प्रवेश पहिला
( स्थळ : कुबेरांचा वाडा )
( मंदाकिनी, वल्लरी, तुंगा, त्रिवेणी, जान्हवी, शरयू वगैरे मुली गौरीची मांडणावळ मांडून )
मंदाकिनी : आतां बायकांना म्हणावं हवं तेव्हां या. आमच्याकडून तयारी आहे. वल्लरी, तें वाळ्याचं अत्तर गंघांत घातलंस ना ?
वल्लरी : हो हो, बघ हवं तर ! ( वास दाखविते ।
शरयू : मंदाकिनी, पोरीसोरींना सरसकट एकेक तुरा द्यायचा म्हणतेस, पण तुरे सगळे हतकेच ना ?
मंदाकिनी : ते कां ? माळ्याला आणखी इतके आणायला सांगितले आहेत. बरं, आतां मांडणावळींतलं कांहीं राहिलं नाहीं ना ? बघतें हो. अग सगळंच मुसळ केरांत ! गौरीपुढें मिठाईचं तबक ठेवायला विसरलोंच. शरयू, जा बरं तेवढं घेऊन ये. ( शरय़ू जाते ) आजचं हळदीकुंकू मुलीमुलींचं आहे. कांहीं चुकलं नाहीं म्हणजे झालं.
जान्हवी : कांही चुकत नाहीं. जिनं तिनं आपापलं काम संभाळायचं.
मंडाकिनी : ( बुवाचें सोंग घेतलेले दोन मुलगे हंसत येतात, त्यांस ) या बुवा ! ही तुमची जागा बरं का ! बायका यायला लागल्या म्हणजे डोळे मिटून माळ ओढीत पुटपुटत बसायचं. नाहीं तर त्यांच्या देखत जवळच्या ताटांतलं कांहीं तरी उचलून टाकाल तोंडांत.
त्रिवेणी : आम्ही सगळ्याजणी कशा हौसेनं जमून काम करतों आहों; पण ती शारदा कांहीं अजून आली नाहीं. मग कसला तिला इतका डौल आला आहे कोण जाणे !
वल्लरी : येऊं द्या तर खरी, चांगली खोड काढतें, आज मला तिची एक गम्मत समजली आहे.
तुंगा : अग गप्प, तीच आली पाहा.
मंदाकिनी : शारदे, हें ग काय तें !
शारदा : ( येऊन ) अशी रागावूं नकोस. झाला खरा बाई थोडा उशीर.
मंदाकिनी : मी तुला जेवतांक्षणींच यायला सांगितलं आणि तूं आतां आलीत ! मोठी शहाणीच म्हणायची मग ! आणि म्हणते रागाऊं नको.
वल्लरी : मंदाकिनी, अग तुग करून कुणाचं ग शहाणपण काढलंस तें ? शुद्धीवर आहेस का ! कांहीं तरी मेला विचार ! आपली उचलली जीभ आणि लावली टाळ्याला म्हणजे काय ! जिनं तिनं आपली पायरी ओळखून बोलावं.
मंदा० : हें काय ! मी पायरी विसरून कुणाला काय बोललें बाई ? आतां शारदेला उशीर कां केलास म्हटलं, त्यांत कांहीं चुकलं असेल त्र सांग,
वल्लरी : आधी कान पिळून जिभेला चांगला चिमटा घे, आणि नाकदुराई काढून चुकलें म्हणून बाईसाहेबांचे पाय घर.
मुली : ( साश्चर्य ) बाईसाहेब कोण ?
वल्लरी : दिसत नाहींत का कोण त्या ? त्रिवेणी, जा आधीं बाईसाहेबांना बसायला तो कमळाचा मखमली गालिचा घेऊन ये आणि शरय़ू ---
पद्य --- ( लेगवोचिर वनमाली )
घेउनि ये पंखा वाळ्याचा जा जा जा झणीं ॥ध्रु०॥
नाजुक ही राणी घाबरि होय उन्हानें, उमटेना बघ वाणी ॥
मधुर सुवासाचें सुंदर झारि भरोनी, आण गडे तूं पाणी ॥१॥
मंदाकिनी : कुणाचे ? शारदेचे का आदरसत्कार चालले आहेत ? मली चावट बरं का तूं ! इतंक करून हंसते का बघा !
शारदा : काय मेला एवढासा उशीर झाला यायला, तर इतकी थट्टा करतेस ? येऊन जाऊन काय तो कामाचाच डौल ना ? तूं बैस कशी आतां स्वस्थ. मी तुझ्याहिं वांटणीचं काम करतें आणि माझ्याहि वांटणीचं करतें.
वल्लरी : भलंतच कांहीं तरी ! बाईसाहेबांनीं काम करून आम्हीं स्वस्थ बसायचं ! नको ग बाई !
मंदा० : वल्लरी, पुरे मेली इतकी थट्टा, मधाशीं मला एक शारदेची गम्म्त समजलीं आहे म्हणत होतीस, ती काय गम्मत ग ?
मुली : खरंच वल्लरी, काय गम्मत ग ती ? सांग सांग, पाहूं लौकर ! ( तिच्याभोंवतीं जमतात )
वल्लरी : अशी घाई नका करूं गडे ! गम्मत म्हणजे गमतीगमतीनंच सांगितली पाहिजे. शारदा आज शेलारी नेसली आहे ती पाहिलीत का ?
शारदा : हं, आतां शेलारीवर वळली वाटतं संक्रांत !
वल्लरी : कुणीं दिलीन् तें ओळखा बरं ?
जान्हवी : हा मेल्यांनो ! हें कसं ओळखायचं ! शारदे, तूंच सांगेनास ?
शारदा : वल्लरीचा एकदां चावटपणा संपूं द्या; माग सांगेन मी.
वल्लरी : श्रीमंतांनीं तुला शेलारी दिली, त्यांत मीं ग काय चावटपणा केला ? श्रीमंतांनीं केला असं म्हण हवं तर !
तुंगा : हें बाई कांहीं निराळंत दिसतं बरं का ! शारदे, श्रीमंत ग कोण ?
शारदा : मला कांहीं ऐकायलाच येत नाहीं.
वल्लरी : नाहींत यायचं ! पण तिला कशाला विचारतां ? मी सांगतें तें. ते हेरंबमहालांत येऊन राहिले आहेत ते ---
मंदा० : समजलें; पण त्यांनीं काय म्हणून हिला शेलरी दिली /
वल्लरी : उगीच कोण कुणाला देईल ? ही त्यांच्या मनांत भरली असेल म्हणूण दिली असेल. म्हणजे काय ? इतकं नाहीं का मेलं समजत ? पण ही शारदा येत्या वैशाखांत त्या श्रीमंतांची अर्धांगी होणार ! आतां तरी पडला का उजेड ! खरंच का म्हणजे ! मुहूर्त सुद्धां ठरला. माझे बाबाच सांगत होते.
तुंगा : सुवर्णशास्त्री ना ? मग खरंच तर. तरी म्हटलं, वल्लरीनं इतकी थट्टा केली तरी ही रुसली कशी नाहीं !
शरयू : तूं तरी मोठी हीच दिसतेस. अग, अशा साखरथट्टेला का कुणी रुसतें ? उलटी गालांतल्या गालांत खुदुखुदु हंसत होती.
जान्हवी : कां नाहीं हंसायचीं ? एकदां लग्न होऊं द्या म्हणजे बघा ---
पद्य --- ( जरि गंध गजाचा )
श्रीमंत पतीची राणी, मग थाट काय तो पुसतां ॥
बंगला नवा नवकोनी, फुलवाग बगीचा भवता ॥
किति दासी जोडुनि पाणी, “ जी ” म्हणतिल कामाकरितां ॥
ही जात्या चतुर शहाणी, पति मुठींत ठेविल पुरता ॥चाल॥
सुग्रास बसुनि खायाला ॥ मउ शय्या लोळायाला ॥
गुजगोष्टि काळ जायाला ॥ ना काम, धाम, ना चिंता ॥
ही फगेल बघतां बघतां ॥१॥
मन्दाकिनी : बरं, काय ग शारदे, श्रीमंतांची खाशी स्वारीच का पाहायला आली होती ?
