सेंट पिटसरबर्ग मधला दुसरा दिवस उगवला. हॉटेल अँबॅसेडर मधील मुक्काम तसा प्लिझन्ट होता. पण गम्मत म्हणजे रूम मध्ये उकडत होते. बाहेर कडाक्याची थंडी असूनही रूम मात्र खूपच गरम होत्या. हिटर अगदी मिनिमम वर ठेवला तरीही २३ डिग्री च्या खाली तापमान येत नव्हते. खिडकी उघडायची सोय नव्हती. इथे सगळीकडेच २३ डिग्री तापमान मेंटेन केले जाते. रशियन एअर लाईन `ऐरोफ्लोट' च्या फ्लाईट मध्ये सुद्धा हेच तापमान ठेवले जाते. याचा संबंध ग्लोबल वॉर्मिंगशी असावा असा अंदाज. नवव्या मजल्यावरील प्रशस्त डायनिंग हॉल अतिशय सुरेख होता. एका बाजूला पूर्ण उंचीची काच असल्याने शहराचा देखावा फारच सुंदर दिसत होता. इथला ब्रेकफास्ट फक्त आमच्या पॅकेज मध्ये होता. बाकी जेवण हे इंडियन रेस्टोरंन्टलाच होते. ते एक बरं नाहीतर या कॉंटिनेंटल पद्धतीच्या जेवणाने आमची पोटं काही भरली नसती. ब्रेकफास्ट मात्र जमून जायचा.
सकाळी साडेनऊला सगळेजण तयार होऊन बसमध्ये बसलो. आजही काहीजणांनी वेळ (न) पाळण्याचे आपले कसब दाखवले होतेच. बस ने आम्हाला सोडले `पॅलेस स्क्वेअर' या भागात. भला मोठा ऐसपैस चौक आणि त्याच्या सगळ्या बाजूने राजवाडे. मध्ये उंच स्तंभ. इथे आम्हाला काही फिरते विक्रेते दिसले. सगळे राजवाडे बघणे शक्य नव्हते. आम्ही पहिल्यांदा बघणार होतो ते `स्टेट हर्मिटेज म्युझियम' आणि नंतर शेजारचा `कथेरिन पॅलेस'. म्युझिअमचा आवाका प्रचंड होता. आणि व्यवस्था अतिशय सुंदर होती. २० फूट रुंदीच्या उच्च प्रतीचे कार्पेट टाकलेल्या जिन्याने आम्ही वर गेलो. जुन्या इतिहासकालीन वस्तूंचा तिथे प्रचंड खजिना भरलेला होता. मूर्ती, शस्त्रे, पेंटिंग्स, दागिने, शव पेट्या, पुतळे आणि अजूनही बरेच काही. इथे मोनालिसा या चित्राचा जगप्रसिद्ध चित्रकार `लिओ नार्दो द विंची' याने काढलेले दोन चित्र होते. मला तर त्यात काही विशेष वाटले नाही
पण कदाचित माझ्याकडे `ती' नजर नसेल म्हणून मला त्यातील वैशिष्ट्ये दिसली नसतील. तब्बल तीन लाख पन्नास हजार वस्तू इथे संग्रहित आहेत. इथल्या प्रत्येक वस्तूसमोर फक्त एक मिनिट बघत उभे राहिले तर रोजचे आठ तास, सार्वजनिक सुट्ट्या असलेले दिवस वगळून इथे कोणी रोज जात राहिले तर सर्व वस्तू पाहायला आठ वर्ष लागतील असे आमचा गाईड निखोलाय ने अभिमानाने सांगितले. पण खरे सांगायचे तर असे म्युझियम पाहणे आणि त्यातही आपल्याशी संबंध नसलेल्या इतिहासाशी फार वेळ जुळवून घेणे आपल्याला जमत नाहीच. त्यामुळे आम्ही लवकरच शेजारील कथेरिन पॅलेस मध्ये पोहोचलो. इथे एक नवीन प्रकार पाहायला मिळाला. इथल्या दालनांमध्ये प्रवेश करण्याअगोदर आपल्या बुटावरून एक कापडी-प्लास्टिक पिशवी घालावी लागते. तिला लेस असल्याने ती पायावर घट्ट बसते. इथल्या वातावरणात बाहेरची धूळ जाऊन नये हा उद्देश तर आहेच पण बुटाला चिकटून कृमी, कीटक किंवा वाळवी इथे जाऊ नये हा उद्देश. हा पॅलेस पीटर द ग्रेट ने राजपरिवाराच्या आणि स्पेशली आपली मुलगी कथेरिन हिच्यासाठी `विंटर पॅलेस' म्हणून बांधला. कथेरिन चा मुलगा आणि रशियाचा शेवटचा झार (राजा) `निकोलस-दुसरा' इथे काही दिवस राहिला होता. आत गेलो तर डोळे दिपवणारे सुवर्ण प्रदर्शनच मांडलेले होते. सगळ्या भिंती वर नक्षीकाम केले होते आणि ते सगळे प्युअर सोन्याचे दिसत होते. पण गाईडकडून कळले कि मूळचे हे लाकडी कोरीवकाम असून त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. पण नुसता मुलामा म्हटले तरीही शेकडो टन सोने इथे वापरले गेले असेल. हे राजे (झार) लोक किती श्रीमंती थाटात राहत असतील याची कल्पना आली. त्यात त्यांची वेगवेगळी दालने. सगळीकडे सोन्याचा मनसोक्त वापर. पण खरे सांगू, मला तर ते प्रचंड गॉडी वाटले. एखाद्या नटवलेल्या शो रूमसारख्या घरात राहायचे, रोज रोज तेच सोनेरी रंग बघायचे. नक्कीच कंटाळा येत असेल. पण त्याकाळी राजपरिवाराला आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करायची सवय असल्याने त्यांना हे वैभव बघून बरे वाटत असेल. इथे एक सोन्याचे घड्याळ होते. पण ते घड्याळासारखे दिसत नव्हते. एका झाडावर एक मोर बसलेला आणि दुसऱ्या लहान झाडावर कोंबडा. आठ -दहा फूट उंचीचे हे शिल्प संपूर्ण सोन्यात तयार केलेले आहे. हे घड्याळ अजून चालू आहे आणि दर तासाला तो मोर आपले पंख उघडतो आणि घड्याळाचे ठोके ऐकायला येतात असे गाईडने सांगितले. हे बघायला काही आम्हाला वेळ नव्हता. हा राजवाडा बघून आम्ही बाहेर पडलो आणि `नमस्ते' या इंडियन रेस्टोरेंटला जेवण करून निघालो ते पीटरहॉफला जाण्यासाठी.
