लेखक---प्रभाकर पटवर्धन

श्रद्धा व ज्ञान

-----------+------------+-------------

श्रद्धा व ज्ञान ही वासनेशी निगडित आहेत .जर आपण श्रद्धा व ज्ञान ही संपूर्णपणे समजून घेतली तर वासना, श्रद्धा व ज्ञान यांच्याद्वारे कशी थैमान घालील ते, वासनेच्या सर्व गुंतवळ्यासह, समजून येईल .

प्रथम आपण श्रद्धेचा विचार करू.श्रद्धेबद्दलचे विचार चटकन आकलन होतील असे मला वाटते.श्रद्धा नकोत असे मी सांगत नाही . श्रध्दा वाईट असेही मी सांगत नाही .आपण फक्त श्रद्धेचा विचार करायचा आहे .मग श्रद्धा हवी की नको त्याचा अापोआपच उलगडा होईल .अापण श्रद्धा का ठेवतो याच्या विचाराने ,याच्या शोधाने, आपण श्रद्धा कां बाळगतो,त्याचा उलगडा होईल .शक्यता आहे कि आपण श्रद्धेपासून स्वतंत्रही होऊ .श्रद्धा ही राजकीय, सामाजिक,धार्मिक,पंथीय, राष्ट्रीय किंवा आणखी कुठलीही असो, त्यामुळे लोक दुभंगले जातात .विलग केले जातात.लोक एकमेकांना दुरावतात .भांडणे व झगडे निर्माण होतात .गोंधळ माजतो .विरोध निर्माण होतो .आणि तरीही आपण कसल्या ना कसल्या श्रद्धांना चिकटून असतो .ही सरळ सरळ दिसणारी वस्तुस्थिती आहे .हिंदू म्हणून, ख्रिश्चन म्हणून, बौद्ध म्हणून, शीख म्हणून,मुसलमान म्हणून,आपल्या प्रत्येकाला काही ना काही श्रद्धा आहेत .त्याशिवाय राष्ट्रीय,जातीय, पक्षीय, पंथीय, राजकीय, श्रद्धा आहेत .हे सर्व लोक एकमेकांशी भांडतात झगडतात .दुसऱ्याचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत असतात.आपण नेहमी पाहतो श्रद्धेमुळे लोक दुरावतात .श्रद्धेने असहिष्णुता निर्माण होते .ही उघडउघड लक्षात येणारी गोष्ट आहे .श्रद्धेविना जीवन शक्य आहे काय?हे ही ज्याने त्याने स्व- निरीक्षणातून शोधायचे आहे .जर आपण आपल्या श्रद्धा ,आपली श्रद्धास्थाने, आपल्या श्रद्धेविरुद्ध श्रद्धास्थाने असणार्‍या लोकांशी गाठ पडल्यावर आपली होणारी वागणूक,यांचा जर आपण अभ्यास केला;थोडक्यात स्वतःचा, स्वत:च्या श्रद्धेशी असलेल्या संबंधाचा, अभ्यास केला, तर श्रद्धे विना जीवन शक्य आहे कि नाही,याचे उत्तर मिळू शकेल .एका श्रद्धेच्या ठिकाणी दुसरी श्रद्धा आणून नव्हे,श्रद्धा बदल करून नव्हे,तर कुठल्याही श्रद्धे विना,जीवन शक्य आहे काय?जर हे शक्य असेल, तरच आपण प्रतिक्षणी ताजेपणाने जीवन अनुभवू शकू . शेवटी सत्य हेच आहे .जीवन प्रतिक्षणी ताजे पणाने अनुभविता आले पाहिजे.भूतकाळातील धारणेचा स्वतः व वस्तुस्थिती यामध्ये पडदा असता कामा नये .

