|| मराठी राजभाषा दिन विशेष लेख ||
उपजतच माणूस हा अनुकरण प्रिय असतो. मराठी माणसात दुसऱ्याला सामावून घेणे व आपण दुसऱ्यात सामावून जाण्याची वृत्ती जन्मजात असते.अर्थात किती सामावून घ्यायच व किती सामावून जायच हा तारतम्य भाव त्याच्यापाशी नक्कीच आहे.याच गुणांमुळे त्याची जिद्दीने येथल्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची असाधारण प्रवृत्ती प्रकर्षांने दिसते.मराठी माणूस स्वाभिमानी तर आहेच पण नवीन तंत्रज्ञान शिकून त्यावर मात करण्या ची उमेद व मनोधारणाही त्याज पाशी आहे.मराठी माणूस म्हणजे दिलदार व्यक्तीमत्वा चा नमुना आहे.बुध्दी कौशल्याने एखादी गोष्ट ग्रहण करण्याचे चातुर्य त्याच्याकडे आहे.वरून कडक पण आंतून मधाळ,फणसा सारखा गोड आहे.
" देश तसा वेष " हे मौल्यवान वाक्य लक्षात ठेऊन व परिस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन सामंजशाने वागणारा आहे.एखादी गोष्ट पोटतिडकेनी करण्याची वृत्ती मराठी माणसात दिसून येते.येथील राहणीमानानुसार नवरा बायको दोघांनाही कमाई साठी घरा बाहेर पडणे,गरजेचे असते.अलबत संसाराचा भार दोघांच्याही खांद्यावर समसमान असतो.त्यामुळे बायकोच्या बरोबर पुरूषही तितकाच बाहेरील व घरा तील जबाबदारीला हातभार लावत असतो.
जो माणूस स्वत:च्या देशात कांहीवेळा ताठ्याने राहतो तोच परदेशात दुसऱ्या मराठी माणसाशी दसपट जास्त जवळीक ठेवून आपुलकीने व आदरयुक्त वागतो आणि मदत करतो.त्यात आनंदच आहे. कदाचीत आपल्या माणसांच्या व पर्यायाने आपल्या देशाच्या आणि देशबांधवांच्या रितेपणाची जाणीव त्याला होत असावी.
येथील मराठी लोक घरगुती व सार्वजनिक स्तरावर भारतीय सण,परंपरा,दसरा,दिवाळी,गणपती साजरे करतात.लावणी,भारतीय संगीत,नृत्य,खाद्य पदार्थ,भारतीय वेशभूषा,ढोल-ताशा,दिंडी,जुन्या पारंपरिक गोष्टींचे आकर्षण मराठी माणसात ओतप्रोत भरलेलं आहे.व त्याप्रमाणे सर्व येथे वेळेनुसार आवर्जुन समारंभ आयोजित करून साजरे केले जातात.कांही मोठ्या शहरांमध्ये मराठी मंडळ आहेत.तेथे काव्य वाचन,कथा वाचन,संगीत,मराठी पध्दतीचे भोजन ठेऊन कार्यक्रम केले जातात.हे सण एकोप्याने,आनंदाने साजरे होतात.
दर दोन वर्षांनी अखिल अमेरिकन मराठी मंडळांचे स्नेहसंमेलन होते.ते चार दिवस असते.तेव्हां सर्व अमेरिकेतील मराठी लोक या निमित्तानी एकत्र येतांना दिसतात.व्याख्यान,संगीत,भजन,लावणी,पुस्तकांचे प्रकाशन,नाटक,चित्रफित दाखविणे.इ.भरगच्च कार्यक्रम असतात.मराठमोळ भोजन,नास्ता यांची रेलचेल असते.भारतीय वस्तु,मौलीक पुस्तक,मासिक,कपडे,दाग दागिने इ.चे स्टाॅल असतात.