शारदा : इश्श मेलं । मला नाहीं ठाऊक बाई !
जान्हवी : अहाहा ! इतक्यांतच का इतकी लाजायला लागलीस ! मग लग्न झाल्यावर तर लाजून लाजून मानेचे तुकडे पडतील. त्यांच्या जवळच का बसली होतीस ?
वल्लरी : का श्रीमंतांच्या मांडीवर बसली होतीस ?
शरय़ू : इश्श ! लग्नाच्या आधींच का मांडीवर बसतात कुणी ?
वल्लरी : अग, आम्ही काय भिक्षुकांच्या सुना. श्रीमंतांच्या घरची काय रीत असते ती आम्हांला काय माहीत !
शारदा : मंदाकिनी, या बाई फारच चावटपणा करायला लागल्या. मला कांहीं काम सांगतेस, का मी आपली हळदकुंकू घेऊन जाऊं घराकडे ?
मंदाकिनी : आतां नका ग कुणी तिची थट्टा करूं.
जान्हवी : पण शारदे, खरंच सांगूं का ? एकदां त्या वैभवांत जाऊन पडलीस म्हणजे ---
पद्य --- ( मूढमते तूं पाप )
तूं श्रीमंतिण खरी शोभशिल ॥ डौल किती येईल तुला, मग आम्हां विसरशिल ॥ध्रु०॥
कधीं पालखिंत मिरवित जाशिला ॥ कधिं अंबारी मेणा कधिं, कधिं, रथांत फिरशिल ॥१॥
कधीं पैठणी लाल नेसशिल ॥ कधीं काजळी शालु बुट्ट्यांचा अशी चमकशिल ॥२॥
कधिं मोत्यांची पुतळी होशिला ॥ शुभ्र हिरा कधिं, पाचहि हिरवीगार लेशिल ॥३॥
मंदाकिनी : डौल करूं द्या, आम्हांला विसरूं द्या, पण एकदां श्रीमंतांची पट्टराणी होऊं द्या ! बिचारी किती दिवस नवर्यासाठीं नवस करीत होती; पण शेवटी देवांन गार्हाणं ऐकलं हो ! शारदे. असं स्थळ हजारों रुपये हुंडा भरून मोठमोठयांच्या मुलींना सुद्धां मिळायचं नाहीं.
त्रिवेणी : बरं पण वल्लरी, श्रीमंतांचं वय किती आहे ?
वल्लरी : अंहं ! तेवंढ मात्र विचारूं नकोस, श्रीमंत आहे. हौशी आहे. मायाळू आहे, तें सगळं हवं तसं आहे. पण वयाची गोष्ट काढू नकोत.
मुली : म्हणजे ? म्हातारा आहे कीं काय ?
वल्लरी : छे छे !
पद्य --- ( शांति घरा नृपराज )
म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान ॥ लग्ना अजुनि लहान ॥ध्रु०॥
दंताजीचें ठाणें उटलें, फुटले दोन्ही कान ॥ डोळे रुसले कांहिं न बघती नन्ना म्हणते मान ॥१॥
तुरळक कोठें केस रूपेरी, डोइस टक्कल छान ॥ भार वयाचा बाहुनि वाहुनि कंबर होय कमना ॥२॥
काठीवांचुनि नेट न पाया परि मोठें अवसान ॥ उसनी घेउनि ऐट चालतां काय दिसे तें घ्यान ॥३॥
जान्हवी : शारदे, ऐकलंस का पतिराजांचं वर्णन ? अशी खाली कां मान घातलीस ? लाजलीस वाटतं ?
मंदाकिनी : ( मुलींना ) पुरे ग आतां चावटपणा. शारदे, खरंच सांगतें, तुझ्यासारख्या तरण्या बायकोला म्हातारा नवरा मिळाला तर वाईल नव्हे. कां म्हून नाहीं विचारलंस ? तुंगे, तें गाणं म्हण ग.
तुंगा :
पद्या --- ( परदेसन जोगनी )
जरठास तरूण हो स्त्री जरी ॥ ती नवरा तो स्त्रीपरी ॥ध्रु॥
भय फार बाळगी तो तिचें ॥ जणु मांजर ताटाखालचें ॥
त्यां व्यंग ठाउकें अंगिंचें ॥ मन धरुनि तिचें बहुपरी, राखि तो लौकिका घरच्या घरीं ॥१॥
मुली : ( एकेक वाक्या म्हणतात ) अग, तुला तो मुलीसारखी जतन करील. अगदीं तळहाताच्या फोडासारखी संभाळील. तुझे शब्द म्हणजे कसे अगदीं फुलासारखे झेलील. तोंडांतून निघायची फुरसत, कीं तुझी असेल ती हौस पुरवील. तो तुला अगदीं ताइताप्रमाणं गळ्यांत बाळगील !
वल्लरी : तुमचं ठीक आहे ग, दुसर्या इकडे प्राण जात असला तरी तुमची आपली थट्टा चालायची ! ( शारदेजवळ जाऊन ) फार चावट बाई या मुली, नाहीं ?
शारदा : ( तिला ढाकलून ) आणि तूं काय कमी आहेस !
जान्हवी : ( टाळी वाजवीत ) एका दुतोंडया माणसाची खाशी मोडली. नाहीं ग मंदाकिनी ?
मन्दाकिनी : तें जाऊं द्या मेलं ! पण कांचनभट किती कवडीचुंबख असला तरी तसल्या म्हातार्या खोडाच्या पदरांत आपला पोटचा गोळा टाकील. हें मला अजून खरं वाटत नाहीं.
शरय़ू : आणि शारदेला तरी कुठें खरं वाटत होतं ! त्या दिवशीं त्या संगमनाथाच्या देवळांत ही म्हणाली नाहीं का कीं, माझे बाबा कांहीं अशा उलटया काळजाचे नाहींत. पण बाई, कायसं म्हणतात ना ! ‘ दाखिवलं सोनं आणि हंसे मूल तान्हं. ’ महा हा तर कांचनभट !
त्रिवेणी : शारदे, हें ग काय ! अशी रडूं नकोस बाई; आईबापांनीं बुडविलं आणि नवर्यानं तुडिवलं, सांगायचं कुणाला ? अशीच आईकडेजा, आणि तिच्याकडून बघ कांहीं झालं तर, पण बाहेर हांका कोण मारीत आहे ? ( पडद्यांत ) अव, त्या कांचनभटाच्या सारदाबाई हतं हैत न्हवं का ? सारदाबाई. अव सारदाबाई !
वल्लरी : शारदे, तुलाच कोणी हांक मारीत आहे, आहेत रे ---
शारदा : कोण आहे रे ?