तुम्ही विचार केला तर तुम्हाला असे आढळून येईल की, भीती ही श्रद्धा बाळगण्याचे प्रमुख कारण असते.जर आपण कुठली ना कुठली श्रद्धा बाळगली नाही तर आपले कसे होईल ?भविष्य काळात आपले काय होईल ?याबद्दल आपण घाबरलेले नसतो काय ?श्रद्धा नाही म्हणजे आधार नाही.विसावा नाही .अाश्रय नाही. कसे वागावे याची काही आखणी नाही .आपण सूत्र तुटलेल्या पतंगासारखे कुठल्या कुठे भरकटत जाऊ .छे: आपल्याला कुठची ना कुठची श्रद्धा पाहिजेच.तो देव असो, अल्ला असो, ख्रिस्त असो, बुद्ध असो समाजवाद असो,साम्यवाद असो, भांडवलवाद असो, ज्यामध्ये आपली वाढ झाली आहे असे एखादे तत्त्व असो, कुठली ना कुठली श्रद्धा पाहिजेच .काहीच नसणे,रिकामे असणे, या भीतीपासून श्रद्धा आपला बचाव करित नाही काय़ ?श्रद्धा काहीच नसणे, या भीतीवर पांघरूण घालीत नाही काय ? पण लक्षात घ्या रिकामा पेलाच उपयोगी असतो . जे मन श्रद्धा ,तत्त्वे, समजूती, अवतरणे, यांनी भरलेले आहे, ते मन केवळ नक्कल करणारे आहे .सृजनशीलतेपासून वंचित झालेले आहे.भीती ,काही नसण्याची भीती, एकले पणाची भीती ,ही आपल्याला श्रद्धा ठेवण्यास भाग पाडीत नाही काय?श्रद्धा नाही तर आपली प्रगती कशी होणार ?श्रद्धा नाही तर आपण कुठल्या दिशेने जाणार ?श्रद्धा नाही तर यश तरी कसले मिळवायचे?श्रद्धा नाही तर पोचावयाचे कुठे?श्रद्धा नाही तर अापण असणार तरी काय ?श्रद्धा नाही तर अापण बनावयाचे तरी काय ?या सर्व स्थितीची भीती,आपल्याला श्रद्धा ठेवण्यास भाग पाडत नाही काय ?आपण इतक्या अधाशीपणाने उतावळे पणाने श्रद्धा का ठेवतो ?श्रद्धा ठेवून आपण स्वतःला कधी तरी समजू शकू काय ?धार्मिक व राजकीय कुठल्याही प्रकारच्या श्रद्धेमुळे,स्व-ज्ञानात अडथळा निर्माण होतो .स्वतःकडे पाहात असताना आपण नेहमी श्रद्धेच्या पडद्यातून बघतो .श्रद्धेविना स्वत:कडे आपण पाहू शकू काय?जर आपण सर्व श्रद्धा काढून टाकल्या, तर बघायाला शिल्लक काय राहील? जर मन उरापोटी बाळगलेल्या सर्व श्रद्धा सोडून देईल,तर बघायला तरी काही शिल्लक राहील काय? जर मन त्याने उरापोटी बाळगलेल्या सर्व श्रद्धा सोडून देईल, तर तुलने शिवाय, स्वत:कडे ते जसे आहे त्या स्वरूपात पाहू शकेल .तिथेच स्व-ज्ञानाला खरी सुरुवात होईल.

श्रद्धा व ज्ञान याबद्दलचा विचार हा खरोखरच अत्यंत गमतीदार व आकर्षक आहे .आपल्या जीवनाचा केवढा थोरला प्रांत या श्रद्धांनी व्यापलेला आहे .

