मॉस्कोच्या `शेरेमेतयोव्हो' विमातळावर आमचे स्वागत केले ते हलकासा पाऊस, भुरभुरणारे बर्फ आणि कडाक्याची थंडीने. बॅगेज ताब्यात घेऊन इमिग्रेशनच्या लाईनला उभे राहिलो. इथे सगळं कामकाज रशियन महिलांच्या ताब्यात होते. त्यांची करडी आणि कठोर नजर उगाचच मनात धडकी भरवत होती. पण त्यांचे वागणे तसे को-ऑपरेटिव्ह होते. गर्दी फारशी नव्हती. सगळीकडे शांतता होती. आमच्याच ग्रुप चा गलका ऐकू येत होता. शेवटी अल्ताफभाईंनी सर्वांना बाजूला घेऊन सांगितले कि इथले कायदे कानून अतिशय कडक असतात. कुणी आडवले, तक्रार केली तर परतीचे तिकीट काढावे लागेल. मग जरा शांतता निर्माण झाली पण तरीही अधून मधून `जरा हळू बोला' असा पुकारा होत होता. मॉस्कोचे विमानतळ आहे मोठे पण तरीही आपल्या मुंबई विमानतळाची त्याला सर नाही. मुंबईचे विमानतळ अभिमान बाळगावा असेच आहे. सर्व सोपस्कार उरकून एक्झिटच्या लॉबीत आलो. आमचा गाईड आणि बस अजून यायचे होते. कंटाळून आम्ही ३-४ जण बाहेर जाऊन उभे राहू म्हणून बाहेर आलो खरे पण बाहेरच्या थंडीने हातपाय गारठले, आणि एकदा बाहेर गेलं कि आत येता येत नाही. तसेच कुडकुडत बाहेरच थांबलो. काहींनी आपल्या बॅगेतून जर्किन, हातमोजे, कानटोपी काढून परिधान केली. पण थंडी दाद देत नव्हती. काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर आमचा गाईड आला. अनेकांना आनंदाचा सुखद धक्का बसला. आलेला गाईड तो नसून ती होती. एक सुंदरशी रशियन ललनाआमच्या स्वागतासाठी उभी होती. तिचे नाव `याना'. सवयीने अनेकांनी तिच्याबरोबर फोटो काढले. बस मध्ये पाऊल ठेवताच त्या उबदार वातावरणाने खूप बरे वाटले. आपल्याकडे जशा ए.सी. बस असतात तशा इकडे `हिटर' असलेल्या बस असतात. बाहेर पडून शहराचे सुंदर देखावे बघत आम्ही हॉटेल गाठले. गाईड आम्हाला आजूबाजूच्या इमारतींबद्दल माहिती देत होती. थोड्या वेळात आम्ही हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल `रॅडिसन' हे सात मजली आणि ३०० रूम्स असलेले अतिशय भव्य हॉटेल आमच्या मुक्कामाचे ठिकाण असणार होते. हॉटेलची लॉबी अतिशय भव्य आणि आलिशान होती.

खरेतर आमच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आम्ही सकाळी ११ वाजता (रशियातील) पोहोचणे अपेक्षित होते, पण विमानाचे बदललेले टाईमिंग मुळे आम्ही संध्याकाळी ५ वाजता हॉटेलवर पोहोचलो होतो. (त्यावेळी भारतात ७.३० वाजले होते) आराम करण्यात वेळ वाया घालवणे चुकीचे ठरणार होते. त्यामुळे रूम ताब्यात घेऊन पटकन आवरून घेत सहा म्हणता म्हणता साडेसहाला सर्वजण परत लॉबीत जमलो. मेट्रो मधून प्रवास असा कार्यक्रम होता. पण अनेक जणांना मेट्रोत काही अप्रूप वाटत नव्हते. मेट्रो आपल्याकडे (साताऱ्यात नाही) मुबई, दिल्ली, आता नागपूर, लवकरच पुणे अशा अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे मेट्रोत काय बघायचे असे वाटत होते. पण बरे झाले गेलो. आमच्या हॉटेलच्या समोरच्याच भव्य बिल्डिंगमध्ये मेट्रो स्टेशन होते. रशियन भाषा काही वाचता येत नाही. मुळाक्षरे इंग्लिश सारखी वाटली तरी बरीच उलटी सुलटी आहेत. त्यामुळे संदर्भ लागत नाही. तिकिटे काढून आम्ही आत प्रवेश केला आणि समोरच्या जिन्याने चांगले २०० - ३०० फूट खाली गेलो असू. खाली स्टेशन होते. अतिशय सुंदर, ऐतेहासिक बांधकाम. भिंतींवर, छतावर केलेलं कोरीव काम आणि रेखाटलेली चित्रे अतिशय सुंदर. याना ने स्टेशनचा समग्र इतिहास सांगितला पण तो बऱ्याच जणांच्या डोक्यावरून गेला. इंग्लिश आपल्याला येत असली तरी दुसऱ्याचे बोलणे सवय नसली तर पटकन कळत नाही.