गाडीवान : ( पुढें येऊन ) कांचनभट तुमास्नी दाखवायला शिरिमंताकडे घेऊन जानार हैत, म्हून म्यां गाडी आनलीया. त्ये आतां इकत्यांत यत्याल. तुमी गाडीमंदी येऊनशेनी बसा,
शारदा : बरं, आलें चल. ( तो जातो ) मंदाकिनी, येतें बरं का ! ( सर्व मुली तिच्या कानाशीं कुजबुजतात. मंदाकिनी तिला हळदकुंकू घेऊन जा म्हणून सांगते. ) काल तर ते दोघे येऊन पाहून गेले. आज आणखी काय हें ! मघांपासून त्या सुदाम सावकाराच्या लग्नाची आठवण होते. आतां वल्लरीनं सांगितलंन तेंच अर खरं असेल तर माझं काय होईल बाई ! आणि ती तरी खोटं काय म्हणून सांगेल ! ऐकलंन तें सांगितलंन
पद्य --- ( बात हारकीजे जवानसे )
मूर्तिमंत भीति उभी मजसमोर राहिली ॥ वाटतें दुजा सुदाम मज दिसेल त्या स्थळीं ॥
दाखवावयास मला तात नेत त्याकडे ॥ राक्षसा रुचेल का पहावया जसा बली ॥१॥
( जाते )
प्रवेश दुसरा
( स्थळ : हेरंबमहाल )
श्रीमन्त : लग्नाला मुहूर्त कशाला पाहतात कोण जाणे ! तो मुहूर्त येईपर्यंत आमचा दम कसा निघावा ! त्यांतून काल तें स्वप्न पडल्यापासून तर आमची फारच धांदल उडाली आहे. पाहाचं तिकडे कोदंड दिसतो. काय चमत्कारिक स्वप्न तें ! ---
पद्य --- ( जीस कपट ठाउकें नसे )
लग्न होय चार चिवस, नाच रंग पाहिले ॥ काढिली रथीं वरात, तीस जवळ घेतलें ॥
राजदूत ते अशांत चोहिंकडुनि धांवले ॥ बांधुनी मला रथीं, तसेस नीट चालले ॥१॥
इतक्यांत कोदंड पुढें तोंड करून हंसत हंसत मला म्हणाला. कीं चला आतां कारागृहांत ! शृंखला--नवरी तुमची वाट पाहत आहे ! हे शब्द ऐकतांच माझं देहभान गेलं. जागा होऊन पाहतों तों दीक्षित पुढें उभे, त्यांना स्वप्नाची कथा सांगितली. कोदंडाची भीति समूळ समूळ नाहींशी करण्याची कांहीं तोड काढतों, असं त्यांच्यापासून वचन घेतलं. तेव्हा थोडासा निर्धास्त झालों. बरं, कांचनभट आज आपली मुलगी मला दाखविण्याकरितां आणणार होता, तो कां अजून आला नाहीं ? तो नाहीं आला तर न येईना, पण ती आली पाहिजे, या महालांत येऊन ती आज मला भेटणार, या कल्पनेनंच माझ्या सर्वांगावर आनंदाच्या लहरी येताहेत .
पद्य --- ( चार जातकी )
येइल माझी भावी कांता आतां ती या एकांतीं ॥ वेडे होतिक दिपतिल डोळे पाहुनि ती कांती ॥१॥
हंसविन, रुसविन, लाजवीनही प्रश्न खुबीचे बहु करुनी ॥ उभी राहिली वसविन खालीं, कोमल कर धरूनी ॥२॥
पाहिला चोरुनि मुख वळवोनी जेव्हां रमणी तीं मजला ॥ ही मौजेची छबी आमुची पाडिल मोह तिला ॥३॥
( आरशांत पाहून ) अरे ! नुकता स्त्रानापूवीं कल्प लावला. आणि हे मिशांचे बुडखे इतक्यांत पांढरे दिसायला लागले कीं काय ? नाही;
उगीच वाटलं तें, एकदां लावला म्हणजे पुन्हा पांढरा केस म्हणून आंतूनच निघायाचा नाहीं, असा जर मला कोणी कलप देईल. तर मी त्याला केसागणिक रुपये मोजीन. पुरुषाचं तेज, सत्त्व या पांढर्या केसाच्या रूपाने बाहेर निघून जातं असं सांगतात, म्हणून यांची इतकी प्रतिष्ठा ! ( जिन्याकडे पाहून ) आली वाटतं ! ( गडबडीनें ) दीक्षितांनीं सांगितलेल्या तयारींत चुकलों नाहीं ना ? पाहूं एकदां ---
दिंडी
करीं झळके आंगठी हिर्याची । गळां कंठी लोळते मौक्तिकांची ॥
कणि बाळी आहेच कडें हाती ॥ उंच बसनें घेतलीं योग्य तीं तीं ॥
( आरशांत पाहून ) मघांच्या विचारांनीं मुद्रा जरा निस्तेज दिसते. ती उठावदार दिसायला एक--दोन अध्यें तें प्रसन्नतीर्थ घ्यावं. पण अक्काश कुठें आहे ? आलीच ती .
दीक्षित : ( गडबडीनें येऊन ) श्रीमंत, आपण जाऊन आंतल्या महालांत बसा, कांचनभट इतक्यांत मुलगी घेऊन येईल. वेळ मात्र चांगली मारून नेली पाहिजे, नाहीं तर भ्रमाचा भोपळा फोडाल !
श्रीमन्त : छे ! ती भीति नको; पण तुम्ही आतां वरचेवर तुमचं तोंड दाखवूं नका; फक्त तिची आणि माझी गांठ घाला लौकर.
दीक्षित : आपण चला तर आंत, मी इथेंच उभा राहतों. ( श्रीमंत जातात ) या भुजंगनाथानं श्रीमंतांचं नुसतं सोंग घेतलं आहे, तर याचा स्बभाव इतका लहरी झाला आहे. म्हणतो ‘ फक्त तिची आणि माझी गांठ घाला. ’ हें साधायला काय युक्ति काढावी ? आहा ! ही आमच्याजवळ युक्तीची जंत्री असल्यावर काय कमी ? ( कांचनभट येतो त्यास पाहून ) या तुम्ही कांचनभटजी ! किती विलंब केलांत, बरं, मुलगी कुठें आहे ?
कांचन० : खाली सुवर्णशास्व्यांच्या कुटुंबांनीं थोडी बसवून घेतली आहे. श्रीमंतांची मजीं सुप्रसन्न आहे ना ?
दीक्षित : अहो ! नसते कधी ? पण हो. बरं स्मरण झालं. आज मुलगी दाखवायला आणलीत, उत्तम केलंत. कां तें सांगतों. अहो. मुलगी अतोनात मित्री आहे. असा कोणी श्रीमंतांचा ग्रह करून ठेवला आहे.
कांचन० : माझी शारदा मित्री ! हें पाहा दीक्षित, नसती खोड काढून व्यापार मोडणं, --- नव्हे लग्न मोडणं, हें श्रीमंतीलाहि शोभत नाहीं आणि संभावितपणालाहि उचित नाहीं. शारदेला मित्री कोण म्हणतो तो ? आणा त्याला असा,
दीक्षित : अहो, विघ्नसंतोषी लोकांना उद्योग काय दुसरा ? तुम्हांला त्यांच्याशीं काय कर्तव्य ? प्रत्यक्ष मी तुमची मुलगी पाहिली आहे ना ? पण श्रीमंतांच्या मनांत भरलेला संशय तर तसाच ठेवून सोय नाहीं ! त्यांचं म्हणणं श्रीमंतांच्या बायकांत मित्रेपणा असणं, हा मोठयांतला मोठा दुर्गुण .
कांचन० : आणि तुमच्या आमच्या बायकांत त्याला गुण का मानतात ? तें कांहीं नाहीं, मीच आता श्रीमंतांना सांगतों कीं स्त्री करायची म्हणजे जन्माची जोड पाहायची. ती प्रथमत:च नीट कसोशीनं पारखून केलेली चांगली.
दीक्षित : झालं ! आणखी काय ? आणि मी तरी रीतीविरुद्ध मुलीला इकडे दाखवायला घेऊन या, म्हणून तुम्हांला सांगितलं, तें याचकरतां, प्रथम काय तें होऊं द्या, जा, मुलीला हांक मारा. तिला आंत नेऊन त्यांच्यासमोर बसूवूं, आणि आपण बाहेर निघून येऊं, श्रीमंतांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तुमची मुलगी खंवीर आहे.
कांचन० : हो हो १ आहे म्हणजे ! जातों तर, तिला घेऊन येतों.
( जातो )
दीक्षित : मुलीचं लग्न करणं म्हणजे एक फायद्याचा व्यापार करणं. हें तत्त्व या भटाच्याच डोक्यांत खरं उतरलेलं पाहिलं. ( कांचनभट मुलगी घेऊन येतो ) अहो भटजी, थांबा, मी आलों रस्ता दाखवायला.
( सर्व जातात )
प्रवेश तिसरा
( श्रीमंत बसले आहेत. कांचनभट मुलीस घेऊन येतो. दीक्षित बरोबर येतो )
कांचन० : ( नमस्कार करून ) मुली, ये अशी, इथें उभी राहा, श्रीमंतही मित्री आहे, असं आपल्याला कुर्णी सांगितलं ?
श्रीमंत : हे दीक्षित, आणि हे तुम्ही ! काय तें पाहून घ्या.
कांचन० : वाहवा ! दीक्षित, आपलाच का उद्योग हा ? मग काय बोलायचं १
दीक्षित : श्रीमंतांचा उद्देश तुम्हांला समजला नाहीं, भटजी ! चलाबाहेर, सर्व सांगतों. ( स्वगत ) श्रीमंतांनीं आमच्याकडे बोट दाखवून आमच्या मंत्राचा आमच्यावरच प्रयोग केला. ( उघड ) भटजी, चला.
श्रीमंत : दीक्षित, चाललांत कुठं ? थांबा, तुम्हीं आमचा मोठा अपराध केलांत. हिचं वर्णन करतांना, तुम्ही हिचं अर्धंअधिक सौंदर्य चोरून ठेवलंत तें ठेवलंत; शिवाय तिच्या नाजुकपणाची गोष्टसुद्धा सांगितली नाहींत. किती नाजुकपणा हा १ संध्याकाळच्या कोंवळ्या उन्हानंसुद्धां हिच्या मुखकमलाच्या पाकळ्या कशा तांबडया होऊन गेल्या आहेत. पाहा. हंसतां काय !
दीक्षित : ( हात जोडून ) महाराजांनीं क्षमा करावी. ( भटजीस ) पाहा, किती दयाळू अंत:करण !
कांचन० : हें काय विचारावं ! मुली, पाहिलीस का आतांपासूनच तुझी किती काळजी ती ! तूं मित्री आहेस असा यांचा समज आहे, तेवढा नाहींसा कर, माझं यांचाशीं थोडं काम आहे.
श्रीमंत : दीक्षित, आमच्या कुटुंबाकडे पाहिजे तशी तशी द्दष्टि लावणारे तुम्ही कोण ? चला इथुन.
दीक्षित : चुकलों, महाराज, ( स्वगत ) इतक्यांतच मत्सराचा संचार झाला का ? ( उघड ) चला, भटजी.
शारदा : तुम्ही चाललांत, पण बाबा, मी इथें एकटी कशी राहूं ?
कांचन० : ( हळूच ) हाच, हाच तो मित्रेपणा, पुन्हा असं बोलूं नकोस, मी हा आलोंच, काय नांव--गांव विचारतील तें न भितां सांग म्हणजे झालं. ते कांहीं खात नाहींत तुला ! ( जातो )
शारदा : ( स्वगत ) बापाला माया कमी म्हणतात तें खरं !
श्रीमंत : आतां सुरुवात कशी करावी ? मीच गांगरून गेल्यासारखा झालों आहें. ( उघड ) तूं अशी उभी कां ? या सुखासनावर बैस. भिऊं नको, तुझंच घर आहे.
शारदा : ( स्वगत ) मला भिऊं नको म्हणतात; आणि यांच्या अंगांत कांपरं भरलं आहे हें कसलं ? म्हातारपणाचं कीं काय ?
श्रीमंत : तुझा--आमचा थोडक्यांतच एकजीव व्हावयाचा आहे, म्हणून आतांपासून थोडी थोडी लाज कमी कर. ( जवळ जाऊन ) हंसत हंसत माझ्याकडे पाहा बरं.
शारदा : ( वर पाहून स्वगत ) अगबाई ! काय चमत्कारिक चेहरा दिसतो हा ! इश्श ! कपाळभर सारं आठयांचंच जाळं पसरलं आहे.
श्रीमन्त : ( स्वगत ) माझ्याकडे पाहून हिनं तों फिरवलंन तेव्हां कल्पाची शंका आली कीं काय हिला ! ( आरशांत पाहतो )
शारदा : ( स्वगत ) आरशांत काय पाहतो हा ?
श्रीमन्त : ( स्वगत ) मला वाटलं, एखादा पांढरा केस डोकावून पाहूं लागला कीं काय ? पण नाहीं. ह्या हिरडया मात्र नवीन सुजल्या. मला मोठं भय वाटतं या दांतांच्या कवळीचं. आज बसावी तशी साफ वसली नाहीं, पण हें काय १ याच नादांत लागलों, ( तिच्याजवळ जाऊन उघड ) अजून नाहीं का बसलीस तूं ? बरं तुझं नांव काय तें न लाजतां सांग, अगदी भिऊं नकोस.
शारदा : माझं नांव शारदा.
श्रीमंत : काय, सारजा ? वा ! नांव किती गोड ! सुंदर मुखांतून, मधुर वाणींतून निघालेलं गोड नांव ! मग काय विचारतां !
( मान डोलवीत राहतो )
शारदा : ( स्वगत ) मीं सांगितलं शारदा, आणि यांनीं ऐकलं सारजा ! वल्लरीनं म्हटलं तें खरं, याला चांगलं ऐकायला येन नाहीं.
श्रीमंत : ( जवळ जाऊन ) बरं, आतां वर पाहा, आणि मी तुला आवडलों असं हास्यमुखानं सुचीव बरं.
शारदा : ( स्वगत ) हें लक्षण कांहीं ठीक दिसत नाहीं.
शारदा : तूं कां नाहीं वर पाहात मी समजलों, पण श्रीमंतांच्या बायकांना इतकी लाज नको, ( तिचा हात धरून ) तुज्या मनांत भरलों ना मी ?
शारदा : ( दूर होऊन ) हं, हें काय ! पाहायला आणलेल्या मुलीच्या अंगाला हात लावणं म्हणजे काय ?
श्रीमंत : ( हंसत ) आतां कशी मोठयानं बोललीस ! पण हेंच हंसत बोल, रागानं नको, हात धरणार होतों, त्यांत काय बिघडत होतं बरं ? लग्न झाल्यावर तरी तो मीच धरणार कीं नाहीं ?
शारदा : माझ्या फुटक्या नशिबानं तसं झालं. तर आहेच कपाळीं. पण तोंपर्यंत कुंवारपणाला न शोभणारं असं मी कुणाला कांहीं करूम करुं द्यायची नाहीं !
श्रीमंत : बरं, लग्न झाल्यावर तुझ्या अंगावर दागिने घालायचे ते कसले पाहिजेत ? हिर्याचे का मोत्याचे ? का पाचूचे ? ( पाठीवर हात फिरवृन ) जी हौस असेल ती सांग,
शारदा : ( हात झिडकारून ) हें पाहा, असा जर चावटपणा पुन्हा कराल, तर मी मोठयानं ओरडून बाबांना हांक मारीन, पाहिलंत ना मला ? जातें मी आतां.
श्रीमंत : छे छे ! नको, नको, ! ( स्वगत ) बापाला कांहीं तरी भलतंच सांगेल. ( उघड ) छे छे ! हें काय बरं सारजे ! तूं जाऊं नकोस, ( तिला अडवितो ) मीं तो बिनोद केला.
शारदा : ( त्वेपानें ) मला अशी अडवाल तर मी तुमच्या पायाशी कपाळ फोडून घेईन, सोडा मला. कोण आहे हो तिकडे ?