खरोखरच मनुष्य जेवढा जास्त शिकलेला, जेवढा जास्त सुसंस्कृत ,जेवढा जास्त अध्यात्मिक, तेवढी त्याची समजण्याची पात्रता कमी असते.आजच्या जगातही आपल्याजवळ अगणित श्रद्धा असतात .जो खरा विचारी आहे, जो खरा जागृत आहे, जो खरा सावधान आहे, तो बहुधा अश्रद्ध असतो .तो कशावरही विश्वास ठेवीत नाही.तो खरा नास्तिक असतो .सर्व जगाकडे पहा, आर्थिक जग पहा, राजकीय जग पहा, तथाकथित अध्यात्मिक जग पहा, एकच गोष्ट आढळून येते. श्रद्धा बद्ध करते.श्रद्धा अलग करते .तुम्ही श्रद्धा ठेवता कि देव आहे ,मी श्रद्धा ठेवतो कि देव नाहीं, प्रत्येक गोष्टीचे राज्याकडून नियंत्रण यावर तुम्ही श्रद्धा ठेवता. मी व्यक्तिस्वातंत्र्य व मुक्त उद्योग यावर श्रद्धा ठेवतो. तुम्ही फक्त एकच प्रेषित आहे व त्याच्याकडून आपले ध्येय साध्य होईल, अशी श्रद्धा बाळगता .मी अशी श्रद्धा ठेवीत नाही .अशा प्रकारे तुम्ही तुमच्या श्रद्धा व मी माझ्या श्रद्धा राखण्याचा प्रयत्न करतो .त्यांना चिकटून बसतो. त्यांचा आधार घेतो .वेळप्रसंगी त्यासाठी भांडतो,झगडतो, युद्ध खेळतो, वादविवाद करतो, आणि तरीही आपण, प्रेम शांती मानव ऐक्यता एक जीवन याबद्दल फार बोलत असतो .या बडबडीला काही अर्थ आहे काय ?कारण श्रद्धा म्हणजेच विलगता .मी ब्राह्मण आहे तू अब्राह्मण आहेस. तू ख्रिश्चन आहेस मी मुसलमान आहे.अरे काय चावटपणा चालला आहे ?तुम्ही विश्व बंधुत्वाच्या गप्पा मारता व मीहि विश्वबंधुत्व शांती प्रेम याबद्दल खूप बडबड करतो .वस्तुस्थिती काय आहे आपण एकमेकांपासून दुरावलेले आहोत .आणखी आणखी दूर दूर जात आहोत .विश्व बंधुत्वाच्या गप्पा मारता मारता, आपण आपल्या श्रद्धेसाठी, एकमेकांचे खून करण्यालाही तयार आहोत. जो प्रामाणिक आहे, ज्याला खरेच विश्वबंधुत्वाची तहान लागली आहे, ज्याला खरेच शांतीची तहान लागली आहे, ज्याला नवीन जग निर्माण करायचे आहे, त्याला कोणत्याही श्रद्धेच्या खोड्यात अडकून कसे चालेल?तुम्हाला मी काय म्हणतो ते स्पष्टपणे कळले काय ?तुम्हाला कदाचित शब्द समजले असतील पण जर तुम्हाला यातील भाव, सत्यता, महत्त्व ,तुमच्या हृदयाला जाऊन भिडेल, तर खात्री असू द्या तुमचे सुप्त मन कामाला लागलेले आहे.तुम्हाला अध्यात्मिक सुरक्षितता,अंतर्यामी सुरक्षितता,आर्थिक सुरक्षितता, अश्या अनेक प्रकारच्या वासना आहेत .जिथे वासना कार्यरत आहे, तिथे श्रद्धा आहे .जिथे श्रद्धा आहे ,तिथे अलगता आहे .मी जे लोक आर्थिक कारणांसाठी, पोटासाठी, भाकरीसाठी, श्रद्धा बाळगतात, त्यांना चिकटून बसतात, त्यांच्या बद्दल बोलत नाही .त्यांची वाढ काही एका विशिष्ट दिशेने विशिष्ट कारणासाठी झालेली असते . त्यांना ती नोकरी ,तो धंदा ,तो व्यवसाय, केल्याशिवाय गत्यंतर नसते .उदाहरणार्थ भटजीमंडळी, मौलवी ,पाद्री ,इत्यादी .त्याच प्रमाणे जे लोक एक सोय म्हणून श्रद्धा बाळगतात ,त्यांच्याबद्दलही मी बोलत नाही.आपण सर्वजण त्यामध्ये मोडतो .सोय म्हणून आपण बर्‍याच गोष्टींवर श्रद्धा ठेवतो.परंतू ही आर्थिक कारणे दूर करून आपल्याला जास्त खोल विचार केला पाहिजे .

असे लोक घ्या कि जे उत्कटतेने आर्थिक राजकीय सामाजिक व धार्मिक श्रद्धा बाळगतात.सुरक्षिततेची( सुरक्षित असावे )मानसिक वासना याशिवाय त्यापाठीमागे काय असते.?"सुरक्षितते "नंतरची दुसरी वासना म्हणजे "अखंड असावे "ही वासना होय.कधीही नष्ट होऊ नये अशी इच्छा .लक्षात असू द्या,की मरणोत्तर जीवन आहे की नाही, या प्रश्नाची मी येथे चर्चा करीत नाही .मला फक्त अखंड असण्याची ,कधीही नष्ट होऊ नये, अशी असलेली मूलभूत इच्छा व त्यामुळे सदैव श्रद्धा ठेवण्यासाठी असलेली प्रेरणा, ही दाखवायची आहे . जो खरा शांतीचा चाहता आहे ,ज्याला मानवी अस्तित्वाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्यायची आहे ,तो स्वतःला श्रद्धेने बद्ध करून घेऊ शकत नाही.अश्या व्यक्तीने स्वत:ला बद्ध करून घ्यावे काय?आपण सुरक्षित असावे, ही वासना काय चाळे करीत असते ते तो फक्त पाहत असतो.कृपाकरून बोलण्याचा विपर्यास करून घेऊ नका .अधर्म शिकवण्याचा माझा हेतू नाही .माझा तो मुद्दाच नाही . माझा मुद्दा असा आहे की जो पर्यंत आपल्याला वासना, श्रद्धेच्या मार्फत, काय थैमान घालत असते हे समजणार नाही तोपर्यंत रोज आपल्याला दिसत असलेले झगडे भांडणे दु:खे ही नष्ट होणार नाहीत.जर मला खरोखर उमजेल, जर मी खरोखर जागृत होईन,तर ही श्रद्धा असावी कि ती श्रद्धा असावी, ती किती असावी कि मुळीच असू नये, हा प्रश्न नसून, "मी" या सुरक्षिततेच्या उत्कट वासनेपासून कसा स्वतंत्र होईन हा आहे .मन सुरक्षिततेच्या वासनेपासून स्वतंत्र होऊ शकेल काय ?खरा प्रश्न हा आहे.श्रद्धा कशावर ठेवावी किती ठेवावी हा नव्हे.आपण अंतर्यामी अत्यंत असुरक्षित असतो.आपल्याला सुरक्षिततेची जोरदार तहान लागलेली असते.जगात आपल्याला अत्यंत असुरक्षित वाटते .सुरक्षिततेच्या उत्कट वासनेचा परिणाम, कशावर ना कशावर श्रद्धा ठेवण्यात, कसला ना कसला आश्रय घेण्यात, कुठचा ना कुठचा आधार शोधण्यात होतो.