अमेरिका खूप विस्तृत पसरलेली आहे ठिकठिकाणी मोकळी जागा पाहुन अचंबा वाटतो. पण त्या
जागेचा योग्य उपयोग करून घेतलेला दिसतो.सुंदर,सुबक नक्षीकाम केलेली मंदीर बांधून तो परिसर भाव
भक्तीने भारावून प्रसन्न झालेला दिसतो.साहजीकच वातावरण भक्तिरसाला पोषक असते.लोकाच्या रहदारीने परीसर भरूनही अनेकविध देऊळे व देऊळांचे पावित्र्य ठेवले जाते.कदाचित कांहीवेळा अनावधानाने ते इतर ठिकाणी ठेवले जात नसावे.भक्तगण लांबून येत असल्याने प्रत्येक देवळाच्या ठिकाणी प्रसादाची व खाद्य पदार्थीची उत्तम व्यवस्था केलेली असते.कुठेही अस्वच्छता,गलीच्छपणा दिसत नाही.शिस्त व स्वच्छता हे तिथले ब्रिद वाक्य आहे.कारण प्रत्येक गोष्ट कायद्याच्या तागडीतून तावून सुलाखून निघते.मनांत कुठेतरी
कायद्या विषयी धास्ती असते.त्यामुळे मराठी माणूसही त्याचे उल्लंघन करत नाही.
येथील रीतीरिवाज संस्कृतीचे मराठी माणूस अनुकरण करून अमंलात आणतांना दिसतो.मराठी
मंडळातर्फे भारतातून कलाकार बोलवून नाटक व संगीताचे,नृत्यांचे प्रयोग केले जातात.तसेच येथील मराठी
लोक स्वत: नाटक,नृत्य बसवून सादर करतात.गाणी,निबंध,रांगोळी,चित्रकला,पेंटींग इ.च्या स्पर्धा लहाना
पासून मोठ्यां पर्यंत घेतल्या जातात.व हौसे खातर प्रोत्साहनयुक्त बक्षीसाचे नियोजन केले जाते.मराठी लोक भेटल्यामुळे ओळखी होतात.गाठीभेटी वाढतात.विचारांची देवाण-घेवाण होते.अडीअडचणीवर उपाय योजना आखली जाते.जेणे करून मराठीपण व मराठी संस्कृती जतन व्हावी हा सबळ हेतू असतो.मराठी
भाषा आत्मसात करून कशी टिकून राहील हे प्रयत्नपूर्वक मेहनतीने पाहीले जाते.
आजारपणात,लग्नकार्यात एक मराठी माणूस आपल्या सह मित्र,मैत्रिणीला हिरिरीने मदतीला पुढे धावून येताना दिसतात.सुशिक्षित लोक धार्मिक विधी शिकून लग्न लावणे,सत्यनारायण पुजा सांगणे.हे विधी हौसे खातर आवडीने घरोघरी जाऊन करतात.त्यांना सन्मानाने वागवून मैत्रीचे बंध घट्ट केले जातात.
कांही ठिकाणी घरगुती मराठी व संस्कृतचे वर्ग घेतात.तिथे मराठी मुळाक्षर,अंक,लिहीणे,वाचणे
काव्य प्रकार,गाणी,म्हणी,वाक्प्र,अभंग याची तोंड ओळख करून देण्याचा कसोशिने प्रयत्न केला जातो.कले
चे सादरी करण्याचे प्रयोग केले जातात.त्यातूनच त्याला स्पर्धेचे रूप देऊन बालगोपाल व पालकांना सामिल
करून घेण्यांत येते.त्यातून नवीन उर्मी,उर्जा मिळते.त्याच्या आकर्षणाने मुलांना कलावर्गात पाठविण्यांत येते.
भरतनाट्यम व कथ्थक नृत्य क्लास,संगीत क्लासला मुले जातात.तेथे नृत्य व संगीताच्या स्पर्धा घेऊन बक्षीस देतात.तरूण वर्ग गाण्याचे ग्रुप बनवून आठवड्यातून एकदा एकत्र येऊन गाण्याच्या मैफीली करतात.अशा मैफीलीला श्रोतु वर्ग आवर्जुन हजेरी लावतो.
अमेरिकन लायब्ररीत भारतीय नावाजलेले कवि,लेखकांची उत्तम मराठी पुस्तक,मासिक बऱ्याच
वेळेला दिसतात.त्यासाठी वेगळे दालन असते.लावणी नृत्य प्रकारा पद्दल अमेरिकन लोकांना फार विलक्षण
उत्सुकता असते.ते शिकण्याची इच्छा प्रदर्शित करतात.कांहीनी ती अवगतही केलेय.मराठी मुल,मुली पण
हा नृत्य प्रकार करतात.मराठी खाद्य पदार्थ व रेसिपी यांच जितक मराठी लोकांना अपरूप आहे तितकंच
येथील अमेरिकनांना आहे.त्यामुळे मराठी पारंपारिक पदार्थ येथे सर्वत्र मुबलक मिळण्याची रेस्ट्राॅरंट आहेत
वडा-पाव,कांदा भजी हिरव्या मिरची सह,आनंदाने आस्वाद घेतांना लोक दिसतात.याचे मालक मराठी किंवा भारतीय असतात.
येथे मराठी व भारतीयांनी,भारतीय वस्तुंची दुकान थाटलेली दिसतात.त्यामुळे भाज्या,आइसक्रीम
मराठमोळ्या लोणची,पापड,पापड्यांपासून ते काजू कतली,बाकरवडी पर्यंत सर्व भारतीय वस्तुंची उपलब्धता असते.
वर उल्लेख केल्याप्रमाणे मराठी भाषा जीवीत राहण्यासाठी. क्लासेसची सोय असली तरी निदान
मुले सोळा वर्षाची होई पर्यंत खाजगी वाहनांतून इच्छित स्थळी नेऊन सोडण्याचे काम पालकांनाच करावे लागते.कारण तेथे बस,ट्रेन सारखी वाहन सर्रास उपलब्ध नसतात.लहान मुले स्वतंत्रपणे बाहेर जाऊं शकत
नाहीत.कांही शहरात सार्वजनिक वाहनांची तुरळक सोय आहे.आई-वडील अगर आजी-आजोबा त्याच्या कामाच्या व्यापात दिवसभर व्यस्त असतात.मुलांसाठी तेवढा वेळ द्यायला त्यांच्या जवळ वेळ नसतो.तरी ओढाताण करून बरेच लोक वेळेचं नियमन करून हेतू साध्य करण्याची धडपड करत असतात.पुढे मुलांचा अभ्यास वाढल्यावर त्यांनाही ते करण शक्य होत नाही.येथे मदतीला मनुष्य बळ नसल्याने प्रत्येक काम स्वत:लाच करावे लागते.येथील जीवनशैली शारीरिक व मानसिक कष्टाची आहे.त्यामुळे आठवड्यातील पाच दिवस घाण्याला बांधलेल्या बैला सारखी येथील लोकांची अवस्था असते.त्यामुळे शारिरीक उर्जा उत्साह कमी होऊन माणूस थकलेला असतो.
बहुतेक ठिकाणी घराघरात माता-पिता,आजी-आजोबा मराठीच बोलतात.ते समजून त्याच उत्तर
मात्र मुलं इंग्रजीतून देतात.प्रत्येक शब्द,म्हणी,वाक्प्रचा त्यांना अर्थ कळत असतो.त्यांना त्याचा वापर कुठे करायचा हे ही समजत असत.एखाद्या मराठी शब्दाचा किंवा म्हणी,वाकप्रचा आपण जर त्यांना अर्थ विचारला तर अचून सविस्तर अर्थ मात्र ते आपल्याला इंग्रजीतूनच सांगतात.पहिल मुलं जन्माला आल्यानंतर घरातील मराठी भाषा ऐकून व्यवस्थित साधारण तीन वर्षा पर्यंत छान मराठी बोलत.एकदां ते डेकेयर मधे गेल की हळुहळु इंग्रजी बोलायला लागत व थोड्या कालावधीत पूर्ण इंग्रजी बोलायला लागते. ते पुन्हा मागे वळुन पहात नाही.नंतर त्याचे शब्द कानावर पडुन दुसरे मुल अनुकरण करून प्रथम इंग्रजी शब्द बोलते. व थोड्याच कालावधीत पूर्ण इंग्रजी वाक्य बोलू लागते.तेव्हां त्याने मराठी बोलण्याचा प्रश्नच येत नाही.परंतु घरात मराठी आपसात बोललं गेल्यामुळे त्याला मराठी कानावर पडल्याने मराठीच आकलन झालेल दिसत. व समजत पण असत.हे ही नसे थोडके असे बोलण्याची वेळ आई-वडिलांवर येते.
आपण विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे.एकदां घराच्या बाहेर पडल्यावर शाळा, काॅलेज,टीचर,समाजात वावरणे,स्कुल बस,मित्रांमधे ते वावरतांना संभाषण कसे करणार ? कानावर पडणारे शब्द इंग्रजीच असतात ना ? शिक्षण इंग्रजीतून मिळत असत.तस नाही केले तर त्यांचे संभाषणच खुंटेल सर्वांशी,पेपर लिहीताना द्विधा मनस्थिती होईल.समाजात वावरण कठीण होऊन जाईल.त्याकरीता प्रामुख्याने घरांतील सरावाने मराठी भाषा जीवीत ठेवण्यास मदत होईल.त्याकरीता पालकांनी पुढाकार घ्यायला हवा.तेवढा पुरेसा वेळ घोटवून घ्यायला पालकांना नसतो.
येथे येऊन स्थायिक झालेल्यांना स्वत:च्या कर्तुत्वावर व स्वबळावर स्वत:ला शाबीत करायच असत.त्याकरीता मेहनत करणे ओघाने आलेच,स्पर्धा परीक्षांना सामोर जाव लागते.तेव्हां कुठे ते स्वत:च्या
हिंमतीवर येथे पाय रोवून तग धरूंन उभे राहुं शकतात.कित्येक मराठी व्यक्ती संशोधन करून उच्चपदस्थ
झाल्यात कांही मराठी बांधवांनी येथे येऊन स्वत:चे स्वतंत्र व्यवसाय सुरूं करून ते यशस्वी रीत्या करत आहेत.त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.तरीपण कांही अंशी अशा वेळी इतर गोष्टींकडे मनांत असूनही लक्ष देण होत नाही.
मुलांच्या जीभेला इंग्रजी उच्चारांचे वळण लागले की मराठी उच्चार करायला त्यांना कठीण जाते.उदा.ळ,र,ज,छ,ज्ञ मूळाक्षरे बोलणं जमत नाही.ती घोटवू घ्यायला वेळे अभावी व इथल्या जीवनशैली मुळे पालकांना जमत नाही.तरीपण खूप प्रमाणात पालक मेहनत घेतांना दिसतात.परंतु सर्वांना ते शक्य होत नाही.मराठीतील आदरार्थि शब्द बोलण्यांत गडबड होते.तसेच बोलण्याच्या गती मधे गोंधळ होतो.संभाषण
करतांना पुढचा शब्द आठवून वाक्य पटकन जुळवायला वेळ लागतो.तेच इंग्रजी वाक्य ते झटकन बोलुन
जातात.व चुकले तर हस होईल,याची त्यांना लाज वाटते.म्हणून मराठीतून उत्तर द्यायला आणि बोलायला ते काचकुच करतात.
हे सगळं त्यांना इथली संस्कृती सांभाळून करावे लागते.इकडचे सण,हवामान वागणे,बोलणे,रीती
पाळुन करणे म्हणजे तारेवरची कसरत असते.मराठी माणूस इर्षेने धडपड करत असतो.पोषक वातावरण
निर्मिती करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.तीस,चाळीस वर्षा पलीकडे जे लोक येथे स्थायिक झाले.
त्यांना मराठीचा अभिमान आहे.पण प्रश्न आहे,पुढे येणाऱ्या पिढीचा,ते हे मराठीपण,मराठी वाग्ड:मय,संगीत
कला,नाट्य,खाद्य संस्कृती टिकवूं शकतील कां ? याची खात्री देता येत नाही.तरी मराठी माणसाच्या रक्तात
जिद्द आहे.पुढील पिढी माघार न घेतां आपला झेंडा व " मराठी बाणा " देशोदेशी फडकवेल अशी आशा करूं या.कदाचित आपले सणवार रीतीभाती ते साजरे करतील ही,पण पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक पध्दतीने करतीलच अस नाही.ते त्यांच्या सोयी प्रमाणे करतील.त्या मागे त्यांची भावना व मानसिकता काय आणि कशी असेल.हे सांगता येण कठीण आहे.मी ते पुढील ओळीतून विशद करते पहा तर कस वाटतय...
आहे आमुचा मराठी बाणा,मराठी साठी धरतो वाणा
वावरात पिकवितो दाणा,श्रम आमुचे सकलांनी जाणा ॥
शेतात राबून पैशाची वाण,मनांत माणूसकीची खाण
घरादाराला देतो आम्हीं दाणा,कुणी कांहीही म्हणा ॥
जीवाला जीव देत राहतो ताठ,थोपटु नका आमुची पाठ
कुणी आम्हां उगा हाणा,वाकणार नाही आमुचा कणा ॥
सर्वांना देतो मदतीचा हात,ह्याच आमुच्या मराठी खूणा
शूरवीर आम्हीं मराठा मावळा,काढतो देशासाठी फणा ॥
देवाला आम्हीं मनात ठेवतो,करतो साजरे मराठी सण
प्रेमळ भाव आमुच्या रक्तात,हेच आमुचे मराठी पण ॥
मोडू पण वाकणार नाही,आहोत आम्हीं हाडाचे दांड
अन् देहाने बलदंड,थोपटतो ईर्षेने आम्हीं बाहुदंड ॥