें । तिये वेळीं मग । जाय सर्व जग । भरोनियां ॥३४३॥
जी का ब्रह्मस्थिति । स्वभावतां देख । फिटे अनोळख । तियेची गा ॥३४४॥
कर्म -प्रयोजन । संपोनियां अंतीं । लाभे मनःशांति । निरंतर ॥३४५॥
व्यापारउद्यमीं । भांडवल मी च । असें जया साच । धनंजया ॥३४६॥
तया अध्यात्माचा । ऐसा लाभ होय । भेद -दैन्य जाय । सांडोनियां ॥३४७॥
आणि उत्कर्षातें । पावे साम्यबुद्धि । होतसे समृद्धि । ऐक्यरुप ॥३४८॥
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः ।
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥३०॥
इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
अर्जुना जयांनी । प्रतीतीच्या द्वारा । जाणिलें शरीरा -। सह मातें ॥३४९॥
तेविं जीवासह । माझें ज्ञान भलें । करोनि घेतलें । परिपूर्ण ॥३५०॥
आणि अधियज्ञा । मज ज्ञान -बळें । जयांनीं देखिलें । यथार्थत्वें ॥३५१॥
एवं साधिभूता साधिदैवा मातें । जाहले जाणते । साधियज्ञा ॥३५२॥
देह -वियोगाचें । पावती ना दुःख । पुरुष ते देख । स्वभावें चि ॥३५३॥
ठाकतां समीप । प्रयाणाचा काळ । उडे खळबळ । प्राणियाचे ॥३५४॥
आणि तयाची ती । पाहोनियां स्थिति । इतर हि होती । भयभीत ॥३५५॥
परी नेणों कैसें । काय साधे तयां । गेले जडोनियां । मद्रूपीं जे ॥३५६॥
होतां लगबग । पार्था , अंतकाळीं । माझ्या चि जवळी । राहती ते ॥३५७॥
ऐसे जे निष्णात । होती ज्ञानी भक्त । तेचि स्थिरचित्त । योगी जाण ॥३५८॥
तंव देवें मागें । केलें निरुपण । तेथें होतें मन । अर्जुनाचें ॥३५९॥
म्हणोनि ह्या शब्द -। रुप कुपीखालीं । नव्हती अंजुळी । अवधानाची ॥३६०॥
तेथें तीं तद्ब्रह्म -। वाक्यरुप फळें । ज्यांचा दरवळे । भाव -गंध ॥३६१॥
ऐसीं होतीं देखा । रसाळ बहुत । जीं का विविधार्थ -। रुप रसें ॥३६२॥
सहज कृपेचा । मंदवात वाहे । कैसा डोळताहे । कृष्णवृक्ष ॥३६३॥
तेणें वाक्यफळें । पडलीं अवचित । श्रवणखोळेंत । अर्जुनाच्या ॥३६४॥
कैसीं जणूं तत्त्व -। ज्ञान -सिद्धान्ताचीं । घडलीं तीं साचीं । वाक्य -फळें ॥३६५॥
चुबकळोनियां । ब्रह्मरसामाजीं । मग घोळिलीं जीं । महानंदें ॥३६६॥
देखोनि तयांचे । निर्मळ सौन्दर्य । गेला धनंजय । भुलोनियां ॥३६७॥
भावार्थाचा गाभा । लाभावा सकळ । जाहली प्रबळ । इच्छा त्यासी ॥३६८॥
मग तयाचे ते । डोहळे ज्ञानाचे । विस्मयामृताचे । घेती घोट ॥३६९॥
तेणें सुखें मग । भरोनियां जात । वांकुल्या दावीत । स्वर्गलोका ॥३७०॥
आणि तयाचिया । हृदयान्तरांत । गुदगुल्या होत । आनंदाच्या ॥३७१॥
वाक्यफळांचिया । बाह्य सौन्दर्याचें । ऐसें सुख साचें । भोगूं लागे ॥३७२॥
तों चि रसरुचि । चाखावया भली । उत्कंठा लागली । तयालागीं ॥३७३॥
अनुमानाचिया । तळहातावरी । मग झडकरी । घेवोनि तीं ॥३७४॥
अनुभवाचिया ।मुखामाजीं साच । जंव एकदांच । घालूं पाहे ॥३७५॥
तंव विचाराच्या । जिह्रेनें तीं तेथ । होई असमर्थ । चोखावया ॥३७६॥
आणि तर्काचिया । दातेम चावूम जातां । तया तीं सर्वथा । फुटती ना ॥३७७॥
जाणोनि हें तेणें । न चोखितां खालीं । ठेवोनिया दिलीं । होतीं तैसीं ॥३७८॥
चमत्कारोनियां । मागुतीं तो म्हणे । काय तारांगणें । जळींची हीं ! ॥३७९॥
सुलभ सुंदर । अक्षरांनीं भला । गेलों ठकविला । कैसा जेथें ॥३८०॥
नातरी अक्षरें । नव्हेत हीं साच । वाटती घडया च । आकाशाच्या ॥३८१॥
बुद्धीचिया बळें । घेऊं जातां ठाव । तियेचा रिघाव । नाहीं तेथें ॥३८२॥
मग जाणायाची । गोष्ट ती तों दूर । करोनि विचार । मनीं ऐसा ॥३८३॥
यादवेन्द्राकडे । वळवोनि दृष्टि । पुन्हां तो किरीटी । प्रार्थी तया ॥३८४॥
म्हणे देवा ब्रह्म -। अध्यात्मादि सात । पदें एकत्रित । ऐकिलीं जीं ॥३८५॥
तयांचें तों नाहीं । कोणा आकलन । ऐसीं विलक्षण । वाटती तीं ॥३८६॥
एर्हवीं जीं नाना । प्रमेयें गहन । घ्यावीं तीं जाणोन । म्हणोनियां ॥३८७॥
तयांचे श्रवण । केलें सावधान । तरी का तीं पूर्ण । आकळती ? ॥३८८॥
परी हें तों नव्हे । तैसें साधारण । कैसा विलक्षण । बोल तुझा ॥३८९॥
देखतां चि देवा । शब्द -समुदाय । वाटला विस्मय । विस्मयासी ॥३९०॥
जंव कानाचिया । झरोक्यामधून । शब्दाचे किरण । शिरती ना ॥३९१॥
तंव तें तेथें च । माझें अवधान । गुंतलें संपूर्ण । चमत्कारें ॥३९२॥
पदांचा त्या अर्थ । घ्यावा समजोन । उत्कंठा लागोन । राहिली ही ॥३९३॥
ऐसें सांगतां हि । जातसे जो वेळ । तो हि साहवेल । ऐसें नाहीं ॥३९४॥
म्हणोनियां आतां । विनंति ही देवा । सत्वर सांगावा । गूढार्थ तो ॥३९५॥
घेवोनि मागील । ऐसें प्रत्यंतर । पुढें हि नजर । देवोनियां ॥३९६॥
सर्व अभिप्राय । लक्षोनियां नीट । करोनि प्रकट । उत्कटेच्छा ॥३९७॥
चातुर्ये देवासी । कैसें विनवावें । सर्व हें स्वभावें । जाणे पार्थ ॥३९८॥
कृष्णहृदयासी । मारावया मिठी । कैसा तो किरीटी । सिद्ध झाला ॥३९९॥
भिडेची मर्यादा । नोलांडितां तैसी । देखा श्रीगुरुसी । पुसे कैसा ॥४००॥
पुसों जातां दक्ष । कैशापरी व्हावें । हें तों सर्व ठावें । तयासी च ॥४०१॥
आतां तयाचें तें । प्रश्न विचारणें । त्यावरी बोलणें । सर्वज्ञाचें ॥४०२॥
संजय तो प्रेमें । सांगेल ही मात । परिसावी चित्त । देवोनियां ॥४०३॥
सरळ सुंदर । मराठी हे बोल । पाहोनि निवेल । आधीं दृष्टि ॥४०४॥
कानाचिया मना । मग सावकाश । होईल संतोष । ऐकोनि ते ॥४०५॥
बुद्धीच्या जिह्रेनें । बोलाचें ह्या सार । सर्वथा साचार । न चाखितां ॥४०६॥
देखा शब्दाचिया । सौन्दर्ये केवळ । तृप्ति पावतील । सर्वेद्रियें ॥४०७।
उधळोनि गंध । मालतीच्या कळ्या । होती घ्राणेन्द्रिया । सौख्यदायी ॥४०८॥
पाहोनि तयांची । परी रम्याकृति । न लाभे का तृप्ति । नेत्रांसी हि ॥४०९॥
तैसें मराठीचें । देखोनि लावण्य । सर्वेन्द्रिये धन्य । होवोनियां ॥४१०॥
मग स्वभावें चि । सिद्धांताचें सार । बुद्धीसी सत्वर । आकळेल ॥४११॥
ऐसा चि बोलेन । शब्दातीत भाव । म्हणे ज्ञानदेव । निवृत्तीचा ॥४१२॥
इति श्री स्वामी स्वरुपानंदविरचित श्रीमत् अभंग -ज्ञानेश्वरी सप्तमोऽध्यायः ।
हरये नमः । हरये नमः । हरये नमः । श्रीकृष्णार्पणमस्तु ।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.