मन, कुठचेही जागृत मन, कोणतेही व्यक्तिमत्त्व ,सुरक्षित असावे ,या वासनेपासून मुक्त होईल काय ?आपल्याला सुरक्षितता हवी असते .त्यासाठी स्थावर जंगम मालमत्ता कुटुंब इत्यादींची आपल्याला गरज भासते .आपल्याला अंतर्यामी सुरक्षितता हवी असते. अध्यात्मिक सुरक्षितता हवी असते. आणि मग या सुरक्षित असावे, या वासनेच्या तडफडीचे, दृश्य फल म्हणजे कशावर ना कशावर आपण श्रद्धा ठेवण्यास उद्युक्त होतो.निरनिराळ्या श्रद्धांच्या तटबंद्या अापण उभारीत राहतो.व्यक्ती म्हणून या सर्वांचे पर्यवसान श्रद्धा ठेवण्यात होते .सुरक्षित असावे या वासनेपासून आपण मुक्त होऊ शकू काय ?जर आपण या सर्वांपासून स्वतंत्र नसू तर"मी" हेच एक झगडण्याचे केंद्र आहे .आपण स्वतः शांत नाही. शांतिप्रदही नाही . शांतिकारकही नाहीं .आपले हृदय कोरडे ठणठणीत आहे.तिथे प्रेमाचा उद्धव झालेला नाही.श्रद्धा ही नाशकारक आहे.आणि ही गोष्ट रोजच्या जीवनात पदोपदी लक्षात येण्यासारखी आहे.वासनेच्या तडाक्यात सापडून श्रद्धेला चिकटून राहणारा "मी" या सगळ्या प्रक्रियेचे साक्षित्व करू शकेन काय?मन (श्रद्धा बदलून नव्हे )श्रद्धेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकेल काय?तुम्ही शब्दाने होय किंवा नाही असे उत्तर देऊ शकणार नाही .पण जर तुमची श्रद्धेपासून मोकळी होण्याची तळमळ उत्कट असेल, तर तुम्ही निश्चित उत्तर देऊ शकाल .त्या तळमळी मधून तुम्ही अशा एका ठिकाणापर्यंत येऊन पोचू शकाल, कि जिथे या सुरक्षित असावे या वासनेपासून मुक्त करतील, अशा साधनांचा तुम्ही शोध घेऊ लागाल.ईश्वर आहे.तो आपली काळजी घेत असतो .आपल्या बारीक सारीक हालचालीवरही त्याची नजर असते.तो तुम्हाला काय करावे व काय करू नये हे सांगत असतो .अशा गोष्टींवर श्रद्धा ठेवणे आपल्याला आवडते .अत्यंत अपरिपक्व व बालिश असे हे विचार आहेत .तुम्ही म्हणता त्या आकाशातील बापाचे आपल्यापैकी प्रत्येकावर लक्ष आहे.हे केवळ जे तुम्हाला आवडेल त्याचे प्रतिबिंबीकरण आहे .हे सत्य नाही. सत्य संपूर्णपणे निराळे आहे .