श्रीमंत : नको नको, तुझ्या पायां पडतों, ओरडूं नकोस, पुन्हा तसं करायचा नाहीं. खोटं वाटत असेल तर ही पाहा थोबाडींत मारून घेतो. ( तसं करतो, आणि दांतांची कवळी अधीं बाहेर पडते, गोंधळून जातो )
शारदा : ( स्वगत ) अगबाई ! हें काया ! ही दांतांची बसविलेली कवळी गालफडात मारून घेतांना बाहेर आली वाटतं.
श्रीमंत : ( स्वगत ) पाहिलीन १ पाहिलीन ! हिनं पाहिलीन ! आतां हिला काय सांगावं ! तिच्याजवळ जेऊन उघड ) आमच्या राजवैद्यानं मला एक रसायन दिलं होतं. हे त्यानें माझे दांत किडले, म्हणून मीं तें काढून हे नवे बसविले होते. हें मी तुला लग्न झाल्यावर सांगणारच होतों, तें आजच आपोआप कळलं, छान झालं, कारण नवराबायकोंत कांहीं गुप्त राहूं नये, खरं कीं नाहीं सांग ? पण ही गोष्ट कोणापाशीं बोलूं नकोस. नाहीं ना बोलायचीस ?
शारदा : माझी एक विनंति मान्य कराल तर नाहीं बोलायची.
श्रीमंत : ती कोणती विनंति ?
शारदा : हीच कीं, आपण आपल्या तोलाच्या कोणा तरी श्रीमंताच्या मुलीशीं लग्न करावं.
श्रीमन्त : आणि तुझ्याशीं कां नको ?
शारदा : रेशमी शेल्याला सुताच्या दशीसारखी गरिबाची पोरगी मी ! शोभलें तरी पाहिजे ना ?
श्रीमंत : हेंच ना कारण ? अं: ! लग्न झाल्यावर श्रीमंताची होशील.
शारदा : दुसरं एक आहे.
श्रीमन्त : दुसरं कोणतं ?
शारदा : सांगतें. पण ---
अजंनी गीत
वाटुं न द्यावा विषाद चिता ॥ सत्य दिसे तें वदतें आतां ॥
वयें अजोबा माझे दिसतां ॥ नात दिसे मी ही ॥
श्रीमन्त : ( खवळून ) काय ? मी वयानं आजोबा दिसतों का ? म्हणजे अर्थात तूं आम्हांला म्हातारा ठरविलंस ! आमच्याशीं असं उद्धटपणांन बोलायला तुम्हींच शिकवलंत का, असं जाऊन तुझ्या बापाला विचारतों.
श्रीमन्त : मला खरं वाटलं तें मी बोललें.
श्रीमन्त : काय ? काय, मी म्हातारा हें तुला खरं वाटलं ? तुम्हांला असंच वाटतं का, म्हणून कांचनभटाला बिचारतों.
( रागानें निघून जातो )
शारदा : देवा ! काय झालं ! करायला गेलं एक आणि झालं भलतंच. आतां बाबा संतापून माझी काय दशा करतील कोण जाणें !
पद्य --- ( आलिघन तो हे )
खचित खचित हें नशिबचि फुटकों ॥ म्हणुनि मला कोंडूनि या व्यसनीं ॥ पाजि बळें दुःखाचे घुटके ॥ध्रु०॥
सांगित जनका हा भलभलतें ॥ प्राण खास घेइल तो हातें ॥ मीच देउं का लोटुनि तनुतें ॥ चुकतिल तरि चिंतेचे चटके ॥१॥
कांचन० : ( घाईनें येऊन ) अग कारटे ! काय बोललीस त्यांना ? नीट उत्तर दे, असं मीं सांगितलं, म्हणून तूं माझी अशी खोड मोडलीस वाटतं. चल आतां घराकडे !
( तिला मारीत ओढीत नेतो )
प्रवेश चवथा
( स्थळ : हेरंबमहालाच्या मागील फुलबाग )
( कोदंड, श्यामसुंदर, गोरख )
कोदंड : हिरण्यगर्भा, हा गोरख म्हणजे मला आज मारुतीच भेटला. याच्या साह्यांन मी बंवमुक्त झालों. परंतु याच्या उपकारबंधनांत सांपडलो; त्यांतून क्सा मुक्त होईन तो होवो.
गोरख : छे ! छे ! महाराज ! जगावर उपकार करणारे आपण. आपल्यावर माझ्यासारख्या पामरानं काय उपकार करावे ! माझ्या हातून आपली ही अल्पसेवा झाली, हाच मी देवाचा प्रसाद सनजतों. नाहीं तर आम्ही निरंतर पोटाच्या पाठीं लागलेलीं पशुवत माणसं, आम्हांला असा प्रसंग कधीं येणार ?
कोदंड : पाहिलंस, हिरण्यगर्भा ! मनाच्या मोठेपणाचा आणि उच्चनीच वर्णाचा कांहीं संबंध नाहीं. ब्राह्यण असून त्या भद्रेश्वरानं अल्पस्वार्थासाठी, अन्नावांचून माझा प्राण घ्यावा म्हणून मला तळघरांत कोंडून ठेवलं; आणि या गोरखानं आपलं केवळ जीवन, अशा चाकरीवर लाथ मारून मला त्यांतून मुक्त केलं.
हिरण्य० : शाबास गोराखा ! तूं खरा म्हात्मा आहेस !
गोरख : पण मला या महाराजांनीं त्या नीचाच्या गुलामगिरींतून सोडवलं हें मांझ केवढं कल्याण केलं ? कारण नीचसेवा म्हणजे नरकवास असं सांगतात.
हिरण्य० : ( स्वतःशीं ) हरहर ! इतका वेळ आनंदाच्या भरांत माझं लक्ष गेलं नाहीं. पण तीनच दिवसांत मित्राची काय स्थिति झाली ही !
कोदंड : हिरण्यगर्भा ! हें काय !
पद्य --- ( असखीये मनिगे बारे )
द्दष्टि भरे जलभारें. कां रे अनिवारे सुहुदा रे वद कारण मजला सारें ॥ध्रु०॥
मदर्थ धरूनी बल्लवपणही, विकत घेतला दासचि हा उपकारें ॥१॥
भद्रेश्वर दे क्लेश बहुत परि, तदधिक दे तव शोकविकल मुख बा रे ॥२॥
हिरण्य ० : खरोखर ! तुझ्यासारख्या सत्पुरुषाचे हाल पाहणं मोठं कठीण ! अरे नीचा भद्रेश्वरा ! तुला या अघोर कर्माचं प्रायश्चित मिळाल्याबांचून कधीं राहणार नाहीं.
कोदंड : अरे, मी तर य:कश्चित ! माझे हे हाल म्हणजे कांहींच नव्हेत. परंतु मोठमोठयांना अशा विपत्ति येतात, त्या पाहत नाहींस ! हें व्रतच मोठं खडतर आहे.
पद्य --- ( राधा मनोहर )
जो लोककल्याण ॥ साधावया जाण ॥ घेई करीं प्राण ॥ त्या सौख्य कैचें ॥ध्रु०॥
बहु कष्ट जीबास जीवास ॥ दुष्टान्न उपवास ॥ कारागृहीं वास ॥ हे भोग त्याचे ॥१॥
निंदा जनीं त्रास ॥ अपमान उपहास ॥ अर्थीं विपर्यास ॥ हें व्हावयाचें ॥२॥
गोरख : आहा ! सन्मार्गानं चालणार्यांची ही स्थिति ! आणि हें जगन्नियंत्याला आवडतं !
कोदंड : अरे बाबा, ही कसोटी आहे. हिला उतरेल तोच खरा थोर. पण हिरण्यागर्भा, भुजंगनाथाच्या लग्नाचं कुठपर्यंत आलं ? झालं तर नाहीं ना ?
हिरण्य० : येत्या द्वादशीचा मुहूर्त ठरला आहे.
कोदंड : आहे, अजून बराच अवकाश आहे, बरं , तुझ्याविषयीं भुजंगनाथाला किंवा भद्रेश्वराला अद्यापि कांहीं संशय नाही ना आला ?
हिरण्य० : यत्किंचित्हि नाहीं. या वेळीं मीं अशी युक्ति लढविली आहे कीं --- ( कानांत सांगतो )
कोदन्ड : ठीक आहे. कांहीं अल्पकाळापर्यंत पूर्ववत आहेस त्याच स्थितींत राहा, असं सांगणं म्हणजे माझा निर्दयपणा, परंतु त्यापासून आपलं बरंच कार्य साधणार आहे. मीं व हा गोरख जाऊन ( कानांत ) असं असं करतों.
हिरण्य० : ठीक आहे. हे दयाघन परमेश्वरा ! माझ्या मित्रावर तुझं कृपाछत्र असूं दे. गोरखा. याला तुझ्या स्वाधीन केला आहे, संभाळ.
जास्त काय सांगूं !
गोरख : माझी मान तुटून खालीं पडल्याशिवाय यांच्या केसालाहि धक्का लागायचा नाहीं. मी तरी जास्त काय सांगूं ! कोदंड महाराज, चलावं, आतां या ठिकाणीं फार वेळ राहण्यांत धोका आहे.
कोदंड : हा मी तयार आहें. मित्रा हिरण्यगर्भा ---
साकी
काकद्दष्टि भद्रेश्वर घातक कपटी सावध मोठा ॥ सशय येतां घालिल आम्हां तोचि संकटी उलटा ॥
यास्तव जपुनि रहा । माझी चिंता नच वाहा ॥१॥
( सर्व जातात )
प्रवेश पांचवा
( स्थळ : कांचनभटाच्या घराजवळील रस्ता )
शिपाई : ( प्रवेश करून ) मैं तो सेठसाहेबका नौकरीमें बहोत ठोडी भुद्दतसे रहा हूं, इसलिये शहरकी ये बाजू मेरे देखनेमें अबतक नहीं आयी । उसमेंभी इस मगरीबके वख्त उस कांचनभटका मकान मुझे कैसा मिलेगा ! ए शक्स, ए भाई ! कांचनभट रहता है वो मकान कौनसा ? क्या कहता है ? सुधे हातके चार मकान छोड जो गली जाती है, उसमेंका बाएँ बाजूका तीसरा ? बहोत ठीक कहा ! खुदा तेरा मला करें ! (चालून) क्या गलिच्छ गली है ये ! हे बम्मन इतने पाक ! और ऐसे नाकिसीमें रहते हैं ! यही होगा वो मकान। ( जवळजाऊन ) अंदर कौन है ? अजी कांचनभट !
इन्दिरा० : ( आंतून ) कोण हांक मारीत आहे तें ? आलें, आले.
शिपाई : कांचनभट अंदर है ? नहीं ? अच्छा ! उनको कहना के सेठसाबका शिपाई आया था और सेठसाबने तुमको हिसाबके वास्ते बुलाया है ।
इन्दिरा० : बरं, सांगेन जा. ( शिपाई जातो ) अगदीं करकरीत तिन्हीसांच झाली. तरी अजून शारदा कशी येत नाहीं ! आधीं तिला तिकडे आज दाखवायलाच कां न्यायची कोण जाणे. जयंता. जा बाळ, ताईची गाडी आली कीं नाहीं पाहून ये. ( जयंता जातो ) पुरुषांचं हें असं चुकतं जिथं तिथं. बोलायला जावं, तर राख घालायला उठायचं. जयंता, आली का रे ?
जयंत : आई, आई ! ताई एकटीच आली, आणि बाबा ग ?
इन्दिरा० : कुठं जायचं असेल बरं, तूं जा जेवायला. त्या बघ आत्याबाई हांक मारताहेत. ( जातो ) ( शारदेस पाहून ) इतका ग कां उशीर ? बरं ये, काय झालं ? त्यांनीं काय काय विचारलं ? तूं काय काय उत्तरं दिलींस ? का आपली बसली होतीस पायाचीं बोटं मोजीत ?
शारदा : ( येऊन आईच्या गळां पडून रडत ) आई ! तुम्हीं काय आरंभलं आहे हें !
इन्दिरा० : शारदे, भर दिवेलावणीच्या वेळीं हें ग काय ? झालं काय तुला ? खालीं बैस आधीं, ( असतात )
पद्य -- ( दूर तूं रुसुनि )
रडसि काय म्हणुनि अशी सांग शारदे ॥ कोण बोललें किं काय, मजसि समजुं दे ॥
पुसुनि पुसुनि नेत्र पहा काय जाहले ॥ पदर भिजुनि चिंब होय, गाल नाहले ॥
भ्यालिस कीं काय कुणीं सांग मारिलें ॥ मौन धरिसि हें मनास फार ताप दे ॥१॥
शारदा : आई, काय सांगूं ग ! आणि सांगूं तरी कसं !
पद्य --- ( गीत )
आम्ही गाई जातीच्या ॥ नाहीं अम्हां बाचा ॥ ती असती तरि तुमच्या ॥ भेदितेचि ह्रदया ॥१॥
अंतरि जें जें: सलतें ॥ सांगितलें मग असतें ॥ गुपित अशा मारातें ॥ नसतें सोशियलें ॥२॥
इन्दिरा० : शारदे, आज तुला कांहीं झालं तर नाहीं ना ? चल, तुझी द्दष्ट काढतें अगोदर, कातरवेळेला आलीस, तेव्हांच माझ्या मनांता आलं.
शारदा : आई ! द्दष्ट पडून चांगल्या चांगल्या देवांच्या मूर्तीसुद्धा फुटतात म्हणून ऐकतें, तशी तर मी कुणाची द्दष्ट पडून फुटून, मरून जाईन तर किती चांगलं होईल म्हणतेस !
इन्दिरा० : ( मनाशीं ) खास ! श्रीमंतांच्या घरीं कांहीं तरी कमजास्त झालं आहे. हें हिचं तर्हेवाईक बोलणं ऐकून नांही नाहीं तें मनांत येतं. ( उघड ) असं भलतंसलतं बोलूं नये शारदे ! देवघरांत चल. तुला कुळस्वामिनीच्या नांवानं अंगारा लावतें.
शारदा : आई, जिवंत समंधाच्या बाधेला कुळस्वामिनीचा अंगारा लावून काय होणार ? तूं आपल्या मायेची तीट लावशील. तर मात्र खास गुण येईल. आई, काय हवं तें कर; पण बाबांनीं लग्न ठरवलें आहे, तेवढं होऊं देऊं नकोस, तर तूं माझी खरी आई !
इन्दिरा० : लग्नाचं ठरबलं त्यांत काय बिघडलंग तुझं ? तुझ्यासारख्या गारिबाच्या मुलीला चांगलं सोन्यासारखं पालखीपदस्थाचं स्थळ मिळालं म्हणून मोठया आनंदानं असावंस, तें हें ग काय ?
शारदा : आई, पालखी खरी; पण ती मोडकी किडकी पालखी. पाय ठेवल्याबरोबर मोडूनसुद्धां जाईल काचित. अशा पालखींत मला जबरदस्तीनं कां बसवतां ? यापेक्षां असं करानात ---
पद्य --- ( जोगी : धुमाळी )
तुम्हि गरिब म्हणुनि जरि माझा ॥ घरिं भार तुम्हांला झाला ॥ तरि मोट बांधुनी माझी ॥ विहिरींत नेउनी ढकला ॥
मग मजहि दुःख जगिं नाहिं ॥ तुमचाहि हेतु तो पुरला ॥ परि लोभ धरुनि पैशाचा विकुं नका पोटचा गोळा ॥१॥
इन्दिरा० : म्हणजे ? तुला आम्हीं विकायला का काढली आहे ? खबरदार पुन्हां असं बोलशील तर ! मला नाहीं पत्करायचं ! म्हणतां म्हणतां फारच चेकाळलीस !
शारदा : ( रडत ) आई, माझ्या बोलण्याचा भाव तुला समजण्यासारखा असून, तूंच जर मला अशी झिडकारायला लागलीस तर मी मोकळ्या मनानं रडूं तरी कुणाजवळ ?
इन्दिरा० : ( जवळ घेऊन ) रागावलें नाहीं, पण वडील माणसांच्या करण्याला अशीं भलतींसलतीं नांवं ठेवूं नयेत. पैशापेक्षां तुझ्या सुखाची आम्हांला काळजी जास्त आहे, समजलीस ?
शारदा : पुन्हा रागावशील म्हणून बोलायचं भय वाटतं. पण आई, माझ्या सुखाची तुम्हांला काळजी आहे म्हणतेस, मग हें ग काय ?
पद्य -- ( ये अशी बैस मजसरसि )
यमपाश, गळ्याशीं ज्यास लागला, त्यास मला कां देतां ? ॥ कां मांस विकुनि, धर्मास वांकडे जातां ? ॥चाल॥
पाळिलें घातलें खाया, अजवरी ॥ बकरीस मोल बहु याया, ज्यापरी ॥ ही तुमचि मुलीवर माया कां खरी ? ॥
जगतांत, सदय सकळांत माउली तात, मुलीला असतां ॥ मग तुम्हीच इतके कठोर कां गे होतां ? ॥१॥
इंदिरा० : ( मनाशीं ) ही आल्यापासून हिच्या बोलण्यावरून ते श्रीमंत अगदीं म्हातारे आहेस असं वाटतं, ( वल्लरी व जान्हवी पडद्यांतून ) इंदिराकाकू ! अहो काकू ! काय चाललं आहे? शारदा आली का परत ?
शारदा : आई, ही वल्लरी आली. हिला विचार म्हणजे तुझी खात्री होईल.
इन्दिरा० : वल्लरी, अग जान्हवी, या वेळच्या कुणीकडं ग ?
वल्लरी : शारदेच्या लग्नाचं ठरलं असं सकाळीं ऐकलं, म्हणून त्यासंबंधानं तुम्हांला कांहीं सांगायचं मनांत आले; पण विनाकारण कुणाचं उणं सांगून लग्न मोडण्यांत पाप आहे म्हणतात. म्हणून इतका वेळ दम धरला होता, पण आतां सांगतेंच.
इन्दिरा० : असं इतकं काय तें ?
वल्लरी : खरं वाटो, खोटं वाटो, तुम्हांला जर मुलीचं खरं खरं सुख पाहायचं असेल. तर ठरविलं आहे. तिथं तिला देऊं नका. आणि नुसत्या भपक्यावरच जायचं असेल, तर आमचं कांहीं म्हणणं नाहीं. होय की नाहीं जान्हवी !
इन्दिरा० : पण ते श्रीमंत चांगले देखणे, तरणे, शहाणे आहेत असं तर मला घरांतून सांगणं झालं; आणि तुझं हें निराळंच बोलणं !
वल्लारी : कुठले तरणे, कुठले देखणे आणि कुठले शहाणे घेऊन बसलांत इंदिराकाकू ! सगळं सोंग आहे. तुम्हांला आम्हीं मुलींनीं सांगायचं म्हणजे लहान तोंडीं मोठा घांस घेतल्यासारखं होईल. पण त्या बहुरूपी श्रीमंतीला फसून त्या कुचक्या खोडाला आपली मुलगी विकूं नका. मीं सांगतें यांतलं एक अक्षर खोटं असेल तर जीभ कापून देईन !
इंदिरा० : ( शारदेला कुरवाळून ) उगीच ग बाई मी तुझ्यावर रागावलें ! हें इतकं कपट करायचं मला काय माहीत ?
शारदा : आई, खरंच का ग तुला माहीत नव्हतं ?
वल्लरी ; यांना माहीस नव्हतं हें मीसुद्धां सांगतें, कारण तसं असतं तर असं झालंच नसतं !
इंदिरा० : शारदे ! तुझ्या गळ्याची शपथ माहीत नव्हतं. आतां अगदीं भिऊं नकोस. मला कांहीं तू अधिक झाली नाहींस. तुझा जीव काय आणि माझा जीव काय, एकच ! समजलीस ? रडूं नकोस आतां.
शारदा : म्हणून तर आई मी येऊन तुझ्या गळीं पडलें ! पण ती बेगडी श्रीमंती पाहून बाबांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे, आणि त्यांनीं मला खाईत टाकायचं मनांत आणलं आहे, त्याला काय करशील ? माझे बाबा असे उलटया काळजाचे नाहींत म्हणून मी या मुलींबरोबर किती भांडत होतें. पण --- ( कांचनभट पडद्यांतून रागानें ) काय, काय म्हटलंस पोरी ? पुन्हा बोल पाहूं !
इन्दिरा० : ( चपापून ) चोरून ऐकलं वाटतं सगळं ! वल्लरी, त्या कोनाडयांत करंडा आहे, कुंकू लावून घेऊन तुम्ही स्वयंपाकघरांतून चला आतां. आजचा रंग ठीक दिसत नाहीं. ( बरं म्हणून त्या घाईनें जातात ) पोरी, तूं अगदीं बोलूं नकोस.
कांचन० : ( बाहेर येऊन ) काय ग कारटे ! मी उलटया काळजाचा आणि मी तुला खाईंत टाकणार आहे का ? फार फारशी जीभ लांब केलीस ?
शारदा : पण बाबा, मीं काय म्हटलं तें ऐकून तरी घ्या !
कांचन० : ( तिच्या अंगावर धांवून ) काय, ऐकून काय घ्या, मी उलला काळजाचा हेंच कीं नाहीं? आणि मी तुला खाईंत टाकणार ? अग कारटे ! इतकी मस्त झालीस का ? ( तिला मारीत ) चल, चालती हो. आत्तां नीघ माझ्या घरांतून.
इन्दिरा० : ( सोडवीत ) हें काय ! हें काय पण ! उगीच काय म्हणून पोरीला मारायचं ? शारदे, जा, जा स्वंयपाकधरांत; आत्याबाईंजवळ जाऊन बैस.
शारदा : ( रडत ) जन्म देणारेच मारायला लागल्यावर जायचं कुठं ?
कांचन० : पुन्हा तोंड, पुन्हा तोंड करते ! मस्तवाल कारटी ! म्हणे तें स्थळ असंच आहे, म्हणे ती बेगडीच श्रीमंती आहे, तिथे म्हणे मला कां देतां ? जसं कांहीं कारटीचं स्वयंवरच चाललं आहे. गळ्यांत दावं बांधून मी विकीन तिथं तुला गेलंच पाहिजे.
इंदिरा० : हो ! दांव बांधून विकायला माझी मुलगी म्हणजे गोठयांतली पारडीच कीं नव्हे !
कांचन० : आतां तुम्ही आलांत वाटतं पोरीचा कैवार घेऊन ! तूंच, तूंच तिचे कान फुंकून तिला बिघडवलीस; नाहीं तर इतकं चुरुचुरु बोलायची तिची काय छाती होती ?
इन्दिरा० : पोटांत दुखल्यावर कोणीहि ओवा मागेलच. पण तिळाएवढया पोरीला इतकं मारायला तिचा अपराध तरी काय ?
कांचन० : अपराध काय ? तुला कळला त्र तूंसुद्धां झोडपशील पोरटीला. चांगली गाडींत घालून दाखावायला नेली. हिनं प्रत्यक्ष श्रीमंतांचा अपमान केलान. असल्या दांडग्या मुलीशीं आम्हांला विवाह कर्तव्य नाहीं. असं त्यांनीं मला स्पष्ट सांगितंल. त्यांच्या हातांपायां पडून पुन्हा त्यांची समजूत घालतां माझी पुरेवाट झाली. तिथून घरीं आलों, तो हा प्रकार !
इन्दिरा० : पण इतकं हातांपायां पडायचं काय कारण ? ही दांडगी म्हणून जर त्यांच्या मनांतून उतरली असेल तर देवच पावला म्हणायचा अनायासें, माझ्या पोरीला तरी तसला जांबुवंत नवरा कुठं आवडतो आहे ?
कांचन० : म्हणजे ? तूंसुद्धां श्रीमंतांना जांबुवंत म्हणतेस कीं काय ?
इन्दिरा० : सगळं गांव म्हणतं, म्हणून मी म्हणतें; आणि म्हटलं तरी खरं तेंच म्हणतें ना ?
कंचन० : तुझ्यासारख्या तोंडाळ मूर्ख बायकोशीं घसा फोडून घेण्यांत अर्थ नाहीं, होय, तें पाऊणशे वर्षांचे जांबुवंत आहेत. पण त्यांच्या श्रीमंतीवर मी त्यांना मुलगी देणार. तुझं काय म्हणणं ?
इन्दिरा० : देणार म्हणजे ? मी देऊं द्यायची नाहीं. नाहीं पोरीचं लग्न झालं तरी पुरवलं, जन्मभर तश्शी जवळ बाळगीन, पण पैशाच्या लालचीनं विकूं म्हणून द्यायची नाहीं.
कांचन० : पण तुला विचारतो कोण ! आणि त्यांत तुला कळतं काय ? तुझी अक्कल म्हणजे तिखटमिठापुरती. श्रीमंतांशीं शरीरसंबंध करण्यांत किती लाभ होतो याची कल्पना तरी आहे काय तुला ? उडया पडताहेत उडया !
इन्दिरा० : पण आपल्या पोरीवर उदार होऊन कितीहि लाभ झाला तरी मला नको तो ! त्यांतून कांहीं कोंडा देऊन विकत घेतलेली नाहीं. चांगली एका जिवाची, एका हाडामांसाची आहे, तिला सुख होईल तिथ्थंच दिली पाहिजे.
कांचन० : बस ! बस ! तुम्ही बायका म्हणजे शुद्ध अडाणी जनावरं घालेलं खावं, दिलेलं नेसावं, आणि सांगितलेलं करावं हें तुमचं काम ! जास्त पंचाइतींत पडण्याची जरून नाहीं. मी तिला तिथेंच देणार. नुसत्या तिच्या सुखाकडे लक्ष देऊन १ आपल्या घरीं धांव घेत येणार्या लक्ष्मीला पाहून, दाराला अडणा लावणारा मी मूर्खं नव्हे, समजलीस !
इन्दिरा० : आम्ही जनावरंच, तेव्हां आम्हांला काय कळतं ! पण पैशाकरितां आपली मुलगी म्हातार्याला विकावयाची, हें मनुष्यांना शोभतं का ?
कांचन० : हो ! कां विकूं नये ? पूर्वी कोणीं विकली नाहीं, का पुढें कोणी विकणार नाहीं ? आणि विकल्याशिवाय आज चौदा वर्षं तिच्या पालनपोषणाकरितां झालेला खर्च कसा भरून येणार ?
इन्दिरा० : ( कानांवर हात ठेवून ) नको ग बाई ! हेशब्द सुद्धां ऐकायला नकोत १ इतकीं कशीं पुरुषांचीं मनं निर्दय म्हणतें मी १
पद्य - ( मांड : दादरा )
माया जळली का ॥ तिळही ममता नाहीं का ॥ आली पोटीं पोर एकटी, तीही विकितां का ॥१॥
लाजहि गेली का ॥ मतिला भ्रमही पडला का ॥ शोभा करितिल लोक तयाची, चाडहि नाहीं का ॥२॥
द्रव्यचि बघतां का ॥ तिजला पतिसुख न लगे का ॥ वृद्दा देउनि तिला वांझपण, विकतचि धेतां का ॥३॥
कांचन० : काय करावं हिला ! अग शहाणे ! तूं कधीं पाहिलं नाहींस का ? निदान ऐकलं तरी नाहींस का ? कीं ---
दिंडी
दिल्या तरूणां तरि होति किती रंडा ॥ जरठ पतिही किति बघति नातवंडा ॥
सौख्य संतति सौभाग्य देव देई ॥ आम्हां हातीं त्यांतील कांहि नाहीं ॥१॥
इन्दिरा० : ( संतापून ) आग लागली त्या जिभेला ! मी म्हणतें, मनाची नाहीं, पण जनाची तरी कांहीं चाड !
कांचन० : काय संबंध जनाचा ? माझी पोरगी मी वाटेल त्याला देईन !
इन्दिरा० : म्हणजे माझी तिच्यावर मुळींच का सत्ता नाहीं ? मी तिला आणि जयंताल घेऊन आपलीं माहेरीं जातें कशी ? ( रडूं लागते )
कांचन० : ठीक आहे ! उत्तम ! जयांताला घेऊन जा, खुशाल जा. मी सुपारी लावून लग्न लावीन पोरीचं !
इन्दिरा : आणि तिच्यावर नाहीं का माझी सत्ता !
कांचन० : सत्ता असेल, पण मत्ता आहे माझी. म्हणे माहेरीं जातें. भय घालते मला. आण इकडे माझी ती संध्येची कळशी. ( ती जाते ) असल्या कामांत असली तापट बायको उपयोगी नाहीं,
इन्दिरा० : हं, ही कळशी ! ( आपटते ) आणि तो बाहेर कोणी सावकाराचा शिपाई आला आहे.
कांचन० : ( अंगरखा, बंडी काढीत ) तोच तो ! म्हणे पोरीला विकूं नका. मग तुला विकून त्या सावकाराचं कर्ज फेडूं का !
इंदिरा० : हं, असलं कर्जाचं भय कुणाला घालायचें ! कवडी कवडी करून रूपयांच्या त्या दोन घागरी पुरून ठेवल्या आहेत, तें मला ठाऊक नाहीं वाटतं !
कांचन० : ( तिच्य अंगावर जाऊन ) गप्प ! गप्प ! खवरदार पुन्हा चकारशब्द काढलास तर ! पुन्हा आणखी ! पैशाची किंमत कळत नाहीं, त बायको कसली ! ( रागारागानें अंगरखा, बंडी फेंकून कळशी घेऊन जातांना ( कुणीं माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तर त्या घागरीच मला वांचवतील. ( जातो )
शारदा : ( बाहेर येऊन आईला मिठी मारून ) आई, मीं सगळं बोलणं ऐकलं. आतां मला तारणार तूंच, आणि मारणार तूंच १
इन्दिरा० : माझं तर मन बाई असं पेटल्यासारखं झालं आहे. काय करूं !
शारदा : मला या जगांत आणलीस, तशीच परत पोंचीव म्हणजे झालं !
इन्दिरा० : ( चपापून ) म्हणजे !
शारदा : आई ! ---
पद्य --- ( यहिबंदिमे पाया गं )
तूं टाक चिरूनि ही मान, नको अनमान ॥ नउ मास वाहिले उदरिं तिचा धरिं, कांहिं तरी अभिमान ॥ध्रु०॥
तो कसाब झाला तात ॥ करूं सजे मुलीचा घात ॥
मग बरा तुझा मउ हात ॥ जा विसरुनि माया सारी, करीं घे सुरी, धरीं अवसान ॥१॥
हें कठिण दिसे जरि काज ॥ विष तरी जरासें पाज ॥
परि ठेवूं नको जगिं आज ॥ जी दुःख मुलीचें निवारिना ती माय नव्हे दुस्मान ॥२॥
इन्दिरा० : आंत चल; वन्संना तरी कांहीं सुचतं का विचारून पाहतें. ( तिला आंत घेऊन जाते)