`पीटरहॉफ' यालाच कॅथरीन (समर) पॅलेस किंवा पुश्किन पॅलेस असेही म्हणतात. सेंट पिटर्सबर्ग पासून २५ किलोमीटर अंतरावर हे पुश्किन गाव आहे. तिथे हा पॅलेस बांधला गेला. बसच्या ड्रायव्हरने ट्राफिक टाळून शहराला बाहेरून वळसा घेऊन गेलेल्या एलिव्हेटेड हायवेने नेले. हा हायवे अतिशय मॉडर्न आणि सुंदर होता. विशेषतः जिथे क्रॉसिंग असेल त्याठिकाणी उडडाणपुलांचे जाळेच उभारलेले होते. जाताने आम्हाला सेंट पिटर्सबर्गच्या इंडस्ट्रियल एरियाचे दर्शन झाले. शहराच्या मानाने इथे जरा विस्कळीत पणा दिसत होता. पण तरीही कचऱ्याचे ढीग मात्र नव्हते. एका तासाच्या प्रवासानंतर आम्ही पुश्किन ला पोहोचलो. लांबच लांब पसरलेला भव्य राजवाडा थक्क करणारा होता. सध्या हा हेरिटेज प्रॉपर्टी असून पर्यटंकासाठी खुला आहे. तिकिटे काढून आत गेलो. पुन्हा एकदा तो सोन्याचा भपका बघून आनंद वाटण्याऐवजी खेदच वाटत होता.
पीटर द ग्रेटनेच हा राजवाडा आपली मुलगी कॅथेरीन साठी समर पॅलेस म्हणून बांधून घेतला. या संपूर्ण एरियाचे क्षेत्रफळ आहे दहा हजार एकर. पण राजवाड्यापेक्षाही या जागेचे खरे सौंदर्य आहे ते आजूबाजूला असलेल्या शेकडो एकर पसरलेल्या बाहेरच्या बागेत. पण दुर्दैवाने आमचं तिथे जाण्याचे टायमिंग चुकलेच होते. नुकताच हिवाळा संपत होता, बर्फाखाली झाकली गेलेली जमीन मोकळी होतेय आणि झाडांना नवी पालवी फुटू पाहतेय. पूर्ण बहरलेली बाग बघायची असेल तर मे महिन्याचा शेवट किंवा जून महिना उत्तम. (या बागेचे फोटो मी नेटवर बघीतले आणि आपण काय मिस केले याची कल्पना आली) आणि त्यातही थंडी इतकी होती कि त्या थंडीत मोकळ्या बागेत फिरणे हे आनंददायी ठरण्याऐवजी त्रासदायकच ठरले असते. तरीपण जे काही समोर दिसत होते ते अवर्णनीय होतेच, त्यासाठी प्रत्यक्ष जाऊनच बघायला हवंय. दुरूनच बाग बघून आम्ही परत फिरलो. येताने भरपूर ट्राफिक लागले. सर्वजण पाणी पाणी करत होते म्हणून मग अल्ताफभाईंनी बस एका सुपर मार्केट जवळ थांबवली. इथे अनेक जणांनी शॉपिंग केले. किमती जरा आवाक्यातल्या होत्या. विशेषतः बऱ्याच जणांनी गॉगल्स, घड्याळे अशी खरेदी केली. पुन्हा बसने आम्हाला `नमस्ते' रेस्टोरंटलाच आणून सोडले. इथे चार-पाच वेळा येणे झाले पण ते वेग वेगळ्या बाजूने. त्यामुळे प्रत्येक वेळी तो भाग नवीन वाटत होता. रात्रीचे साडेआठ झाले तरी बाहेर भरपूर उजेड होता. त्यामुळे संध्याकाळीच जेवण करतोय असे वाटत होते.
जेवण करून पुन्हा हॉटेल अँबॅसेडर गाठले. दिवसभरच्या धावपळीने तसे सगळे दमले होतेच. आठ दहा किलोमीटर तरी चालून झाले असेल. त्यामुळे सर्वच जण न रेंगाळता आपापल्या रूम मध्ये गायब झाले. आणि अशा प्रकारे सेंट पिटर्सबर्ग मधील आमचा दुसरा दिवस संपला.........................
अनिल दातीर
(९४२०४८७४१०)