आता अापण ज्ञानाचा( अध्यात्मिक ज्ञान)विचार करू .ज्ञानाचा विचार समजणे हे तर फारच बिकट आहे .सत्य समजण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे काय ?जेव्हा मी म्हणतो "मी जाणतो "त्यावेळी त्यात ज्ञान म्हणून काही चीजआहे अशी गर्भित सूचना आहे . असे मन शोध घेण्याला व सत्य हुडकण्याला समर्थ असेल काय ?ज्याला आपण ज्ञान ज्ञान म्हणून म्हणतो, जे "मी जाणले" "मी ओळखले" असे म्हणतो, असे ते काय आहे ? त्याचे"ज्ञानाचे"स्वरूप काय आहे ?त्याबद्दल आपल्याला अभिमान का वाटतो ?ज्ञान ज्ञान आपण कशाला म्हणतो?ज्ञान म्हणजे "स्थिती ओळखल्याबद्दलची , समजल्याबद्दलची माहिती, किंवा आपल्याला आलेल्या एखाद्या अनुभवाबद्दलची पावती .सतत गोळा केलेली माहिती, निरनिराळ्या तथाकथित ज्ञानाचा संग्रह,म्हणजे "मी जाणतो" .आणि लगेच आपण जे काही वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले असेल , त्याचा आपल्या पार्श्वभूमी प्रमाणे, वासनेप्रमाणे,अनुभवाप्रमाणे, धारणे प्रमाणे, अनुवाद करू लागतो .श्रद्धा व ज्ञान यांच्या हालचाली सारख्याच आहेत.दोन्हीही -सुरक्षित असावे- -सदैव असावे- या मूलभूत वासनेने ,उभारलेल्या तटबंद्या आहेत .फक्त आपण श्रद्धेच्या ठिकाणी ज्ञान घालतो एवढेच .आपण काय छाती ठोकून म्हणतो "मी जाणतो"माझा तो "अनुभव" आहे .तो नाकारता येणारच नाही.मी त्यावर संपूर्ण विसंबून राहू शकतो .ही ज्ञानी इसमाची बडबड आहे .पण जर तुम्ही त्याच्या पाठीमागे जाऊन पाहाल ,त्याचे पृथ:करण करून पहाल,जास्त काळजीपूर्वक चिकित्सकरित्या विश्लेषण कराल,तर तुम्हाला आढळून येईल, कि तुम्हाला व मला विलग करणारी ही दुसरी भिंत आहे.या तटबंदी मागे तुम्ही आश्रय घेता, विसावा शोधता, सुरक्षितता हुडकता,आणि त्यामुळे जो जो ज्ञान जास्त तो तो या ज्ञानाचे ओझे पुष्कळ, आणि तो तो समजण्याची ताकद कमी,असा हा प्रकार आहे. आपल्याला ज्ञान मिळविण्याची प्रबळ इच्छा असते.पण ज्ञान ज्ञान म्हणजे नक्की काय?आपण ते मिळविण्याचा सारखा प्रयत्न कां करीत असतो ? याचा आपण कधी विचार केला आहे काय?ज्ञान प्रेम निर्माण करते काय ?निदान त्याची मदत तरी होते काय? ज्या गुणधर्मांमुळे अंतर्बाह्य विरोध निर्माण होतो, तो कमी होण्याला, नष्ट होण्याला, त्यापासून मुक्त व्हायला, ज्ञान मदत करते काय?ज्ञान, मन वासना मुक्त करू शकते काय ?-नाही -ज्ञान तुम्हाला काहीतरी बनण्याच्या काहीतरी होण्याच्या धडपडी पासून कधीही मुक्त करू शकत नाही. या गुणधर्मामुळे आपले संबंध दूषित केले जातात. ज्यामुळे माणसा माणसात विरोध निर्माण केला जातो, त्यातील ज्ञान हे एक आहे.

जर आपल्याला शांतपणे जगायचे असेल, तर सर्व प्रकारची ध्येयें,केवळ राजकीय आर्थिक सामाजिक नव्हे, तर त्याहूनही गूढ आत्मिक व अध्यात्मिक ,काहीतरी असण्याची बनण्याची वासना, संपूर्णपणे संपूर्णपणे नष्ट झाली पाहिजे .ज्ञानसंग्रह करण्यापासून, या जाणण्याच्या इच्छेपासून,मन कधी तरी स्वतंत्र होईल काय ?

ज्ञान व श्रद्धा या आपल्या जीवनातील केवढा मोठा भाग बळकावून बसलेल्या असतात .केवढ्या जोराने व जोमाने त्यांचे कार्य अविरत चाललेले असते.यांचे साक्षित्व करणे, ही एक फार गमतीची व आकर्षक गोष्ट आहे .प्रचंड ज्ञान व गाढे पांडित्य असलेल्या लोकांबद्दलचा आपला भक्तिभाव पाहा .याचा अर्थ तुम्हाला समजतो काय?जर तुम्हाला काहीतरी नवीन शोधायचे असेल, जर तुम्हाला मनोनिर्मित नाही व मनोगम्य नाही असा काहीतरी अनुभव हवा असेल, तर तुमचे मन स्वतंत्र नको काय?नवीन पहाण्याला ते समर्थ नको काय ?जोपर्यंत ज्ञान व श्रद्धा यांची झापडे आहेत, तो पर्यंत सत्य पाहता येईल का ?दुर्दैवे करून जेव्हा जेव्हा तुम्ही काही नवीन बघता,त्या त्या वेळी तुम्ही तुम्हाला ज्ञात असलेली माहिती, तुमचे ज्ञान, तुमच्या आठवणी, तुमचा अनुभव, हे सगळे काही मध्ये अाणता ,व अश्या रीतीने नवीन काही बघण्याला, नवीन काही समजण्याला, तुम्ही असमर्थ ठरता.श्रद्धा व ज्ञान यांच्या चष्म्यातून वस्तू बघितल्यामुळे ती विपरीत दिसते .तिचे स्वरूप आकलन होत नाहीं.कृपा करून शब्दांचा कीस काढू नका .जर मला घरी कसे परत जायचे हे माहीत नसेल तर मी या शहरात हरवेन.जर मला यंत्र कसे चालवावे हे माहित नसेल,तर कारखान्यात मी निरुपयोगी ठरेन.या फार वेगळ्या गोष्टी आहेत ,त्यांची चर्चा आपण येथे करीत नाही.सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचे एक साधन ,मानसिक व अंतर्यामी अत्यंत असुरक्षित वाटत असल्यामुळें व अत्यंत सुरक्षित असण्याची प्रबळ दुर्दम्य इच्छा असल्यामुळे,त्या वासनापूर्तीसाठी वापरले जाणारे एक साधन, असे जे ज्ञान त्याचा आपण विचार करीत आहोत .तुम्हाला ज्ञानापासून कसली प्राप्ती होते ?.अर्थात विद्वत्ता व त्याचा कैफ,गाढेपणा, पारंगतता, महत्त्वपूर्ण असल्याबद्दलची सुप्त किंवा प्रगट जाणीव, जिवंतपणा, तरतरीतपणा, आपल्याला प्राप्त होत नाही काय?जो मनुष्य मी जाणतो ,मला माहित आहे, माझा असा असा अनुभव आहे ,असे असे आहे, असे असे नाहीं ,

असे म्हणतो तो निश्चितपणे विचार करण्याचा थांबलेला आहे.या वासना प्रक्रियेचे साक्षित्व त्याने थांबवलेले आहे .

आता आपला असा प्रश्न आहे कि ज्ञान व श्रद्धा या आपल्या शृंखला आहेत .ही डोळ्यावरची झडपे आहेत .यांनी आपण जखडलेले आहोत .यांच्या ओझ्याने आपण वाकलेले आहोत .तर मग मनाला संग्रह केलेल्या श्रद्धा व ज्ञान कि जे केवळ भूतकाळातील आव्हान जबाब व संग्रह याचा परिणाम आहे,त्यापासून स्वतंत्र होता येईल काय ?समाजामध्ये श्रद्धा व ज्ञान , यावरच आपली वाढ झालेली असूनही, तुम्हाला व्यक्ती म्हणून, श्रद्धा व ज्ञान यापासून स्वतंत्र होऊन वागता येईल काय?माझा प्रश्न तुम्हाला कळला काय?ज्ञानापासून मुक्त होण्याचे सामर्थ्य मनामध्ये आहे काय?आपण कितीतरी धार्मिक ग्रंथ वाचतो, काय करावे,काय करू नये,कसे वागावे, ध्येय कोणते ठेवावे, ते कसे प्राप्त करून घ्यावे,खरे ध्येय कोणते, ईश्वर म्हणजे काय, हे सर्व नीट सुसंगत सविस्तर त्या धार्मिक ग्रंथातून विशद केलेले आहे .तुम्ही ते नीट समजून घेतले आहे. तुमचा मनःपूर्वक अभ्यासही चाललेला आहे .हे तुमचे ज्ञान आहे .ते तुम्ही मिळविलेले आहे.याचा तुम्ही अभ्यास चालवलेला आहे .त्या मार्गावरून तुमची वाटचाल चालू आहे .अर्थात तुम्ही जे मिळविण्याचा व शोधण्याचा प्रयत्न चालविलेला आहे, ते तुम्हाला मिळेलच, पण ते सत्य आहे काय ?तुमच्या ज्ञानाचे ते केवळ प्रतिबिंब नाही काय?ते सत्य नाही "आत्ता" "उद्या नाही", या शब्दांचा अर्थ तुम्हाला आता कळला असेल."आत्ता" आणि "मला सत्य उमजले"असे जेव्हा तुम्हाला सत्य उमजेल तेव्हा म्हणा आणि नंतर विसरून जा म्हणजे तुमचे मन कल्पना व प्रतिबिंबीकरण यात गुंतून पडणार नाही .त्याने लंगडे होणार नाही.

मन श्रद्धेपासून स्वतंत्र होण्याला समर्थ आहे काय?हो जरूर आहे .जेव्हा तुम्ही श्रद्धेला चिकटून बसण्याच्या मुलभूत प्रवृत्तीची, केवळ प्रगट नव्हे तर सुप्तही,कारण मीमांसा लक्षात घ्याल,तेव्हा तुम्ही श्रद्धेपासून स्वतंत्र होऊ शकाल.आपण केवळ जड जाणिवेच्या पातळीवर वावरणारी वस्तू नाही.खोलवरच्या सुप्त व प्रगट हालचाली,आपण अवश्य शोधू शकू .आपण फक्त सुप्त मनाला संधी दिली पाहिजे .सुप्त मन हे प्रगट मनापेक्षा जास्त तरल, हुषार, कार्यक्षम, व एका अर्थाने जास्त जागृतही आहे.जेव्हा तुमचे प्रगट मन,थंडपणे ऐकत, पाहात, विचार करीत, अनुभवीत असते, त्या वेळेला सुप्त मन जागृत असते व ऐकत असते, ते प्रगट मनाहून कितीतरी वेगाने जास्त पटीने कार्यरत असते. सुप्त मन तुम्हाला,ते श्रद्धेपासून स्वतंत्र होण्याला समर्थ आहे कि नाही, याचे उत्तर जरूर देऊ शकेल.जे मन श्रद्धेने वाकलेले ग्रासलेले आहे,जे मन श्रद्धेचे गुलाम झालेले आहे,जे मन शिस्त म्हणून श्रद्धेचे पालन करीत आहे,ते मन कधीतरी स्वतंत्रपणे विचार करु शकेल काय?ते ताजेपणाने प्रत्येक आव्हान पेलू शकेल काय?अनुभवू शकेल काय ? तुम्हाला इतरांपासून दुरावणारी प्रक्रिया थांबवू शकेल काय?कृपया श्रद्धा लोकसंग्रह करते असे म्हणू नका .श्रद्धा, लोक कधीही एके ठिकाणी आणू शकत नाही .ही गोष्ट अगदी उघड आहे .

कोणत्याही धर्माने ते आजतागायत केलेले नाही .तुम्ही सर्व श्रद्धावान आहात.तुमची कोणा ना कोणावर श्रद्धा आहे. तुम्ही एकत्र आहात काय?तुम्हाला माहित आहे की तुम्ही नाही .तुम्ही जाती,पंथ, धर्म, वैचारिक प्रवाह, राष्ट्रीयत्व, तत्त्वज्ञाने,प्रांतीयत्त्व, इत्यादिकांनी दुभंगलेले आहा.सर्व जगात हेच चालले आहे .मग ती पूर्व असो नाहीतर पश्चिम असो . ख्रिश्चन ख्रिश्चनांचा नाश करीत आहेत. मुसलमान मुसलमानांचा नाश करीत आहेत. हिंदू हिंदूंचा नाश करीत आहेत. बौद्धपंथीय ही एकमेकांचा नाश करीत आहेत.एकमेकांची क्षुद्र कारणावरून हत्या करीत आहेत .श्रद्धा एकमेकांच्या विरुद्ध असतील, वेगवेगळ्या असतील, तर मग बघायलाच नको. एकमेकांच्या जिवावर उठण्यासाठी आणखी एक सबळ कारण तुम्हाला प्राप्त होते .युद्धासाठी निरनिराळी राष्ट्रे व गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले आहेत . श्रद्धा कधीही लोकांना एकत्र आणीत नाही .हे अगदी स्पष्ट आहे .जर हे स्पष्ट असेल, जर ही वस्तुस्थिती असेल, आणि जर ती तुम्हाला उमजली असेल,पटली असेल, तर आपण त्यावर ताबडतोब उपाययोजना करायला नको का ?प्रश्न हा आहे की आपल्याला शब्द कळतात पण अर्थ कळत नाही.अर्थ समजून घेण्याला मनाची तयारीच नसते.कारण श्रद्धा नाही तर सुरक्षिततेची भावना कुठची?आणि मग अशा असुरक्षिततेत आपण राहणार कसे ?आपले मन असुरक्षिततेला तोंड देण्याला असमर्थ असते.आपल्याला कशाचातरी आधार लागतो.कसला तरी आश्रय लागतो. कसले तरी विश्रांतिस्थान हवे असते.ते खोटे आहे,फसवे आहे,असे कळले तरी ते मन मानायला तयार नसते .मनाची उमजून घेण्याची प्रवृत्ती नसते .अश्या कळण्याकडे, दुर्लक्ष केले जाते .राष्ट्र, जात, धर्म, सरकार, पंथ, गुरू, प्रेषित, आणखी काही, पण काही ना काही पाहिजे असते .त्याच्या मांडीवर डोके ठेवून,आपण तथाकथित निश्चिंतता उपभोगू शकू.यदा कदाचित यातील फसवेपणा लक्षात आला, तरी त्याच्या विदारक दर्शनाने त्यांचे डोळे दिपतात. असे लोक डोळे बंद करून, पूर्वस्थितीला जाऊन, त्यातच खूष राहतात.परंतु जर तुम्ही खरोखरच वस्तुस्थिती जाणाल, मग ती क्षणमात्र का असेना, एक असामान्य गोष्ट घडत असलेली तुमच्या निदर्शनास येईल .सुप्त मन एकदा का त्यातील सत्य कळले,म्हणजे कामाला लागते .मग प्रगट मन ते झिडकारून का देईना, तो क्षण हाच फार महत्त्वाचा आहे . त्याचे परिणाम निश्चितपणे होणारच.मग प्रगट मन श्रद्धेच्या बाजूने कितीही झगडत असले,तरी हरकत नाही .