रशियाची ही मेट्रो १९३५ साली सुरु झाली हे ऐकून फार आश्चर्य वाटले. त्यावेळी आपण इंग्रजांच्या जुलमी टाचांखाली भरडले जात होतो. हे तंत्रज्ञान आत्ता आत्ता विसाव्या शतकात आपल्याकडे आलेय, आणि रशियात ८४ वर्षांपूर्वीच ही मेट्रो अस्तित्वात आलीय. बरं फक्त एक रूट नाही तर सर्व शहराभोवती एक सर्क्युलर मार्ग आहे आणि सेंटर मधून अनेक ठिकाणि या लाईन्स जातात. शिवाय ही मेट्रो तीन लेव्हल मध्ये आहे. एका लेव्हल वर उतरून दुसऱ्या लेव्हल ने वेगवेगळ्या रूटवर जाता येते. म्हणजेच शहरातल्या कुठल्याही ठिकाणाच्या जवळपास या मेट्रोने पोहोचता येते. आणि म्हणूनच बहुसंख्य रशियन लोक या मेट्रोचा वापर करतात. गाईड माहिती सांगत असताने मी आणि माझे एक मित्र किशोरजी लुल्ला या मेट्रोचे टाईमिंग मोजत होतो. एक ट्रेन गेल्यानंतर बरोबर साठाव्या सेकंदाला (एका मिनटात) दुसरी ट्रेन येते. बरोबर तीस सेकंद (अर्धा मिनिट) थांबते आणि सुरु होते. म्हणजे एखाद्याने ट्रेन मध्ये चढण्यासाठी पाऊल उचलले अन ट्रेन चे दरवाजे बंद झाले तर उचललेले पाऊल तसेच अधांतरी धरून ठेवले तर पुढच्या एका मिनिटानंतर पुढच्या ट्रेन मध्ये चढता येईल. गर्दी बरीच होती. लोकांची धावपळही होती पण सर्वकाही शिस्तबद्ध चालू होते. कुठे गोंगाट नाही, कलकल नाही, रेटारेटी नाही. हो पण अशा गर्दीतही प्रेमकुजन करणारी प्रेमी युगुलंही कुठेकुठे दिसत होती. त्यांना जगाशी काही देणे घेणे नसावे. खरेतर जगालाही त्यांच्याशी काही देणेघेणे नसावे. त्यांच्याकडे कोणी बघतही नव्हते पण आमचे काही लोक मात्र डोळे फाडून हे नजारे बघत होते. बघू देत, जे आपल्याकडे सहसा दिसत नाही ती गोष्ट कुणीही कौतुकाने बघणारच की. (आपल्याकडेही चौपाटीवर असे भान विसरलेले कपल्स दिसतातच कि) आपण भारतीय लोक तसेही याबाबतीत जरा मर्यादा सांभाळून असतो (काहींनी आजकाल सोडलीय) म्हणून आपल्याला प्रेमाचे हे खुले प्रदर्शन अचंभित करते. असो.

आम्ही एका ट्रेन मध्ये स्वार झालो. अतिशय कमी वेळात त्या ट्रेनने फुल स्पीड पकडला होता. नक्की माहित नाही पण किमान ७०-८० च्या पुढच्या स्पीडने ट्रेन धावत होती. चार स्टेशन गेल्यानंतर आम्ही उतरलो. तिथले स्टेशन हे खास लेनिनच्या स्मुर्ति प्रीत्यर्थ उभारलेले होते. असेच अजून एक स्टालिनच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले आहे. लेनिन आणि स्टॅलिन हे राजेशाहीनंतरचे रशियाचे महान नेते होऊन गेलेत. या दोघांच्या नावाने लेनिनग्राड आणि स्टॅलिनग्राड अशी दोन भव्य शहरेही उभी आहेत. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या पराभवाच्या कारणांमध्ये या लेनिनग्राड आणि स्टॅलिनग्राड शहरावरील हिटलरचे आततायी आक्रमण आणि त्याचा रशियन सैन्याने केलेला दारुण पराभव हेही एक महत्वाचे कारण आहे.

हे मेट्रोस्टेशन बघून झाल्यावर आम्ही वर चढून दुसऱ्या लेव्हलला आलो. ते स्टेशन बघून पुन्हा दुसरी मेट्रो पकडून दोन स्टेशन पुढे गेलो. प्रत्येक मेट्रोस्टेशन हे बघण्यासारखे आहे. अतिशय अनमोल कलाकृतींचा अविष्कार या स्टेशनवर केला गेलेला आहे. पुन्हा कुठूनतरी उतरून कि चढून अजून एक लेव्हल गाठली. येतानाही परत कुठंतरी दोनदा ट्रेन बदलून आम्ही त्या गुहेतून बाहेर येत जमिनीवर आलो. `यानाने' आम्हाला नुसता मेट्रोचा प्रवास घडवला नव्हता तर त्या मेट्रोची ऐतेहासिक सफर घडऊन आणली होती. बाहेर आमची बस उभी होती. एक इंडियन रेस्टोरेंट गाठून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि थकले भागले जीव आपापल्या रूम कडे पळाले. आणि अशा रीतीने रशियातल्या मॉस्को मधला आमचा पहिला दिवस संपला. उद्या पुन्हा भेटू मॉस्कोच्या सिटी टूर वर……………..

अनिल दातीर, सातारा
(९४२०४८७४१०)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel