मी सात वर्षांचा होणार होतो त्याच्या अगोदरच माझ्या मुंजीचा विचार सुरू झाला .आईचा विचार अापण दुसऱया गावात आहोत सगळी मंडळी सारस्वत तेव्हा थोडक्यातच मुंज करावी.भाऊ नेहमी प्रमाणे कोणतीही गोष्ट पाबूत व व्यवस्थित म्हणजेच भरपूर आणि एकदम पद्धतशीर .आईचा स्वभाव काट कसरी तर भाऊ बरोबर त्यांच्या विरुद्ध. शेवटी दणक्यात मुंज करावयाचे ठरले .भाऊनी शिक्षक बँकेमधून चारशे रुपये कर्जही काढले .त्या वेळी चारशे रुपये म्हणजे अाजचे किती हे मला सांगता येणार नाही परंतु त्यावेळी पोतभर कोळंबी तांदूळ सहा सात रुपयांना मिळत असे .
मध्ये एक समस्या निर्माण झाली माझ्या दोन मावश्या तापाचे निमित्तहोऊन वारल्या .आता काय करावे तयारी तर सर्व झाली आचारी मांडव वाजंत्री भट इ.मुंज चार दिवसांवर आली घरात सर्व पाहुणे जमले त्यात आई तापाने फणफणली.आईचा ताप दोन दिवसांत गेला व ठरल्याप्रमाणे मुंज करावयाची असे ठरले .
मातृभोजन वाजंत्री इत्यादी दणक्यात पार पडले सर्व गाव जेवले खूप नातेवाईक गोळा झाले होते .
मी सात वर्षांचा लहान होतो त्यामुळे मला मुंज म्हणजे गर्दी गडबड उत्सव नातेवाईक मामे भाऊ आतेभाऊ मावस भाऊ यांची भेट खेळ दंगामस्ती गोडधोड लाडू पोळ्या खायला मिळतील एवढेच याशिवाय दुसरे काही नव्हते .
मुंजी मध्ये वस्तऱ्याने डोक्याचा गोटा करावयाचा त्याचीही भीती नव्हती .त्या काळात केस वाढवणे निषिद्ध समजले जात असे .नाटकी व सिनेमातील किंवा चंगीभंगी लोकांचे ते काम असा समज होता .मुंज होण्याअगोदर डोक्यावर सोडण ठेवलेले असे . नाकाच्या बरोबर वरच्या बाजूने डोक्यावर कपाळाला लागून चार बोटांच्या आकाराचे केस ठेवले जात बाकी सगळा वस्तऱ्याने गुळगुळीत गोटा केला जाई.तो केसांचा आकार सोडणासारखा असल्यामुळे त्याला सोडण म्हटले जाई . सोडण म्हणजे नारळाच्या बाहेरच्या सालापासून तळहाताच्या आकाराएवढा भाग काढून पुढच्या बाजूला एखाद्या दुसऱ्या बोटाच्या आकाराचा भाग ठोकून ब्रशच्या केसासारखा भाग बनविला जाई . त्याचा उपयोग जातीणीवर दऴल्यानंतर जमा झालेले पीठ गोळा करण्यासाठी केला जाई .मुंज म्हणजे पुढचे सोडण जाईल व मागे घेरा व शेंडी येईल .वस्तर्याची सवय होतीच गोटाही माहिती होता .मुंज म्हणजे उत्सव गोडधोड खेळ व मजा याशिवाय मला दुसरे काही माहिती नव्हते .
मुंजीच्या वेळची आणखी एक लक्षात राहिलेली गोष्ट बटू काशीयात्रेला जातो त्यावेळी मामा त्याला आपली मुलगी देईन म्हणून सांगतो आणि मग बटू परत फिरतो ही प्रथा का पडली असावी हे कळत नाही. कदाचित संन्यासाश्रमापेक्षा गृहस्थाश्रम सर्व दृष्टींनी चांगला.गृहस्थाश्रमामध्येही अलिप्त राहून चांगला संसार करता येतो असे लक्षात आणून द्यावयाचे असावे.संन्याशी होवून गृहस्थाश्रमीय विचार करत बसण्यापेक्षा गृहस्थाश्रम स्वीकारलेला चांगला असेही सांगण्याचा हेतू असावा.बटूला मुलीची लालूच दाखविणे बरोबर नाही !!!प्रथा या प्रथा असतात का पडतात उलगडा होत नाही .मला गुरुजींनी मुलगी देतो परत फिर म्हणून सांगितले .मामे बहीण चुलत बहीण आतेबहीण मावस बहीण इत्यादी कोणत्याही बहीणीशी लग्न करण्याची पद्धत आमच्याकडे नाही .म्हणून मामा ऐवजी गुरुजी मुलगी देतो म्हणून सांगतात.
अश्या प्रकारे माझी मुंज संपन्न झाली .
२६/५/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com