तेव्हा आपला प्रश्न असा आहे कि मनाला श्रद्धा व ज्ञान यांपासून स्वतंत्र होणे शक्य आहे काय?मी असे विचारतो कि मन म्हणजेच श्रद्धा व ज्ञान नाही काय?मनोघडणीमध्ये श्रद्धा व ज्ञान याशिवाय काय आहे ?श्रद्धा व ज्ञान म्हणजेच ओळखण्याची, तुलनेची, नामकरणाची व संग्रहाची प्रक्रिया होय .तेच मनाचे केंद्रस्थान होय.परंतु ही प्रक्रिया जगापासून आपल्याला विलग करणारी, स्वतःच स्वतःला कोंडून घेणारी आहे.मन स्वतःचा नाश करू शकेल काय?मन स्व-गुणधर्मापासून स्वतंत्र होऊ शकेल काय ?मन असण्याचे थांबेल काय ?मन स्तब्ध होईल काय?खरा प्रश्न हा आहे कि जे मन आपल्याला ज्ञात आहे त्याचे, श्रद्धा,वासना, सुरक्षितअसण्याची उत्कट इच्छा, ज्ञान,शक्तिसाठा करणे,हे पैलू आहेत .जर आपण स्व-विचार करू शकलो नाही तर जगात शांती नांदणे अशक्य आहे .तुम्ही शांतीच्या गप्पा माराल,शांतीवर प्रवचने झोडाल, शांतीचे गुणानुवाद गाल, राजकीय पक्षांची उभारणी कराल, घराच्या आढ्यावरून बोंब माराल,परंतु तुम्हाला शांती मिळणार नाहीं.मन हेच अशांतिचे स्थान आहे.इथेच विरोध निर्माण होतो .इथेच विलगता उत्पन्न होते.इथेच वेगवेगळी डबकी निर्माण होतात.

खरा शांतीचा चाहता, खरा प्रामाणिक, खरा तळमळीचा,खरा कळकळीचा मनुष्य, स्वतःला जगापासून श्रद्धा व ज्ञान यांनी विलग करून,विश्वबंधुत्वाच्या व शांतीच्या गप्पा मारू शकत नाही.श्रद्धा व ज्ञान यांचा आश्रय, म्हणजे राजकीय किंवा धार्मिक खेळ आहे .काहीतरी मिळवण्याच्या, काहीतरी होण्याच्या, काहीतरी बनण्याच्या धडपडीचा, तो परिपाक आहे .जो प्रामाणिक आहे,ज्याला शोध घ्यावयाचा आहे, त्यांने ज्ञान व श्रद्धा यांना सरळसरळ तोंड दिले पाहिजे .त्याने श्रद्धा व ज्ञान म्हणजे काय ते पाहिले पाहिजे.

श्रद्धा व ज्ञान यांच्या पाठीमागे जावून, सुरक्षित असणे या वासनेचा विलास व त्याचे परिणाम यांचे संशोधन केले पाहिजे.

ज्या मनाला काही नवीन समजून घ्यायचे आहे,मग ते सत्य असो, ईश्वरअसो,कि आणखी काही असो;त्याने मिळविणे, संग्रह करणे, थांबविले पाहिजे.त्यांने सर्व ज्ञान व श्रद्धा बाजूला सारल्या पाहिजेत .जे सत्य आहे, जे अगणित आहे, जे अनंत आहे, ते श्रद्धा व ज्ञान यांनी वाकलेल्या मनाला समजणार नाही

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel